श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ धनगरवाडी प्रकाशाने भरली… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मधूनच खसखस ऐकू येत होती, एखादे पाखरू झाडातून बाहेर येत होतं. दोघी हातात हात घेऊन आणि हातात काठी घेऊन चढणं चढत होत्या. ) – इथून पुढे
अर्धा तास चढन चढल्यावर सपाट भाग लागला, दोघी पहात राहिल्या, पश्चिम दिशेला सहयाद्रीच्या रांगा दिसत होत्या, सगळा भाग हिरवा गार. अजून अर्धा तास चालल्यानंतर लांबून एक घर दिसू लागलं. त्या घराकडे पहात नीलिमा म्हणाली “संध्ये, हाच मोरेवाडीचा धनगरवाडा बहुतेक “.
दोघी त्या घराच्या दिशेने चालू लागल्या. ते मातीच्या विटाचे छप्पर असलेल्या घराजवळ शेळ्या बांधलेल्या दिसत होत्या. त्या शेळ्यांचे “बे.. बे ऐकू येत होतं. त्यांच्या पायाची जाग लागताच एक कुत्रा भुंकू लागला आणि त्या कुत्र्याचे भुंकणे ऐकून एक ऐशी ब्याऐशी वयाची बाई हातात काठी घेऊन बाहेर आली.
या दोघीना पहाताच ती म्हातारी आश्रयचकित झाली
“कोन बे, का आलिया ? “
“आम्ही शहरातून आलोय. तुम्ही एकट्या राहता का इथे?”
“माजी सून हाय आनी मी “
“सून कुठे गेली तुमची?”
“पानी आनय गेली, थिकून आनाव लागत न्हवं “
तेव्हड्यात तिची सून प्लास्टिकच्या दोन कळश्या एकावर एक घेऊन आली, या दोघीना पाहतच आश्चर्यचकित झाली.
“कुणीकधन आलाय म्हणायचं?”
नीलिमा म्हणाली.. “आम्ही पेपरवाले आहोत. तुम्हाला सरकारी योजना मिळतात काय, कोण सरकारी माणूस तुम्हाला भेटतात काय, हे पहाण्यासाठी आलोय “
“हिथं कोन बी येत न्हाई, आमास्नी घासलेट बी मिलत न्हाई, रातच्याला दिवा कसा लावायचा?”
नीलिमाचे पटकन वर लक्ष गेले, घरात वीज असल्याचे काही वाटेना.
तिने विचारले ” लाईट नाही तुमच्यकडे? “
“न्हाई, लाईट न्हाई आनी घासलेट बी देत न्हाईत “
संध्या नीलिमाला म्हणाली, “आश्यर्य आहे, स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी अजून भारतात लाईट पोचली नाही? आणि आपण कसले कसले दावे करत असतो. मग दिवे कसे लावता रात्री?”
सुनेने एक बाटली आणुन दिली, संध्याने वास घेतला, “ डिझेल? हे कुठं मिळते?”
“बाजाराला जाती की मी, कोंबड्या घेऊन, तवा तांदूळ, डाळ आनती, त्या पिशवीतुन ही बाटली दडवून आणती. काय करायचा? घासलेट बी देत न्हाई कोनी. ”
“तुमच रेशनकार्ड आहे की नाही?”
“न्हाई बा, काय असतंय त्ये?”
“तुमच्याकडे ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेविका कधी येतात की नाही?”
“न्हाई बा, आज किती वारसन तुमी हिथं आलाय “
“तुमी मत द्यायला जाता काय?”
“न्हाई, माजा दादला व्हता, तो जायचा मत द्यायला. आता कोन आमास्नी सांगत बी न्हाई “
नीलिमा आणि संध्याने सारे घर पाहिले. रानातली भाजी तोडलेली दिसत होती, एका भांड्यात तांदूळ होते, नाचणी होती. त्यांच्या लक्षात आले, भात कुटून त्याचे तांदूळ बनवत असणार. आजूबाजूला शेळ्या, मेंढया बांधलेल्या होत्या.
“मग बकरे विकता की नाही?”
“व्हय, आमचा एक पाव्हणा हाय वर घाटावरचा, त्यो बकरी घेऊन जातो, आमास्नी तांदूळ, तेल आणुन देतो”
नीलिमाने त्यांचे आणि त्यांच्या घराचे, परिसराचे फोटो काढले, आणि त्यांना म्हणाली,
“आता तुमच्यकडे लाईट येते की नाही बघ, तुमच्यासाठी रॉकेलची पण व्यवस्था होईल. ”
दोघी परत निघाल्या. नीलिमा संध्याला म्हणाली “बारा दिवस फिरून जी बातमी मिळाली नव्हती, ती आज मिळाली बघ, या बातमीने आग लागेल, बघत राहा “
नीलिमा आणि धनगरवाडीतल्या सासू सून बोलत असताना संध्याने सर्व मोबाईलवर रेकॉर्ड केले होते.
पुन्हा घाट उतरून त्या गावात आल्या आणि आपली गाडी घेऊन तालुक्याच्या गावी पोहोचल्या.
नीलिमाने मोठी बातमी तयार केली आणि फोटो आणि रेकॉर्डिंगसह ऑफिसला पाठवली.
खानोलकर साहेबांनी बातमी, फोटो, रेकॉर्डिंग पाहिले. त्यांनी संपादक मेहताना बातमी दाखवली. मेहताच्या लक्षात आले, ही बातमी सर्वप्रथम आपल्या पेपरला लागायला हवी, मग पाहिजे तर tv वर देऊ.
दुसऱ्या दिवशी त्या पेपरचे पहिल्या पानावर ठळक बातमी होती.
‘स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली तरी जिल्ह्यात वीज नाही, सरकारी योजना पोहोचल्या नाहीत, रेशनकार्ड नाही ‘.
त्या दोघी सासूसुनेचे फोटो होते, त्यांच्या घराचे फोटो होते.
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर होती. सत्ताधारी पक्षाचा खासदार तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होता. त्याच्या हातात सकाळचा पेपर पडला मात्र, तो खवळला, त्याने त्या भागातील कार्यकर्त्याना फोन लावले आणि ताबडतोब त्या वाडीत जायला सांगितले.
TV वरील सर्व चॅनेलवर कालच्या रेकॉर्डिंग परत परत दाखवत होते. पालकमंत्री आमदारावर चिडले. आमदार मामलेदारावर चिडले. मामलेदार त्या गावातील तलाठ्यावर भडकले.
कलेक्टर आपला लवाजमा घेऊन निघाले, सोबत मामलेदार होते, ग्रामसेवक होते, तलाठी होते, निवडणूक लढवणारे उमेदवार होते.
गावात अजून सकाळचे पेपर आले नव्हते. लोकांना कळेना एव्हड्या सरकारी गाड्या गावात कशासाठी धाऊ लागल्या?
सर्व मंडळींनी आपल्या गाड्या गावात थांबवल्या आणि घाटी चढायला लागले.
त्या सासू सुना नेहेमीसारख्या निवांत होत्या. तांदूळ जात्यावर दळत होत्या. मधेच शेळ्यांना हिरवे गवत घालत होत्या.
अचानक बाहेर गडबड सुरु झाली म्हणून त्या बाहेर आल्या. बाहेर इतकी माणसे का जमा झाली, त्याना कळेना.
कलेक्टर फिरून घर पहात होता. त्यानी सुनेला विचारले “लाईट नाही आली काय?”
“न्हाई “.
“रेशनकार्ड आहे?”
“न्हाई “
“हे तलाठी, ग्रामसेवक कधी आले होते काय?”
“न्हाई ‘.
“ठीक आहे, तुमची लाईटची व्यवस्था दोन दिवसात होईल, रेशनकार्ड आठ दिवसात मिळेल, तुम्हाला पक्के घर हवे आहे काय?
“व्हय आनी राकील बी मिलत न्हाई “.
“तुमचे पक्के घर सहा महिन्यात होईल, आनी रॉकेल खास तुमच्यासाठी मंजूर करतो, ते सरकारचा माणूस घरपोच करेल. ”
… दोन दिवसात सोलर सिस्टिम बसवली गेली आणि मोरेवाडीची धनगरवाडी प्रकाशाने भरून गेली.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈