सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
जीवनरंग
☆ शून्याच्या आत… – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
डॉ हंसा दीप
(काही चुकीचं तर होत नाहीये ना, मांजर पण का बरं अशी मला सोडून जाते! असो, पण कोणीतरी घरात आहे हा विचारच तिला काहीतरी करण्यासाठी उत्साह देत असे.) – इथून पुढे —
एक दिवस सकाळचा नाश्ता ताटलीत होता, पण खायची इच्छाच नव्हती तिला. केरात टाकण्यापेक्षा बाहेर टाकले तर कोणी प्राणी तरी खाऊन जाईल, म्हणून तिने ते ब्रेडचे तुकडे बाहेर टाकले. वळून दोन पावलंच टाकली असतील, नसतील तोवर कसला तरी आवाज आला, म्हणून वळून बघते तर एक चपळ खार त्या ब्रेडच्या तुकड्यांकडे धावत पळत येताना दिसली. कुमुडीचा चेहरा प्रसन्न हसण्याने भरून गेला. हा असा आनंद होता, की तिच्या आतपर्यंत त्या खारीचा आवाज गुंजत होता. ती खार आपल्या छोट्याशा तोंडात मावतील तितके तुकडे भरून घेऊन पळून गेली. परत आली आणि परत तोंडात काही तुकडे घेऊन पळाली. ती परत येईपर्यंत एक रॅकूनचं पिल्लू घाबरत, घाबरत तिथे आलं. मोठे रॅकून माणसांना घाबरवतात, स्वतः घाबरत नाहीत. दुसऱ्यांना घाबरवायची कला अजून हे पिल्लू शिकलं नव्हतं. कुमुडीने घरात येऊन फ्रीजमधून भात काढला आणि एका प्लॅस्टिकच्या वाटीत घेऊन त्याच्या समोर ठेवला. कठड्यावर बसून त्याने तो खाल्लं आणि निघून गेला.
दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच वेळी ते दोघेही हजर झाले. कुमुडीला वाटलं, की दिवसातून एक वेळच त्यांना खायला देणं काही बरोबर नाही. आता जेंव्हा जेंव्हा ती काही खात असेल, तेंव्हा तेंव्हा ती त्यांच्या जागेवर ते खाणं ठेऊन यायची. ते खाणं ठेवल्याबरोबर ते दोघेही कुठून तरी लगेचच प्रगट होत असत, जसं काही तिनं दार उघडून बाहेर येण्याचीच वाट बघत असत. हे असं दिवसातून तीन वेळा न चुकता होत असे. आता तिच्याकडून खाणं मिळण्याची आशा लाऊन बसणारे तीन प्राणी होते, जे प्रेमाने तिच्याकडे बघत असत. असे यायचे, की जणू आमंत्रित पाहुणेच होते, आणि खाऊन झालं की उड्या मारत निघून जात असत. ती त्यांना खायला द्यायच्या वेळी मांजरीला आपल्या बरोबर घेऊन यायची आणि त्यांच्याशी खेळायचा प्रयत्न करायची. त्यांच्याशी बोलायची, त्यांच्या खाण्याकडे एवढं लक्ष द्यायची, की जणू त्यांची दुसरी आईच बनून जायची! हे दोन दिवस तिला अगदी शांत झोप लागली. तिसऱ्या दिवशी तिला आपल्या खिडकीतून डोकावून बघणारं कुत्र्याचं एक गोड पिल्लू दिसलं. बहुधा आपल्या घरातून भटकत वाट चुकून तिच्या घराच्या मागच्या बाजूनं आत आलं होतं.
तिनं त्याच्याकडे काही वेळ दुर्लक्ष केलं. पण तो काही तिथून हलला नाही, भुकेला होता ना!
“ तू जा बघू, मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत, तुझ्या घरचे लोक तुला न्यायला आले, की तू निघून जाशील!”
पण तो एखाद्या अडेलतट्टू सारखा तिथेच बसून राहिला, हललाच नाही.
“वचन दे, की तू जाणार नाहीस, सही करून देणार असशील तर ये. ”
खरोखरच कुमुडीनं दरवाजा उघडून त्याच्या समोर एक कोरा कागद ठेवला. तो घाईने आत आला आणि त्यानं त्या कागदावर आपला पाय ठेवला. ती खुश झाली, जणू कोणीतरी तिची आपुलकी स्वीकारली होती! हे पिल्लू तिचं घर सोडून जाऊ इच्छित नव्हतं. बहुतेक तो जे घर सोडून आला होता, ते असंच दिसत असावं. मांजरीला काही त्याचं येणं आवडलं नव्हतं. ती पाळत पाळत येऊन सारखी कुमुडीला चिकटत होती. पण कुमुडी तिला समजावत राहिली—“ तू त्याच्या बरोबर खेळायचंस, मग तो तुझा मित्र होईल. ” तिने चेंडू फेकला, की ते पिल्लू धावत जाऊन तो घेऊन यायचं. हळू हळू मांजरी पण त्या खेळात सामील झाली.
आता कुमुडी होती आणि हे चार प्राणी होते. खार दिवसातून तीन वेळा बरोबर ठराविक वेळेला हजर होत असे. पाहिली वेळ तीच होती, जेंव्हा पहिल्यांदा कुमुडीने ब्रेडचे तुकडे टाकले होते आणि भटकत भटकत येऊन तिने ते खाल्ले होते. कशी ती वेळ त्या एवढ्याशा मेंदूत पक्की बसलेली होती, कोणजाणे! रॅकून तर एरवी कचऱ्यात पडलेलं खाणंच खायचा, पण तोही बरोबर त्याच वेळी कुमुडीकडे यायचा, जेंव्हा तिने पहिल्यांदाच वाटीत भात आणून दिला होता. त्यांना ना घड्याळाच्या काट्याची जाणीव होती, ना वेळेची पण खायला देणाऱ्याची ओळख, पारख त्यांना बरोबर होती! माणसापेक्षा प्राणी जास्त निष्ठावान असतात, हे ऐकलेलं होतं, पण आता या चार प्राण्यांच्या आपलेपणाने ते सिद्ध झालेलं होतं.
ते आपापल्या वेळी यायचे, तिच्याकडे बघायचे, आपलं खाणं घ्यायचे आणि काहीतरी आवाज काढत निघून जायचे, जसे काही तिला आशीर्वाद देत असत. निदान, कृतघ्न तर नक्कीच नव्हते ते. तिच्या मनात विचार यायचा, जेंव्हा तिचा मृत्यू होईल, तेंव्हा किमान या चार जणांचे अश्रू तरी नक्कीच तिला खांदा देतील! मांजरी, खार, रॅकून आणि कुत्र्याचं पिल्लू या सर्वांचं मिळून तिचं एक कुटुंब तयार झालेलं होतं. दोघे घरात रहात असत आणि दोघे पाहुण्यांसारखे येत आणि निघून जात.
आता न्यूझीलंडला जाणं बंद झालेलं होतं. पेन्शनच्या पैशांवर निर्वाह तर होतंच होता, शिवाय बचतही भरपूर होत होती. तिच्या मनात आता या कुटुंबाची चिंता होती, की माझ्यानंतर यांचं काय होईल? तिला मृत्युपत्र तयार करायचं होतं, की ती गेल्यानंतर तिने मिळवलेला पैसा, तिचं एवढं मोठं घर, गाडी सगळं काही यांच्या पालन पोषणासाठी वापरलं जावं. आपल्या भावा-बहिणींना जसं तिने घर दिलेलं होतं, तसंच यांच्यासाठीही एक घर द्यायचं होतं तिला. निदान या चार जणांना तरी तिची अनुपस्थिती जाणवली, तरी तिचं जीवन सफल झाल्याचं समाधान तिला लाभणार होतं. या सगळ्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचं प्रेमच प्रेम होतं. कुमुडीच्या डोळ्यात त्या मुक्या प्राण्यांसाठी आणि त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यात कुमुडीसाठी!
प्रथम जेंव्हा पशु-पक्षी विहाराची सुरुवात झाली, तेंव्हा त्यामागची ही कथा ऐकून खूप देणग्या मिळायला लागल्या. आज “कुमुडी” या नावाने असे अनेक पशु-पक्षी विहार स्थापले गेले आहेत, ज्यांमध्ये असंख्य मुक्या प्राण्यांना आसरा मिळालेला आहे. या आपल्यांशी बोलणारी कुमुडी आता मुकी झालेली आहे. फोटोंमधेच आता तिचं अस्तित्व कैद झालेलं आहे. पण आजही ती त्या मुक्या प्राण्यांशी त्यांच्याच भाषेत बोलते. तिचं स्वतःचं शून्याचं वर्तुळ आता खूप मोठं झालेलं आहे. ते सांगत आहे, की शून्याचं वर्तुळ नेहमीच शून्य नसतं, आतून पसरत गेलं तर त्यात एक नवं जग वस्तीला येतं.
कथा संपताच माझ्या आत कसली तरी चुळबुळ जाणवू लागली मला. माझे हात आपोआप समोरच्या देणगीच्या खोक्याकडे वळले. माझ्या मित्राचाही ऑडिओ ऐकून झाला होता आणि त्याचे हातही त्याच्या पैशांच्या पाकिटाकडे गेले होते!
— समाप्त —
मूळ कथा : शून्य के भीतर – डॉ. हंसा दीप. कॅनडा
मराठी भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈