सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? जीवनरंग ?

☆ जॉब… — लेखिका : सुश्री गीता गरुड ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“वहिनी,माझ्या आईला तू उलट कशी बोलू शकतेस?”

नणंद रेश्मा आईचा कैवार घेत मालतीशी भांडायला अगदी अर्ध्या दिवसाची रजा टाकून आली होती. 

उन्हातून आली म्हणून मालतीने तिला माठातलं गार पाणी दिलं. 

“आज लवकर सुटलं ऑफीस?” मालतीनं विचारलं

“हे असं आमच्याशी गोडगोड बोलतेस नि आमच्या अपरोक्ष आमच्या आईला..अगदी पोरक्यासारखी वागणूक देतेस. बरोबर ना.”

जीजी डोळ्याला पदर लावून बसली. “बघ बाई आता तुच काय ते. तू झालीस तेंव्हा दुसरीपण पोरगीच झाली म्हणून हिणवलं सासूसासऱ्यांनी पण तुम्हा लेकींनाच गं माझी कणव.”

“आई,तू अजिबात रडू नकोस. तुझी लेक जीवंत आहे अजून. खडसावून जाब विचारते की नाही बघ. कुणाचं मिंध रहायची गरज नाही तुला. पेंशन आहे चालू तुझी. यांच्या जीवावर नाही जगत तू.” भरल्या गळ्याने रेश्मा आईचे डोळे पुसत म्हणाली.

“आत्या काय चाललय तुझं. खालपर्यंत आवाज येतोय,” नुकतीच  घरात पाऊल टाकत असलेली किमया आत्याजवळ आपली स्याक ठेवत म्हणाली. 

“या पोरीला माझा आवाज सहन होत नाही गं रेशम. आता तुझाही सहन होत नाहीए बघ.”जीजी असं म्हणत परत रडू लागली.

“एक मिनिट. हे काय चाललंय आणि आत्तू तू माझ्या आईवर का कावत होतीस मगाशी? पहाटे उठल्यापासनं आई घरात वावरतेय. एकतर कामवालीही मिळत नाहीए हल्लीच्या काळात. मिळाली होती एक धुणी धुवायला पण आजी रोज आपली चादर धुवायला टाकू लागली,कधीकधीच्या कपाटातल्या साड्या काढून तिला धू म्हणून सांगू लागली. ती बिचारी मावशी पळून गेली नंतर पोळ्या करायला बाई लावली तर तिच्या खनपटी बसू लागली..इतक्याच पातळ हव्या,एकसारख्या हव्या..तीही परागंदा झाली. 

डॉक्टर म्हणतात,आजीला अल्झायमर झालाय. गोळ्या चालू केल्यात पण ही कधी घेते,कधी खिडकीतून फेकून देते. त्यादिवशी कुंडीतही सापडल्या हिच्या गोळ्या. कुठेही नाक शिंकरते,थुंकते..ते सगळं आई स्वच्छ करतेय. हल्ली तर अंथरुणातही..पण हे सारं एका शब्दाने आई बोलली का तुला!नाही नं. का तर तुला त्रास होईल. तू तुझ्या घरी सुखी रहावस म्हणून. 

हल्ली ऐकूही कमी येऊ लागलय आजीला. डॉक्टर म्हणाले,आता या वयात ऑपरेशन नको. ही मोठमोठ्याने बोलते. मोठ्या आवाजात टिव्ही लावते. दोन खोल्यांचं घर आमचं. कसं अभ्यासात लक्ष लागणार गं आत्तू! तरी आई मला हिला काही बोलू देत नाही. तूच लायब्ररीत जाऊन अभ्यास कर म्हणून सांगते. 

आजीला तेलकट कमी द्यायला स़ागितलय म्हणून घरात सगळ्यांनाच कमी तेलाचं,थोडसं अळणी स्वैंपाक  का तर आजीला वाटू नये की आम्ही तिला टाकून चांगलंचुंगलं करुन खातोय. आजीचा मधुमेह वाढलाय म्हणून आजीसोबत आमचं सर्वांच गोडधोड बंद का तर तिला टाकून कसं खायचं! 

आत्तू, माझी आई घरात रहाते म्हणून आजवर तुम्ही तिला ग्रुहित धरीत आलात. उन्हाळ्याची सुट्टी पडली की खुशाल तुझी नि मोठ्या आत्तुची मुलं आमच्याकडे. का तर मालतीवहिनी घरातच तर असते. घरात कसलं डोंबलाचं काम असतं एवढं.. नुसत्या झोपाच तर काढते!”

“किमया”..कपडे धुऊन ते वाळत घालण्यासाठी पिळे भरलेली बादली घेऊन आलेल्या मालतीने लेकीला दटावलं. 

“आई, मी कधी आत्याच्या घरी रहायला गेली की आत्या असंच बोलायची तुझ्याबद्दल. घरात तर असते. अरे,हौस होती का माझ्या आईला घरी रहायची? तुमच्याइतकीच शिकलेली ती पण आजीने मला सांभाळण्यास नकार दिला होता. मला पाळणाघरात ठेवायचं नाही असंही बजावलं होतं..खिंडीतच पकडलं होतं तिला. राहिली मग ती घरात. घरी शिकवण्या घेऊ लागली तर तेही आवडत नसायचं आजीला. मुलांना शिकवायला बसली की काहीतरी कामं सांगून उठवायची. मुलांच्या आया मुलांना पाठवेनाशा झाल्या. 

काही माणसं नं फक्त ऐकून घेण्यासाठीच जन्माला आलेली असतात त्यातलीच माझी आई. मला आठवतं,एकदा मावशीकडे मुंजीला जायचं होतं आईला आणि आईचा कैरीहार आजीने दडवून ठेवला. आई शोधूनशोधून रडकुंडीला आली. बाबाही तापले होते तिच्यावर. आजीला कोण हसू येत होतं. मला फाइव्हस्टॉर चॉकलेटसाठी पैसे देऊन माझं तोंड गप्प केलं होतं तिने तरी मी रात्री आईला आजीची करामत सांगितलीच. बाबा संतापले होते. तिला जाब विचारायला उठले तर आईनेच त्यांना शांत झोपायला लावलं होतं. 

आताशी आजी फार चिडचिड करते.  वाढलेलं ताट भिरकावून देते. आत्तू, खरंच माझी आई वाईट आहे असं धरुन चालुया आपण. तू घेऊन जा तुझ्या आईला. उगा या छळवादात नको ठेवूस तुझ्या माऊलीस.”किमयाने आत्यापुढे हात जोडले. 

“न्हेलं असतं गं पण..अतुलची फायनल एक्झाम आहे ना.  आणि आमचं घर पडलं खाडीजलळ. तिथली हवा सहन होणार नाही तिला.”

“बरं मग..”

“मग काय निघतेच मी. बराच वेळ झाला येऊन.”

तेवढ्यात किचनमधून मालतीने आवाज दिला. वन्सं,आमटी केलीय चिंचगुळाची तुमच्या आवडीची नि नाचणीचे पापड तळतेय. एकत्रच बसू जेवायला. तुमचं चर्चासत्र संपलं तर हात धुवून घ्या. मी पानं वाढते. 

“वहिनी,तुझं गं पान कुठेय?”

“आत्तु,हल्ली आजी नीट जेवत नाही ना म्हणून आई तिला कधीच्या जुन्या गोष्टी सांगत भरवते. चार घास जास्त जातात तिचे.” 

रेश्माच्या डोळ्यात पाणी आलं. 

“अहं,आत्तू,भरल्या पानावर डोळ्यात पाणी आणू नाही,”आईच म्हणते असं. आत्तुचे डोळे पुसत किमया म्हणाली. कधीतरीची गोड आठवण सांगत सासूला घास भरवणाऱ्या आपल्या वहिनीकडे पाहून जेवणाआधीच त्या माहेरवाशिणीचं मन समाधानाने भरुन पावलं.

रेश्मा जायला निघाली तेंव्हा मालतीने तिला गुळपापडीचा डबा दिला. रेश्माला अजब वाटत होतं..कधीच उलट न बोलणारी आपली भाची आपल्याला आज एवढं का बरं सुनावत होती याचं.  किमया तिला खाली सोडायला गेली..तिचा हात धरुन म्हणाली,”सॉरी आत्तू,आज जरा जास्तच बोलले तुला पण..”

“पण..काय?”

“अगं महिना झाला आईच्या अंगावर जातय. माझी परीक्षा चालू म्हणून कोणालाच बोलली नाही ती. आठ दिवसांपूर्वी चक्कर येऊन पडली. डॉक्टरकडे न्हेलं. त्यांनी स्त्रीरोगतज्ञांची चिठ्ठी दिली. तिथे सगळ्या तपासण्या झाल्या. रिपोर्टस आलेत. गर्भाशयात ट्यूमर आहे. मला आजीचा राग येतोय. हीच तिला सणावाराला गोळ्या घेऊन पाळी पुढेमागे ढकलायला लावायची. माझ्या लेकी यायच्यात. तू बाहेरची झालीस तर त्यांचं कोण करणार..देवाचं कोण करणार? आता माझ्या आईचं कोण करणार गं आत्तु?”

रेश्मा आपल्या भाचीकडे पहात राहिली. एक लेक तिच्या आईबद्दल जाब विचारायला आली होती. जाताना एक लेक तिला जाब विचारत होती!

लेखिका : सुश्री गीता गरुड

प्रस्तुती : सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments