प्रा. विजय काकडे
परिचय
नाव : प्रा. विजय काकडे (कथाकार,लेखक,वक्ते)
शिक्षण : एम एस्सी (SET),संगीत विशारद
नोकरी : विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती. जि. पुणे
पद : विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स विभाग
विशेष कार्य :
१) कथाकथनाचे दोन हजार पेक्षा जास्त प्रयोग व विविध विषयावर पाचशे पेक्षा जास्त व्याख्याने
२)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल वक्ते म्हणून २००७ पासून कार्यरत आहे.
३) ९४ व्या अ.भा. साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी तसेच अंमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझल कट्ट्यासाठी निमंत्रित गझलकार म्हणून निवड झाली आहे.
४) ” के विजय ” या नावाने कविता व गझल लेखन तसेच ” विजलहरी ” या नावाने चारोळी लेखन
५) विजलहरी या गझल वृत्ताचे स्वतंत्रपणे संशोधन केले आहे.
६) नुकतेच सूलक म्हणजेच सूक्ष्म लघू कथा या कथा प्रकाराचे स्वतंत्र संशोधन केले आहे.
प्रकाशित साहित्य : सहा कथासंग्रह प्रकाशित.
पुरस्कार :
- राष्ट्रीय पुरस्कार : (१) कोविड योद्धा, विशाखा फाउंडेशन, नवी दिल्ली (२) कोविड- १९ फायटर सन्मान, महावीर इंटरनॅशनल मेडीकल सर्विसेस, मुंबई (३) Dr. Babasaheb AmbedkarNational Exllence award 2022
- राज्य पुरस्कार : (१) छ. शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकरंजन कला मंडळ, नाशिक (2010) (२) वपु काळे स्मुर्ती प्रतिष्ठानच्यावतीने वपु कथन गौरव पुरस्कार (2013) (३) आदर्श शिक्षक पुरस्कार, गंगाधर लोकवार्ता, कोल्हापूर(2020) (४) उत्कृष्ट स्थंभलेखक पुरस्कार, जाई फाउंडेशन, मुंबई ( २०२१ ) (५) साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, बाल संस्कार संस्था, ठाणे
साहित्य सन्मान : माझा शाळा प्रवेश दिन या ग्रंथास ५ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
आगामी प्रकाशने : एक कथासंग्रह, दोन कवितासंग्रह,
चारोळी संग्रह : १) नातीगोती 2) विजलहरी
- लेखसंग्रह व काव्य संग्रहांसाठी प्रस्तावनालेखन.
- विविध दिवाळी अंक व वृत्तपत्र यातून सातत्याने कथालेखन चालू असते.
मराठी ॲपच्या माध्यमातून डिजिटल खालील माध्यमावर विपुल प्रमाणात लेखन केले आहे-
१) प्रतिलिपी २) स्टोरी मिरर ३) पॉकेट नॉव्हेल
स्वतःचा युट्युब चॅनेल आहे ज्यावर अनेक कथा, मिमिक्री, भाषणे उपलोड आहेत.
जीवनरंग
☆ पसंत आहे मुलगा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆
महिनाभरानंतर मी महेशच्या घरी जात होतो तो आठ ते दहा दिवसांपासून कॉलेजला आला नव्हता. त्याची तब्येत बरी नाही की काय अशी शंका सहज माझ्या मनात आली.शिवाय माझे एक पुस्तक आणि दोन टॉपिकच्या नोट्स त्याच्याकडेच होत्या त्या मला त्याच्याकडून घ्यायच्या होत्या. मी गेलो त्यावेळी महेश घरीच होता आपली जुनी एम 80 गाडी पुसत होता. मला पाहताच त्याचा चेहरा खुलला. “का रे कसा आलास? “
“सहजच, आठवडाभर झाले कॉलेजला आला नाहीस,म्हटलं गेला की काय ते बघावं…”
” असा कसा जाईन रे? तुला बरोबर घेतल्याशिवाय! ” त्याच्या या वाक्यावर आम्ही दोघेही खळखळून हसलो आणि हासतहासतच एकमेकांना अलिंगन दिले.
” मग?काय झालं? कॉलेजमध्ये, काही विशेष? “
” विशेष काही नाही रे पण वहिनी जरा जास्तच कावऱ्याबावऱ्या झाल्यात… मला पण काही सांगता येईना. म्हणून थेट तुझ्याकडं आलो. “
” आत्ता गप्प बसं नाहीतर उगाच मार खाशील, अन हळू बोल आई घरात हाय,चल घरात, ” तो म्हणाला तसे बोलत बोलत आम्ही घरात गेलो. घरात जाऊन खाटेवर बसलो.
“आई, पाणी दे विजू आलाय,” महेशने आईला आवाज दिला त्याबरोबर पाण्याचा तांब्या घेऊन महेशच्या आई बाहेर आल्या. मी त्यांना मावशी म्हणत असे.
“बरेच दिवसांनी आलास रे ?”
” हो मावशी हल्ली अभ्यास फार वाढलाय ना, परीक्षा पण जवळ आल्यात ना? महेश आ…चार दिवस झालं कॉलेजला आला नाही (खरेतर मी आठ दिवसच म्हणत होतो परंतू महेशच्या वटारलेलंय डोळ्याकडे पाहून मी लागलीच आठ वरून चारवर आलो)म्हटलं चला त्याला भेटून तर यावं. “
अरे त्याला बरं नव्हतं अन रानात कामं पण चालल्यात ना म्हणून म्हटलं रहा घरी चार दिवस, काय व्हत न्हाय. बरं झालं बाबाआलास. बसा जेवायला दोघं.”
” नको, नको मावशी,मी डबा खाऊन आलोय आत्ताच.”
” ये विज्या लय नाटक करू नकोस,वाढ गं आई आम्हाला,मला पण खूप भूक लागलीय, ” महेश पुढे म्हणाला.
” अरे, पण मी खरंच जेवलोय म…महेश… ” पण माझ्या तशा म्हणण्याचा काही उपयोग झाला नाही कारण खरं सांगायचं तर मी जेव्हा जेव्हा महेशच्या घरी जायचो तेव्हा तेव्हा जेवण केल्याशिवाय तिथून माझीच काय पण सोबत असलेल्या कोणाही मित्राची कधीच सुटका व्हायची नाही आणि तिथे नाही म्हणायची तर आमची बिषाद नसायची. त्याच्या आईचा स्वभावच तितका प्रेमळ होता. असे मित्र आणि अशी आई मिळायला खरंच खूप भाग्य लागतं! शिवाय आमच्या दोघांची मैत्री तर फारच दृढ होती. एकमेकांना आम्ही खूप समजावून घ्यायचो.
महेश एक चांगला स्पोर्टमन होता पण अभ्यासात मात्र सोसोच होता. लेक्चर पेक्षा मॅचेस, पिक्चर आणि स्टाईल हेच त्याचं जीवन होतं.मी लेक्चरला रेग्युलर असायचो त्यामुळे महेशला नोट्स पुरवण्याचे माझे काम असायचे. महेशचा स्वभाव खूप मनमोकळा होता. त्याचा मित्रपरिवार सुद्धा खूपच मोठा होता. त्याची पर्सनॅलिटी पण छान होती. सडसडीत बांधा,उंचपुरा, स्टायलिश केस, दिसायला सावळा असला तरी तो नाकीडोळी छान होता. त्याचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा. सगळ्यांशी छान बोलायचा. कोणाशी भांडणतंटा वगैरे असली काही भानगड नव्हती. सगळ्यांच्यात मिळून मिसळून वागायचा. त्या उलट मी मात्र शांत संयमी आणि अभ्यासू असल्याने थोडा हुशारात मोडत होतो. आमच्या दोघांच्या मैत्रीचं खरं कारण म्हणजे एसटी. आम्ही दोघे एकाच एसटीने प्रवास करायचो.माझ्या गावातून सकाळी एसटी निघायची आणि दोन गावे ओलांडून महेशच्या गावात प्रवेश करायची. तोपर्यंत गाडीत शाळेच्या मुलांची गर्दी व्हायची. पण मी बहुतेकवेळा माझ्या शेजारची जागा महेशसाठी राखून ठेवायचो. वर्गात सुद्धा बहुतेकवेळा आम्ही दोघे एका बाकावरच बसायचो कारण त्याचं लिहिण्याचं स्पीड कमी असल्यामुळे तो माझं पाहून त्याच्या वहीत लिहायचा. लेक्चर संपल्यावर प्रॅक्टिकलला लॅबमध्ये जाण्याअगोदर मधल्या ब्रेकमध्ये आम्ही झाडाखाली डबे खायचो. एकमेकांच्या भाज्याच नव्हेतर थेट डबेच एकमेकांना शेअर करायचो. डबा नसलेले मित्रही आमच्यात मिसळायचे आणि मग अवघा रंग एकच व्हायचा. मौज- मजा -मस्ती खूप व्हायची.
खरेच,आयुष्यातले ते खरे सोनेरी दिवस होते!
हे सगळं मी आठवत असतानाच अचानक महेशने आवाज दिला.
“बस खाली.” तेव्हा कुठे मी भानावर आलो!
मावशींनी लगेच दोन ताटे वाढून आमच्यापुढे आणून वाढून ठेवली. आम्ही जेवायला बसलो. जेमतेम दोन घास खाल्ले आणि माझ्या पटकन काहीतरी लक्षात आल्याने मी म्हणालो, “मावशी, परवाच्या स्थळाचं काय झालं?”
” गप्प बस ! जेव गपचिप!,” विषय टाळण्यासाठी महेश म्हणाला.
तेवढ्यात आईचा आवाज आला, ” अरे पसंत आहे मुलगा त्यांना…! लगेच फोन येऊन गेला त्यांचा. “
” अरे वा! अभिनंदन महेशराव!मावशी आता होऊन जाऊ द्या! लवकर बार उडवा भावड्याचा !”
” अरे बाबा, बार उडवायचा पण महेशचा नाही.”
” मग? “
” तुझा… “
” माझा? म्हणजे मला नाही कळलं?, ” मी हातातला घास परत ताटात ठेवत आश्चर्याने म्हटले.
” अरे त्यांनी महेशला नाही तुला पसंत केलंय. “
” काय?,” मावशींच्या तोंडचे ते शब्द ऐकून मी उडालोच!”
” अरे, ते लोक म्हणाले, आम्हाला नवरदेवासोबत आलेला तो दुसरा मुलगा पसंत आहे. त्याला आम्ही आमची मुलगी देऊ, “मावशी माहिती देत म्हणाल्या.
” काहीतरीच काय मावशी, तुम्ही माझी मस्करी करताय… हो ना? महेश तू तरी… “
” अरे बरोबर बोलतेय आई, काही मस्करी वगैरे नाही. ” महेश म्हणाला.
” अरे पण माझा काय संबंध? माझा प्रश्न येतोच कुठे? आणि हे काय माझ्या लग्नाला अजून पाच ते सहा वर्षे लागतील. मला एम एस्सी करायचंय, त्यापुढे नोकरी आणि… “
” ते खरंय, पण त्यांनी तुलाच पसंत केलय आणि मुलगी छान आहे असं तूच तर म्हणत होतास?”
” हो पण ते सगळं महेशसाठी होतं…शिवाय त्याला पण मुलगीही पसंत आहे.”
” अरे पण तिला तू पसंत आहेस ना? हाच तर मोठा घोळ आहे. “
” मावशी प्लिज तुम्ही माझी चेष्टा करू नका.”
” अरे मी खरं बोलतेय बाळा. महेश? तूच सांग बाबा काय म्हणत होते ते लोक त्यादिवशी फोनवर?,” त्या महेश कडे बोट दाखवत म्हणाल्या.
मी महेशकडे पाहिले पण त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते तो जाम टेन्शनमध्ये दिसत होता.
बोलण्यापेक्षा तोंडातला घास भराभर चावण्याचे नाटक तो करू लागला.
– क्रमशः भाग पहिला
© प्रा. विजय काकडे
बारामती.
मो. 9657262229
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈