श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

सूर्य नवा दिवस नवा- भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळी जाग येताच शुभदाने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. साडेसहा वाजायला आले होते. बेडवरून उठून तिची पावले किचनकडे वळली. चहाचं आधण ठेवलं. बेसिनवर जाऊन ब्रश करून तिने तोंडावर पाणी मारलं. फक्कड वाफाळत्या चहाचे घुटके घेत ती बाल्कनीतल्या खुर्चीत बसली. गार वार्‍याची झुळुक तिला सुखावून गेला.

अजून सगळं आवरून स्वत:साठी जेवण बनवायचं होतं. आज जेवायला काय करायचं, हा मोठा प्रश्न असायचा. एकटीसाठी म्हणून कसली आवडनिवड असते? नवरोबा रविवारी येतो तेंव्हा त्याची कसलीच फर्माईश नसते. आपली लेक मात्र उद्याच्या ब्रेकफास्टचा, लंचचा, डिनरचा मेनू एक दिवस अगोदर सांगायची. कधी सुशांतला विचारलं तर, ‘आई तुझ्या हातचं काहीही चालेल, पण मेदूवडे करशील तर मज्जा येईल.’ असं म्हणायचा. आता सगळंच बदललं आहे.  

‘शुभदा’ या हाकेने तिचं लक्ष खाली वॉकिंग ट्रॅककडे गेले. वॉकिंगला चाललेल्या सुमित्राकाकूंनी हाय म्हणण्यासाठी आवाज दिला होता. शुभदाने त्यांना वरती येण्यासाठी खूण केली. थोड्याच वेळात सुमित्राकाकू लिफ्टने वरती आल्या. 

सुमित्राकाकू म्हणजे मध्यम बांधा, गोरा रंग, स्वच्छ सुती साडी, पिकलेल्या केसांवर मेंदी लावून सोनेरी झालेले केस, लुकलुकणारे निरागस टपोरे डोळे आणि सुरकुतलेल्या चेहर्‍यावर मधाळ हसू  ल्यालेली सुंदर मूर्ती.  

‘काकू, बसा तुमच्यासाठी चहा करते.’

‘नको ग, हे गेल्यापासून मी सकाळचा चहा सोडला आहे. बरं तुझी लेक काय म्हणतेय? सुशांतचं मेडिकल कसं चाललंय?’

‘खरं सांगू, काकू लेकीच्या लग्नानंतर माझ्या शरीराचाच एक भाग विलग झाल्यासारखं मला वाटलं होतं. माझ्या अवतीभवती मांजरीसारखी सदैव घुटमळणारी माझी लेक सासरी गेल्यानंतर मला पार विसरली आहे. गावात असून देखील तिला इकडे यायला वेळ नसतो. कधी अचानक वादळासारखी येते अन झपाट्याने निघून जाते. अधूनमधून केवळ रेसिपी विचारून झालं की ‘चल ठेवते, परत बोलू’ असं म्हणत लगेच फोन ठेवते. 

सुशांतला मेडिकलची अ‍ॅडमिशन मिळाल्यावर त्यानं घर सोडलं अन त्याच्या माघारी मी खूप रडले. तो सदैव कुठल्या ना कुठल्या सेमिनारमध्ये व्यग्र असतो. त्याच्याकडेही वेळ नसतो. माझ्याशी फोनवर चाललेलं संभाषण कधी एकदा संपेल याची त्याला घाई असते. 

पतिदेव मात्र रोज रात्री न चुकता फोन करतात. ‘जेवलीस काय? आजचा दिवस कसा गेला?’ हे आवर्जून प्रेमाने विचारतात. मुंबईलाच बदली झाल्यानं ते रविवारी किंवा मध्ये सुट्या पडल्या की येऊन जातात. एरव्ही मी एकटीच असते. दिवसभर बॅंकेत असते म्हणून बरं आहे. संध्याकाळी मात्र मला एकटीला घर खायला उठतं. 

काकू, मला आता कसलंच टेन्शन नाही. पण अलीकडेच उच्च रक्तदाब असल्याचं निदान झालं. आता एक कायमची गोळी नियमितपणे घ्यावी लागतेय. एक वेळ गोळी चुकली तरी चालेल पण फिरायला मात्र न चुकता जायला हवे असा डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं आहे. पण अजूनपर्यंत तरी फिरायला जात नाहीये.

‘अगं, तुझी मुलं आता आईबाबांचे बोट सोडून स्वतंत्रपणे चालायला शिकली आहेत. त्यांना त्यांचं म्हणून एक स्वतंत्र विश्व निर्माण करायचं आहे. स्वत:चे निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत, यातच तुला आनंद मानायला हवा.

आपण नागपूरहून इतक्या लांब आलो म्हणून काय आपलं आपल्या आईबाबांच्यावरचं, भावाबहिणीवरचं प्रेम ओसरलं आहे काय? आपल्या पंखाखाली पिलांना ऊब देणं हा मायेचा धर्म असला तरी त्यांना पंख फुटल्यावर आकाशात स्वच्छंद उडू देणं हे देखील पालकांचं कर्तव्यच असतं. जीवनातला हा बदल अपरिहार्य असतो तो स्वीकारायला हवा. मुलं आपल्यापासून कायमची विलग झाली म्हणून उगाच चिंता करू नकोस. त्या चिंतेचाच परिणाम आहे, तुझा रक्तदाब. सकाळी फिरायला जात जा, किती प्रसन्न वाटेल पाहा.

या विश्वात प्रत्यक्ष दिसणारा एकमेव देव सूर्यनारायण किरणांच्या रथावर आरूढ होऊन आपल्या भेटीला नित्य नव्या स्वरूपात येत असतो. कधी अनुभवून पाहा. जमलंच तर संध्याकाळच्या वेळी वंचित मुलांच्यासाठी काही करता आलं तर बघ.’ 

‘काकू, बसा मी पोहे करते. तुमच्यासाठीच म्हणून नाही, मलाही खायचे आहेत.’ 

‘शुभदा, तुझी हरकत नसेल तर पोहे मी बनवू काय?’ काकूंच्या लाघवी बोलण्यात आर्जव होतं.

शुभदा रिलॅक्स होत म्हणाली, ‘ठीक आहे काकू, बनवा. मी आंघोळ आटोपून येते.’               

शुभदा तयार होऊन येताच काकूंनी पोह्यांची प्लेट तिच्या हातात दिली. ‘पोहे अगदी मस्त झाले आहेत. काकू तुमच्या हाताला केवढी चव आहे!.’

‘अग हो, कुणाला तरी खाऊ घालणं आणि कुणाच्या हातात काही ठेवणं याचंच या हातांना अप्रूप वाटत आलंय. आता ती दोन्ही कामं थांबली आहेत. माझी सून मला किचनमध्ये फिरकू देत नाही. त्यांचं ते सामिष चमचमीत जेवण बनवणं मला जमत नाही. 

तुझे काका असताना घरखर्चासाठी म्हणून मुद्दामहून जास्ती पैसे द्यायचे. हिशेब पाहायचेच नाहीत. आतापर्यंत त्याच पैश्यातून पुरवून पुरवून मी मुलां-नातवंडाना काही तरी देत होते. आता तेहि संपत आलेत. कुणाकडे मागायची लाज वाटते. तुझी हरकत नसेल तर मी तुझा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करू काय?. महिन्याअखेरीस तू जमेल तेवढे पैसे माझ्या हातात टिकवले तरी चालतील. एवढंच वाटतं की माझ्या हातांची दानत शेवटपर्यंत टिकायला हवीय. आणि हे गुपित आपल्या दोघांतच असायला हवं.’ 

– क्रमशः भाग पहिला

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments