श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

मोबदला… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

सरगम कुमारचा चेहरा सात्विक संतापाने लालपिवळा झाला होता. बंगाली बाबू खूप भावनाप्रधान असतात असं इन्स्पेक्टर भोसले इतके दिवस ऐकून होते, आज प्रत्यक्ष पहात होते. 

सरगम कुमार ! इलेक्ट्रिक सतार वाजवणारा, शास्त्रीय आणि पाश्चिमात्य संगीताचा मिलाप आणि मिलाफ घडवणारा आणि त्याच्या या फ्युजन शैलीने तरुणाईत लोकप्रिय असलेला – संगीत क्षेत्रातले एक अग्रगण्य नाव. आजवर पुण्यात त्याच्या अनेक मैफिली गाजल्या होत्या आणि नुकत्याच झालेल्या एका मैफिलीच्या आयोजकांविरूद्ध तक्रार नोंदवण्यासाठी आज तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला होता. 

“ये कॉलेज का छोकरा लोग ने मेरा प्रोग्राम arrange किया उनके कॉलेज मे. बोले भोत पब्लिक आएगा. मेरे सेक्रेटरी से पैसे का बात पक्का किया. बोले ये महाराष्ट्र मे पानी की किल्लत है, पानी का भोत लफडा हुवा है, तो जो पैसा आयेगा वो उस के लिये इस्तेमाल करेगा. मैं सोचा, बच्चे कूछ नेक काम कर रहे है, तो मैं भी हा बोला. 

प्रोग्राम तो हूवा, लेकीन पब्लिक तो आयाही नहीं. फिर भी मैं बजाया, परफॉर्म किया. बाद मे बच्चे लोग बोलते है, लोग आयेही नहीं, प्रोग्राम लॉस मे गया, और मेरा बाकीका पैसा अभी देने से इन्कार कर रहे हैं. ऐसा कैसे चलेगा ? मैंने जो कला पेश की हैं, उसका पुरा मोबदला मिलना चाहिए के नहीं ? वो कूछ नहीं, तुम मेरा कंप्लेंट लिख्खो,” सरगम भडभुंज्याच्या भट्टीतील चण्यादाण्यांसारखा तडतडत होता.

इन्स्पेक्टर भोसले शांतपणे ऐकून घेत होते. देशभरात लोकसभेच्या निवडणुका चालल्या होत्या. नेमका ज्या संध्याकाळी हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच दिवशी पुण्यात दोन ठिकाणी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांच्याही मोठ्या नेत्यांच्या सभा लागल्या. वाहतुकीचे मार्ग बदलले गेले, काहींनी सभांना उपस्थिती लावली, बरेच जण – कुठे त्या गर्दीत अडका – म्हणत घरीच थांबले, आणि त्यामुळे कार्यक्रमाचा बऱ्यापैकी फियास्को झाला. आयोजक मानधन कमी करता येईल का विचारत होते आणि पैसे उभे करण्यासाठी महिनाभराची मुदत मागत होते. आणि इथे सरगम कुमार मात्र नियमावर बोट ठेवत हटून बसला होता.

“सरगमजी, आप का कहना एकदम उचित है. लेकीन रिपोर्ट लिखने से पहले मैं आप को एक कथा सुनाता हूं, उसके बाद, आप जो कहेंगे, वैसे करेंगे,” भोसले सरांनी मखलाशी केली. 

“१८९२ साली अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठात एक अनाथ विद्यार्थी होता. त्याची फी भरायची बाकी होती, आणि पैसे उभे करण्यासाठी त्याने आणि त्याच्यासारख्याच आणखी एका गरजू विद्यार्थ्याने, विद्यापीठात, पदरेवस्की नावाच्या एका ख्यातनाम युरोपियन पियानोवादकाचा कार्यक्रम आयोजित केला,” भोसले सर सांगू लागले, “त्या काळी, पदरेवस्कीला, त्या कार्यक्रमाचे, तब्बल २००० डॉलर द्यायचे असं ठरलं होतं. पण झालं भलतंच.

तुमच्या कार्यक्रमाला जसे लोक येऊ शकले नाहीत, तसे काही ना काही कारणाने याही कार्यक्रमाला लोक आले नाहीत. तिकीट विक्रीतून जेमतेम १६०० डॉलर उभे राहिले. त्या दोन विद्यार्थ्यांनी ते सगळे पैसे पदरेवस्कीला देऊ केले आणि उरलेल्या रकमेचा पुढील तारखेचा (post dated) चेक देऊ केला.”

सरगम कुमारला कहाणीत रस निर्माण झाला. ही तर आपल्यासारखीच कथा आहे हे ध्यानात येऊन, तो पुढे काय झालं हे जाणण्यासाठी, सरसावून बसला.

पदरेवस्कीने सगळी कथा जाणून घेतली. तो एक सहृदय कलाकार होता. आपण सगळे बहुधा विचार करतो की, मी याला मदत करत बसलो तर माझं काय होईल, मला यातून काय फायदा होईल ? पदरेवस्कीने वेगळ्या पद्धतीने विचार केला – मी जर यांना मदत केली नाही, तर यांचं काय होईल ? यांना कोण मदत करेल ?

त्याने तो उर्वरित रकमेचा चेक फाडून टाकला. जमा झालेले ते १६०० डॉलर त्या दोघा विद्यार्थ्यांना परत केले, सांगितलं, आधी तुमची फी भरा, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तुमचे काही पैसे खर्च झाले असतील तर ते वजा करा आणि त्यानंतर काही पैसे उरले तरच तुम्ही ते मला द्या. 

कालचक्र सुरू राहिले. पदरेवस्की पोलंड देशाचा नागरिक होता. पहिले जागतिक महायुध्द संपल्यावर, १९१९ साली, स्वतंत्र पोलंडचा तो पहिला पंतप्रधान झाला. युद्धजन्य परिस्थितीमुळे, त्यावेळी पोलंडच्या लाखो नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. देशाकडे ना अन्न होते, ना अन्न विकत घेण्यासाठी पैसा.

पदरेवस्कीने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विल्सन यांच्याकडे मदतीची याचना केली. अमेरिकेच्या अन्न आणि मदत प्रशासनाच्या हर्बर्ट हूव्हरने अतिशय तत्परतेने मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य साठा उपलब्ध करून दिला (हे हूव्हर पुढे स्वतः अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झाले). पोलंडच्या नागरिकांवरील संकट टळलं.

पंतप्रधान पदरेवस्की हूव्हरला भेटले. आपल्या नागरिकांना केलेल्या समयोचित मदतीसाठी आभार मानण्यासाठी त्यांना शब्द सापडेनात. पण हूव्हर यांनी पदरेवस्की यांना थांबवलं, ते म्हणाले, सर, तुम्ही माझे आभार मानायचे काहीच गरज नाही. तुम्हाला कदाचित आठवणार नाही, पण २७ वर्षांपूर्वी, अमेरिकेतील दोन विद्यार्थ्यांना कॉलेजची फी भरायला तुम्ही मदत केली होतीत, त्यातला एक विद्यार्थी मी होतो.”

भोसल्यांची गोष्ट संपली होती. सरगम कुमार त्याच्या तंद्रीत हरवला होता. त्याने त्याच्या असिस्टंटला बोलावले, आणि म्हणाला, “तू जा, वो छोकरा लोग को बोल दे, की वो बाकीका पैसा देने का कोई जरुरी नही है. मेरे को मेरा पुरा मोबदला मिल गया. और हां, मेरी तरफ से ये चेक लेकर जाना और वो छोकरा लोग को देना. बोलना किसानोंको – गाँव में पानी के लिये मेरी तरफ से ये मदद. 

काली मां ने आजतक इस सरगम को भोत दिया हैं. उस मे से थोडा तो देना मेरा फर्ज बनता है.” 

डोळ्यातले पाणी पुसत, घशातील आवंढा गिळत, सरगम कुमारने भोसले सरांशी हस्तांदोलन केलं, आणि तो निघून गेला. आणि भोसले सर, गरमागरम चहाचा कप हातात घेऊन, कार्यक्रमाच्या आयोजकांना ही माहिती देण्यासाठी फोन करू लागले.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments