डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ तेजस्विनी… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
” महाराज, जेवणाची काय काय तयारी झाली आहे ” ” सगळं झालंय बाईसाहेब, मावा बर्फी, गुलाबजाम तयार आहेत. तवा भाजीची तयारी झालीय.काबुली चणे, भरली वांगी तयार आहे ” ” आणि जेवणापूर्वीचे सगळे स्नॅक्स तयार आहेत ? ” ” होय बाईसाहेब, पाणीपुरी, दहीवडा, नुडल्स तयार आहेत. जेवणानंतर बर्फाच्या गोळा, कुल्फीही तयार आहेत.मुखशुद्धीसाठी मसाला पानही तयार असेल “
” महाराज, उद्या वरात परतीच्या प्रवासाला लागेल. त्यांच्यासाठी आणि पाहुण्यांसाठी काय तयार केलंय ” ” बाईसाहेब, मसाला शेव आणि मोहनथालची पाकिटे तयार आहेत. तुम्ही आता ती ताब्यात घ्या म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही आणि उद्या वरातीच्या परतीच्या प्रवासात इडली चटणी, मसाला पुरी, बटाट्याची सुकी भाजी फ्रेश तयार करून देईन ” ” छान महाराज,उत्तम तयारी केलीय, पाहुणे मंडळींनी हाॅलही गच्च भरलाय.दाराशी सजवलेला घोडाही आणलाय. नवरदेवाकडून ग्रीन सिग्नल मिळाला कि ” सुक्या “( नवरीचा भाऊ ) लगेच नवरदेवाला घेण्यासाठी जाईल.
” अगं अगं, मीरा, थांब थोडी, कोठे निघालीय ” ” काय ग आक्का, काय म्हणतेस ” ” अगं सुवासिनींच्या ओटीचं सामान कोठे ठेवलंय ” ” अगं, माझ्या रूममधल्या कपाटात ठेवलंय व्यवस्थित. प्रत्येक पाकिटात तांदूळ, खोबरं, एक रूपयाचं नाणं, आणि ब्लाउज पीसेस सगळं व्यवस्थित ठेवलंय आणि होय नवरीची विदाई करतांना सोबत देण्यासाठी गूळ पोळीही तयार केलीय ” ” शाब्बास बाई, लग्नासाठी सगळ्यांचा हातभार लागला कि कामं कशी व्यवस्थित पार पडतात “
” ए अप्पा, अप्पा, काय करतोहेस तू.” ” काय गं
आक्का ” ” अरे हवनकुंडं आणलंहेस काय ?” ” होय गं आक्का, आणलंय सगळं.त्यासाठी समिधा, शुद्ध तूप, खारीक, खोबरं, पूजा साहित्य सगळी व्यवस्थित तयारी केलीय आणि होय गुरूजींचाही फोन येऊन गेलाय, तेही येण्यासाठी निघालेत. थोड्या वेळात येथे पोहोचतील ” ” ठीक आहे. कर तू तुझी कामं “
” ए विठ्ठल, बाहेर कार आलीय. कोण आलं आहे बघ. स्वागत कर त्यांचं ” ” आक्का मुंबईचे काका आलेत. सोबत मुलगा व सूनबाईही आहेत ” ” या काका या, नमस्कार करते. कसा झाला प्रवास ? काही त्रास नाही ना झाला ? ” ” नाही बेटा, काही त्रास झाला नाही. अगदी मजेत झाला प्रवास, कुठे आहे आमची छकुली, सेलिब्रिटी गर्ल ” ” आहे ना, बोलावते, ए सीमा, छकुलीला बोलव जरा, काका आलेत ” ” आक्का नववधूचा मेकअप चाललाय ” ” असू दे गं, काकांना भेट म्हणावं पाच मिनीटे “
लाजरी,साजिरी,गोजिरी माझी छकुली मूळातच नक्षत्रासारखी सुंदर आणि आज तर वधूवेषात फारच खुलून दिसत होती.” छकुली मुंबईचे बाबा आलेत. नमस्कार कर त्यांना” ” छकुली नमस्कारासाठी वाकली तशी वरचेवर झेलत काकांनी तिला ह्रदयाशी धरले. ” नमस्कार काय करायला लावते बेटा तिला. मुलगी तर दुर्गेचं रूप असते.आणि दुर्गाची तर आपण पूजा करतो.तिला नमस्कार करायला लावून आपण पापाचे धनी कसे होणार. बाळा खूष राहा, सुखी राहा. जीवनात तुला सगळी सुखे मिळोत. नांदा सौख्य भरे ” म्हणत काकांनी आशीर्वादाचा हात तिच्या माथ्यावर ठेवला.माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आलं.” रडू नकोस बेटा, आजचा दिवस मोठा शुभ.तुझी चिमणी स्वतःच्या घरट्यात विसावणार आहे.स्वतःच्या घरट्याचा विस्तार करणार आहे.तुझी तपस्या सफल झाली बेटा.” “काका ” म्हणत मी ही नकळत काकांच्या ह्रदयावर विसावले.
“आई, काय करतेस तू ” ” अगं बेटा ही अन्नपूर्णा मावशी, शोभा मावशी, सखू मामी, मीना आत्या आल्यात बघ ” ” काय म्हणते आमची वधूआई. परमेश्वरानं आनंदाचा क्षण आणलाय जीवनात. आनंदानं साजरा करा “, सगळ्या सुवासिनींनी बांगड्या भरा. कासाराला बोलावलंय मी. बघा त्या कोपर्यात बसलाय.” मी सगळ्यांना बांगड्या भरण्यास पाठविले. ” काय ताई आक्काच्या कपाळाला तांदूळाचा मळवट भरला नाहीस अजून. नवरीची आई आहे ती ” अन्नपूर्णा बोलत होती.” “अगं होय, नुसती धावपळ चाललीय सगळ्यांची. कोणाच्या लक्षातच आलं नाही. ” सुमन, ए सुमन ” ” काय म्हणता वन्स ” सुमन आक्काच्या कपाळाला तांदूळाचा मळवट भर ना ” ” होय वन्स, मी करते ते काम “
वर्हाडींना फेटा बांधण्याचे काम सुरू होते. अरे वाजंत्रीवाले वाजवा ना जरा. सगळे धार्मिक विधी सुरू आहेत आणि तुम्ही वाजंत्री नाही वाजवत “. लगेच वाजंत्री सुरू झाली.वातावरण निर्मिती झाली. कामाला गती आली.
” आप्पा, आप्पा वरमाला कोठे ठेवल्यात ?” ” मला नाही माहित.फुलवाल्याने सकाळी आँर्डरची डिलीव्हरी दिलीय.तुम्ही कोठे ठेवलीय मला माहित नाही “. ” काय रे बाबा, ऐनवेळी घोटाळा नको व्हायला.सुनेत्रा शोध घे गं जरा ” होय मी शोधते ” ” आक्का गूरूजींनी जयमाला वधूवरांच्या खुर्चीवरच ठेवल्या आहेत ” ” ठीक आहे. एक काळजी दूर झाली “
आप्पा वेळ होत आली रे. अजून मुलाकडच्या मंडळींकडून काही निरोप नाही ” ” येतील, आली असेल काही अडचण. मी फोनही ट्राय करतोय केव्हाचा पण तो ही लागत नाही आहे. तू काळजी करू नकोस. मी पाहतो काय ते ” म्हणत आप्पा निघून गेला. माझी काळजी वाढली.मनांत नको नको त्या शंका येऊ लागल्यात. ” हे विघ्नेश्वरा गजानना, तुझ्यावरचं सोपवलंय रे बाबा. तूच सगळ्यांचा त्राता, विघ्नहर्ता, तूच तार रे बाबा या संकटातून “.
पंधरा मिनीटे, वीस मिनीटे, अर्धा तास, एक तास. घड्याळ पुढे पुढे सरकत होतं आणि माझ्या काळजात धस्स होत होतं. लग्न मंडपातही कुजबूज सुरू झाली होती.” अहो मला आँफिस गाठायचेय.इन्स्पेक्शन सुरू आहे.म्हटलं नवरदेव नवरीला आशीर्वाद देऊ आणि लगेच निघू,पण इथे तर काहीच तयारी दिसत नाही आहे,वरातीचा घोडाही इथेच आहे. शुभ मुहूर्त कोणी पाळतच नाही आजकाल. आपल्याला पाहिजे तेवढा वेळ ही मंडळी घेतातच.वरातीची मिरवणूक, त्यात यांची नाच गाणी, नववधूचा मेकअप दोन दोन तीन तीन तास केव्हाच निघून जातात. मग लागतात लग्नं यांच्या सोयीनुसार.कोणी या संदर्भात बोलतही नाहीत. कारण काय तर लग्न ही आयुष्यात घडणारी एकमेव गोष्ट. हौस मौज आता नाही करायची तर केव्हा करायची, हा यांचा मुख्य सवाल.
” आप्पा, आप्पा, काय झालं ? लागला काय फोन ? ” होय आक्का, लागलाय फोन ” ” काय म्हणतात ते लोक ?, अजून का आले नाहीत ? विवाहमुहूर्त टळायला नको ” ” आक्का, मुलाला पुण्यात फ्लॅट विकत घेण्यासाठी पन्नास लाख पाहिजेत ” ” पण ही मागणी तर ठरली नव्हती. आता एनवेळी कसं काय मागत आहेत, आणि आपण कशी काय पूर्ण करणार “.
होय, ही मागणी तशी आपल्या आवाक्याबाहेरची आहे.मी ही सेवानिवृत्त माणूस,मलाही कुटुंबाची जवाबदारी आहे. काय करावं ? सुचतच नाही आहे. पण हे बघ, तू काळजी करू नकोस.मी काकांशी चर्चा करतो, चार लोकही सोबतीला घेतो आणि त्या लोकांची समजूत काढतो.छकुलीला काही कळू देऊ नकोस.लग्नमंडपातील लोकांनाही तू सांभाळून घे.करशील ना एवढं सगळं व्यवस्थित.” होय मी सांभाळते सगळं तू बघ पुढे काय करायचं ते “,
आप्पा, काका समाजातील चार प्रतिष्ठित मंडळी नवरदेवाच्या जानसघरी गेली.( जानोसा — नवरदेव व वर्हाडी मंडळीसाठी केलेली राहण्याची व्यवस्था ) ” हे बघा विवाह हा सोहळा दोन जीवांच्या मधुर मिलनाचा, त्यात पैशांचा अडसर नसावा. मुलगा मुलगी दोघे शिकलेले आहेत. दोघांनाही चांगल्या नोकरी आहेत.ते वसवतील आपलं घरकुल “.
” होय ना,विवाह हा दोन जीवांच्या मधुर मिलनाचा क्षणच.पण नुसती स्वप्नेच कामी येत नाहीत,त्याला वास्तवाचीही जोड हवी. मुलाच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली. हाडाची काडं केलीत आम्ही अक्षरशः. आता सुख हवयं आम्हांला, मुलाला स्वतःचं घरकुल हवयं.त्यासाठी हवा पन्नास लाख रूपयांचा निधी.काही आम्हीही टाकू.काही तुम्ही टाका.तुमच्या मुलीच्या सुखासाठीच तर करतोय आम्ही हे सगळं “. ” बाई, आमच्रा मुलीचं सुख कशात आहे हे आम्ही जाणतो.तुम्ही मुलाला शिकवलंत, करिअर केलंत, पण आम्हीही कुठे कमी नाही पडत आहोत.मुलगी शिकलेली आहे. करिअरीस्ट आहे, अखंड लक्ष्मी येईल तुमच्या घरी. राहिला सवाल फ्लॅटसाठी पैसे देण्याचा. तेवढी ताकद माझी नाही.मी काही देऊ शकत नाही.
” देऊ शकत नाही ? मग लग्न मोडलं असं समजा.
” काय ? लग्न मोडलं ? आमची मुलगी अंगाला हळद लावून नववधूच्या वेषात भावी जीवनाची स्वप्ने घेऊन तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराची लग्नमंडपात वाट पाहातेय आणि तुम्ही लग्न मोडण्याच्या गोष्टी करताहेत ? लग्नापूर्वी तर ही बोलणी झाली नव्हती.तसं असतं तर आम्ही मुलगी दिलीही नसती.जरूर विचार केला असता या गोष्टीवर “
” मग आता विचार करा ना. आता मागतोय आम्ही.तुम्ही नाही म्हटलं तर दुसर्या मुलीवाले तयार आहेत ना ” ” अच्छा, तर हे कारण आहे होय. दुसरीकडे जास्त हुंडा मिळतोय म्हणून तुम्ही लग्न मोडताय ? शुद्ध फसवणूक आहे ही आमची.हुंडा मागणं आणि हुंडा देणं कायद्यानं गुन्हा आहे.हा अन्याय मी नाही सहन करणार “
” जा, जा तुम्ही, जे होत असेल तुमच्याकडून ते खुशाल करा ”
” अहो, एवढा माज बरा नाही. मुलीचा बाप असलो तरी इज्जत आहे मला.चला काका पोलीस स्टेशनात FIR दाखल करायला,
नवरदेव, त्याचे आई वडील व इतर नातेवाईक ( मध्यस्थ ) पोलीस स्टेशनात लाॅकअप मध्ये बंद झाले.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]