सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ चार अनुवादित लघुकथा : भाग्यवान // वेळेचा अभाव // संशोधन // ममत्व ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
१. भाग्यवान
दादा आणि भाऊ बालमित्र. दोघेही एका शाळेत, एका वर्गात शिकले. पुढे दादासाहेब शाळेत मास्तर झाले आणि नंतर हेडमास्तर. भाऊसाहेब एका कचेरीत कारकून म्हणून लागले. पुढे हेड क्लार्क झाले.
दोघांची लग्ने जवळपास एकदमच काही महिन्यांच्या अंतराने झाली. दादांचा मुलगा आदित्य आणि भाऊंचा मुलगा गौरव हेही समवयस्क. दादांना पुढे अमेय झाला. भाऊंना मुलगी झाली गौरी. ही सारी मुलेही एकाच शाळेत शिकली.
दादांची मुले आदित्य आणि अमेय अतिशय हुशार आणि प्रखर बुद्धीची. सतत नंबरात असलेली. स्कॉलरशिप मिळवणारी. दादांना त्यांचा अभिमानच नव्हे, तर गर्व होता. भाऊंच्या पुढे ते आपल्या मुलांचं वारेमाप कौतुक करत. आपण किती नशीबवान आहोत, हे वारंवार बोलून दाखवत. त्यांना थोडसं हिणवतसुद्धा. भाऊंची मुलेही हुशार होती, पण दादांच्या मुलांप्रमाणे चमकत्या करिअरची नव्हती.
आदित्य पवईहून एम. टेक. झाला. त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. सुंदर, सुविद्य पत्नी मिळाली. पुढे परदेशात मोठे पॅकेज मिळाले. तो अमेरिकेला निघून गेला. अमेयही त्याच्या पाठोपाठ अमेरिकेला गेला. तिथेच स्थिरावला. तिथेच लग्न केले. संसार मांडला.
गौरव डिप्लोमा झाला. नंतर एम. बी. ए . केले. टू व्हीलर दुरुस्तीचा वर्कशॉप सुरू केला. गोड बोलणं, कष्ट करण्याची तयारी यामुळे गौरवचा धंद्यात चांगलाच जम बसला. पुढे त्याने टू व्हीलर गाड्यांची एजन्सी घेतली. त्याचाही संसार मार्गी लागला.
दादा आणि भाऊ आता निवृत्त झाले होते. ते रोज संध्याकाळी भेटत. एकत्र फिरायला जात. वाढत्या वयानुसार रोजची भेट अधून मधून झाली. नंतर नंतर दुर्मिळ होऊ लागली. दोघांच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरू झाल्या. गौरव आपल्या वडलांची काळजी घेत होता. अधून मधून आपल्या दादा काकांकडे येऊन त्यांचीही विचारपूस करत होता. त्यांना काय हवं- नको ते बघत होता. गरजेच्या गोष्टी आणून देत होता.
दादांची मुले अमेरिकेत गेल्यानंतर सुरूवातीला एक-दोनदा येऊन गेली. नंतर नंतर मात्र त्यांना यायला वेळ मिळेनासा झाला. दादांना पेन्शन होती. ते काही आर्थिकदृष्ट्या आपल्या मुलांवर अवलांबून नव्हते.
दादांचे प्रोस्टेटचे ऑपरेशन करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का? यायला वेळ नाही.’ दादांच्या रक्तप्रवाहात ब्लॉकेजेस निघाली. अॅंजिओप्लास्टी करायचे ठरले. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का? यायला वेळ नाही.’ दादांना माईल्ड हार्ट अॅटॅक आला. गौरवने दादांच्या मुलांना कळवले. मुले म्हणाली, ‘पैसे पाठवू का? यायला वेळ नाही.’ गौरवने दादांचे सारे मुलाच्या मायेने केले.
दादांना आताशी वाटू लागलय, आपली मुलं थोडी कमी हुशार असती तर बरं झालं असतं. भाग्यवान आपण नाही. भाऊ आहे.
लेखिका – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
२. वेळेचा अभाव
फेसबुकवर जशी काही स्पर्धा चालू होती. क्षणांशात एक नवीन पोस्ट त्याने टाकली. त्यात अनेक फोटो सामील होते. रंग बदलणारे ढग, चित्रकार सूर्य, झाडांचे, पर्वतराज हिमालयाचे, मोहवणार्या आकर्षक धारणीचे, हसणार्या खिदळणार्या रत्नाकराचे, सर्पिणीसारख्या नागमोडी वळणाने जाणार्या सरितांचे, याचे… त्याचे… आणखी किती तरी…
यावेळी दु:खी-कष्टी झालेल्या सुनीलने आपल्या मृत झालेल्या वडलांचा देह आणि हार घातलेला त्यांचा फोटो अपलोड केला. आसपासच्या आगरबत्यातून, वर वर चढत जाणार्या धूम्ररेखा नुकतंच त्यांचं निधन झाल्याची ग्वाही देत होत्या.
सगळ्यात जास्त लाईक्स या फोटोला मिळाले.
एका बहिणीने आपल्या भावाला फोन केला,
‘तू त्यांच्याकडे जाऊन का आला नाहीस? निदान पोस्टवर त्यांच्याविषयी श्रद्धांजलीचे दोन शब्द तरी लिहायचे. सुनीलला सांत्वना मिळाली असती.’
‘ताई तेवढा वेळ नव्हता. लाईक तर केलं ना?’ आणि तो पुन्हा विविध सुंदर दृश्यांचे फोटो आपलोड करू लागला.
मूळ कथा – समयाभाव
मूळ लेखिका – अनिता रश्मि
भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
3. संशोधन
‘मुलांनो, मला असं वाटतं, यावेळी शेतकर्यांवर संशोधन प्रबंध हाती घ्यावा.’
‘फारच छान!’
‘मग सगळ्यात आधी नामवंत लेखकांकडून या विषयावरच्या कथा मागवून घ्याव्या.’
‘ठीक आहे सर, पण याबाबतीत एक गोष्ट मनात येतेय.’
‘अरे, नि:संकोचपणे सांग.’
‘सर, शेतकर्यांवर संशोधन प्रबंध हाती घेत आहोत, तर त्यावरील कथांची गरज आहे का?’
‘म्हणजे काय? संशोधनासाठी कथेत शेतकरी हे पात्र असायलाच हवं.’
‘मला म्हणायचय, प्रत्यक्षात शेतकरी काय करतोय, कसा जगतोय, याचं वर्णन यायला नको का?’
‘अजबच आहे तुझं बोलणं! वास्तवातल्या पात्रांवर कधी संशोधन झालय?’
‘पण सर, संशोधनात नवीन गोष्टी यायला हव्यात नं?’
‘ओ! समजलं तुला काय म्हणायचय!’
‘मग काय त्याबद्दल माहिती गोळा करूयात?’
अरे बाबा, आपल्याला, लेखकाच्या लेखणीच्या टोकाच्या परिघात असलेल्या कथांमधील शेतकरी पात्रांवर संशोधन करायचय. त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर अश्रूंसह दयाभव जागृत व्हायला हवा. शेत सोडून रस्त्यावरून ट्रॅक्टर फिरवणार्यांवर आपल्याला संशोधन करायचं नाहीये.’
‘पण असं तर ते आंदोलन करण्यासाठीच करताहेत नं!’
‘हे बघ, ज्या शेतकर्यांबद्दल तू बोलतोयस, त्यातील एक तरी अर्धा उघडा, अस्थिपंजर शरीर असलेला आहे का?’
‘पण सर, आता काळ बदललाय. प्रत्येक जण प्रगती करतोय.’
‘बाबा, एक गोष्ट लक्षात ठेव, संशोधनासाठी शोषित असलेलीच पात्र योग्य ठरतात. अशा पात्रांच्या कथाच काळावर विजय मिळवणार्या ठरतात.
मूळ कथा – शोध
मूळ लेखिका – अर्चना तिवारी
भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
४. ममत्व
सावित्रीच्या मुलीच्या सासरहून फोन आला की पारोला मुलगा झालाय. आजी झाल्याच्या आनंदात तिने आसपास, परिचित नातेवाईक यांच्यामध्ये मिठाई वाटली. काही वेळाने मुलीचा फोन आला, ‘माझ्याकडे यायचं, तर आपला चांगला आब राखून ये. आपली इज्जत आणि प्रतिष्ठा वाढेल, अशी ये.’
पारोचं जेव्हा लग्नं ठरलं, तेव्हा मागणी तिच्या सासरच्यांकडून होती. त्यावेळी तिने आपले दागिने विकून आणि जी काही जमा-शिल्लक होती, ती काढून, मोठ्या थाटा-माटात तिचं लग्नं लावून दिलं होतं.
यावेळी मागणी तिच्या स्वत:च्या मुलीची होती. खरं तर पारोला आपल्या आईच्या परिस्थितीची चांगली जाणीव होती. सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांना पारोच्या फोनबद्दल सांगितलं. पण दोघांनीही आपण स्वत:च पैशाच्या तंगीत आहोत, असं म्हणत हात झटकले. सावित्रीने मग आपल्या राहिलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या विकल्या. आपल्या नातवाला सोन्याची चेन केली. मुलीच्या सगळ्या परिवारासाठी कापड-चोपड घेतलं. फळांच्या आणि, मिठाईच्या टोपल्या घेतल्या आणि ती पारोकडे आली. पारोच्या सासरी तिची इज्जत वाचली पण ती जेव्हा घरी आली, तेव्हा तिच्यावर दु:खाचा पहाड कोसळला.
सावित्रीने आपल्या बांगड्या विकल्याचे ऐकून तिची मुलं आणि सुना अशा संतापल्या की वाद-विवाद, भांडणात ती दोन घास अन्नालाही महाग झाली. आता सावित्री मंदिरात सेवा करून आपला जेवणाचा आणि औषधापाण्याचा खर्च चालवते आणि तिथल्या धर्मशाळेच्या तुटक्या-फुटक्या खोलीत खंत करत आपलं म्हातारपणाचं ओझं वहाते.
इकडे मुलं आणि सुना सांगत फिरतात की आईला देवाची इतकी ओढ लागली आहे, आता ती घराच्या बंधनात बांधून राहू इच्छित नाही. ती आता संन्यासिनी झालीय. आता ती घरीदेखील येत नाही.
मूळ कथा – ममत्व
मूळ लेखक – अशोक दर्द
भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
☆☆☆☆☆
अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈