श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

तू सध्या काय करतेस ? – भाग-२ ☆ श्री सुनील शिरवाडकर

(त्यांच्याकडे आता पैशासाठी हात पसरणे नको वाटते. पण नाही मिळत जॉब. काय करू? इंटरव्ह्यू साठी गेले की अंगाला कंप सुटतो. पाय लटपट करायला लागतात.) – इथून पुढे –

“इशा, सांग ना, कुठली कंपनी? कुठुन तुला कॉल आला?”

ती भानावर आली. तो काय विचारतो, ते कळेचना. जेव्हा समजले तेव्हा ती उठली.वर रैकमध्ये ठेवलेली सैक काढून तिने त्यात ठेवलेले इंटरव्ह्यू चै लेटर काढून त्याच्या हातात ठेवले.

त्याने ते लेटर बघितले. आणि तो आश्चर्यचकित झाला.’सुप्रीम इलेक्ट्रो’ म्हणजे त्याच्या मामाचीच कंपनी.

“माहीत आहे तुला ही कंपनी? आहेत कुणी ओळखीचे तेथे?”

“हो.ही कंपनी माझ्या मामाचीच. सख्ख्या मामाची. बहुतेक तरी तुझे काम होईल असे वाटते. मी आता उतरल्यावर त्याला फोन करतो. तु रीतसर इंटरव्ह्यू वगैरे दे.बाकी मी बघतो”

आता आश्चर्यचकित होण्याची पाळी तिची होती. तिचा कानावर विश्वासच बसेना. हा खरंच सांगतोय की गंमत करतो हे ही तिला कळेना. काय उत्तर द्यायची ते पण सुचेना.

“अगं,ए इशा.. जागी आहे ना तु? मी काय म्हणतो आहे. तुला हा जॉब मिळाला असं समज.”

“हो..हो..अरे थैंक्स हं..खरोखर थैंक्स. मला ना अजूनही खरंच वाटत नाहिये. माझं नशीब खरंच इतकं चांगलं आहे?मला इतका पटकन जॉब मिळेल?”

“मिळाला समज.बरं एक सांग..पुण्याला आता त कुठे जाणार आहेस?म्हणजे कुठे उतरणार?” त्याने विचारले.

“अरे मावशी असते पिंपरीत. नाशिक फाट्यावर कोणीतरी घ्यायला येईल मला”

“ठिक आहे. मग काही हरकत नाही. उद्या तु एकदम कॉन्फिडन्टली इंटरव्ह्यू ला जा.हा जॉब बहुतेक तर तुला मिळेलच. पण जर नाहिच मिळाला.. तरी टेन्शन घेऊ नकोस. पुण्यात आहे आपल्या ओळखी.आता फक्त पार्टीचे लक्षात ठेव म्हणजे झालं”

“हो..नक्की”

तिच्या डोळ्यात एकदम पाणीच आलं.कसं नशीब क्षणात पलटतं.देव आहे आपल्या पाठिशी. आपले बाबा इतकी सेवा करतात, त्यांची पुण्याई आपल्याला ही अशी उपयोगी पडते. आईला सांगावं का फोन करून? पण नकोच.एकदा काय ते फायनल होऊ दे.मगच तिला ही गुडन्युज देऊ.

“चला.. गाडी अर्धा तास थांबेल”

ड्रायव्हर ने आवाज दिला. गाडी’दौलत’ वर थांबली होती.

“चल..कॉफी घेऊया का?” श्री ने विचारले.

दोघेजण खाली उतरले.

“तु फ्रेश हो,तोपर्यंत आलोच मी कुपन घेऊन”

श्री ने काउंटरवरुन कुपन्स घेतली. दोन कॉफी आणि दोन सैडविचेस घेऊन तो टेबलवर आला.

“अरे,इतके कशाला?”इशा म्हणाली.

“घे.मला पण भुक लागली आहे”

दोघांनी कॉफी संपवली .श्री इशाकडे पहात होता.. वेगळ्या नजरेने.

किती छान दिसते ही. गाडीत बसलो तेव्हा लक्षात आले नाही. तोंडावर स्कार्फ होता, नंतर तिने तो काढला.. पण शेजारी बसल्यामुळे कळलं नाही. आता तो प्रथमच तिला समोरून बघत होता. थोड्या वेळापूर्वी तिच्या चेहऱ्यावर जी काळजी, उदासीनता दिसत होती, ती आता कुठल्या कुठे पळाली होती. तिच्या डोळ्यात आता एक आत्मविश्वासाची चमक दिसत होती. आपण तिच्या उपयोगी पडु शकतो ही भावना त्याच्या मनाला समाधान देऊन गेली.

“श्री, अरे तु काय करतोस? काही सांगितलेच नाही मघापासून” अचानक इशाने विचारले.

तिचे तिलाच वाटले.. हा आपल्याला एवढी मदत करतो.. आणि आपण त्याला त्याच्याबद्दल काहीच विचारले नाही.

“बस्स..चालू आहे काहीतरी” त्याने विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

“काही तरी म्हणजे नक्की काय?सागरमल मोदी सुटल्यानंतर आपण प्रथमच भेटतो आहोत. तु मग ‘पेठे’ ला नाही गेलास?”

“नाही. ती एक वेगळीच स्टोरी आहे”

“सांग ना मग”

“आपण चौथीतुन पाचवीत गेलो ना.. नेमकी त्याचवेळी बाबांची बदली झाली. पुण्यात. मग आम्ही पुण्यातच शिफ्ट झालो”

“मग पुढचं शिक्षण पुण्यात झालं?”

“हो.शिक्षण म्हणजे तरी काय गं..दहावीला मी दोन वर्ष घेतली. बाबांनी सांगितले.. बस झालं शिक्षण. मग नोकरीला लागलो”

“कुठे?”

“प्रविण मसाले मधे. बाबांची तिथे ओळख होती. मार्केटिंग मध्ये जॉब मिळुन गेला. तीन वर्ष केला जॉब. मग नोकरी सोडून दिली”

“मग आता काय करतोस?” तिने उत्सुकतेने विचारले.

तेवढ्यात बस सुरू झाल्याचा आवाज आला. धावत धावत दोघे बसमध्ये जाऊन बसले.

“आता मी माझी स्वतःची इंडस्ट्री सुरू केली आहे. स्मॉल स्केल.. फुड प्रॉडक्ट,मसाले वगैरे.ग्राईंडर्स घेतले आहे. छोटी छोटी कामे मिळताहेत. वर्ष दिड वर्ष झालं. अजून सेट व्हायला वेळ लागेल”

“नाशिकला कोण असतं? कोणाकडे आला होतास?”

“अगं एक मसाल्याचा ब्रैंड आहे तिथला..त्यांच्याकडून काही बल्क ऑर्डर मिळेल म्हणून आलो होतो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयत्न चालू आहे”

“मग नाशिकला कुणाला भेटलास?

“ते नाही का शामसन्स मसाले.. त्यांच्याकडे गेलो होतो. एकानं रेफरन्स दिला होता”

“मग काय म्हणाले ते?”

“नेहमीचचं गं..हो..बघु..विचार करुन सांगतो. आताशा सवय झाली मला. हे लोक सरळ नाही म्हणून सांगत नाही. “सांगतो विचार करून” म्हणाले की समजायचं.. इथे आपले काम होणार नाही”

इशाने ते ऐकून घेतले. त्याला थांबवले. आणि हसुन म्हणाली,

“तु जशी मला मदत केली ना.. तशीच आता मी पण करु शकते. शामसन्स मसाले म्हणजे आपल्या एकदम घरचीच माणसं. माझ्या बाबांचे मित्रच आहे ते. शामकाका जाधव. मी सांगते बाबांना. बाकी मी काही करु शकत नाही. पण तुला बहुतेक तरीही तिथले काम मिळेल”

श्री चा आपल्या कानावर विश्वास बसेना. ही सहज भेटते काय..ओळख होते काय.. आपण तिचे काम करतो..ती पण आपले काम करते.किती योगायोग.. अगदी सिरीयलमधल्या सारखेच ना.

“इशा, तु खरंच सांगते आहेस?का गंमत नुसती?”

“थांब एक मिनिट..”इशा म्हणाली.

Whatsapp वर जाऊन तिने शामकाकांचा Dp दाखवला.

“यांनाच भेटला का तु?”

“हो”

“अरे हे आमचे शामकाका. फक्त तु त्यांची काय रिक्वायरमेंट आहे ती बघ.क्वॉलिटी चं वगैरे ते सांभाळ.मी सजेस्ट करते आहे.. पण कामाच्या बाबतीत ते फारच पर्टिक्युलर आहेत. त्यांची तक्रार नको यायला”

“ते सोड.एकदा का मला मोठी पार्टी मिळाली ना.. बघ कुठल्या कुठे जाईन मी. क्वॉलिटी च्या बाबतीत तु निश्चिंत रहा. तुझ्या काकांना सैटिस्फाइड करायची जबाबदारी माझी”

श्री पण आता निश्चिंत झाला

नाशिकला दोघे गाडीत बसले तेव्हा दोघांचेही मन उदासीनतेमुळे ग्रासले होते ती उदासी आता कुठच्या कुठे पळाली होती.दोघांच्याही मनस्थितीत आमुलाग्र बदल झाला होता. ते दोघेही आता प्रसन्न वाटत होते. आता त्यांना हा प्रवास कधीच संपु नये असे वाटत होते. पण गाडीने आता पुण्यात प्रवास केला होता. साडेनऊ वाजुन गेले होते. नाशिक फाट्यावर ती जेव्हा उतरण्यासाठी उठली तेव्हा त्यांनी उद्याच भेटण्याचे ठरवले.. आणि बाय..बाय..करून ती गाडीतून उतरली.

– समाप्त –

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments