श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ एक सहजीवन…  भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(असं म्हटल्यावर रजनीने रविवारी सकाळचा नाश्ता झाल्यावर रघुवीरजींच्या समोर विषय काढला. ‘पप्पा, आम्ही तुम्हाला सोसायटीतल्या राजेश्वरी आंटीबरोबर पार्कमध्ये गप्पा मारताना पाहिलं आहे.’) – इथून पुढे — 

रघुवीरजी शांतपणे म्हणाले, ‘हो, अलीकडेच आमची ओळख झाली आहे. राजकीय घडामोडी, आवडती पुस्तके, जुनी अवीट गाणी ह्याविषयी होणाऱ्या गप्पांतून आमची मैत्री फुलत गेली आहे एवढंच. ’

‘पप्पा, मला ठाऊक आहे की तुमच्या हृदयातील सासूबाईंची जागा कुणीच घेऊ शकणार नाहीत, तरीही मी राजेश्वरी आंटीशी एकदा बोलून पाहते. ’ यावर काय बोलावं हे रघुवीरजींना सुचलंच नाही.

रजनीने माहिती काढल्यावर कळलं की राजेश्वरींच्या लग्नानंतरच्या दोन महिन्यांतच त्यांचे पती कायमचे परदेशी स्थायिक झाले. काही महिन्यानंतर त्यांच्या पतीने फोनवर सांगितलं, ‘आईवडिलांच्या इच्छेखातर मी हे लग्न केलं होतं. मी इथल्याच एका मुलीशी लग्न केलं आहे. तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस. ’

हे ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काय करावं हे सुचत नव्हतं. त्यांनी ठरवलं असतं तर त्या गुंत्यातून बाहेर पडल्या असत्या. घटस्फोट घेऊन त्या माहेरी जाऊ शकल्या असत्या पण त्यांच्या पोटात बाळ वाढत होतं.

स्थानिक हायस्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. त्यावेळी त्यांनी माहेरी जाण्यापेक्षा सासू सासरे यांच्याबरोबर राहून आपल्या होऊ घातलेल्या अपत्याला वाढवत जीवन व्यतीत करण्याचा कठोर निर्णय घेतला. जो पर्यंत सासू सासरे होते तोवर त्यांची सेवा करीत राहिल्या. आपल्या लेकीला शिकवून विद्याविभूषित केलं.

एकुलत्या एका मुलीच्या लग्नानंतर राजेश्वरी मॅडम एकट्या पडल्या आणि त्या नुकत्याच सेवानिवृत्तही झाल्या. त्यांच्या आयुष्यात प्रचंड पोकळी निर्माण झाली. एकटेपणाच्या धास्तीने त्यांची तब्येत खालावत चालली. जावई आणि मुलीने राजेश्वरींना त्यांच्याकडे येऊन राहण्याचा आग्रह केला पण त्या तयार झाल्या नाहीत. अलीकडेच त्यांना रघुवीरजींच्या रूपाने सुखदु:ख वाटून घेणारा एक मित्र भेटल्याने त्यांच्या चित्तवृत्ती फुलून आल्या होत्या.

एके दिवशी रजनी भाभी थेट राजेश्वरींच्या घरी पोहोचली. रघुवीरजींची सून असल्याचं सांगून ती बसली. त्यांनी दिलेला चहा घेतला. विषयाला हात कसा घालावा या विचारात रजनी अवघडली होती. अखेर धैर्य एकवटून तिने तोंड उघडलं. ‘ मी काय म्हणत होते, तुम्ही दोघांनी लग्न केलंत तर तुम्हाला एकमेकांची सोबत होऊन तुमच्या जीवनातील एकटेपणा संपून जाईल. ’

राजेश्वरी अस्वस्थ होऊन म्हणाल्या, ‘निघा आता. ’ त्यांना तो विवाहाचा प्रस्ताव अजिबात रूचला नाही.

एवढ्यावरच न थांबता रजनीने राजेश्वरींच्या मुलीचा, अर्चनाचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिला फोनवरून सगळी हकीगत सांगितली.

अर्चनानेही आईला भेटून तोच विवाहाचा प्रस्ताव मांडला. राजेश्वरी म्हणाल्या, ’अर्चू बेटा, संपूर्ण आयुष्य मी एकटीनं घालवलं आहे. मला लग्नच करायचं असतं तर मी माझ्या तारुण्यातच केलं असतं. या वयात लग्नाचा विचार केला तर लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल? अन लक्षात ठेव, सातासमुद्रापलीकडे असेना का, माझा पती अजून जिवंत आहे. ’

‘आई, त्यावेळी मी तुझ्या पोटात होते. तुला पुन्हा लग्न न करण्यासाठी ते एक सबळ कारण होतं. पण आता हे एकटेपण तुला सुखाने जगू देणार नाही आणि तुझ्या काळजीत मीदेखील सुखी राहू शकणार नाही.

आई, समाजाचं काय घेऊन बसली आहेस. बाबांनी केलेल्या अन्यायावर तुझ्या पाठीमागे त्यांनी चविष्ट चर्चा केली असेल. तुझं दु:ख वाटून घ्यायला कुणी पुढे आले नाहीत. आपलं स्वत्व सांभाळून, तू या स्वार्थी जगाच्या खडकाळ वाटेवर हरवून न जाता वाट काढत चालत राहिलीस. आपल्या पोटच्या गोळ्याला आणि त्याच माणसाच्या आईबाबांना सांभाळत नेटाने तू पुढे चालत राहिलीस.

आई, ज्यानं स्वत:च्या अपत्याचं तर सोड, जन्मदाते आईबाबा, जिच्याशी सप्तपदी घातली ती पत्नी ह्यांच्याकडे परत कधी वळूनही पाहिलं नाही त्या माणसाबद्दल बोलते आहेस? तू आपल्या अपत्याच्या वात्सल्यापुढे हरलीस हे त्यानं ओळखलं. तुझ्या काळजाला निर्दयीपणे नख लावून गेलेल्या त्या माणसाला तुझी तडफड कधीच कळली नाही. त्या पतीचं कसलं कौतुक सांगते आहेस?

अगं नोकरीच्या निमित्ताने ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ असं म्हणत जगणारी जोडपीही असतात; तरीही ही जोडपी मनाने, संवादाने एकमेकांशी जोडलेली असतात. एकमेकांच्या साथीने पुढे जातात, एकत्र स्वप्नं पहातात आणि ती पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचतात. पण गेल्या अठ्ठावीस वर्षात तो माझा ‘बाप’ म्हणवला जाणारा माणूस मी कधी पाहिलाच नाही.

आई, पती म्हणजे कोण हे मी सांगावं तुला? अगं, जो पुढे होऊन तिच्या डोळ्यांतला भाव टिपतो, कधी काळी चूक झालीच तर क्षमा करून तिचं न्यूनत्व तिला जाणवू न देता जो समजून घेतो आणि कसलीही उणीदुणी न काढता जो तिला उराशी धरतो, तो खरा जीवनसाथी. लग्नानंतरच्या दोन वर्षात मी हे अनुभवते आहे. तुला एवढा चांगला जावई शोधता आला ह्याचा अर्थ रघुवीरजींच्यात तू नक्कीच काही तरी चांगलं पाहिलं असणार. आई, माझ्यासाठी तरी हो म्हण. ’

‘बाळा, तरुणपणी आपण लग्न करतो किंवा एक नातं निर्माण करतो तेव्हा त्या नात्यासोबत काही जबाबदारीदेखील उचलतो. परंतु म्हातारपणी तसं नसतं. म्हातारपण म्हणजे व्याधींचं घर. आता त्या जबाबदारीचे ओझे शरीराला झेपत नाही, म्हणून एकटे राहावेसे वाटते. म्हातारपणी सोबत न राहता निखळ मैत्रीचे नाते जास्त उपयुक्त ठरते. या नात्याने आधार मिळतो आणि जबाबदारीचे ओझे देखील वाटत नाही. म्हातारपणी साथ देणारे मित्र- मैत्रीणी मात्र जरुर हवेत. ते आपला भावनिक प्रवास सुखकर करतात. त्यात स्त्री पुरूष असा मात्र भेद नसावा. ’

‘आई, आम्ही सदैव तुमच्यासोबत असणार आहोत’ हे लेकीने पटवून दिल्यानंतर अखेर राजेश्वरीने त्या प्रस्तावास होकार दिला. एकमेकांच्या सहवासात भावनात्मक आधार मिळणार होते, हे जरी खरं असलं तरी या वयात विवाहाच्या बंधनात अडकणे आणि वारसा हक्काने मिळणाऱ्या कुणाच्याही संपत्तीला धक्का लावणे हे मात्र त्यांना प्रशस्त वाटत नव्हते.

कसल्याही नात्यांची चौकट न स्वीकारता, त्या दोघा कुटुंबियांच्या आणि आप्तेष्टांच्या संमतीने त्या दोघांनी लग्नाविना सहजीवनाचा निर्णय घेतला.

आजवर एकटीनेच झुंजत राहिलेल्या राजेश्वरींच्या जीवनातले रितेपण संपून सौख्य पदरी आलं. साहेब, आता रघुवीरजींची काळजी घ्यायला राजेश्वरी आंटी असल्याने. लवकरच शेखर सपत्निक परदेशातल्या कंपनीत जॉइन होण्याच्या तयारीत आहे. अर्चनाला हक्काचे ‘पप्पा’ मिळाले म्हणून ती खूश आहे. एकच वाटतं, सहजीवन आजही तितकं समाजमान्य नाही. आपण सुद्धा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. ” असं जगदीशने आपले मत मांडलं.

रघुवीरजींना भेटून जुन्या आठवणी ताज्या करून उगाच त्यांच्या मनांत काहूर माजवायला नको म्हणून मी त्यांना भेटायचा विचारच सोडून दिला.

– समाप्त – 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments