श्री मंगेश मधुकर

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ मूर्ख ☆ श्री मंगेश मधुकर ☆

सामंतांनी बोलावले म्हणून तीन मजले चढून लाल्या आला.

“लिफ्ट बंद आहे. खुर्ची खाली घेऊन जा. टेम्पो आला की त्यात ठेव. समजलं” दहाची नोट हातात देत सामंत म्हणाले. खुर्ची घेऊन गेलेला लाल्या बराच वेळ परत आला नाही. वाट पाहून वैतागलेले सामंत खाली आले तर तिथं लाल्या खुर्चीसोबत उभा.

“ए बावळटा, बाकीच्या खुर्च्या आणायला परत का नाही आलास”

“तुम्ही परत ये म्हणून कुठं म्हणाला” सामंतांनी कपाळावर हात मारला. “झक मारली अन तुला काम सांगितलं” चिडलेले सामंत बडबडत होते तेव्हा आपला काहीच संबंध नाही अशा आविर्भावात ‘लाल्या’नखं खात उभा. शेवटी थकलेले सामंत ओरडले “चल निघ. तोंड काय बघतोस”. मान फिरवून लाल्या निघून गेला.

 

पाच फुटी, गोल चेहऱ्याचा, बारीक डोळे, तिशीतच पडलेलं टक्कल, काळ्या-पांढऱ्या केसांची खुरटी दाढी, स्थूल शरीराचा, अंगापेक्षा मोठा शर्ट अन ढगाळी पॅन्ट असा कायमचा वेष असलेला “लाल्या”. पक्का सांगकाम्या. डोकं न वापरता जेवढं सांगितलं तेवढंच कामं.. तेही कासवाच्या गतीनं करायचा. सोसायटी म्हणजेच त्याच जग. मागेपुढे कोणीही नव्हतं. स्वतःहून कधीच बोलायचा नाही फक्त विचारलं त्याला उत्तरं द्यायचा. काम नसेल तेव्हा वॉचमन केबिनच्या बाहेर बसलेला ‘लाल्या’ सोसायटीचा बिनपगारी नोकर. कमी पैशात कामं होत असल्यानं सभासदांचीसुद्धा तक्रार नव्हती. सगळे मस्करी करायचे. चिडवायचे, वाट्टेल ते बोलायचे, रागवायचे पण लाल्या ढिम्म!!

 

‘बी’ बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये चारपाच जण टाइमपास करत बसलेले. त्यांच्यातल्या एकानं लाल्याला बोलावून नेहमीचा खेळ सुरू केला. एक रुपयाची बारा कॉईन आणि वीसचा डॉलर ठेवत लाल्याला विचारलं “बोल, यापैकी तुला काय पाहिजे” लाल्या पाहत असताना “हे, घे” “नको ते घे” असं बोलून बाकीचे आधीपासून असलेला लाल्याचा गोंधळ अजून वाढवत होते. “काय येडा समजता का?ठोकळा नको. ही जास्त असलेली चिल्लर दे” लाल्या मोठ्यानं म्हणाला तेव्हा सगळे खी खी करत हसले.

“लई हुशारेस, भारी” ‘लाल्यासाहेब, तुम्ही ग्रेट आहात” म्हणत चिडवाचिडवी सुरु झाली. डोक्यावर टपली मार, शर्टची बाही खेच, गाल ओढ असले प्रकार सुरू झाल्यावर कशीबशी सुटका करून पळतच लाल्या नेहमीच्या ठिकाणी येऊन बसला. त्याला डोळे पुसताना पाहून वॉचमननं विचारलं. “लाल्या, काय झालं रे” 

“काय नाई”

“लक्ष देऊ नकोस. ते गॉन केस आहेत. आईबापाशी सुद्धा अशीच वागत असतील. ” वॉचमनच्या बोलण्यानं लाल्याला बरं वाटलं. त्यानं पिशवीतून एक केळ काढून वॉचमनच्या पुढे केलं. “मला नको तू खा”

“घ्या वो, माझ्याकडे अजून आहेत. ”लाल्या.

“इथं कामाला आल्यापासून बघतोय. सोसायटीतील लोक वाट्टेल ते बोलतात, त्रास देतात. फुकट काम करून घेतात. तुला राग येत नाही. ”

“येतोच पण गप राहायला लागतं. ”

“म्हणून काहीही सहन करायचं. तुला मूर्ख म्हणतात ह्ये माहितीयं.. ”

“काय पण म्हणू दे. मला फरक पडत नाही. ”

“अरे पण तुजी काळजी वाटते. ” वॉचमन बोलत असताना ‘लाल्या’ एकटक बघत होता.

“काय झालं. असं का बघतोय”

“काई नाई”

“अरे सांग ना”

“आई गेल्यानंतर पयल्यांदाच कोणीतरी काळजीनं बोलतय. लई बरं वाटलं. बावळट, मूर्ख, येडा, इडियट, यडपट, हुकलेला असलं ऐकायची सवय झालीयं. तुमच्या बोलण्यात माया दिसली. म्हणून जरा.. ”

“तु माझ्या लेकरासारखा हायेस” लाल्या उठला अन वॉचमनला घट्ट मिठी मारली. भरून आल्यानं तोंडातून शब्द फुटत नव्हते. डोळे घळाघळा वाहत होते. काही वेळानं लाल्या शांत झाला

“एक बोलू. तुझं वागणं आपल्याला पटत न्हाई. येवडा अपमान सहन करण्यापेक्षा दुसरी नोकरी बरी” लाल्या हसायला लागला “काय झालं”

“कुणी सांगितलं की कामाला हाय. इथं मी बिनपगारी फुल अधिकारी”

“तरिबी एवढं सहन करतोस मग तर कमाल आहे गड्या तुझी!!आपल्याला हे जमलं नसतं”

“दुसरा पर्याय नाहीये. माजी आई ही सोसायटी बांधताना कामाला होती. नंतर इथंच साफसफाईचं काम करायला लागली. आई आणि मी दोगच. इथंच बाजूला भाड्याच्या खोलीत रहायचो. दिसभर आईला मदत करायचो. करोनात आई गेली अन मग समदी कामं मीच करायला लागलो. खोली सोडून इथंच आलो. ”

“कोणी बोललं नाई”

“२४ तास लक्ष ठेवणारा, कमी पैशात काम करणारा माणूस मिळाल्यावर कोण कशाला बोललं”

“अरे पण सगळे तुझ्या नावानं बोंबा मारतात. त्याच काय?”

“तेवढं चालायचचं. फुकट रहायला मिळतंय त्याची किंमत हाय. स्वतःला शाणी समजणारी येडी हायेत”

“हळू बोल. कुणी ऐकलं तर नसता कुटाणा व्हईल” 

इतक्यात दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून देशमुखांनी नेहमीच्या सवयीनं ओरडत ऑर्डर सोडली “लाल्या, रिक्षा घेऊन ये”

“जी”लाल्या धावतच रिक्षा आणायला पळाला. पंधरा मिनिटांनी चडफडत देशमुख खाली आले तर समोर रिक्षा उभी. “रिक्षा आणली तर सांगितलं का नाहीस”

“तूमी कुठं बोल्ला की रिक्षा आणली की सांग”

“डोकं वापरता येत नाही. इतका कसा रे तू सांगकाम्या” देशमुख प्रचंड वैतागले. लाल्या नेहमीसारखा निर्विकार. देशमुख रागानं बोलत असताना लाल्यानं रिक्षाचं मीटर वाकून पाहीलं तेव्हा देशमुख गप्प झाले अन रिक्षात बसून निघून गेले. वॉचमन हसत म्हणाला “तुझ्याबी अंगात किडा हायेच की.. एक सांग तुला खरंच कळत नाई की…… ??”लाल्या गालातल्या गालात हसला

“बोल ना” 

“दादा, समोरचा कसा वागतो यावर ठरवतो”

“म्हणजे”

“कोणाशी कसं वागायचं हे बरोबर समजतं. कायी चांगली लोकं पण हायेत. खायला देतात, कपडे देतात, माज्याशी नेहमी नीट बोलतात. अशांची कामं मनापासून करतो पण काही नमुने जे फुकट राबवून घेतात, दमबाजी करतात. त्यांना इंगा दाखवतो. कामाला ‘नाही’ म्हणता येत नाही म्हणून मग सांगकाम्यासारखा वागतो. फुकटयांचा जळफळाट होतो तीच माझी कमाई!! “

“आयला, हे नवीनचयं”

“ते ‘बी’बिल्डिंगमधे एक स्वतःला हुशार समजणारे हायेत. चारचौघात मला मूर्ख बनवण्याचा खेळ खेळतात. तो बाबा नेहमी इसची नोट आणि धा-पंदरा रूपयाची नाणी ठेवतो. दरयेळेला मी नोटेऐवजी नाणीचं घेतो. ”

“अरं येडया, वीसची नोट मोठी नाही का”

“दादा, ज्या दिशी ईसची नोट घेईल त्यायेळेपासून माझी नाण्यांची कमाई बंद!!चार चौघांसमोर मूर्ख ठरवून त्यांना आनंद मिळतो आणि मला पैसे मिळतात आता तुमीच सांगा खरा मूर्ख कोण?

“म्हणजे तू.. ”

“मुद्दाम असा वागतो. सगळे येडा, मूर्ख समजतात त्यातच फायदा आहे. माज्या येडेपणातच भलं आहे.

माज्यापासून कोणाला काही धोका नाही. म्हणून तर इथं राहून देतात. दुनिया शाण्या माणसाला घाबरते. त्यापरिस सोयीस्कर मूर्ख असणं कवाबी चांगलंच की.. ”…… लाल्याचं बोलणं ऐकून वॉचमननं कोपरापासून हात जोडले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments