डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
“अगं थोडसं सैल सोड तू. आक्रसून घेऊ नकोस. तुला भीती वाटणं साहजिकच आहे. पण आई व्हायचंय ना तुला. मग हे उपचार तर करावेच लागतील. काही त्रास होणार नाही तुला. या उपचारानंतर पुढच्या वेळेस येशील तू गोड आनंदाची बातमी घेऊनच. आणि मग पुढे बाळंतपणासाठी. मग मला सहकार्य कर. ” पेशंटची कळी खुलली. उपचार करून घेण्यास मला सहकार्य देण्यास तयार झाली.
“बाई, तुम्ही धन्वंतरी आहात. आजपर्यंत अनेक घरात तुमच्या मदतीने, ज्ञानाने वंशाचा दिवा उजळलाय. घरात पाळणा हलला आहे. सगळी आशा सोडून दिलेल्यांना तुम्ही पुन्हा त्यांच्या काळोख्या जीवनात दीपज्योती प्रज्वलित केलेल्या आहेत. अनेक मातांची ओटी भरून तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेतलेत. त्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण केलात. खरंच बाई, परमेश्वराला तर मी पाहिलं नाही पण परमेश्वरा समान माणूस मी तुमच्या रूपात पाहिलाय. ” पेशंटची सासू शेवंता सोनटक्के बोलत होती.
“अहो, मी काही करत नाही. जे काही घडतं त्यामागे परमपित्या परमेश्वराचीच प्रेरणा असते. मी तर एक निमित्त मात्र. पेशंट्सची सेवा करणे हे तर माझं व्रत. त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, औषध उपचार करणं, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यानुसार उपचार करणं हे तर माझं कर्तव्यचं. माझ्या हाताला यश आहे असं तुम्ही मानता, पण मावशी माझ्या पेशंटचे सहकार्य, जिद्द, इच्छाशक्ती आणि मनोबल ही त्यांना मदत करतं. माझ्या प्रयत्नांना अशी सहकार्याची जोड मिळाली तर यश मिळणारच ना मावशी. होय एक गोष्ट मात्र मी कटाक्षानं पाळलीय, मी आणि पेशंटच्या दरम्यान पैसा हा महत्त्वपूर्ण घटक मी कधीही ठरू दिला नाही. एखादा गरजवंत अडचणीतील पेशंट असेल तर पैशा अभावी त्याचे उपचार न करणं हे माझ्या तत्त्वात कधीच बसलं नाही. अनेकांची मी मदत केली आहे, करीत आहे आणि करीत राहीन. “
“तेच तर म्हणते ताई मी, माणसापेक्षा त्याच्यातील माणुसकी ही श्रेष्ठ असते. तुमच्यातील माणुसकी, तुमच्यातील जिद्द, कामातील सचोटी यामुळेच तर माणूस ओढला जातोय तुमच्याकडे. तुमचं लाघवी बोलणं, पेशंटसच्या समस्या अगदी मातेच्या ममतेनं जाणून घेणं, सगळंच विलक्षण. तुमच्या बोलण्यानेच बाई पेशंटचा निम्मा आजार बरा होतो. अनेक माता भगिनी रित्या ओटीन, रित्या मनानं तुमच्याकडे येतात, आणि निराश न होता भरभरून सुख घेऊन जातात. म्हणून तर म्हणते तुम्ही धन्वंतरी नाही तर कोण आहात बाई?” शेवंताबाई दिलखुलास हसली.
“ठीक आहे मावशी, तुमच्या सुनेसाठी मी, ही काही औषधे लिहून देते. ती वेळेच्या वेळी घ्या. तिच्या खाण्यापिण्याकडे ही लक्ष असू द्या. थोडीशी ॲनिमिक झालीय ती. रक्ताची कमतरता भरण्यासाठी सकाळच्या वेळी खजूर, राजगिऱ्याचा लाडू, पालकाची भाजी, सफरचंदे, दूध, डाळी यांचा आहारात समावेश असू द्या. या महिन्याचं मासिक चक्र संपलं की लगेचच घेऊन या तिला. ”
“होय, डॉक्टर ताई तुम्ही सांगितलेला प्रत्येक सल्ला पाळीन मी. माझ्या ही सुनेची ओटी भरू द्या. माझ्याही घरात चिमणी पावलं उमटू द्या. आणि आजी म्हणून आता माझंही प्रमोशन होऊ द्यात. ऋणी राहीन तुमची. “
मी माझा आश्वासक हात त्यांच्या हातावर ठेवला. मायेने थोडासा दाबला. शेवंताबाईच्या नेत्रात आसवांनी दाटी केली. “या मावशी आता. ” मी टेबलावरची बेल दाबली तशी नर्स आत आली “नेक्स्ट”, “येस मॅडम” म्हणत तिने पुढील पेशंटला माझ्या केबिनमध्ये सोडलं.
सुनिता निनावे व तिचे यजमान माझ्यासमोर बसले. “काय त्रास होतो. ” “मॅडम आमच्या लग्नाला एक वर्ष होत आलंय. पण अजून बाळाची चाहूल लागली नाही. घरात आई-बाबांनाही नातवंडाचं मुख पाहण्याची तीव्र इच्छा वाढलीय.
“हे बघा, निनावे साहेब, एक वर्ष म्हणजे काही फार मोठा काळ नाही. अजून एक वर्ष आपण वाट पाहूया. दोन वर्षांच्या कालावधीतही अपयश आलं तर मग पुढील सगळ्या टेस्ट, उपायोजना आपण करूयात. “
“सुनिता तुझे चेकअप करूयात. ” नर्स ने सुनीताला टेबलावर झोपले. सुनिता मासिक चक्र व्यवस्थित सुरू आहे ना. त्यात काही अनियमितता तर नाही ना. ” “नाही मॅडम, मला कसलाही त्रास होत नाही. पोटात दुखत नाही की ब्लीडिंग चा त्रासही होत नाही. ” “गुड गुड, बाकी सर्व ठीक आहे. ” मी काही शक्तिवर्धक औषधे लिहून देते. आहार-विहार-योग्य व्यायामाचीही जोड असू दे. आणि मुख्य म्हणजे चिंता करू नकोस. काळजी करणं सोडून दे. “ऑल द बेस्ट” “येस मॅडम, ” सुनिता व तिच्या यजमानांचा चेहऱ्यावर हास्य पसरले.
काम आटोपून मी थोडी रिलॅक्स झाले. अर्थात असे निवांत क्षण माझ्या जीवनात फार कमी प्रमाणात येत. सातत्याने पेशंट, प्रसुती, दिवसाचे 24 तास मी जणू कामाला वाहिलेली होते. माझ्या दोन सखी भारती आणि रेखा या दोघींची मला खूप मदत व्हायची. बरीचशी जबाबदारी त्या सांभाळत. जणू माझा उजवा हातच होत्या ह्या दोघीजणी. “
“मॅडम कॉफी” भारती ने गरमागरम कॉफीचा मग माझ्या हाती दिला. माझ्या थकल्या भागल्या जीवाला ती कॉफी अमृता समान वाटली. “भारती, सगळ्या पेशंट ठीक आहेत. ” “होय मॅडम, रूम नंबर सात मधील पेशंटचं बाळ दूध पीत नाही हे तिचं म्हणणं ” “अगं मग बाळाच्या पायाला गुदगुल्या करा. त्याच्या कानाच्या चाफ्यावर हळूवार मसाज करा. कपाळावर मायेने हात फिरवा. बाळ लगेच दूध प्यायला सुरुवात करेल” “होय मॅडम, करते मी हे सगळं आणि मॅडम लेबर रूममध्ये एक पहिलटकरीण तळमळतेय. मी प्राथमिक स्तरावर तिची सर्वस्वी मदत करीत आहे. पण तिला काही वेदना सहन होत नाही आहेत. खूप आरडाओरडा करतेय. संपूर्ण हाॅस्पिटल दणाणलंय. आपण बघा मॅडम आता तिला ” ” ओ के, मी आलेच, वेळ पडली तर आँपरेशन थिएटर सुसज्ज ठेवा सिझेरियनसाठी. आपण नैसर्गिक सुटकेवरच भर देऊयात. सिझेरियन शेवटचा उपाय. “
मी पेशंटला स्टेथास्कोपनं तपासलं, तिचे व बाळाचे ठोकेही ठीक होते. ” हे बघ बाळ जन्माला येणार, ते आसुसलंय जगात पहिलं पाऊल टाकायला आणि तू त्याची मदत नाही करत. पोटात वेदनेची कळ उठली की तू ही प्राणपणानं शक्ती लाव. बाळाचा मार्ग सुकर होईल. ”
“आता नाही सहन होत डॉक्टर ताई. मी पाया पडते तुमच्या पण माझी सुटका लवकर करा. सिझर करा माझं. “
“अगं जगात बाळाचं पहिलं पाऊल पाहणं, त्याच्या संघर्ष पाहणं आणि त्याने फोडलेला पहिला टाहो ऐकणं हे तर प्रत्येक मातेचं आद्य कर्तव्य, नव्हे तो तिच्या जीवनातला सोनेरी क्षण. अशा सोनेरी क्षणाची साक्षीदार होण्याऐवजी झोपी जाऊन बाळाला जन्म देणार होय. तुला तपासलंय मी. नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. मग कशासाठी सिझेरियन करायचं. आणि ऑपरेशन नंतर दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती. जखमेचं दुरुस्त होणं, त्यामुळे येणारा अशक्तपणा, का ओढवून घेतेस”.
“नाही नाही डॉक्टर ताई. खूप त्रास होतोय मला तुम्ही करा माझं ऑपरेशन. मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही”. मी तिला हलकेच थोपटून आश्वस्त केले.
“डॉक्टर ताई कशी आहे माझी मुलगी खूप त्रास होतोय हो. तिच्या वेदना ऐकल्याही जात नाहीत माझ्याकडून. “
“मावशी तुम्ही स्वतःही या दिव्यातून गेल्या आहात. आणि आज तुम्हीच घाबरताय. रीमा च्या नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. हे सगळं आपण तिच्या आणि बाळाच्या भल्यासाठीच करीत आहोत. थोडा धीर धरा. होईल सगळं व्यवस्थित. “
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]