श्री मंगेश मधुकर

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ दोन कथा — (१) रिल / (२) क्रोसिन ☆ श्री मंगेश मधुकर ☆

(१) रिल”

रुटीनमध्ये गुरफटलेल्या शहरी लोकांना पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की निसर्गाच्या भेटीची ओढ लागते. जूनपासून पावसाळी सहली सुरू होतात. अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी गर्दी झालेली. त्यात जोरदार पावसाच्या हजेरीनं सगळ्यांचा उत्साह वाढलेला. नेहमी ट्राफिक जाम, प्रदूषण, माणसांची, गाड्यांच्या गर्दीची सवय असलेल्यांना हिरवाईनं सजलेल्या डोंगरावरून पडणारे धबधबे, दरीत खोल खोल कोसळणारं पाणी, झाडांवरून टपकणारे थेंब, आसमंतात पसरलेला सुगंध, मोकळी स्वच्छ हवा अशा मनमोहित वातावरणानं काय करू अन काय नको अशी अवस्था झाली. नेहमीच्या सेलिब्रेशनच्या सवयीनं मोठ्या आवाजात स्पीकर लावून नाचगाणं सुरू झालं सोबत आरडा-ओरडा, हसणं-खिदळणं, सेल्फी, फोटो सेशन होतंच. रिलसाठी कुणी चिखलात लोळत होतं, कुणी नाचत होतं तर कुणी पावसात समाधी लावून बसलेलं. अतिउत्साही दरीच्या टोकावर उभं राहून सेल्फी काढत होते, फोन उंच धरून शूट करत होते. वाट्टेल ते प्रकार सुरू होते. सगळ्यानांच अत्यानंदाचा कैफ चढलेला असताना दूर उभे असलेले अरुण, मनोरमा मात्र गर्दीच्या धांगडधिंग्याकडे निर्विकारपणे पाहत होते.

“पब्लिक कसलं एंजॉय करतयं ना”अरुण म्हणाला पण मनोरमानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

“तुझ्याशी बोलतोय. बघ ना कसली धमाल चाललीय. रिल्ससाठी कसल्या भन्नाट आयडिया काढतायेत. भारी!!”

“हंsssम”

“चल”

“कुठं”

“आपणही रिल करू”

“नको”

“असं कसं”

“चल ना”अरुण चिडला.

“आता मला काहीच करायचं नाहीये”

“कालपर्यंत तर रील्ससाठी पागल होतीस. दिवसभर सेल्फी आणि रिल्स तर काढत होतीस. आता का नाही म्हणतीयेस” 

“काल वेगळा होता आणि आज???तो विषय नको. प्लीज”मनोरमा हात जोडत काकुळतीनं म्हणाली.

“बघ कसा धो धो पाऊस पडतोय. जोडीला वीजांचा कडकडाट, रील्ससाठी एकदम परफेक्ट वातावरण आहे. ”अरुण मनोरमाला हाताला धरून ओढू लागला.

“कशाला त्रास देताय. सोडा. ”हात झटकत मनोरमा किंचाळली. अरुण गप्प झाला. अस्वस्थपणे येरझारा मारायला लागला. मनोरमा रडायला लागली.

“असं काय करतेस. आज दोघांचे सोबत रील्स करू. तू म्हणशील तसं मी करेल. ”अरुणनं पुन्हा आग्रह सुरू झाला.

“नको”

“दरीच्या कडेला टायटॅनिक पोजमध्ये शूट करू. बॅकग्राऊंडला ‘टीप टीप बरसा पाणी’ गाणं. एकदम कडक!!!सुपरहिट रिल”

“माझ्याकडून चूक झाली. ”मनोरमानं हात जोडले.

“नुसती चूक नाही तर घोडचूक” अरुणच्या डोळ्यात विखार होता.

“काय करू”

“आता विचारून काय उपयोग?जे करायचं ते कालच करून बसलीस. ” 

“मुद्दाम नाही केलं”.

“तरी सारखं बजावत होतो की काळजी घे. नको तो आगाऊपणा करू नकोस. पण…. तुझ्या बेजबाबदारपणामुळे सगळं घडलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तुझ्याबरोबर माझीही फरफट झाली. हे म्हणजे एकावर एक फ्री सारखं. आपलं घर उद्ध्वस्त झालं. ”

“असं का बोलता. सहन होत नाहीये. ”

“खरं तेच बोलतोय ना. हा त्रास आता कायमच राहील. आताही तू स्वतःचाच विचार करतेयेस. माझं काय?? तुझ्या हौसेपोटी माझं आयुष्य ???. ”

“आता मरेपर्यंत हेच ऐकवणार का?” एकदम मनोरमानं गप्प झाली.

“विसरली असशील तर आठवण करून देतो. काल याच ठिकाणी दरीच्या टोकाजवळ हटके रिलच्या नादात तोल जाऊन तू दरीत पडली. तुला वाचवताना मीही घसरलो आणि दोघंही……. ”

“खूप पश्चाताप होतोय. ” 

“आता तेवढंच करायचंयं. अट्टल दारुड्याला जसं दारूशिवाय सुचत नाही तसंच तुझी अवस्था. घरीदारी सेल्फी नाहीतर रील्स. शेवटी त्यानचं घात केला. आता आपल्या मुलांचं कसं होणार?त्यांना कोणाचाच आधार नाही. ”अरुण ढसाढसा रडायला लागला. दुर्दैवानं त्याचा आकांत मनोरमा सोडून इतर कोणापर्यंतच पोचत नव्हता.

बऱ्याच प्रयत्नानंतर दरीत पडलेल्या दोन्ही बॉडीज सापडल्या. स्ट्रेचरवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या ममी-पपाला पाहून एकमेकांचा हात घट्ट पकडलेल्या समर आणि सिद्धीनं हंबरडा फोडला. तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलांची अवस्था पाहून मनोरमाचा बांध फुटला. असहाय्य अरुण स्वतःच्या तोंडात मारायला लागला. दोन्ही मुलांना कुशीत घेण्याचा प्रयत्न अरुण -मनोरमानं केला. एकदा, दोनदा पुन्हा पुन्हा पण स्पर्श मुलांपर्यंत पोचतच नव्हता. नियतीच्या अजब खेळात अरुण, मनोरमा हतबल होते.

“रील्सच्या नादात नवरा-बायकोचा दरीत पडून मृत्यू. ”चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झळकत होती. दरीत पडतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. दु:खाचा बाजार मांडण्याची विकृती आता जगण्याचाच भाग झालीये. कोणत्या क्षणी कसं वागायचं याच भान सुटत चाललंय कारण माणसं मनानं दगड होतायेत. जिथून अरुण, मनोरमा पडले ती जागा ‘हॉट स्पॉट’ झाली. तिथले फोटो, सेल्फी सोशल मिडियावर RIP च्या मेसेज सोबत फिरत होते. समर, सिद्धीचा आक्रोशाचा रिल कोरडी सहानुभूती दाखवत जो तो फॉरवर्ड करत होता.

(२) क्रोसिन ”

सकाळची वेळ, क्लिनिकमध्ये पेशंटही नव्हते. तितक्यात मित्र आला. निवांत गप्पा चालल्या होत्या. इतक्यात रिसेप्शनिस्ट धावत आली.

“सर, अर्जंट आहे”

“बोल”

“ते आलेत”

“कोण”

“क्रोसिन” रिसेप्शनिस्ट बोलल्यावर मित्रानं एकदम माझ्याकडं पाहीलं.

“अरे बाप रे, नंतर यायला सांग”

“सांगितलं पण ऐकत नाहीत. भेटायचंच असं म्हणतात. ”

“जरा वेळ बसू देत. मी सांगितल्यावर आत पाठव. ”

“काही अर्जंट असेल मी जातो. तू पेशंट चेक कर”मित्र म्हणाला.

“तू बस रे!!हा पेशंट म्हणजे नमुनायं. नुसता डोक्याला ताप म्हणूनच आम्ही त्यांना क्रोसिन म्हणतो. ”

“दुखण्याला कंटाळलेले असतील. ”

“दुखणं नाही अतिहुशारी”

“म्हणजे”

“स्वतःचं बघ” रिसेप्शनिस्टला पेशंटला पाठवायला सांगितल्यावर पन्नाशीचे काका आत आले.

“नमस्कार डॉक्टर!!कसे आहात. तब्येत वैगरे ठिक ना” डॉक्टरांचीच विचारपूस करणारा पेशंट बघून मित्राला आश्चर्य वाटलं.

“मी मस्त, तुम्ही कसे आहात!!”

“थोडा डिस्टर्बय. रोज नवीन नवीन त्रास…. ”

“अरे बाप रे, नक्की काय होतंय”

“तीन दिवस वाट पाहिली. स्टडीपण केला आणि शेवटी तुमच्याकडे आलो. ”

“शेवटी म्हणजे?समजलं नाही”

“गैरसमज नको. तुम्हांला तर माझा स्वभाव माहितेय”

“चांगलाच”माझं खऊटपणे बोललेलं काकांच्या डोक्यावरून गेलं.

“थॅंकयू, मी लहानपणापासूनच अभ्यासू आहे. ” 

“हो, हे तुम्ही नेहमी सांगता. ”

“खरं तर मला डॉक्टरच व्हायचं होतं पण मार्क कमी पडले आणि सरकारी नोकरी मिळाली म्हणून मग.. ”

“अरेरे!!समाज एका हुशार डॉक्टरला मुकला”

“तुम्ही चेष्टा करत नाही ना”

“छे, काहीतरीच काय!!तुमच्या त्रासाविषयी सांगा ना. ”

“अरे हो, तीन दिवसांपूर्वी माझा हात दुखत होता नंतर पोटदुखी सुरू झाली. एकदोनदा छातीत कळ आली आणि कालपासून डोकं दुखंतय. ”

“आपण चेक करू” 

“एकच मिनिट” काका म्हणाले म्हणून मी पुन्हा खुर्चीत बसलो.

“प्लीज पटकन सांगा. अजून पेशंट आहेत. ”

“ऐका ना. त्रास सुरू झाल्या झाल्या लगेच इंटरनेटवर सर्च केलं. तेव्हा हा त्रास म्हणजे अनेक गंभीर आजरांची प्राथमिक अवस्था आहे असं कळलं म्हणून जरा टेंशन आलं. दुसऱ्या दिवशी पोटदुखी सुरू झाल्यावर पुन्हा सर्च केलं तर तिथं अजून वेगळी माहिती सापडली आणि आता आजाराविषयी कंफ्यूजन झालंयं. ”

“चेक करतो. या”

“फक्त अर्धा मिनिट. इंटरनेटवरच्या माहितीवरून घरच्याघरी ट्रीटमेंट सुरू केली आणि केमिस्टकडून आणलेल्या दोन गोळ्या घेतल्या पण फरक पडला नाही. नाईलाजानं तुमच्याकडं आलो. ”

“ओके, सगळं सांगून झालं. आता चेक करू” जराशा चढया आवाजात मी बोललो पण काकांवर काहीही परिणाम नाही. त्यांची बडबड चालूच. ब्लड प्रेशर तपासताना देखील संभाव्य आजार आणि त्यावरची औषधं याविषयी सांगत होते. तपासणी झाल्यावर खुर्चीत बसताना काका म्हणाले “माझा अंदाज बरोबर ना. ”

“काही प्रमाणात”

“म्हणजे”

“काळजी करण्यासारखं काही नाहीये. ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम दिसतोय. दोन दिवस पोटाला आराम द्या. सगळं ठिक होईल. ” 

“वाटलचं असं काही असेल तरीही काही टेस्ट करून घेतो. इंटरनेटवर तसं सांगितलयं. प्रिकोशन इज बेटर दन क्युअर”

“जशी तुमची इच्छा!!, ”म्हणत काकांना दोन टेस्ट लिहून दिल्या.

“अजून एक”

“बोला”

“काही पथ्य”

“महिनाभर इंटरनेट वापरू नका. ”इतका वेळ शांत बसलेला मित्र बोलून गेला. त्याच्याकडं विचित्र नजरेनं पाहत काका बाहेर गेले आणि मी हुsssश केलं.

“आता कळलं क्रोसिन नाव का ठेवलं. ”

“हो रे, फुल पकाऊ आणि पार डोकं आऊट झालं. असे दोनचारजण भेटले तर रोजची क्रोसिन नक्की!!”

“पूर्वी डॉक्टरांनी सांगितलेलं निमूटपणे ऐकणारे पेशंट होते. आता इंटरनेटवरची माहिती वाचून शहानिशा न करता असे स्वतःलाच चतकोर डॉक्टर समजणारे फार वाढलेत. ”

“चतकोर डॉक्टर!!हे भारीये”

“खरंतर फार काही कळत नाही परंतु अशांचा कॉन्फिडन्स जबरदस्त असतो. काहीही झालं तरी आपलं घोडं दामटत असतात. सोशल मिडियावर आलेल्या खऱ्या-खोट्या माहितीवर विश्वास ठेवून प्रॉब्लेम काय असेल आणि काय ट्रीटमेंट द्यावी असं डॉक्टरांनाच सुचवतात. ”

“अशांना हँडल कसं करतोस”

“शक्यतो वाद घालत नाही. आत्ताच बघ. बाहेरचं खाणं झालं म्हणून पोट बिघडलं पण त्यांना टेस्ट करायच्यात म्हणून मग लिहून दिलं. विनाकारण खर्च पण अनुभवानं शहाणपण आलयं की चतकोर ज्ञानापुढं डोकं चालवायचं नाही. ते जाऊ दे, चहा घेणार!!”

“एकदम कडक मागव. खरंच डोकं दुखायला लागलं. ”मित्र.

चहासाठी रिसेपशनीस्टला फोन केला तर ती म्हणाली “सर, एक पेशंट आलेत. ” 

“आता कोण?”

“अजून एक क्रोसिन” मी कपाळावर हात मारला.

—- 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments