सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ स्त्रीणाम् भाग्यम्… भाग-१ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
गुरुवार असल्यामुळे शेवटचं लेक्चर नव्हतं, त्यामुळे लवकरच निघता आलं. उद्या सकाळची फ्लाईट. पहाटेच निघावं लागणार. तसं पॅकिंग ऑलमोस्ट झालंय म्हणा. तेव्हा घरी जाऊन मस्तपैकी ताणून द्यायला हरकत नाही.
बसच्या रांगेत उभी राहिले. ऍज युज्वल, बसचा पत्ता नव्हता. समोर लक्ष गेलं तर एक बाई रस्ता क्रॉस करत होती. डावी-उजवीकडे न बघता माझ्याचकडे बघत येत होती. मग माझीच जबाबदारी असल्यासारखं मी कुठून वाहन येत नाही ना, ते बघितलं. रेड सिग्नल असावा. दोन्ही बाजूंना रस्ता रिकामाच होता.
‘‘आरतीच ना तू?”
मी चमकून तिच्याकडे पाहिलं. मला अगदी नावानिशी ओळखत होती.
ती कोण ते मात्र मला आठवेना. फिकुटलेला गोरा रंग, फरकटलेलं मोठं कुंकू, विस्कटलेले केस, कशीतरीच गुंडाळलेली हलक्यातली साडी…
‘‘तू आरती नाहीयेस?” मला अगदी हक्कानं अगंतुगं करत होती.
‘‘मी आरतीच आहे. पण तुम्ही…”
‘‘ओळखलं नाहीस ना?” ती दुखावली गेल्याचं तिच्या सुरातून पटकन जाणवत होतं.
‘‘तसं बघितल्यासारखं वाटतंय कुठे तरी. ”
‘‘म्हणजे नक्की आठवत नाहीय की ओळख द्यायची नाही? आठवत नसेल तर ठीक आहे. मी सांगेन माझं नाव. पण ओळख द्यायची नसेल, तर तसं सांग म्हणजे मी सरळ निघून जाईन. ”
खरं तर तिच्या बोलण्याचा मला राग आला, पण ते दुखावलेपण… मी टक लावून तिच्याकडे पाहू लागले. एकीकडे मेमरीच्या एकेका कप्यांत डोकावून बघत होते. कुठे बरं भेटलो असू आम्ही? पोस्टग्रॅज्युएशन तर नक्कीच नाही. कॉलेज, शेजारी, आईच्या शेजारी, जुन्या घराच्या शेजारी, शाळा, प्रायमरी शाळा…
‘‘ओह, तज्ज्ञा तू?”
तिला खरोखरच खूप आनंद झाला.
‘‘सॉरी तज्ज्ञा, मी पटकन ओळखलंच नाही तुला. कशी आहेस तू?” तिचे डोळे भरुन आले.
तेवढ्यात बस आली. मग आम्ही सरळ बसची रांग सोडून बाहेर पडलो.
‘‘तुला वेळ आहे ना… चल, आपण कुठे तरी बसून गप्पा मारू या. ” असं मी विचारल्यावर ती लगेचच तयार झाली.
माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नव्हता. शाळेत असतानाची, छान कडक इस्त्रीचा युनिफॉर्म घातलेली, मऊशार केसांचा बॉबकट केलेली, गोरीपान, तेजस्वी, डौलदार तज्ज्ञा.
चौथीच्या सेकंड टर्ममध्ये ती नव्यानेच शाळेत आली. ती वर्गात शिरली मात्र, आम्ही सगळ्याच जणी तिच्याकडे टकामका बघत राहिलो.
मराठीचा तास चालू होता. बाईंनी तिचं नाव विचारलं.
‘‘तज्ज्ञा काळे. ”
‘‘आरती, तू हायेस्ट आली होतीस ना मराठीत?”
मी कॉलर ताठ करून उभी राहिले.
बाईंनी मला जवळ बोलावलं. माझ्या हातात खडू दिला आणि फळ्यावर तिचं नाव लिहायला सांगितलं. मी अतिशय सुरेख अक्षरात तिचं नाव लिहिलं – ‘तज्ञा काळे. ’
‘‘काय गं, बरोबर लिहिलंय का हिने तुझं नाव?”
‘‘चूक”, असं म्हणून, स्वत: अगदी मोठी विद्वान असल्यासारखा चेहरा करुन, तिने डस्टरने मी लिहिलेलं अख्खं नाव पुसलं आणि पुन्हा नव्याने लिहिलं – ‘तज्ज्ञा काळे. ’
मला रागच आला तिचा. एक तर असलं कसलं नाव! दुसरं म्हणजे ‘अर्धा ज’ लिहायला राहिला, तर त्यासाठी अख्खं नाव कशाला पुसायला पाहिजे? मी विचारलं तिला तसं.
‘‘मग ते अव्यवस्थित दिसलं असतं. मला सगळ्या गोष्टी व्यवस्थितच लागतात. ”
आखडू कुठची… गेली उडत.
मग बाईंनी तिला तिच्या नावाविषयी विचारलं. तर समजा, शब्दांनी तोंड तुडुंब भरलंय आणि त्यांना बाहेर पडायला थोडीशी वाट मिळालीय, म्हटल्यावर कसं होईल, तसं तिने भराभर बोलायला सुरुवात केली.
‘‘माझे दोन्ही काका डॉक्टर आहेत. एक चाइल्ड स्पेशालिस्ट आणि दुसरे इ. एन. टी. स्पेशालिस्ट आहेत. मीही डॉक्टर व्हावं असं माझ्या वडिलांचं स्वप्न आहे. मी डॉक्टर होऊन पुढे स्पेशालिस्ट व्हावं, असं त्यांना वाटतं. कसली स्पेशालिस्ट ते त्यांनी अजून ठरवलेलं नाही. पण मी स्पेशालिस्ट होणार हे नक्की. स्पेशालिस्ट म्हणजे तज्ज्ञ आणि मी मुलगी म्हणून तज्ज्ञा. ’’
बाईंनी तिला नेमकं माझ्याशेजारीच बसवलं.
थोडं चालावं लागलं, तरी निवांतपणे बसता येईल, म्हणून आम्ही जरा आतल्या रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये गेलो. बनवायला जास्त वेळ लागणा-या पदार्थांची ऑर्डर दिली.
‘‘तुझं मेडिकल झालं का गं पुरं?” मी विचारलं.
ती दोन मिनिटं काहीच बोलली नाही. तिचे डोळे भरून आले. तिने ओठ घट्ट मिटून घेतले. बहुधा आवंढाही गिळला असावा.
‘‘इफ यू आर नॉट कम्फर्टेबल, लेट अस नॉट डिस्कस एनिथिंग. आपण शांत बसू या. खाऊया. कॉफी पिऊया आणि निघूया. ”
‘‘असं नको ना गं म्हणू, आरती. मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे. म्हणून तर…”
मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ‘‘बोल, मी ऐकतेय. तुला जे सांगावसं वाटतंय ते सांग. तुला जे सांगायचे नसेल ते…”
‘‘मला सगळं सांगायचं आहे. ”
तिने पदराखाली ब्लाऊजच्या डाव्या बाजूला वरच्या भागात हात घातला आणि रुमाल बाहेर काढला. चेहरा खसाखसा पुसून रुमाल परत आत ठेवला.
‘‘खरं सांगू? मी डॉक्टर व्हावं, असा जो अट्टाहास होता ना पपांचा, त्यामुळेच वाट लागली माझ्या आयुष्याची. ”
ती थोडा वेळ काहीच बोलली नाही. बहुधा शब्दांची जुळवाजुळव करत असावी किंवा कुठून सुरुवात करावी वगैरे… मीही स्वस्थ बसून राहिले.
‘‘तुला आठवतं आरती, अगदी अर्ध्या नाही तर एका मार्कासाठीसुध्दा बाईंशी भांडायचे ते. मी लहानच होते तेव्हा. शिवाय एखादा का होईना, मार्क वाढतोय, म्हटल्यावर मला त्यात काही गैर वाटायचं नाही. अर्थात तुला त्रास होत असेल त्याचा. ”
‘‘हो. मला हातात आलेल्या पहिल्या नंबरवर पाणी सोडावं लागायचं. त्यामुळे तू दुस-या शाळेत गेलीस तेव्हा मला हायसं वाटलं. रागावू नकोस हं, असं बोलले म्हणून. ”
ती हसली.
‘‘त्यांनी माझी शाळा का बदलली माहीत आहे?”
‘‘तुम्ही दुसरीकडे रहायला गेलात म्हणून ना!”
‘‘नाही. एस. एस. सी. ला मेरिटमध्ये यावं म्हणून त्यांनी मला त्या चांगल्या शाळेत घातलं आणि ती शाळा जवळ पडावी म्हणून तिथे घर घेऊन आम्ही शिफ्ट झालो. ”
‘‘बापरे, असं पण असतं?”
‘‘पपांचं होतं. मी एस. एस. सी. ला असताना तर आमचं अख्खं घरच एस. एस. सी. ला असल्यासारखं वाटत होतं. एक तर शाळा, शाळेचा क्लास, शिवाय बाहेरचा क्लास या सगळ्यांचे होमवर्क्स, शाळेच्या टेस्ट सीरिज, बाहेरच्या टेस्ट सीरिज, शिवाय प्रायव्हेट ट्यूशन्स लावायचंही त्यांच्या मनात होतं. पण वेळच नव्हता, त्यामुळे त्यांचा नाइलाज झाला. ”
मेरिट लिस्टमध्ये तिचं नाव वाचल्याचं मला आठवत नव्हतं. तिला विचारू की नको…
‘‘घरातही जेवताना, आंघोळ करताना ते पुस्तकं घेऊन मला वाचून दाखवत असायचे. शेवटी तर मला अभ्यासाचा उबग आला. प्रिलिम चालू असतांना मला कावीळ झाली. एवढा विकनेस आला होता की, शेवटचे दोन पेपर मी धड लिहूही शकले नाही. अर्थात माझा आधीचा रेकॉर्ड बघून टिचर्सनी कन्सिडर केलं, पण पपांचं मात्र धाबं दणाणलं. ”
‘‘येस. आय कॅन इमॅजिन. ”
‘‘मी लवकरात लवकर बरी व्हावी, म्हणून त्यांनी डॉक्टरांना स्ट्रॉंग औषधं द्यायला लावली. माझा अशक्तपणा अजूनच वाढला. तरीही बाकीचा दिनक्रम तसाच चालू होता. त्यांचं आपलं, ‘बस, आता एकच महिना राहिला’, ‘ओन्ली थ्री विक्स. तेवढी कळ सोस. ’, ‘आठच दिवस. मग भरपूर सुट्टी. तू म्हणशील तिथे जाऊ या आपण. ’ चालूच. माझ्या डोक्यावर बसून माझ्याकडून अभ्यास करून घ्यायचे ते. त्यासाठी रजा घेऊन घरी राहिले होते ते. ”
‘‘आणि आई?”
‘‘ममीला तर ते सतत ओरडत रहायचे, ‘तिला कावीळ झाली, त्याला तू जबाबदार आहेस. आता तरी जागी हो. डाएटिशीयनकडून लिहून आणला आहे, अगदी तस्साच डाएट तिला दे. तसूभरही फरक होता कामा नये. ’ आणि मला जरी एखादा पदार्थ आणखी खावासा वाटला, तरी मिळायचा नाही आणि दुसरं काहीतरी नको असलं, तरी ते गिळावं लागायचं. ममी बिचारी माझी समजूत घालायची, ‘थोडेच दिवस चालणार आहे हे. एकदा परीक्षा होऊन जाऊ दे. मग सुट्टीत तुला जे जे आणि जेवढं म्हणून खावंसं वाटेल, ते सगळं करीन मी. ‘ ”
– क्रमशः भाग पहिला
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈