श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ एक्झिट… ☆ श्री दीपक तांबोळी ☆
मनोज उठून बेडरुम मधून बाहेर आला तेव्हा सकाळचे साडेसात वाजले होते.समोरच अण्णांना पेपर वाचतांना पाहून त्याला थोडं आश्चर्यच वाटलं.
” अण्णा आज लवकर फिरुन आलात?रोज तर तुम्ही आठसाडेआठपर्यंत घरी येता.आणि हे काय तुमची तर अंघोळही झालेली दिसतेय?” त्यानं वडिलांना विचारलं.
” अरे आज गुढीपाडवा ना! म्हणून आजचा माॅर्निंग वाॅक थोडा लवकर आटोपता घेतला.येतांना कडूनिंबाचा पाला आणि फुलंही तोडून आणली आहेत बघ पुजेला.आज मीच पुजा करणार आहे.सुनबाई उठली का?”
“नाही अजून.आज सुटी आहे ना शाळेला म्हणून थोडी उशीरा उठेल”
“बरं.झोपू दे “
अण्णा पुजेला गेले.एरवी ते पाटावर बसणं जमत नाही म्हणून पुजा करायचे नाहीत.आज मात्र का कुणास ठाऊक त्यांना ती अडचण वाटत नव्हती. मनोज बेडरुममध्ये गेला.विद्या आणि मुलं गाढ झोपली होती.सणासुदीला माणसानं लवकर उठावं,त्यानं घरात उत्साह जाणवत रहातो असं अण्णाचं म्हणणं होतं आणि ते योग्यच आहे असं मनोजलाही वाटायचं.त्यानं विद्याला हाक मारली.विद्यानं डोळे किलकले केले आणि म्हणाली.
” झोपू द्यानं थोडावेळ.रोज तर मेलं असतंच लवकर उठणं ” तिचंही म्हणणं बरोबर होतं.रोज सकाळी पाच वाजता तिला उठावं लागायचं.मुलांचे डबे,मनोजचा डबा करुन पावणेसातला ती शाळेत जायला निघायची.शाळेतून आल्यावर घरची कामं,शाळेची कामं,मुलांचा अभ्यास असं सगळं करता करता रात्रीचे अकरा वाजायचे.सुटीच्या दिवशीच काय ती तिची थोडीफार झोप व्हायची. मनोजने काही न बोलता बेडरुमचं दार बंद केलं आणि तो हाॅलमध्ये आला.
नऊ वाजता सगळेजण नाश्त्याला बसले असतांना विद्यानं विचारलं.
“आज काय करायचं जेवायला?”
कोणी काही बोलायच्या आधीच अण्णांनी विचारलं
” सुनबाई बटाटेवडे करतेस?”
बटाटावडा म्हणजे अण्णांचा विक पाॅईंट!प्रत्येक सणाला अण्णांना बटाटावडा हवा असे.त्यात विद्या फार छान बटाटेवडे करायची.जगातले सर्वात छान बटाटेवडे माझी सुनबाई करते असं अण्णा सर्वाना अभिमानाने सांगायचे.
“अण्णा मागच्या आठवड्यात एका लग्नात तुम्ही बटाटेवडे खाल्ले तेव्हा तुम्हाला किती त्रास झाला होता हे विसरलात वाटतं! दवाखान्यात ॲडमीट करायची वेळ आली होती तुम्हाला!”
विद्या काकुळतीने म्हणाली
अण्णांनी संकोचाने मान खाली घातली.ते मुकाट्याने चहा पित राहीले.
“बासुंदी करायची का?”अंकितानं विचारलं
” त्यापेक्षा श्रीखंड आणू या?” अण्णा मध्येच उत्साहाने म्हणाले.
“अण्णा अहो मागच्या आठवड्यात तुमची शुगर तीनशेपर्यंत पोहचली होती.डाॅक्टरांनी तुम्हाला गोड खायला स्ट्रिक्टली मना केलंय माहितेयं ना? तुम्ही असं पथ्यपाणी सांभाळत नाही आणि मग त्याचा त्रास तुमच्यासोबत आम्हांलाही होतो.डाॅक्टर वरुन आम्हालाच दोष देतात “
मनोज थोडा वैतागानेच बोलला
अण्णा परत एकदा चुप बसले.एकमत न झाल्याने शेवटी काय स्वयंपाक करावा हे न ठरवताच सगळे उठले.
मग मनोजने गुढी उभारायची तयारी केली.
” मनू यावेळी मी गुढी उभारु?”अण्णांनी विचारलं.
“अहो उभारा ना ! त्यात काय विचारायचं?नेहमी तुम्ही मलाच सांगता म्हणून मी चाललो होतो उभारायला”
बोलता बोलता मनोजने गुढी अण्णांच्या हातात दिली.अण्णांनी ती आनंदाने दारावर लावली.ती लावून झाल्यावर मात्र अण्णांच्या डोळे भरुन आल्याचं मनोजला जाणवलं.
” काहो काय झालं?डोळ्यात पाणी का आलं?”
” काही नाही रे!डोळ्यांचा कोरडेपणा वाढलाय. त्यामुळे असं सारखं डोळ्यात पाणी येतं असं डाॅक्टर म्हणत होते “
” अच्छा अच्छा.पण मग त्यांनी दिलेले ड्राॅप्सही तुम्ही डोळ्यात टाकत नाही “
अण्णा काही बोलले नाही.
बरोबर अकरा वाजता मनोज भाजी आणायला निघाला.त्याला पाहून अण्णा म्हणाले.
“मनू बाहेरच जातोय तर सुनबाईला साडी घेऊन ये माझ्यातर्फे”
ते ऐकून विद्या बाहेर येत म्हणाली.
“अण्णा अहो हे काय आता नवीन?अहो ढीग पडलाय माझ्याकडे साड्यांचा!”
“अगं आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काही नवीन खरेदी नको करायला?ते काही नाही,साडी नको तर एखादी पर्स नाहीतर घड्याळ तरी घे”
“ठिक आहे तुमची इच्छाच आहे तर पर्स घेऊन या”विद्या बोलून आत निघून गेली.अण्णांनी नातवांना हाक मारली.ती दोघं आल्यावर त्यांना विचारलं
“मुलांनो तुम्हाला तुमचे आईबाबा घेऊन देत नाहीत अशा वस्तू सांगा.आज माझ्याकडून मी तुम्हाला घेऊन देईन “
“मला मोबाईल “अंकिता म्हणाली
“मला हेडफोन”आदित्य म्हणाला.
“ओक्के! मनू तुला काय हवंय?” अण्णांनी मनोजला विचारलं
” अण्णा एवढी करोडोची प्राॅपर्टी तुम्ही मला दिलीत.आता मला तुमच्याकडून काही नको आणि माझ्याहीकडे सगळं काही आहे”
” असं कसं तुझे बुट बघ किती खराब झालेत!अरे एवढा मोठा ऑफिसर तू आणि इतके खराब बुट घालतोस?जा नवीन चांगले बुट घेऊन ये “
” एवढे काही खराब नाही झालेत ते अण्णा.बरं पण तुम्ही म्हणता म्हणून आणतो.तुम्हांला काय आणू?”
” अरे या वयात आता काय लागणार मला?जे लागतं ते सगळं आहे माझ्याकडे!तुमच्यासाठीच घेऊन या.तुमचा आनंद तो माझा आनंद!”
मनोज हसला.कष्टात आयुष्य काढलेल्या अण्णांना साधी रहाणीच पसंत होती हे तो जाणून होता.
अण्णांनी आत जाऊन पैसे आणून मनोजला दिले.
मनोजला निघतांना काय वाटलं कुणास ठाऊक पण तो किचनमध्ये गेला.विद्याला म्हणाला
“कर बटाटेवडे आणि मी श्रीखंडही घेऊन येतो.आज अण्णा आनंदात आहेत.होऊन जाऊ दे त्यांच्या मनासारखं.त्यांची इच्छा अपूर्ण ठेवायला मन तयार होत नाही बघ!त्यांची काही इच्छा अपूर्ण राहिली असं नको व्हायला “
“अहो पण त्यांना त्रास…..”
“होऊ दे.आहे आपल्या शेजारी डाॅक्टर.बोलावून घेऊ त्याला”
“ठीक आहे.माझे सासरे असले तरी अगोदर ते तुमचे वडिल आहेत.मला काही अडचण नाही.मी करते “
मनोजने सगळ्या वस्तू बाजारातून आणल्या आणि अण्णांच्या हातात दिल्या.अण्णांनी स्वतःच्या हातांनी सगळ्यांना गिफ्ट्स दिल्या.घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसत होता.
जेवतांना बटाटेवडे आणि श्रीखंड पाहून अण्णा एकदम खुष झाले.
“मस्करी करता कारे पोरांनो तुम्ही म्हाताऱ्याची?”
सगळे हसू लागले.अण्णांनी बटाटावड्याची चव घेतली.
“सुनबाई या बटाटावड्याच्या बदल्यात तुम्ही शंभर गिफ्ट मागितले तरी मी देईन.व्वा काय टेस्ट आहे!गजब!”
मनोजने श्रीखंडाची वाटी अण्णांच्या ताटात ठेवली.
अण्णा मनसोक्त जेवले.मनोज,विद्यानंही त्यांना अडवलं नाही.
दुपारी सगळे झोपले असतांना अण्णांनी टिव्हीवर जुनी गाणी पाहिली.सगळे उठल्यावर त्यांनी जुने फोटो अल्बम काढले.मुलगा,सून आणि नातवांना फोटो दाखवता दाखवता आणि त्यांना जुन्या आठवणी उत्साहाने सांगतांना ते सारखे हसत होते.
संध्याकाळी अण्णा विद्याला म्हणाले.
” सुनबाई आज रात्री मी जेवणार नाही”
“का हो अण्णा?काही त्रास होतोय का?”
“नाही नाही.एकतर सकाळचं जेवण फार मस्त झालं.दुसरं आज आम्ही मित्र पिक्चरला जाणार आहोत.परत येतांना भेळ आणि पाणीपुरी खायचा बेत आहे.”
“चालेल.पण लवकर या हं घरी.सकाळी माॅर्निंग वाॅकला जायचंय ना?”
अण्णा थोडे शांत बसले मग म्हणाले.
” ते बघू पुढचं पुढे”
दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज उठला तेव्हा विद्या सगळ्यांच्या डब्यासाठी स्वयंपाक करत होती.मुलांची शाळा काॅलेजची तयारी सुरु होती.बाहेरचं दार बंद पाहून त्याने विद्याला विचारलं
“आज अण्णा फिरायला गेले नाहीत वाटतं?”
“काल रात्री उशीरा आले होते घरी म्हणून झोपले असतील”
का कुणास ठाऊक मनोज थोडा अस्वस्थ झाला.
” पण रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळचं फिरणं ते चुकवत नाहीत.काही त्रास तर होत नाही ना त्यांना?”त्याने विचारलं
विद्याने खांदे उडवले.मग म्हणाली.
“काय माहीत!बघा तरी जाऊन त्यांच्या रुममध्ये “
मनोज त्यांच्या रुममध्ये गेला.अण्णा शांत झोपले होते.तृप्ती आणि समाधानाचं स्मित त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं.मनोजला हायसं वाटलं.त्याने बाहेर जाण्यासाठी बेडरुमचं दार उघडलं.अचानक काहीतरी शंका येऊन त्याने मागे वळून त्यांच्या छातीकडे पाहिलं.तिथं काहीच हालचाल दिसत नव्हती.घाबरुन तो त्यांच्याजवळ आला.त्यांचा हात उचलून त्याने नाडी बघितली.नाडी हाताला लागत नव्हती.पटकन मोबाईल काढून तो शेजारच्या डाॅक्टरशी बोलला.त्याला ताबडतोब यायला सागितलं.दोनच मिनिटांत डाॅक्टर आला.त्याच्यासोबत विद्याही आत आली.डाॅक्टरने अण्णांना तपासलं.मग मनोजकडे पाहिलं.त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहाताच मनोजला समजलं.अण्णांनी या जगातून एक्झिट घेतलीये.या एक्झिटबद्दल अण्णांना कालच कळलं असेल का?म्हणून तर त्यांनी कालचा गुढीपाडवा खुप आनंदात घालवला तर नसेल?विचार करता करता मनोजला एकदम भडभडून आलं आणि अण्णांच्या पार्थिवाला मिठी मारुन तो हमसून हमसून रडू लागला.
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈