डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ तेजस्विनी… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
(नवरदेव, त्याचे आई वडील व इतर नातेवाईक (मध्यस्थ) पोलीस स्टेशनात लाॅकअप मध्ये बंद झाले) – इथून पुढे.
“अरे विजय, अजून आप्पा, काका इतर मंडळी कोणीही आली नाही. काय समस्या आहे रे बाबा, मला तर काही समजेनासं झालंय. काय करू मी ? कसं करू ?
“आक्का शांत हो आणि मन घट्ट करुन ऐक. नवरदेव, त्याचे आई वडील व इतर मध्यस्थ पोलीस लाॅकअप मध्ये आहेत.” ” अरे देवा, हे काय घडलंय रे.माझी छकुली वधूवेषात, अंगाला हळद, लग्नमंडपात लोक जमलेले, दाराशी सजवलेला घोडा, वाजंत्रीवाले, एक हजार लोकांच्या जेवणावळीची तयारी. आणि हे काय घडलंय विपरीत. काय करू मी आता ? कसं सांगू छकुलीला ? कोणत्या तोंडानं सांगू ? केवढी अपराधी आहे मी तिची.देवा हा दिवस दाखविण्यापूर्वीच तू मला मारलं का नाहीस.”
“चूप, असं अशुभ बोलू नकोस ” छकुलीचा हात माझ्या ओठांवर होता.” माझं नशीब बलवत्तर कि त्या माणसाचा खरा चेहरा लग्नापूर्वीच माझ्यासमोर आला.लग्नानंतर ही घटना घडली असती तर मी किती अभागी ठरली असती. अशा नीच, नालायक माणसाच्या चेहर्यावरचा सभ्यतेचा बुरखा वेळीच निघाला ही आपली पुण्याई. मी ही शिकलेली आहे, सुविद्य आहे, आर्थिक पाठबळही आहे माझ्याजवळ. मग मला घाबरण्याचं कारण काय आहे.नकोय मला असला माणूस. त्याने कितीही माफी मागितली आणि लग्नाला तयार झाला तरी पण मला तो नकोय.उतरवते मी माझा मेकअप. लोकांना मात्र जेवण करून जायला सांगा.”
मी तर अगदी दिग्ड,मूढचं झाले होते.काय करावे सुचतच नव्हते.जणू मी निर्जीव पुतळाच झाले होते.छकुलीच्या लहानपणीच तिचे वडील एका अपघातात निवर्तले आणि मी माहेरी भावाच्या आश्रयाला आले.भावाने मात्र मला भक्कम सहारा दिला.मी ही मला जमेल तसे काम करीत राहिली.माझी छकुली मोठी गुणी पोर, आईचं दुःख जाणत होती ती.कधी कोणत्या गोष्टीचा हट्ट केला नाही कि कोणती गोष्ट मागितलीही नाही.आहे त्यात नेहमी समाधान मानलं. चांगली शिकली, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात प्राविण्य मिळवलं आणि आज स्वतःच्या मजबूत अशा पोलादी पायांवर ती उभी होती.आर्थिक स्वावलंबन तर होतंच पण तिचा आत्मविश्वासही दांडगा होता.अन्यायाविरूद्ध चीड होती. सत्याची चाड होती.अडलेल्यांना मदतीचा हात देणारी होती.तर दुष्टांना त्यांची जागा दाखवून देणारी मर्दानी दुर्गा होती, तेजस्विनी होती.
“छकुली छकुली,मला पुढचं बोलताच येईना.” नको रडूस आई, तुझं दुःख जाणते मी.पण आमचा यात काही दोष नाही. आम्ही कोणतंही पाप केलं नाही.मग आम्ही घाबरायचं कशासाठी ? ” ” पण बेटा हा जाती समाज, आजच्या विवाह सोहळ्याची ही तयारी ” ” कोणता जाती समाज. कोणी काही विचारणार नाही आम्हांला.कारण आमचा दोषच नाही कोणता.बाकी राहिलं जेवणावळीचं. त्याचं उत्तर मी दिलेलंच आहे. सगळ्यांना जेवून जायला सांग. मी कपडे बदलते माझे.”
“नको छकुली, नको कपडे बदलवूस, नको मेकअप उतरवूस.नवरीला एकदा हळद लागली कि धुवायची नसते.अपशकून असतो तो.” ” पण मामी, मी काय करू. लग्न तर मोडलंय.दोषी बसलेत पोलीस लाॅकअप मध्ये. आणि मी तर अशी सडकी विचारसरणी ठेवणार्यांना नक्कीच धडा शिकवीन. मी गप्प बसणार नाही मामी “.
गप्प नकोच बसू तू आणि दोषींना धडाही शिकव. मी सुद्धा यासंदर्भात मदत करीन तुझी. खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहीन. पण हळद धुवू नकोस पोरी “
“मग काय करू मी,? कोण लग्न करील माझ्याशी ?
“या समाजात चांगली विचारसरणी असलेली मुलेही असतात बेटा. माझ्या आतेभावाचा मुलगा निलेश आहे. तो करील तुझ्याशी लग्न.अर्थात तो तुझ्यासारखा शिकलेला नाही. बी. काॅम झालाय. एका सी ए कडे प्रॅक्टीसही करतोय आणि सी ए चा अभ्यासही करतोय. तुझी इच्छा असेल तर मी बोलू माझ्या भावाशी “
छकुलीनं आपला आश्वासक हात मामीच्या हाती ठेवला.
“काय घडतंय मला तर कळतंच नव्हतं. मी नुसती बघत होती. ” वन्स तुम्हांला पसंत आहे ना निलेश. छकुलीला अगदी सुखात ठेवील तो ” ” होय गं बाई. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आता तूच आई हो छकुलीची “
“चला चला नवरदेवाला घेण्यासाठी ” सुक्या” ला पाठवा. माझ्या भाच्यालाच सजवलेल्या घोड्यावर बसवून नवरदेवाला ( निलेशला ) घेण्यासाठी पाठविले,लग्नमंडपातील वर्दळ वाढली होती.दाराशी नवरदेव पोहोचला होता.सुवासिनी औक्षण करीत होत्या.फटाक्यांची आतिषबाजी होत होती.नवरदेव नवरीला फुलांच्या पायघड्या घातल्या जात होत्या.भटजींची मंगलाष्टके चालू होती. आणि तो क्षणही आला
तदेव लग्नं सुनदिन तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि
आणि छकुलीनं वरमाला निलेशच्या गळ्यात घातली.
“लग्नाला आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये ” आप्पा माईकवरून घोषित करीत होते.
“वन्स विहिणींचा मानपान करायचा आहे. येताय ना तुम्ही ” एका स्वप्नातून मी जणू जागी झाले.” अहो वन्स, सर्व निर्विघ्नपणे पार पडलंय. विहिणींचा मानपान करायचाय. येताय ना तुम्ही.” मी उठले.विहिणींना नवीन कपडे, ओटीचं सामान, गोड खाऊ घालणे. सगळे विधी पार पडत होते.नवरदेव नवरीची सप्तपदी चालू होती.
“चला कन्यादान विधी सुरू करायचा आहे ” ” आप्पा, सगळं तू आणि वहिनीनं केलंय. कन्यादानही तुम्हीच करा आता. मी तर सगळी आशाच सोडली होती.आयुष्यभर दुःख भोगलेल्या मला हा धक्का सहन न होणारा होता. पण विघ्नहर्त्या गणेशानं सगळं व्यवस्थित केलं.काही पुण्य असेल माझ्या गाठीला ते कामी आलं आज ” असं बोलत असतांनाच मला भोवळ आली आणि मी कोसळले.” काय झालं आक्का,” सगळे माझ्याभोवती जमले, माझ्या चेहर्यावर पाणी शिंपडले, तशी मी पुन्हा शुद्धीत आले.” वन्स, खूप ताण करून घेतलाय तुम्ही. पण आता सगळं व्यवस्थित पार पडलं ना, आता कसली काळजी. पण शारीरिक थकवा आलाय तुम्हांला. तुम्ही आराम करा पाहू. मी सांभाळेन सगळं ” छकुलीही माझ्याजवळ आली होती.
“काही नाही झालंय बेटा आईला. थोडासा थकवा आहे. बरं वाटेल तिला. तू आपले धार्मिक विधी पार पाड. जा भटजी वाट पाहाताहेत तुझी “
रात्री छकुलीचा विदाई सोहळाही पार पडला. आता मला फार रिते रिते वाटू लागले. उद्या सकाळी वरात परतीच्या प्रवासाला लागणार होती.
“निलेश, एक महत्वाचं काम राहिलंय माझं, ते पार पाडायचं आहे मला ” ” कोणतं काम राणी सरकार. तुझं काम ते माझं काम, आता आम्ही एक आहोत सुख आणि दुःखातही “
” माझ्या पहिल्या नियोजित वरा विरूद्ध स्टेटमेंट द्यायचंय मला पोलीस स्टेशनात.आणि पुढे कोर्टातही केस चालवायची आहे मला. फसवणूकीचा व मानहानीचा दावा करणार आहे मी ” ” जरूर कर राणी या लढाईत मी सुद्धा तुझी सोबत करीन.अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे.”
सकाळी वरात परतीच्या प्रवासाला निघाली आणि माझा ऊर दुःखावेगानं भरून आला.एक पोकळी माझ्या मनात निर्माण झाली.पण माझी तेजस्विनी मात्र हरली नव्हती. कठीण प्रसंगालाही सामोरी गेली.तिचा आत्मविश्वास वाढला होता.आणि या आत्मविश्वासात तिचं व्यक्तिमत्व झळाळून उठलं होतं. आता या तेजस्विनीला एका तार्याची सोबतही लाभली होती.माझ्यासाठी हा क्षण परमोच्च सुखाचा होता.या परमोच्च सुखाच्या क्षणीच परमेश्वरानं माझे डोळे मिटावे ही इच्छा होती.
“आक्का, आक्का, छकुलीला आशीर्वाद दे ना ” एका तंद्रीतुन पुन्हा मी जागृत झाले. माझी तेजस्विनी आता स्वतःच्या घरट्यात विसावणार होती. माझी तपस्या फळाला आली होती.विघ्नहर्ता गणपतीने सगळं व्यवस्थित पार पाडलं होतं. एक कृतार्थ समाधान माझ्या चेहर्यावर होतं.
– समाप्त –
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]