श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ गोष्ट एका सी. ई.ओ.ची — भाग-२ ☆ श्री मंगेश मधुकर ☆
(मॅडमच्या बोलण्यानं काळजाचा ठोका चुकला.तेवढ्यात फोन आल्यानं मॅडम बिझी झाल्या आणि मी मात्र…) इथून पुढे
पाचेक मिनिटं झाली तरी सीईओ फोनवर बिझी आणि मी नुसताच बसलेलो.सहनही होत नाही अन सांगताही येत नाही अशी अवस्था.शेवटी एकदाचा फोन संपला.
“सॉरी!!” चेअरमन साहेबांचा फोन होता.जरा महत्वाचं काम होतं”
“मॅडम,नक्की काय झालंय?एकट्यालाच का इथं बोलावलंय”
“मि.अनिल,सगळं कळेल.जरा धीर धरा.”
“काही चूक झाली असेल तर आधीच माफी मागतो.नोकरीची खूप गरज आहे.”मी हात जोडले तेव्हा मॅडम मोठ्यानं हसायला लागल्या.
“अरे अनिल,मला ओळखलं नाही का?”
“खरं सांगू.नाही ओळखलं.”
“अरे मी मीनाक्षी,‘ब’ तुकडी,नववीपर्यंत आपण एकाच वर्गात होतो.”कसं अन काय रिअॅक्ट व्हावं हेच समजत नव्हतं.टोटल ब्लॅंक.कालच डायरीतला नंबर बघितल्यावर आठवण झाली आणि आज चक्क तिची भेट.भान हरपून एकटक बघत राहिलो. “हॅलो,कुठं हरवलास”मॅडमच्या आवजानं तंद्री तुटली.
“जुनी ओळख चांगली लक्षात ठेवलीत”
“नॉर्मल बोल.मॅडम नको शाळेत म्हणायचा तसं ‘मीना’ म्हण आपण ऑफिसमध्ये नाहीये.इथं आपल्याला ओळखणारं कोणी नाही.”
“पण आपल्यामध्ये कंपनी आहे ना.मी साधा ऑफिसर आणि तुम्ही सीईओ..आपल्यातलं अंतर खूप मोठयं.”
“सीईओची ऑर्डर आहे असं समज.”
“का त्रास देता”
“अनिल,तुझ्यात काहीही फरक नाही रे.शाळेत होता तसाच आहेस.लाजरा-बुजरा,घाबरट,कायम डोक्यावर शंभर किलोचं ओझं असल्यासारखा वागणारा.”
“तू …सॉरी!!तुम्ही मात्र पार बदललात”
“खरंय,चवळीची शेंग होते आता मस्त गरगरीत दुधी भोपळा झालेय.”दोघंही खळखळून हसलो.
“किती वर्षांनी भेटतोय.”मी
“सत्तावीस”
“अरे वा!!एवढं परफेक्ट लक्षात आहे”
“तुला कधीच विसरले नाही.”मला जोराचा ठसका लागला पण मनात आनंदाचा धबधबा सुरू झाला.
“म्हणजे तुम्हीपण..”चेहऱ्यावरचा आनंद मला लपत नव्हता.
“तुम्हीपण म्हणजे,ए बाबा,आधी पूर्ण ऐक.प्रेमाचा वगैरे मामला नाहीये.”तिच्या परखड बोलण्यानं बटन बंद केल्याप्रमाणे आनंदाचा धबधबा बंद झाला.
“मग लक्षात रहायचं कारण ….”
“तुझा चांगुलपणा,वर्गात सगळे छळायचे,खोड्या काढायचे तरीही तू नेहमीच मदत करायचा.कधीच तक्रार केली नाहीस.माझ्या महितीतला इतकं चांगलं वागणारा पहिला तूच ..”
“थॅंक्यु”
“तुला तर माहितीये की शाळेत मी बिनधास्त होते.मुलांना त्रास द्यायला आवडायचे.त्यांच्याशी भांडायला मजा यायची.एकदा मधल्या सुट्टीत वर्गात आपण दोघंच होतो.सरांच्या खुर्चीला मी च्युइंगम लावलं ते सरांच्या लक्षात आलं.असले उद्योग नेहमी मुलंच करतात म्हणून सगळा दोष तुझ्यावर आला.सर वाट्टेल ते बोलले. वर्गासमोर अपमान केला तरीही तू गप्प राहिलास.वर्गाबाहेर काढलं.जाताना तू माझ्याकडं पाहिलंस त्यावेळच्या तुझ्या नजरेतला थंडपणा अस्वस्थ करून गेला.आजही आठवलं कि अंगावर काटा येतो/”
“जे झालं ते झालं”
“तसं नाही रे!!सुरवातीला मजा आली पण नंतर अपराध्यासारखं वाटायला लागलं.तू चूपचाप सगळं सहन केलसं पण माझं नाव सांगितलं नाहीस.ही गोष्ट मनाला भावली.तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला असं वाटत होतं.आईशी बोलले नंतर सरांची माफी मागितली.तुझीही माफी मागायची होती पण भेट झालीच नाही.”
“कारण मी शाळा सोडली.त्या संध्याकाळीच वडिलांना अपघात झाला अन चार दिवसांनी ते गेले आणि सगळं बदललं.मामाशिवाय कोणाचाच आधार नव्हता त्यामुळं त्याच्या गावी गेलो.तिथंच पुढचं शिक्षण पूर्ण केलं”
“सॉरी!!हे काहीच माहिती नव्हतं.तुझं एकदम बेपत्ता होणं खूप धक्कादायक होतं.मूळापासून हादरले.माझ्यामुळे तू काही करून तर घेतलं नाही ना या विचारानं खूप भीती वाटत होती.तुला खूप शोधलं.मनात खूप भयंकर विचार येत होते.तुझ्यासाठी रोज प्रार्थना करत होते.”
“माझ्यासाठी एवढं काही चालू होतं अन मला काहीच माहिती नाही.प्रार्थना फळाला आली अन भेट झाली”
“तेच तर!! आज अचानक तुला पाहील्यावर खूप खूप आनंद झाला.कधी एकदा भेटते असं झालं होतं.मित्रा,माफ कर.त्यावेळी खूप चुकीचं वागले.”मीनाक्षीनं हात जोडले तेव्हा डोळ्यात पाणी होतं.
“ओके.आता सोडून दे.उगीच माफी वैगरे नको.लहान होतो.समजही कमी होती.”
“शाळेत असताना होता तसाच आताही आहेस.तुझ्याविषयी कंपनीत खूप चांगलं बोलतात.तुझा प्रामाणिकपणा, मदत करण्याच्या स्वभावामुळे खूप फेमस आहेस.”
“मदत करायला आवडतं.कामाचं म्हणशील तर ज्याच्यामुळे घर चालतं त्या कंपनीसाठी शंभर टक्के योगदान देणं यात काही विशेष नाही.”
“हेच तर खास आहे.सगळेच असा विचार करत नाही.तूझं मन मोठं अन स्वभाव खूप चांगला आहे.”
“बास आता!!इतकं कौतुक ऐकायची सवय नाही”
“पुन्हा एकदा सॉरी यार!!”मीनाक्षीनं हातावर हात ठेवला तेव्हा सर्वांग शहारलं.
“ए बाई!!सोड ना तो विषय,जाऊ दे”
“बाई नको हं.अजून म्हातारी झाली नाहीये.काय गिफ्ट पाहिजे ते बोल.”
“पुन्हा पुन्हा आपली ‘भेट’ झाली तर तेच जगातलं सर्वात भारी गिफ्ट असेल.”
“डन,इतक्या वर्षांनी भेटलास आता तुला सोडणार नाही.भेटत राहूच.तुझ्यासाठी काय करू सांग.ईनक्रीमेन्ट, प्रमोशन,जो चाहिये वो बोल”मीनाक्षी उत्साहानं म्हणाली.
“रागावू नको पण एक विनंती आहे”
“बिनधास्त बोल”
“आपली मैत्री आणि कंपनी दोन्ही वेगवेगळे राहू दे.मला कामाच्या जोरावर पुढं जायचंय.शिफारशीवर नाही.”
मीनाक्षी अपार कौतुकानं पाहत होती.त्यामुळे मी जास्तच संकोचलो.
“भूक लागलीयं”
“काय खाणार”
“वडा पाव?”माझ्या फर्माईशीवर मीनाक्षीचा चेहरा भूत पाहिल्यासारखा झाला.
“अगं,गंमत केली.इथल्या मेन्यू कार्डातलं काही कळणार नाही.तुझ्या आवडीचं मागव.”मीनाक्षीनं ऑर्डर केली.
“मीना,जास्त काही मागवू नकोस.मी काही पट्टीचा खाणारा नाही आणि बिल..”
“ते मीच देणार”मीनाक्षी पटकन म्हणाली.
“तेच म्हणतोय.तुलाच द्यावं लागेल.इथलं बिल परवडणार नाही कारण आमची कंपनी पगार फार कमी देते.”डोळे वटारत मीनाक्षी मनापासून हसली.
— समाप्त —
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈