सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

शून्याच्या आत… – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(आता मात्र तेच भाऊ बहिण आपापल्या मुला-बाळात, आपल्या परिवारात गुंतून गेले आहेत.) – इथून पुढे —

या सगळ्यात ती स्वतः कधी पंचावन्न वर्षांची झाली, ते तिचं तिलाही कळलं नाही. पंचावन्न वर्षांची ती पासष्ट वर्षांची दिसू लागली आहे. तरुण होती तेंव्हा चांगली-चांगली स्थळं येत असत तिच्यासाठी. मुलगे डेटसाठी बोलवत असत. पण त्या दिवसात जबाबदाऱ्यांची मोठीच्या मोठी यादी असायची तिच्याकडे. तिच्या जगात आई-वडील, बहिण-भाऊ यांच्या शिवाय आणखी कोणासाठी जागाच नव्हती. आता आई-वडील राहिले नाहीत, भाऊ-बहिण आपापल्या आयुष्यात मग्न झाले. खरं तर आतासुद्धा ती त्यांच्या छोट्या छोट्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत असं मानून त्यासाठी एवढा लांबचा प्रवास करून त्यांच्याकडे जात असते. त्यांना पाहिजे असो, की नसो त्यांना शारीरिक मानसिक आणि आर्थिकही मदत करत असते. या बहिणींकडून नेहमी मिळणाऱ्या मदतीमुळे हे भाऊ-बहिण प्रत्येक छोट्या गोष्टीतही तिचा सल्ला मागत असत आणि त्यांची प्रत्येक समस्या ही स्वतःच सोडवत असे. ‘नेकी और पूछ पूछ!’ भावा-बहिणीला फायदा कसा घ्यावा हे कळत होतं, ते तो घेत राहिले. हे सगळं करता करता कित्येक वर्षं उलटून गेली.

जगरहाटी पुढच्या दिशेने पळत राहिली आणि या पळापळीत ती अगदी एकटी पडली. स्वतःबद्दल विचार करायला वेळच नव्हता तिच्याकडे! आता तब्येतही बिघडायला लागली. ती आपल्या शहरातच, टोरंटोमधेच काम करत राहिली. हॉस्पिटलमधल्या अनेक विभागांशी ती जोडलेली होती. नोकरी चालू असताना अनेक लोकांशी संबंध यायचा तिचा, पण घरात तेवढीच एकटी असायची ती. फक्त ती आणि घराच्या भिंती! आता ती वयाच्या अशा वळणावर होती, की जिथे तिच्या मदतीसाठी कोणीतरी असण्याची गरज होती. पण कोण करणार तिला मदत? इतकी वर्षे तिने ज्यांना मदत केली, ते सगळे फार लांब राहत होते. ते असेही कधी तिच्याकडे आलेले नव्हते. तीच मदतीचा हात पुढे करून त्यांच्याकडे धावत जात असे. त्यांचा आता कधी फोनही येत नसे. तीच फोन करत असे, अशा आशेने, की तिचा एकटेपणा समजून घेऊन, केंव्हातरी तरी ते म्हणतील की—“ताई इथेच ये आता. ”

“आता ये ना इकडेच, ताई, तुझी खूप आठवण येते. ”

“आता तुला एवढ्या दूर राहून नोकरी करण्याची गरजच नाही. ”

पण असं कधीच झालं नाही. आणि कोणालाही तिने आपल्या मनात काय चाललंय याचा पत्ता लागू दिला नाही. हेही ती कधी बोलली नाही, की तिला आता कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. मनातल्या मनात कुढत राहायची. त्यांच्याशी बोलण्यासाठी काही ना काही निमित्तं शोधात रहायची. पण, “कसे आहात?”, “काय चाललंय?” अशा संभाषणाच्या पलीकडे काही बोलणंच होत नसे. फोन ठेवल्यानंतर तासन्तास ती फोनकडेच एकटक बघत रहायची. जणू, फोननेच कसला तरी कट रचला होता, की तिला जे ऐकायचं आहे, ते तिला ऐकू येऊ नये, यासाठी.

दिवस जात राहिले, तब्येत आणखीच बिघडत गेली. मग तिने मोठी सुट्टी घेतली, पण कोणाला सांगितलं नाही, की ती एवढी आजारी आहे म्हणून. गुडघे, खांदे सतत दुखू लागले. मोठी सुट्टी संपली तरी तब्येत बरी होण्याची लक्षणं काही दिसेनात. आता तिला सिक लिव्ह घेऊन घरी रहाणं हे बेजबाबदारपणाचं वाटायला लागलं. आपण कामावर जात नसल्याने इतर लोकांना किती त्रास होत असेल हे तिला माहित होतं. जोवर ती सुट्टीवर होती, तोपर्यंत तिच्या जागेवर ते दुसऱ्या कोणाला घेऊ पण शकले नसते. बराच विचार करून शेवटी तिने कंपल्सरी रिटायरमेंट घेण्याचं निश्चित केलं, तेच या परिस्थितीत आपलं कर्तव्य आहे, असं तिला जाणवत होतं. त्यामुळे तिला चांगली पेन्शनही मिळाली असती, आणि त्याचबरोबर एक चांगलं पॅकेजही मिळणार होतं, जे तिच्या पुढच्या आयुष्यासाठी पुरेसं झालं असतं. या निर्णयाची अंमलबजावणी होण्यात कुठलीही अडचण आली नाही. सगळं काही सहजपणे झालं. तिचे आतले दरवाजे तर आधीच बंद झालेले होते, आता घराच्या बाहेरच्या जगातील सर्व लोकांचे दरवाजेही तिच्यासाठी बंद होत गेले. एकटेपणामुळे ती खुद्द स्वतःसाठीच अनोळखी होत गेली. ती कोण आहे आणि कुठे आहे, याचाही तिला पत्ता नसायचा. सर्वत्र मौनाचंच राज्य असायचं. बोलणार तरी कोण, आणि कोणाशी? टी. व्ही. कोकलत असायचा, पण ते ऐकायलाही तिला नकोच असायचं. मौनात रहाणं आता टाळता येणारच नव्हतं.

काही दिवसातच तिला आपलं जग शून्यवत झाल्यासारखं वाटू लागलं. फक्त ती आहे, आणि तिच्या आत एक रिकामं वर्तुळ आहे ज्यात शून्यं च शून्यं भरलेली आहेत. एकमेकांवर रेललेली, एकमेकांशी खेळणारी शून्यं!

काही वर्षांपूर्वी एका सहकाऱ्याने तिला सुचवलं होतं, की तिने एखादं मूल दत्तक घ्यावं. तेंव्हा ती आपल्या बहिण भावांचे संसार थाटून देण्यात इतकी बुडालेली होती, की असला काही विचार करण्याची फुरसतच नव्हती तिला. आता जेंव्हा तशी गरज भासते आहे, तेंव्हा लहान मूल सांभाळून मोठं करण्याचं वय राहिलेलं नाही. बराच विचार करून अखेर तिने एक मांजर पाळायचं ठरवलं. ती पांढऱ्या रंगावर काळे-भुरे चट्टे-पट्टे असलेली मांजर आता तिच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनून गेली. आता ती त्या मांजरीच्याच विचारात बुडून गेलेली असायची. सकाळ-संध्याकाळ एकच विचार— “ती ठीक आहे ना”. हा मुका प्राणी तिच्या एकटेपणातला मित्र तर झाला होता, पण तिला मदतीची पण आवश्यकता होती. ती मांजर कशी काय तिला मदत करणार?

“मांजरीनं आज नीट खाल्लं नाही. ”

“ती रात्री नीट झोपली नाही. ”

“तिला आज डॉक्टरकडे घेऊन जायला पहिजे. ”

या सगळ्या काळज्या करण्यात तिचे दिवस जाऊ लागले. रात्री कधी कधी ती मांजरीच्या चाहुलीने जागी होत असे, मग तिला काहीतरी खायला देऊन, उगाचच थर्मामीटर लाऊन तिला ताप तर नाही ना, हे बघत असे. रात्री नीट झोप न झाल्यामुळे बऱ्याच वेळा दिवसा तिचा डोळा लागत असे आणि त्याच वेळी फोनची घंटी खणखणत असे. भाऊ किंवा बहिणीचा फोन असेल, या विचाराने गडबडीने फोन घेत असे, तर तो मेडिकल चेकअप साठी तरी असायचा, किंवा कुठल्या तरी वस्तूच्या जाहिरातीसाठी केलेला कॉल असायचा.

बहिण भावाची आपल्या बद्दलची बेफिकीर वागणूक तिला चांगली माहित होती. कधी कधी तिला वाटायचं, की आपण तेंव्हाच आपला विचार केला असता तर! हे असे विचार मनात आले, तरी असंही वाटायचं, की ते तर खुश आहेत, त्यांना कुठले त्रास नाहीत यातच आपणही खुश राहायला हवं. आपणच केलेल्या कर्माला आता कसं बदलता येईल असाही विचार यायचा तिच्या मनात. आता तिचे सर्व विचार त्या मांजरीभोवतीच केंद्रित झालेले होते. या एकटेपणात ती मांजरीशी बोलत असे. आपलं ऐकवायची, तिचं पण ऐकायची! दोघींची जेवणाची, झोपायची वेळ एकच होती. पण मांजर तर मांजरच होती. मधेच उठून कुठेतरी निघून जायची, ही लगेच अस्वस्थ होत असे. काही चुकीचं तर होत नाहीये ना, मांजर पण का बरं अशी मला सोडून जाते! असो, पण कोणीतरी घरात आहे हा विचारच तिला काहीतरी करण्यासाठी उत्साह देत असे.

– क्रमशः भाग दुसरा  

मूळ कथा : शून्य के भीतर – डॉ. हंसा दीप. कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments