श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ विठाई… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

कोकणातला धुवाधार पाऊस, मी जेवण करण्याच्या गडबडीत होते, मुलगा रवी सकाळी सातलाच शाळेत गेलेला, हे बँकेसाठी साडेनऊला निघत, जाताना यांना डबा द्यायला लागे. माझे दोन्ही स्टो पेटत होते. एका स्टो वर भाजी शिजत होती, दुसऱ्यावर तवा ठेवून मी चपाती लाटून भाजत होते. एवढ्यात यांचा बाहेरून आवाज आला  ” अगं ये ये, आत ये ‘. मी बाहेरचा कानोसा घेतला. यांनी दरवाजा उघडला होता आणि कुणाला तरी आत बोलवत होते. मग माझ्याकडे वळून म्हणाले  ” हिच्यासाठी चहा टाक थोडा ‘. माझी जेवणाची घाई, त्यात यांचे म्हणणे चहा टाक  ” आत्ता मी चहा टाकणार नाही माझी जेवणाची घाई चालली आहे ‘.

” अग ती पावसात पूर्ण भिजली आहे कुडकुडते बिचारी ‘.

” कोण असं म्हणत मी बाहेर आले. पाहते तर एक झाडू घेतलेली म्हातारी बाई बाहेर कुडकुडत होती. त्या कुडकुडणाऱ्या बाईला पाहून मला पण तिची दया आली.

” भिजलीस ग बाई तू, ये आत ये, चहा टाकते तुझ्यासाठी ‘ म्हणून मी स्वयंपाक घरात आले आणि चहाचे आधन ठेवले. चहा तयार केला आणि बरोबर एक कप बशी घेऊन मी बाहेर आले. चहा कपात ओतला आणि तिला द्यायला गेले.

” वहिनीनू, दुसरो फुटको कप देवा, तुमच्या कपातून माका देव नको, मी खालच्या जातीचा गे माय,’

मी म्हंटल ” अगं असं आम्ही काही मानत नाही, वरची जात खालची जात असं काही नसतं. घे तू चहा ‘

” नको वैनीबाय, तुमच्या शेरात चलता आसात, आमच्या गावांनी असला चालचा नाय, तू आपलो फुटको कप हाड बघू ‘

” आता तुझ्यासाठी फुटका कप कुठून आणू? 

हे म्हणेपर्यंत ती कुठून तरी एक करवंटी घेऊन आली.

“ह्याच्यात घाला चाय ‘ती म्हणाली. मी तिच्या कपात चहा ओतला आणि बरोबर दोन बटर खायला दिले.

” एवढ्या पावसात इकडे काय करतेस ग, भिजली आहे संपूर्ण ‘

मी म्हणाले.

“रस्ते, पानांदी झाडायचं काम माझा, गेली वीस वरसा करतय, तेंच माका थोडे पैसे गावातत ‘.

” बरं बरं, आत्ता माझी घाई आहे, उद्या ये अशीच चहा घ्यायला ‘. असं म्हणून मी घरात गेले.

दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्ता झाडायचा आवाज आला, मी अंदाजाने ओळखले आता ती कालची बाई परत येणार, मी स्टो वर चहा ठेवला, आमच्याकडे फुटक्या कानाचा कप नव्हता, आणि ती आमच्या कपातून चहा घेणार नव्हती, म्हणून मी एक चांगल्या कपाचा कान फोडला आणि तसा कप तयार ठेवला.

दारावर टकटक झाली तसे मी दार उघडले. काल ओळख झालेलीच होती. मुलगा रवी सकाळी शाळेत गेला होता. नवरा बँकेत गेला होता, आता मी गप्पा मारायला मोकळी होते.

मी फुटक्या कानाच्या कपातून गरम गरम चहा ओतला आणि अर्धी भाकरी सोबत दिला. तिने पटपट चहा प्यायला  आणि भाकरी पदराला बांधून घेतली.

” भाकरी बांधून घेतलीस कुणासाठी ग?

“माजी नात आसा पाच वर्षाचा, तेका ‘.” घरी कोण कोण असतं ग तुझ्या?

“माझो झील आणि नात ‘

“आणि सून ‘

सून मेली गेल्या साली, झिलाचो काय उपेग नाय, ढोल वाजवता देवळात पन आखों दिवस दारू, दारू पिऊन माका आणि नातीक मारता ‘.

” अरेरे, काय नाव नातीचं? मी विचारलं.

” राधे, असा पाच सहा वर्षाचा .

” आणि तुझं नाव काय ग मी विचारायलाच विसरले ‘

“माका इठा म्हणटत ‘

हा म्हणजे विठा असणार ‘ मी म्हणाले

” तुझ्या नातीला घेऊन ये एकदा, विठाई ‘.

“काय झ्याक हाक मारल्यात माका, विठाई. अशी हाक कोणीच मारुक नाय ‘

आणि विठाई रोज येऊ लागली, रस्ता झाडता झाडता आमच्या पानंदीत आली की माझा नवरा मला सांगायचा “तुझी विठाई येतेय, चहा तयार ठेव ‘.

एकदा मी घरात शेंगदाणे भाजत होते, तेव्हाच विठाई चहासाठी आली होती. मी तिला चहा आणि बटर घेऊन गेले.  तर म्हणाली” वैनी बाय, वास बरो येता, काय भाजतंस? माका थोडे दी गे खाऊक ‘

मी तिला भाजलेले शेंगदाणे दिले, तिने ते पदराच्या शेवटला बांधून घेतले.

“वैनीवाय, आता रस्तो झाडताना एक एक दानो तोंडात टाकीन ‘.विठाई मला म्हणायची वैनी बाय, माझ्या नवऱ्यला दादा आणि माझ्या मुलाला नातू किंवा नातवा.

काजूचा मोसम सुरू झाला की विठाई माझ्या मुलासाठी ओले काजूगर आणायची, ते काजूगरसोलताना   तिचे हात कुजून जायचे. मी तिला म्हणायचे ” विठाई, काजू सोलून तुझे हात कुजून गेले, तू असे सोडू नकोस त्याऐवजी मी सुरीने ते कापते,’

विठाई म्हणायची ” वैनी बाय, काजूची फका सूर्यन कापूची नसतत, ती हातानं चिरुची असतांत ‘

रोज घरी येणारी विठाई दोन दिवस आली नाही, रस्ता झाडायला तिच्या ऐवजी एक दुसरीच बाई दिसली, तिच्याकडे मी विठाईची चौकशी केली. ती म्हणाली विठाईला ताप येतोय, घरी झोपून आहें.’

हे बँकेत निघताच मी भर उन्हात आंबेडकर नगरच्या दिशेने चालू लागले. अंदाजे दोन किलोमीटर चालल्या नंतर आंबेडकर नगर लागले. मी विठाईची चौकशी केली आणि तिच्या झोपडीत पोहोचले. तिच्या बाजूला तिची नात बसून होती. मी राधेला विचारलं  ” केव्हापासून येतोय ग ताप?

” चार दिवस झाले बाई, थंडी वाजून ताप येतोय, दोन दिवस अंगावर काढले, कालपासून अगदी जमीना तेव्हा झोपली आहे ‘

मी विठाईच्या अंगाला हात लावून पाहिले, शरीर तापले होते. मी राधेला बरोबर घेतले आणि तिथून जवळच असणारे आमचे ओळखीचे डॉक्टर नाडकर्णी यांच्या दवाखान्यात गेले. डॉक्टर ना विनंती केली की तुम्ही आंबेडकर नगर मध्ये येऊन विठाईला तपासावे. डॉक्टर माझ्या नवऱ्याचे मित्रच. मी दवाखान्यात गेले म्हटल्यावर ते त्वरित माझ्याबरोबर आले. त्यानी विठाईला तपासले आणि मलेरियाचा संशय व्यक्त केला. आपल्या जवळील थोडी औषधे दिली दुकानातून आणायला लिहून दिली. मी राधेला घेऊन तळ्यापलीकडे असलेल्या औषध दुकानात चालत चालत गेले. तेथे ती औषधे विकत घेतली आणि परत आंबेडकर नगर मध्ये आले. राधेला औषधे कशी द्यायची हे व्यवस्थित समजावले. डॉक्टर नाडकर्णी रोज येऊन एक इंजेक्शन देणार होते.

चार दिवसांनी विठाई पुन्हा रस्ता झाडण्याच्या कामावर हजर झाली. आमच्या घराजवळ आल्यावर घराच्या पायरीवर बसली आणि मला बाहेर बोलावून माझ्या पायावर डोकं ठेवू पाहत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments