सौ राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆ सांगड नव्या जुन्याची… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
“बाबा किती धावपळ करताय?पाच मिनिटं बसा ना जरा माझ्याजवळ!.बाबा मला बोलायचय तुमच्याशी.आधी ह्या गोळ्या घ्या बरं.!मी विसरलेच होते पण स्नेहा मावशिने आठवण करून दिली.” दम लागलेल्या वडिलांना प्रेमाने दम भरूनच अर्पिताने खाली बसवल. “किती थकलेत मानसिक ताणामुळे आपले बाबा. कोरोना मध्ये आई गेली आणि खचलेच आपले वडील. आई असतानाच अर्पिता चा साखरपुडा झाला होता.लग्न अगदी तोंडावर आलं होत.आणि अचानक ही कोरोना ची लाटआली. जबरदस्त तडाखा बसला त्यांच्या घराला.संकटाची ही लाट आली आणि अर्पिता च्या आईला घेऊन गेली. सांवरायला उसंतच मिळाली नाही. लग्न लांबणीवर पडले. पण मुलाकडच्यांना आता उसंतच नव्हती कारण अमरची वयस्कर आजी मागे लागली होती, त्यांचं म्हणणं,’ माझा काही भरोसा नाही. माझ्या डोळ्यासमोर नातसून आणा आता लवकर ‘. त्याप्रमाणे तिचे सासु सासरे घरी आले आणि त्यांनी बाबांना समजावलं . दुःखाचा डोंगर बाजूला सारून प्रयासाने दुःख आवरून लेकीच्या भवितव्यासाठी मधुकरराव लग्नकार्याच्या सिद्धतेसाठी उभे राहयले. नव्हे नव्हे! त्यांना उभारी धरणं भागच होत.
बोल बोलता लग्न दोन दिवसावर आल. हीच बाबांशी बोलायची वेळ आहे असे म्हणून अर्पिता ने मधुकररावांना जबरदस्तीने खाली बसवलं आणि म्हणाली, “बाबा उद्या मी सासरी जाणार कन्यादान करताना मी सांगते तो संकल्प सोडून एक हट्ट पुरा कराल ना माझा?” तिला जवळ घेत ते म्हणाले” काय वाटेल ते करीन मी तुझ्यासाठी बाळा !. सांग काय करू मी तुझ्यासाठी ? प्रसंगी माझ्या लाडक्या लेकीसाठी प्राण सुद्धा द्यायला तयार आहे मी”. असं नकां ना बोलू बाबा! कशाला ही मरणाची भाषा?आधीच ह्या कोरोनाने आई हिरावून घेतलीय माझी. तुम्ही आणखी पोरकं नका नं करू मला . दुर्दैवाने 21 साल खूप खूप वाईट गेले आपल्याला नवीन सालाला आपण सारे दुःख गिळून सामोरं नको का जायला? झाले गेले गंगेला मिळाले असे समजून मागची वर्ष विसरूया आपण ” . अर्पिता वडिलांना कळवळून विनवत होती .दुःखाचा उमाळा आवरत मधुकरराव तिला विचारत होते ” काय करू ग मी अर्पू? तुझ्या आईला नाही मी विसरू शकत”. “समजतय बाबा मला.. पण असं पहा हें ही तितकंच कटू सत्य आहे की,आपली आई तिच्या आठवणी, तिचा वियोग, ते मागचे दिवस परत नाही येणार आता. माणसे निघून जातात पण आपण हळवी माणसं मनाच्या तळात त्या दिवसांचे दुःख,दुरावा बांडगुळासारखं उराशी बाळगत राहतो.पण बाबा एवढ आयुष्य पडलय आपल्या पुढे .हे बोनस डे स्वतःला सावरून मनशांतीतच घालवायला हवेत तुम्ही ..मी सांगते तुम्हाला भूतकाळावर पडदा टाकून भविष्यकाळ कसा जगायचा ते.पण त्याआधी ऐकाल माझं? मला वचन हवय तुमच्याकडून. पुढील आयुष्य आरोग्य, सुख शांततेत जगण्यासाठी तुम्ही — तुम्ही दुसरे लग्न करा बाबा.”उरावर दगड ठेवून बाबांच्या सुखाकरीता एका दमात हे सगळं बोलतांना दम लागला तिला. पण काय करणार ? कधीतरी ह्या विषयाला वडिलांच्या भवितव्याचा विचार करून ,वाचा फोडावीच लागणार होती .
बाबा ओरडले तिच्या अंगावर पण आपल घोड पुढे दामटत ठामपणे ती म्हणाली,” हे सांगताना मला सुद्धा खूपच त्रास होतोय हो. पण तुमचा उदास,एकाकी भविष्य काळ डोळ्यांसमोर आला नां की जीव घाबरा होतोय हॊ माझा!आता तर तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला मी पण नाहीये . कसं होणार तुमच ?आजी पण आता थकलीय. मनाने शरीराने आणि तुमच्या काळजीने खचलीय ती. मुलाचा सुखाचा संसार सुखाने पहात आरामात दिवस काढायचे दिवस आहेत तिचे.तुमचा दोघांचा विचार करूनच काय करायचं ते आधीच ठरवलय मी. मागच्या अंधाराला दूर सारून नववर्षाच्या च्या प्रकाशात पदार्पण करूया बाबा आपण .आणि हो आजी मी,तुम्ही दुःखी असलेलं आईला पण नाही आवडणार. काळाच्या पडद्या आड गेलेली आई परत नाही येऊ शकणार हे कटू सत्य आहे. पण ते उरावर दगड ठेवून पचवायला हवय आपल्याला . त्यासाठी ऊसनं अवसान आणून बाहेर पडायलाच हवय ना आपण! आणि म्हणूनच आईच्या जागी दुसरी आई हवीय मला. माझं माहेरपण जपणारी, आजीची तुमची काळजी घेणारी,आणि आपलं हे घरकुल सावरून घेणारी अशी आई कीं तिच्या जीवावर निर्धास्तपणे मी सासरी आनंदाने राहू शकेन . बाबा तुम्ही फक्त हो म्हणा! पुढचं सगळं मी आणि आजी बघून घेतो.” आता मात्र आश्चर्य करण्याची पाळी मधुकर रावांची होती. ते म्हणाले, ” म्हणजे ? आई पण तुझ्या कटात सामील आहे की काय ? मला नाही वाटत,मलाच काय तिलाही नाही पटणार हे !” “नाही बाबा आपली आजी समंजस, धोरणी भविष्यकाळाचा वेध घेऊन, विचार करणारी कणखर बाई आहे. सगळ्यांच्याचं सुखाचा दूरदृष्टीपणे ती विचार करते. हॊकार फक्त तुमच्याकडून हवा आहे. ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणून या दुःखातून तुम्ही बाहेर पडा.” “नाही बाळा परिस्थितीने मी इतका खचंलोय की मी नाही बाहेर पडू शकत या दुर्दैवापासून”. तें निराशेने म्हणाले. ” तुम्ही आजीच्या वयाचा विचार करा. तिकडे बघा नं जरा.! खिडकीतून बाहेर त्या झाडाकडे बोट दाखवत अर्पिता वडिलांना समजावत म्हणाली, ” ते झाड पाहिलंत कां बाबा? कुणीतरी अर्धवट कापलं होतं,पण ते उन्मळून नाही पडलं अनेक पाखरांची घरटी सांवरण्याकरता ते नुसतं उभं नाही राहयलं तर नीट बघा त्याला पालवी फुटलीय. कापलं तरीही आपली उभारी नाही सोडली त्यानी. तुम्ही पण आमच्यासाठी उमेद धरा. आई मला पोरकं करून गेली. तुम्ही मला खूप वर्ष हवे आहात. तुम्हाला आता स्पष्टच सांगतें तुमच्या बरोबर सगळ्यांची कोसळणारी मनं संभाळणारी, तुम्हाला साजेशी अशी बायको म्हणून मी,आजी आणि आईकडचे आजी-आजोबा यांनी स्नेहा मावशीची निवड केली आहे.” मधुकरराव किंचाळलेच एकदम, ” कांsss य ?” “शांत व्हा बाबा तिचे मिस्टर अपघातात गेलेत, ती पण दुःखी आहे. शेवटी उरलेल्या आयुष्यात वेलीला झाडाचा आधार हा हवाच ना ? तिला पटवलय आम्ही. आता फक्त तुम्ही मदतीचा हात पुढे करा. या नव्या वर्षात तुमच्या पाऊल उचलण्याने,होकाराने तीन कुटुंब सावरतील. आपल्या आजीला मायेची सून मिळेल, आईचे माहेरघर सावरलं जाईल. कारण त्याआजी आजोबांनाही एक मुलगी गेल्याचे दुःख आहे आणि दुसरीही निराधार होऊन माहेरी आलीय.तिची केव्हढी मोठी काळजी उतारवयात आहे त्याना. आईच्या , जाण्याने आपण संकटात सापडलो होतो, तेव्हा आपल दुःख बाजूला सारून स्नेहा मावशीने फार मोठी मोलाची साथ दिली आहे आपल्याला. आता तुम्ही स्वतःला सावरून तिला मदतीचा हात देण्याची हीच वेळ आहे बाबा. मला हक्काचं माहेर मिळेल . माय गेली पण मावशी तर उरली आहे नां? दुसरी आईच आहे ती माझी! आणि हो आणखी हट्ट आहे माझा . तुमचं लग्न माझ्या आधीच झालं पाहिजे आणि ह्यांना तुमच्या दोघांकडूनच कन्यादान हव आहे. मग काय! हो म्हणाल ना बाबा?आता पण नाही आणि काही नाही . हा हट्ट पुरवण्याचं वचन दिलय तुम्ही मला. तेव्हा आधी लग्न तुमचं आणि स्नेहा मावशीच. मग लग्न माझ “.
अखेर लेकीच म्हणणं मधुकररावांना मान्य करावच लागल. शेवटी मायेनी विणलेलं नातं इतकं घट्ट असतं की ते उसवलं जातच नाही. बाल हट्ट त्यांना पुरवावाच लागला. ठरवल्याप्रमाणे त्या घरात दोन लग्नकार्य झाली .कन्यादानाच्या वेळी सारं घर हंसत होत. मागील वर्षांच्या काळोखाला ‘रामराम’ ठोकून ते घर नववर्षाच्या प्रकाशात न्हाहून निघाल होत.. अगदी शांत मनाने शुभ कार्य पार पडलं. तिन्ही घराचा डोलारा सावरला गेला. वयाने लहान असूनही अर्पिताने नव्या जुन्या विचारांची सांगड घालून माहेरघर सावरलं होतं. माप ओलांडून तिच्या लाडक्या स्नेहा मावशीचा तिच्या माहेरी प्रवेश झाला.आणि आता तिचं शुभमंगल होऊन सासरच माप ओलांडायला ती निघाली होती. रेडिओवर जुनं गाणं लागलं होतं उंबरठ्यावर माप ठेऊनी आले तुझीया घरी… कराया तुझीच रे चाकरी… मंडळी अशाप्रकारे आईचा आणि लेकीचा दोघींचाही गृहप्रवेश होऊन शुभकार्य पार पडले.
☆☆
© सौ राधिका माजगावकर पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈