श्री सुनील शिरवाडकर
जीवनरंग
☆ लाली ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
सुलु जेव्हा सिबीएस वर उतरली तेव्हा तीन वाजले होते.सुलु बीवायके कॉलेज मध्ये शिकत होती.शेवटच्याच वर्षाला होती.सध्या कॉलेजला सुट्ट्या होत्या.. दिवाळीच्या..त्यामुळे ती गावी घरी गेली होती.
तिचं गाव नाशिकपासून तास दिड तासाच्या अंतरावर होतं..निफाड जवळ.एका मैत्रीणीकडुन तिला काही नोट्स घ्यायच्या होत्या.. म्हणून ती नाशकात आली होती.
आज तिच्या सोबत तिची लहान बहीण होती..लाली तिचं नाव.आठ दहा वर्षांची होती.पहील्यांदाच ती नाशकात आली होती.शहर म्हणजे काय हे ती केवळ ऐकुन होती.बसमधुन उतरल्या पासून ती नुसती इकडे तिकडे बघत होती.सगळीकडे गर्दी..माणसांची..गाड्यांची.. सिग्नलला तर त्यांना खुप वेळ थांबावं लागलं.एवढ्या सगळ्या गाड्या कुठुन येतात.. आणि कुठं जातात हाच प्रश्न तिच्या मनात आला.
तिचं गाव सोडून ती कधी कुठे गेलेलीच नव्हती.तिचं गाव अगदीच छोटं..खेडचं म्हणा ना! तिच्या त्या एवढ्याश्या गावात तिच्या ताईचा रुबाब खुप.शहरात शिकणारी मुलगी ना! कुणाला नाशिकहून काही आणायचं असलं तर तिच्या ताईचीच सर्वांना आठवण यायची.मोबाईल मधलं काही अडलं तरी सुलुताईच लागायची सर्वांना.लालीला खुप अभिमान वाटायचा आपल्या ताईचा.
आत्ताही तिनं पाहिलं.. किती सहजतेने ती या शहरात वावरत होती.सिबीएस वरुन उतरल्यावर तिनं समोरुनच बस पकडली.कुठली बस.. किती नंबरची बस..कुठुन येते.. कुठे जाते सगळं काही तिला माहीत.
“ताई मला टी शर्ट पॅन्ट घेणार ना तु?मग चल ना..”
“हो लाली.. माझं काम झालं ना..की मग आपण जाऊ शालीमारला..”
“आणि गंगेवर पण ना?मला आईस्क्रीम खायचीए”
“हो..हो.. आहे माझ्या लक्षात”
दोघी बसमधून उतरल्या.कॉलेज रोडवरची दुकाने..शोरुम्स.. बिल्डिंग पाहून लाली अचंबित झाली.सुलुने तिचा हात घट्ट पकडला.. एका बिल्डिंग मध्ये त्या आल्या.सुलुने सहजपणाने लिफ्ट खाली बोलावली.दोघी जणी लिफ्टमध्ये शिरल्या.दरवाजा आपोआप बंद झाला.
“हं..ते पाच नंबरचं बटन दाब”
सुलु म्हणाली.लालीला खुप मजा वाटत होती.लिफ्ट थांबली.. दरवाजा उघडला.दोघीजणी एका फ्लॅटमध्ये आल्या.
सुलुच्या मैत्रिणीनं दोघींना पाणी दिलं..मग सरबत दिलं.लालीच्या तोंडुन शब्दच निघत नव्हता.तो फ्लॅट..ते उंची फर्निचर.. आणि याही पेक्षा सुलुची ती मैत्रीण..तिची आई.. सगळ्यांच्या पुढे आपण खुपच गावंढळ दिसतो आहोत.. नाही आपण गावंढळच आहोत असंच तिच्या मनानं घेतलं.
सुलुचं काम झालं.दोघी खाली उतरल्या.सगळीकडे दुकानच दुकानं.
“ताई मला पॅन्ट..ते बघ तिकडे.. किती मोठ्ठं दुकान आहे”
लाली मागेच लागली.सुलुने तिची समजुत घातली.
“आपण तिकडे शालीमारला जाऊ.. इकडे खुप महाग असतात कपडे”
लाली खुप चिडली.तिला ताईचा रागच आला.मघाशी त्या फ्लॅटमध्ये जाऊन आल्यानंतर तिला आपली ताई एकदमच गावंढळ वाटायला लागली.त्यात ताईने आता इकडुन पॅन्ट घ्यायची नाही म्हणून सांगितलं.पाय आपटतच ती ताईचा हात धरुन चालत होती.
“ताई..पाय दुखायला लागले माझे..मला रिक्षात बसायचं”
“नाही लाले..ती बघ आलीच बस”
सुलुने ओढतच तिला बसमध्ये खेचलं.बस खचाखच भरली होती.लालीला आता खुप कंटाळा आला होता.आजूबाजूला रिक्षा..कार्स..टु व्हिलर्स धावत होत्या.. आणि ती ताईचा हात धरुन कशीबशी उभी होती.
शालीमारला दोघी उतरल्या.लालीच्या मनात ताई बद्दल खुप राग भरुन राहिला होता.तिकडे किती छान मोठ्ठी दुकानं होती.. रस्ते..इमारती..ती श्रीमंती..आपली ताई ही अशीच..खेडवळ..गावठी.. काही काही घेऊन देत नाही मला.पळुन जावसं वाटतं मला.
इकडे शालीमारला पण दुकानच दुकानं..गर्दीच गर्दी..रोड क्रॉस करताना ताई तिला ओढत होती..पण..
..पण गडबडीत ताईचा हात सुटला.इकडे तिकडे बघती तर ताई कुठे? कुठे गेली ताई?
लाली घाबरली..बावरली.. सगळ्या बाजूंनी माणसंच माणसं..पण तरीही तिला एकटेपणाची जाणीव झाली.डोळे भरुन आले.बाजुला एक मारुतीचे मंदिर होतं.तिथल्या पायरीवर बसुन ती रडायला लागली.
तिचं ते रडणं ऐकुन एक बाई तिच्या जवळ आली.
“काय नाव तुझं बाळ?”
असं म्हणून तिची समजुत घालु लागली.तुला खाऊ देते..गाडीत फिरवते.. असं खुप काही काही सांगु लागली.
मघाशी या सगळ्या गोष्टी लालीला हव्या होत्या..पण त्या ताईच्या सोबतीने.
लालीचं एकच वाक्य.. मला ताई पाहिजे.. मला तिच्याकडे जायचं.मघाची ती बाई आता लालीवर चिडली.तिचा हात धरुन ओढु लागली.बाजुला असलेल्या रिक्षात ती लालीला घेऊन जाऊ लागली.
लाली जीवाच्या आकांताने ओरडली..
“ताई.. ताई..”
तेवढ्यात कुठुनतरी तरी सुलु आली.ती शोधतच होती लालीला.त्या बाईच्या खाडकन कानाखाली मारत तिनं लालीला ओढून जवळ घेतलं.
गर्दी जमली.. पोलिस आले. .त्या बाईला आणि रिक्षावाल्याला घेऊन पोलीस निघून गेले.. गर्दीही पांगली.
सुलुनं लालीला घट्ट धरून ठेवलं होतं.लालीला आता खुप सुरक्षित वाटत होतं.तिच्या मनात आलं..आपली ताई खरंच किती ग्रेट..किती शुर आहे.मघाशी आलेला राग आता कुठल्या कुठे पळून गेला होता.
ताईची ओढणी धरुन लाली म्हणाली..
“ताई..चल ना आता घरी लवकर..आई वाट पहात असेल.”
“अगं हो हो.. आपल्याला अजुन खरेदी करायचीए.. आईस्क्रीम खायचं आहे.. जायचं ना गंगेवर?”
“हो..हो..”
लाली पुन्हा एकदा तिच्या ताईला बिलगली.
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈