सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ Equal and opposite… लेखिका : सुश्री धनश्री दाबके ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

“आई, लता भेटली होती वाटेत. सांगत होती, साधना खूप बोलली तुम्हाला आज. खरंय ना ते?” रेवती ऑफिसमधून आल्या आल्या सासूबाईंना म्हणाली. 

“लता भेटली म्हणजे तुला सगळं कळलंच असेल. आज दिवसभर लता हेच करत असेल. जे भेटेल त्याला सांगत सुटली असेल.  पण खरंच आहे ते. साधना आज खूपच बोलली मला आणि तेही अगदी तार स्वरात. मला तर काय बोलावं ते सुचलंच नाही.” रीमाताई म्हणाल्या. 

ते ऐकल्यावर रेवतीला थोडा धक्काच बसला. आईंना काय बोलावं ते सुचलं नाही म्हणजे साधनाने तोफच डागली असावी.  नाहीतर आई बोलण्यात कधीच हार न मानणाऱ्या, ‘द आई’ आहेत. . माझ्यासारख्या नेभळट नाहीत काही !  रेवतीला फसकन हसूच आलं. कसंबसं तिने ते दाबलं पण तरी रीमाताईंना ते कळलंच. 

त्या नुसत्याच रागाने तिच्याकडे बघत राहिल्या.

तर झालं असं होतं की, आज रीमाताईंच्या शाळेत मुख्याध्यापक सरांनी अर्जंट मीटींग बोलावल्याने रीमाताईंना तासभर लवकर शाळेत जायचं होतं. म्हणून त्यांनी त्यांच्याकडे पोळ्या करायला येणाऱ्या लताला आज लवकर बोलावून घेतलं. ज्यामुळे लता साधनाकडे उशीरा गेली आणि साधनाचं डोकं फिरलं. 

लताने आज उशीर का झाला ह्याचं कारण सांगितल्यावर साधनाने रीमाताईंना फोन करून चागलंच सुनावलं. तुमच्यामुळे आज माझी ऑफिसची महत्वाची मीटिंग हुकणार आणि मला ऑफिसमधे बॉसची बोलणी ऐकावी लागणार. 

असं कसं तुम्ही लताला अचानक लवकर ये म्हणून सांगता आणि तीही मला न कळवता परस्पर येते? फक्त स्वतःपुरता विचार करता असं म्हणून आमच्या पिढीला बोल लावणारे तुम्ही सिनिअर्स !  वगैरे.. वगैरे..बोलून तिने लताचीही चांगलीच खरडपट्टी काढली. 

“आई जरा साधनाचा नंबर द्या मला. तिच्याशी बोलायला पाहिजे. तिचा मुद्दा बरोबर असला तरी ती ज्या पद्धतीने तुमच्याशी बोलली ते बरोबर नव्हतं. हे असं बोललेलं पुन्हा खपवून घेतलं जाणार नाही हे तिला कोणीतरी सांगायलाच पाहिजे.” 

“कोणीतरी म्हणजे तू?” रीमाताईंच्या प्रश्नातला उपहास रेवतीला समजला. 

“हो मी….देताय ना नंबर?” 

रेवतीचा ठामपणा पाहून रीमाताईंनी तिला साधनाचा नंबर दिला. साधनापुढे हीचा काय निभाव लागणार ! पण बघू तरी काय उजेड पाडतेय ते.. या विचाराने त्या म्हणाल्या “फोन स्पीकरवरच टाक ग !” 

रेवतीची होऊ घातलेली फजिती ऐकायला रीमाताईंचे प्राण कानात गोळा झाले.

“हॅलो साधना, मी रेवती, रीमाताईंची सून..” 

रीमाताईंची सून म्हंटल्यावरच साधना परत तार सप्तकात जाऊन पोचली. “कशाला फोन केलास आता परत? सकाळी तुझ्या मदर इन लॉ शी बोललेय मी. आता तुलाही तेच सांगतेय परत. 

मला आधी न सांगता लताला लवकर बोलवायचं नाही. आज तुझ्या मदर इन लॉ मुळे माझं सगळं शेड्यूल गडबडलं. परत असं होता कामा नये.” पुन्हा तोच आरडाओरडा सुरू झाला. 

आता कळेल रेवतीच्या आवाजात किती दम आहे ते !  उगीच नाही नेभळट म्हणत मी तिला.. रीमाताईंच्या विचारांना धार आली. 

“हे बघ साधना, तू सकाळी माझ्या सासूबाईंना काय सांगितलंस ते माझ्या कानावर आलंय. पण मी फोन त्यासाठी केलेलाच नाही. माझा मुद्दा तू काय सांगितलयस हा नसून तू ते कसं सांगितलंस हा आहे.” असं म्हणून रेवतीने मुद्दामच एक पॉज घेतला. 

साधना काही बोलत नाहीये म्हंटल्यावर रेवती पुढे म्हणाली, “बघ आत्ताही तू मी रीमाताईंची सून बोलतेय म्हंटल्यावर मला काय म्हणायचंय ते ऐकून न घेताच परत आरडाओरड सुरू केलीस. मी तुला हे सांगायला फोन केलाय की माझ्या सासूबाईंशी परत असं ओरडून बोलायचं नाही. अगदी काहीही झालं असलं तरी. त्या तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत आणि त्यांचा असा अपमान मी खपवून घेणार नाही. 

बास, माझा पॉईंट एवढाच आहे. बाकी तू कॉर्पोरेट वर्ल्ड मधे काम करणारी मॅनेजमेंट गुरू आहेस त्यामुळे लताला तू व्यवस्थित मॅनेज करशीलंच. पण तुझ्या भावनांच्या मॅनेजमेंटमधे मात्र मला थोडी गडबड वाटली म्हणून मी स्वतःहून तुला फोन केला. I hope you got my message and you will take it in the right spirit.” 

रेवतीच्या बोलण्यातला ठामपणा आणि तिचा शांत स्वर ऐकून साधना वरमली. कदाचित आजपर्यंत तिच्या आक्रस्ताळेपणाला असा कमालीचा शांत रिस्पॉन्स याआधी तिला कधी मिळालाच नव्हता. 

“Yes..I agree.. माझी बोलायची पद्धत चुकली. Sorry for that.. तुझ्या मदर इन लॉना पण सांग.” म्हणून साधनाने फोन ठेवून दिला.

फोन स्पीकरवर असल्याने साधनाचं सॉरी रीमाताईंपर्यंत आपोआपच पोचलं होतं. रेवतीला काही बोलायची गरजच नव्हती. 

साधनाच्या प्रचंड आक्रस्ताळेपणाला रेवतीने तितक्याच शांतपणे थोपवलं होतं आणि वर्षानुवर्षे शाळेत मुलांना every action has equal and opposite reaction हा नियम शिकवणाऱ्या रीमाताईंना आज equal and opposite रिॲक्शनचा नवा अर्थ उलगडला होता. 

लेखिका : सुश्री धनश्री दाबके. 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments