सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ स्त्रीणाम् भाग्यम्… भाग-३ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
(सिक्युरिटी चेक वगैरे आटोपूनही तब्बल सव्वा तास बाकी होता. मग पुस्तक काढून वाचत बसले. मध्ये-मध्ये डोळे मिटत होते. इथून पुढे —)
समोरून एअरहोस्टेसची ये-जा चालली होती. त्यांच्याकडे बघताना मला नेहेमीसारखाच कॉम्प्लेक्स आला.
मग आराम म्हणतो ते आठवलं. (का कुणास ठाऊक, पण ‘आराम’ म्हटल्यावर आज मला आमची पहिली भेट आठवली. )
‘‘आराम नाव ऐकलं नव्हतं, मी यापूर्वी. ”
‘‘कसं ऐकणार? अख्ख्या जगात माझं एकट्याचंच आहे. ”
‘‘कोणाला सुचलं?”
‘‘माझ्या आईला. आरतीला सुट झालं पाहिजे ना, म्हणून. ”
त्यावर मी मस्तपैकी लाजले होते.
‘‘खरं सांगायचं, तर आजीच्या मनात होतं, आजोबांचं नाव ठेवायचं- रामचंद्र. मग आईने त्या ‘राम’ चं केलं ‘आराम’…”) तर आराम म्हणतो, ‘‘त्या एअरहोस्टेसना पाहून तुला कशाला कॉम्प्लेक्स यायला पाहिजे? असं सुंदर-बिंदर दिसणं, नटणं-थटणं ही त्यांच्या जॉबची डिमांड असते. उद्या तुझ्यासारखी प्रोफेसर अशी नटूनथटून लेक्चर द्यायला गेली, तर मुलं लाईनबिईन मारतील आणि मुली अभ्यासबिभ्यास सोडून तुला कॉम्पिट करायला लागतील. उलट मी तर म्हणतो, सुंदर नसणं हे प्रोफेसरबाईंचं ऍडिशनल क्वालिफिकेशन आहे. ”
तरीपण त्यांचं ते अप-टू-डेट असणं, ग्रेसफुली वावरणं, मुख्य म्हणजे तो ओसंडून वाहणारा कॉन्फिडन्स…
समोरून जाणा-या पाच-सहाजणींतली एक एअरहोस्टेस पटकन वळली आणि ‘हाय आरती’ करत माझ्याकडे आली.
एअरहोस्टेस जमातीचं आणि माझं नातं म्हणजे ‘ती मात्र माझी कुणीच लागत नाही’, या कॅटिगिरीतलं. आणि ही चक्क नावाने हाक मारतेय!
‘‘ओळखलंस मला?” ती माझ्यासमोर वाकून उभी होती, पण तेही ग्रेसफुली!
‘‘मी सुभद्रा. ”
माझ्या अख्ख्या आयुष्यात दोनच सुभद्रा माझ्या ओळखीच्या आहेत. एक – ती भावाच्या बोटाला बांधायला चिंधी नसणारी गरीब बिचारी सुभद्रा आणि दुसरी- चौथीत माझ्या शेजारी बसणारी, अजागळ, अस्वच्छ सुभद्रा. ही तिसरी सुभद्रा कोण आणखी?
माझ्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह तिने वाचलं असावं. माझ्या शेजारी बसून तिने विचारलं, ‘‘अगं, चौथीला आपण एकाच वर्गात होतो. शेजारी शेजारी बसायचो. आठवलं?”
‘‘पण…” माझं तत पप झालं.
‘‘तेव्हा मळलेला, चुरगळलेला युनिफॉर्म घालून, विस्कटलेल्या केसांनी शाळेत येणारी ती सुभद्रा- ती मीच. ”
‘‘काय सांगतेस!” मी दोन सेकंद डोळे मिटले. त्या सुभद्राचा चेहरा डोळ्यांसमोर आणला आणि मग डोळे उघडून या सुभद्रेकडे बघितलं. डोळे, नाक, जिवणी, हनुवटी…
‘‘हो… अगं, तीच आहेस तू…”
मला खूप आनंद झाला.
‘‘तू एवढी सुंदर असशील, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. ”
‘‘अगं, तुलाच काय, मलाही नव्हतं वाटलं. इव्हन माझ्या आई-बाबांना नव्हतं वाटलं. आणि तेव्हा तर मी भुतासारखी यायचे शाळेत. माझी आई सकाळी घरी असली तर माझ्या वेण्या घालायची. युनिफॉर्म काढून द्यायची, पण तिची सकाळची शिफ्ट असली की मी तशीच यायचे. मला स्वत:ला जमायचं नाही आणि आजी, काक्या वगैरे किचनमध्ये बिझी असायच्या. ”
तुंगारेबाई रोज ओरडायच्या तिला. ‘‘वेण्या घालायला वेळ नसेल, तर चकोट करायला सांग आईला. ”
दुस-या कोणालाही हे बोलायची हिंमत झाली नसती बाईंची, पण ही आपली हॅ… हॅ… करून हसायची.
‘‘तुला आपल्या तुंगारेबाई आठवतात का गं, आरती?”
‘‘त्यांचीच आठवण झाली आता. ”
‘‘किती छान होत्या नाही गं त्या! व्यवस्थित राहायच्या अगदी. मला तर त्या अगदी राणीसारख्या, देवीसारख्या वाटायच्या. खूSSप आवडायच्या मला त्या. ”
‘‘पण, त्या किती ओरडत असायच्या तुला!”
‘‘खरं सांगू आरती? मला तेही आवडायचं. घरात तर मी कुणाच्या खिसगणतीतही नसायचे. शाळेतही तू सोडलीस, तर माझ्याशी फारसं कोणी बोलायचं नाही. त्यामुळे ओरडण्यासाठी का होईना, त्या राणीसारख्या ग्रेट बाई माझ्याशी बोलतात, माझं अस्तित्व मान्य करतात, याचं मला खूप अप्रूप वाटायचं. आणखी एक गंमत सांगू?”
‘‘सांग. ”
‘‘तुला आठवतं?त्या म्हणायच्या – तुझ्या आईला वेळ नसेल तुझे केस विंचरायला, तर तुझं चकोट करायला सांग. ”
मला कानकोंडं झाल्यासारखं वाटलं. मी मानेनेच होकार दिला, पण ती अगदी मनमोकळं हसत होती.
‘‘माझ्या डोळ्यांसमोर चकोट केलेली मी यायची आणि वाटायचं, खरंच चकोट केलं तर अख्खी शाळा मला ओळखायला लागेल. खूप ग्रेट वाटायचं मला आणि हसूच यायचं. मग बाई आणखी चिडायच्या, ” ती मनापासून हसत होती.
‘‘त्या दिवशी एअरपोर्टवरच भेटल्या होत्या. मला बघून एवढं आश्चर्य वाटलं त्यांना आणि आनंदही झाला. मी वाकून त्यांच्या पाया पडले, तर एकदम डोळेच भरून आले त्यांचे. म्हणाल्या – ‘अगं, पायाबिया नको पडूस इथे. त्यात तू एअरहोस्टेस. ’ मग मी त्यांना सांगून टाकलं- मला त्यांच्याबद्दल काय वाटायचं ते. खरंच, माझं रोल मॉडेल होत्या त्या. टीचर्समध्ये त्या आणि मैत्रिणीत तू. ”
‘‘अगं, काहीतरीच काय?” मला संकोचाने अवघडल्यासारखं झालं.
‘‘खरंच सांगते, आरती. अगदी मनापासून. तू किती व्यवस्थित रहायचीस! तुझी हुशारी, तुझी वह्या-पुस्तकं. सगळ्यांशी मिळून-मिसळून वागायचीस तू. अगदी माझ्याशीसुध्दा बोलायचीस. मला डबा खायला घ्यायचीस. ”
ती रोज एक स्टीलचा चपटा डबा घेऊन यायची. त्यात भात असायचा, वरून ओतलेली आमटी भातात जिरलेली असायची आणि वर आमटीतली माशाची फोड. बाकी सगळ्यांच्या डब्यात छान-छान, वेगवेगळं असायचं. पण हिच्या डब्यात मात्र तिन्ही त्रिकाळ हेच.
‘‘मला सगळ्या जणी डब्यावरून चिडवायच्या. तू मात्र कधीच काही बोलली नाहीस. उलट न चुकता स्वत:च्या डब्यातलं मला द्यायचीस. आणखी एक गंमत सांगू, आरती. ती शिष्ट मुलगी तज्ज्ञा आपल्या वर्गात आली आणि बाईंनी तिचं नाव तुला बोर्डवर लिहायला सांगितलं. तू ‘तज्ञा’ लिहिलंस आणि त्या खडूस मुलीनं पुसलं बघ. मला तिचा खूप राग आला. मला वाटलं, तू कधीच चुकणारच नाहीस. तिच्याच वडिलांनी तिचं नाव चुकीचं ठेवलं असणार. ”
माझे डोळे भरून आले.
ती पायावर पाय ठेवून ग्रेसफुली बसली होती आणि गुडघ्यांवर हातात हात. मी तिच्या हातावर हात ठेवला. शब्दांतून सांगणं अशक्य असलेल्या भावना स्पर्शातून पोहोचत होत्या. तीही गलबलून गेली असावी. थोड्या वेळाने दोघी शांत झालो.
‘‘तुझा हा मेकओव्हर कधी झाला गं?”
‘‘ती गंमतच आहे. पाचवीत जायच्या मे महिन्यात बाबांना क्वार्टर्स मिळाल्या. मग आम्ही तिकडे राहायला गेलो. आम्ही म्हणजे मी, आई-बाबा आणि माझा भाऊ. छान नेटकं कुटुंब झालं आमचं. त्यापूर्वी जॉईंट फॅमिली म्हणजे दोन मोठ्या खोल्या आणि घरात पंचवीस-तीस माणसं. त्यात आणखी फक्त जेवायला येणारे पंधरा-वीस खानावळे. पण इथे तीन खोल्या आणि आम्ही चौघंच. त्यामुळे आपणही जगतोय-बिगतोय असं जाणवायला लागलं. ”
हिचं बॅकग्राऊंड असं असू शकेल, असं कधी डोक्यातही नव्हतं आलं माझ्या.
‘‘आमच्या शेजारी एक फॅमिली होती, त्यांची मुलगी सरिता. तिला सगळे रीटा म्हणायचे. तिने तुझी कमी भरून काढली. तिचे डॅड तिच्याबरोबरच मलाही शिकवायचे. त्यामुळे मला अभ्यासातलं खूपसं कळायला लागलं. अभ्यास आवडायला लागला. अगदी तुझ्याएवढे नाहीत, पण ब-यापैकी मार्क्स मिळायला लागले. मग थोडा कॉन्फिडन्सपण आला. तोपर्यंत मी केस विंचरायला, कपडे धुवून इस्त्री करायला वगैरे शिकले होते. तुझ्या डब्यात असायचं ना काय-काय, तसं मी आईला सांगायचे बनवायला. आई रोज नवीननवीन काही तरी करून द्यायची. मग मला शाळेत माझा डबा उघडायची लाज वाटेनाशी झाली. ”
खूप बरं वाटलं ते ऐकून. अर्थात तिला त्या वेळी लाजबिज वाटत असेल, हे तेव्हा माझ्या गावीही नसायचं.
‘‘रीटाला आत्या होती. ती ब्युटिशियनचा कोर्स करायला लागली. मग तिचं होमवर्क आमच्यावर चालायचं. आम्ही नववीत होतो तेव्हा. दोघींच्याही आया विरोध करायच्या, पण आम्ही सगळं यथासांग करून घ्यायचो. आयब्रोज, फेशियल, वेगवेगळे हेअरकट्स, मेकअप. आम्ही तेव्हा पंधरा-सोळा वर्षांच्या होतो, त्यामुळे निसर्गाचाही हातभार लागला. तेव्हाच कधीतरी लक्षात आलं – आपण काय अगदीच ह्या नाही आहोत. हे एअरहोस्टेस वगैरे आत्याचीच आयडिया. तिनेच माझं ग्रुमिंग केलं. नंतर कोर्सलाही गेले. या कोर्सचं सर्टिफिकेट मिळालं ना, तेव्हा मला तुझी खूप आठवण झाली. ”
‘‘काSSय?”
‘‘म्हणजे तशी नेहमीच यायची. पण त्या दिवशी खूपच आली, म्हणून मग पत्ता शोधत-शोधत तुझ्या जुन्या घरी आले, तर कळलं, तुम्ही शिफ्ट झालाय. शेजारचेही सगळे नवीनच होते. तुझा पत्ता कोणालाच ठाऊक नव्हता. गंमत म्हणजे आम्ही शिफ्ट झालो ना चौथीनंतरच्या सुट्टीत, तेव्हा तुला सांगायला मी तुझ्या घरी आले होते, पण तुझ्या घराला कुलूप. मी पण तेव्हा एवढी बावळट होते ना… ना कोणाकडे निरोप ठेवला, ना तुझा पोस्टल ऍड्रेस घेतला. नाही तर आपला कॉन्टॅक्ट राहिला असता ना… आता मात्र कॉन्टॅक्टमध्ये राहू या. ”
तेवढ्यात माझ्या फ्लाईटची वेळ झाली. एकमेकींचा निरोप घेऊन आम्ही निघालो.
काय हा योगायोग! काल तज्ज्ञा आणि आज सुभद्रा. इतक्या वर्षांनी भेटलो.
त्या चौदा-पंधरा वर्षांत पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं. होत्याचं नव्हतं झालं होतं. वठल्या झाडाला धुमारे फुटले होते. सगळं चित्रच बदलून गेलं होतं – काळ आणि त्याच्या जोडीला नशीब.
संस्कृतच्या कंटकबाईंना कळलं तर त्या म्हणतील, “पूर्वी म्हणायचे – स्त्रीयश्चरित्रं पुरुषस्य भाग्यम्, पण आता मात्र स्त्रीणाम् सुध्दा ‘भाग्यम्’च म्हटलं पाहिजे. ”
— समाप्त —
सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈