सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चमचाभर आनंद – लेखक : सुश्री मेधा नेने  ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

“स्वानंदी, यार वैताग आलाय नुसता सगळ्याचा. “… प्रिया चिडचिड करत म्हणाली. सुट्टीच्या दिवशी सकाळी स्वानंदीच्या घरी दोघी गप्पा मारत होत्या. स्वानंदी ओट्यापाशी पोळ्या करत होती.

“आता काय झालं ? “… स्वानंदीने विचारलं.

“एक गोष्ट मनासारखी घडत नाही. मला पाचशेचे सुट्टे हवे होते म्हणून आत्ता इथे येताना रिक्षावाल्याला दिले तर त्याच्याकडे नेमके सुट्टे पैसे नव्हते. त्याच्याशी थोडा वाद झाला. मग शेवटी ऑनलाईनच ट्रान्स्फर केले. सगळीकडे नेहमी मलाच लक्ष द्यावं लागतं…. घरी काय नाहीतर ऑफिसमध्ये काय ! जेंव्हा गरज असते तेंव्हा विनीतला बरोब्बर ऑफिसचं काम असतं. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा माझ्याच अंगावर काम पडतं. “… प्रिया वैतागणाऱ्या सुरात म्हणाली.

“एवढ्या सकाळी नसतील रिक्षावाल्याकडे सुट्टे ! एखाद्या दुकानातून घे. आणि विनीतचा जॉब कसा आहे हे तुला आधीपासूनच माहीत होतं की नाही ? शिवाय दुसऱ्याने केलेल्या कामावर तुझा विश्वास नसतो, म्हणून ऑफिसमध्ये तुलाच जास्त काम पडतं. पण या कामामुळेच तर तुला प्रमोशनही मिळालं की नाही?

तुला नाही वाटत प्रिया की तू सारखी किरकिर करत असतेस ? नेहमी याला नावं ठेव, त्याची तक्रार कर… हेच चालू असतं तुझं. अख्ख्या दिवसात एकही चांगली घटना कशी काय घडत नाही तुझ्या बाबतीत ? बघ, तुझ्याबरोबर घडणारी आजच्या दिवसातली पहिली चांगली घटना मीच घडवते. “…. नाटकी पण धीरगंभीर आवाजात स्वानंदी म्हणाली.

“कोणती घटना ?”… न कळून प्रियाने विचारलं.

“अगं विशेष काही नाही. पोळ्या करतेच आहे मी, तर गरमागरम पोळी देते खायला. तूच म्हणतेस ना, तव्यावरून थेट ताटामध्ये येणारी पोळी आणि त्यावर घरचं साजूक तूप, म्हणजे परमानंद असतो. ”

असं बोलून स्वानंदीने प्रियाला ताटामध्ये तव्यावरची पोळी काढून वाढली. पोळीवर चमच्याने तूप सोडताना म्हणाली… “हा घे तुझ्यासाठी चमचाभर आनंद !”.

“मायेने, आयतं असं कोणी खायला वाढणं म्हणजे एखाद्या संसारी बाईसाठी खरच मोठी आनंदाची गोष्ट असते…. “…. प्रियाच्या मनात आलं.

स्वानंदीच्या घरून निघाल्यापासून प्रियाचं‌ विचारचक्र सुरू झालं. प्रियाच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. तिला कोणाचं काहीच पटायचं नाही…. सारख्या कसल्या न कसल्या तक्रारी करायची. त्यामुळे वर्गातलं कोणीही तिच्याशी जास्त बोलायच्या फंदात पडत नसे. त्या मुलीच्या मागे तिचा उल्लेख ‘कुरकुरे’ असा केला जायचा. स्वानंदी आज जे काही बोलली, ती प्रियाच्या मते धोक्याची घंटा होती. प्रियाला कुरकुरे म्हणवून घ्यायची इच्छा तर‌ नक्कीच नव्हती.

“चमचाभर आनंद…. “… स्वानंदीनी सहज म्हणून उच्चारलेले हे शब्द प्रियाच्या डोक्यात घुमत होते. तिने मनातल्या मनात एक निर्णय घेऊन टाकला. त्याची अंमलबजावणी कशी काय जमतीये हे बघणं महत्त्वाचं होतं.

रात्रीचं जेवण सुरू होतं….

“आज चक्क तू भात खात नाहीयेस ? आज सूर्य पश्चिमेला उगवला का काय ?”…. प्रियाचं भात प्रेम सगळ्यांना माहिती होतं. आज ती भात खाताना दिसली नाही तेंव्हा विनीतने, प्रियाच्या नवऱ्याने आश्चर्याने विचारलं.

“खरच की आई ! तुला कमी पडतोय का भात ? माझ्यातला घे ! “…. छोटा प्रणव निरागसपणे म्हणाला.

“मी खरं तर दक्षिण भारतात जन्माला यायला हवं होतं, असं तुम्ही दोघंही चिडवताना ना मला. म्हणून भात खाण्यावर थोडा कंट्रोल आणायचा प्रयत्न करतीये. “… प्रियाने खोटच कारण सांगितलं.

जेवणानंतरची सगळी आवराआवर झाल्यावर प्रियाने एक रिकामा डबा काढला. “सकाळी आयती गरमागरम तूप पोळी खायला मिळाली त्याचा हा चमचाभर आनंद !”…. असं मनात म्हणून एक लहान चमचा भरून तांदूळ तीने त्या डब्यात घातले. “आणि हा चमचाभर आनंद, लहानग्या प्रणवने आईच्या काळजीने स्वत:च्या ताटातला भात आईला देण्याची तयारी दाखवली त्याचा ! आज दोन चमचे तरी डब्यात जमा झाले. “… मनातून खुश होत प्रिया म्हणाली. त्या डब्याला‌ तिने‌ नाव‌ दिलं…. ‘आनंदाचा डबा’.

जेवताना दोन तीन दिवस प्रियासाठी थोडे कठीणच गेले तसे. कारण वाटीभर तांदूळ जमा झाल्याशिवाय भात खायचा नाही असं ठरवलच होतं तीने. त्यामुळे दिवसभरात आपल्या दृष्टीने काय चांगलं घडलं हे शोधायचा छंदच लागला तिला.

आज भाजी घेऊन घरी पोचते न पोचते तोच लाईट गेले. घामाघुम झालेल्या प्रियाची चिडचिड व्हायला लागली. पण नंतर तिच्याच लक्षात आलं की लिफ्टमध्ये असताना लाईट गेले असते तर ? दोन दिवसांपूर्वी बिल्डींगचा जनरेटर खराब झालाय. तो अजूनही दुरूस्त केलेला नाही. किंवा आधीच लाईट गेले असते तर हातातल्या भाजीच्या पिशव्या घेऊन सहा मजले चढत यावं लागलं असतं. बरं झालं घरी आल्यावर लाईट गेले…… एक चमचा आनंद डब्यात जमा झाला.

आज अति कामामुळे ऑफिसमधून यायला उशीर झाला. पण घरी आल्यावर विनीतने स्वत:हून चहा करून दिला….. एक चमचा आनंद डब्यात जमा झाला.

आज गाडी पंक्चर झाली. त्यामुळे ऑफिसमध्ये पोचायला उशीर झाला. बरं झालं पण बॉसच उशीरा आल्याने बोलणी खावी लागली नाहीत….. एक चमचा आनंद जमा !

रात्री आयत्यावेळी प्रणवने शाळेतल्या सायन्स प्रोजेक्ट बद्दल सांगितलं. विनीत ऑफिसच्या कॉलवर होता. त्याची काहीच मदत झाली नाही. पण दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर प्रणवचा चेहरा किती फुलला होता ! अख्ख्या वर्गासमोर त्याच्या प्रोजेक्टचं कौतुक केलं होतं बाईंनी. त्याने खुशीने मारलेली मिठी आणि “आई, तू कित्ती ग्रेट आहेस”… अशी कॉम्लिमेंट देऊन घेतलेला पापा हा अमूल्य आहे…. एक चमचा आनंद जमा !

आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून येताना शेजारच्या काकू फारच गप्पा मारत बसल्या. घरी यायला‌ उशीरच झाला. आवरायची फार घाई झाली. असू दे…. पण त्यामुळेच सकाळी मनासारखी ताजी भाजी मिळाली. एरवी, पहाटेच फिरून येते, तर तोपर्यंत भाजीवाले बसलेले पण नसतात…. एक चमचा आनंद जमा !

अचानकच रवीवारी विनीतचे मामा मामी घरी आले. स्वयंपाकाची जरा गडबड झाली. पण वेगवेगळ्या कितीतरी विषयांवर मस्त गप्पा झाल्या. नेहमीच्या रूटीनपेक्षा छान वेगळा रविवार गेला….. एक चमचा आनंद जमा!

आनंदाचा डबा भरत चालला होता. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काय चांगलं घडलय, हे शोधायचा नादच लागला प्रियाला. दिवसेंदिवस ती जास्त आनंदी आणि प्रसन्न दिसायला लागली. तिच्या स्वभावातला बदल सगळ्यांना जाणवत होता. तिचा सहवास आता ऑफिसमधले सहकारी, विनीत, प्रणव, शेजारीपाजारी अशा‌ सगळ्यांना हवाहवासा वाटायला लागला.

दिवसांमागून दिवस जात राहिले.

आज बऱ्याच दिवसांनी स्वानंदी प्रियाकडे आली तर प्रिया घरी भांडी घासत होती. भांडी घासता घासता चक्क गाणं गुणगुणत होती.

“काय ? आज बाईने दांडी मारली वाटतं ?”

“मग काय तर ! पण बरं झालं एका अर्थी. बाई भांडी घासते तेंव्हा काही काही भांड्यांवर पावडरचा पांढरटपणा तसाच राहतो. कधी कधी चमचे मागून खराब राहतात. एरवी ऑफिसमुळे या गोष्टी चालवून घ्याव्या लागतात. आज कसं ? सुट्टीचं छानपैकी मनासारखी चकचकीत करते भांडी. “… प्रिया चेहऱ्यावर हसू खेळवत म्हणाली.

“बाईने दांडी मारली आणि तू चक्कं चिडचिड न करता हसून बोलतीयेस ?”… स्वानंदीला आश्चर्य वाटल्यावाचून राहिलं नाही.

एव्हाना‌ प्रियाची भांडी घासून झाली होती. कुकरमधला मस्त सुगंध दरवळणारा गरमागरम पुलाव तिने एका डिशमध्ये काढला. ती डिश स्वानंदीपुढे करून प्रिया म्हणाली,

“हाआनंदाचा पुलाव पहिल्यांदा चाखायचा मान तुझा ! त्याचं काय आहे ना, आयुष्य मला चमचा चमचा आनंद देत होतं. पण डबाभर आनंद एकदम मिळायला हवा या हट्टापायी मी या चमचाभर आनंदांकडे दुर्लक्ष करत बसले. पण माझा आनंदाचा डबा भरलाय आणि तोच आनंद मी आज वाटतीये. “…. प्रियाच्या बोलण्याने स्वानंदी कोड्यात पडली.

“काय बडबडतीयेस ? भांडी घासून घासून मेंदूत पण चमचे न् डबे घुसले का ? नीट बोल की !”

मग त्या दिवशी स्वानंदीच्या घरून निघाल्यापासून अथ पासून इति पर्यंतची सगळी कथा प्रियाने स्वानंदीला सांगितली.

“अस्सं होय ! माझ्या बोलण्याने हा कायापालट झाला आहे, तर याचा मला काय मोबदला मिळणार? “…. स्वानंदीने प्रियाला चिडवत विचारलं.

“देणार तर ! तुझ्या घरून सुरूवात झालेल्या चमचाभर आनंदाचा मोबदला, मी माझ्याकडचा डबाभर आनंद देऊन करणार आहे. “…. असं बोलून प्रियाने एक मोठा डबाभरून पुलाव स्वानंदीकडे सोपवला.

“हा माझा आनंद मी तुझ्या बरोबर आणि तुझ्या घरच्यांबरोबर मी शेअर करतीये. आणि यापुढेही करत राहणार…. ”

“चिंकी तू तो बदल गयी रे !’ “…. स्वानंदी मुन्नाभाई एमबीबीएस मधला डायलॉग मारत बोलली आणि दोघींच्या हसण्याने घर भरून गेलं.

लेखिका : सुश्री मेधा‌ नेने

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments