डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे

(“मावशी तुम्ही स्वतःही या दिव्यातून गेल्या आहात. आणि आज तुम्हीच घाबरताय. रीमा च्या नैसर्गिक प्रसुतीची सगळी चिन्हे आहेत. हे सगळं आपण तिच्या आणि बाळाच्या भल्यासाठीच करीत आहोत. थोडा धीर धरा. होईल सगळं व्यवस्थित.”) — इथून पुढे — 

“मॅडम, बालरोग तज्ञ डॉक्टर राहुल पाटील आलेत. “

“माझ्या केबिनमध्ये बसव त्यांना चहा कॉफीचं विचारशील. मी येतेच थोड्या वेळात. “

“या डॉक्टर साहेब, काल माझ्याकडे एक अपूर्ण दिवसाची सातव्या महिन्यातच प्रसूती झालीये. बाळ अतिशय कमी वजनाचं. फक्त सोळाशे ग्रॅम वजनाचं आहे. इनक्यूबेटर मध्ये ठेवलंय. तुमचा सल्ला हवाय. बाळाला तुम्हीच ट्रीट करा. ” “ओके मॅडम, बघूया पेशंट” म्हणत मी आणि डॉक्टर त्या रूम कडे वळलो. “मॅडम बाळ कमी वजनचं अवश्य आहे. पण हेल्दी आहे. निरोगी आहे. जवळपास एक महिनाभर तरी याला इनक्यूबेटर लागेल. होईल सगळं व्यवस्थित. “

डॉक्टर पाटील माझ्या दवाखान्यातील प्रत्येक बाळाची देखभाल करीत. प्रत्येक जन्माला येणाऱ्या बाळाला बालरोग तज्ञाला दाखवून देणे हा अलिखित नियमच केला होता मी माझ्यासाठी.

“रेखा आज जन्माला आलेल्या बाळांची यादी दिलीस कां महानगरपालिकेत. ” “होय मॅडम, काल जन्मालेल्या तिघी बाळांची, दोन मुली एक मुलगा याची यादी दिली मी महानगरपालिकेत, जन्म मत्यू नोंदणी विभागात. ” “व्हेरी गुड-चल रीमा काय म्हणतेय बघूया. “

रीमाने आता संपूर्ण हॉस्पिटल दणाणून सोडलं होतं. आणि तो सुवर्णक्षण मी एका झटक्यासरशी टिपला. बाळाचं डोकं बाहेर येतात त्याला हळुवारपणे संपूर्ण बाहेर ओढलं. आणि रेखाच्या हाती दिलं. तिनं बाळाच्या नाका तोंडावरची घाण साफ केली आणि लगेच बाळाने टाहो फोडला. रीमाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. संपूर्ण कुटुंब आनंद सागरात न्हाऊन निघालं. बाळाच्या जन्माच्या वेळी बाळ ओढल्याने प्रत्येक पहिलटकरीणीला टाके येतातच. मी ते काम करण्यात गर्क झाले. माझ्या धाकटा भाऊला व्हिडिओ चित्रीकरण यांचं मोठं वेड. अर्थात हा त्याचा छंद होता. शिक्षण त्याचं सुरू होतं. त्याने बाळाच्या जन्माची सीडीच तयार केली. बाळाला प्रत्येक नातेवाईकांकडे देणं, त्यांचे ते आनंदाचे चेहरे कॅमेर्‍यात बंद करणं, नवजात आईचं नवजात बालकाशी संवाद साधणं – सगळं सगळं त्याने चित्रीत केलं.

पेढ्यांचा बॉक्स माझ्या हाती देत रीमाची आई उद्गारली, “ताई तोंड गोड करा तुमचं” “अहो मावशी, तुमचं तोंड गोड होऊ देत आधी. आजीबाई झालात तुम्ही. ” म्हणून मी तिने दिलेल्या बॉक्स मधील पेढा तिला भरवला. “ताई बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. चांगले आहेत. निरोगी आहेत. भरून पावले मी. “

“ही सगळी परमेश्वराची कृपा. आपण फक्त मदतीचे हात सगळं नियंत्रण तर त्याच्याच हाती आहे. “

आज सकाळी सकाळी माझ्याकडून अंथरुणातून उठवलेही जात नव्हते. अंगात तापाची कणकण जाणवत होती. डोकं दुखत होतं. सर्दीनं नाक बंद झालं होतं. थोडासा खोकलाही येत होता. रेखा ड्युटीवर हजर झालीच होती. “मॅडम काय त्रास होतोय आपल्याला, चेहराही बराच उतरलाय. ” “अगं रेखा, बघ अंगात ताप आहे माझ्या. थर्मामीटर आण बघू”. “बापरे मॅडम 102 डिग्री ताप आहे तुम्हाला. ” “थांबा मी डॉक्टर देवकरांना बोलवते”. म्हणत तिने डॉक्टरांना फोन लावला.

“काय होतंय गं माझ्या बछडीला” म्हणत आई माझे जवळ आली. वार्धक्याने तिचा थरथरणारा हात, डोळ्यातून माझ्या विषयी ओसंडून वाहणारी अपार माया, करुणा पाहून मला भडभडून आलं. “उगी उगी बाळ, अंगं केवढं तापलंय. रात्रंदिवस काम, काम आणि काम. आजार पण नाही येणार तर काय होणार अशानं. कधी विश्रांती म्हणून नाही की चार आठ दिवस कुठे गावी जाणं नाही. सातत्याने कामाच्या दावणीला जुंपलेली. आता काही ऐकणार नाही मी तुझं. पंधरा दिवस डॉक्टर वृशालीला सोपव तुझ्या हॉस्पिटलचं काम. करील ती तुझी मदत. ” “अग आई किती काळजी करशील माझी. ऋतू बदलामुळे होतो त्रास. काही काळजी करू नकोस. “

“हा काय म्हणतोय आमचा पेशंट” म्हणून डॉक्टर देवकरांनी माझ्या रूममध्ये प्रवेश केला. मनगटावर बोटे ठेवून नाडीचे ठोके घेतले. टॉर्च चा झोत टाकून डोळ्यांची बुब्बुळे तपासली. स्टेथास्कोपने हृदयाचे ठोके घेतले. ” “केव्हापासून आलाय ताप. ” ” काल रात्रीपासूनच मला बरं नव्हतं डॉक्टर साहेब. आज तर अंथरुणातूनही उठवले जात नाही आहे. ” ताप, सर्दी, खोकला सगळी व्हायरल फिवरची लक्षणे आहेत. मी औषधे लिहून देतो, ती वेळेवर घ्या आणि रेखा ही दोन इंजेक्शनने सलाईनच्या ड्रिप मधून जाऊ देत शरीरात. होईल ताप लवकर कंट्रोल. आणि आई काही काळजी करू नका. लवकरच बऱ्या होतील मॅडम.

“माझं मेलीचं म्हातारपण. त्यात या पोरांना काही त्रास झाला तर माझं अवसानचं संपतं. हातपाय गळतात माझे. कधी आराम करीत नाही पोरगी, विश्रांतीसाठी कुठे जात ही नाही. 24 तास नुसती कामाला वाहिलेली. अहो यंत्राला सुद्धा काही तासांची विश्रांती लागते. तेव्हा ते पुन्हा पुर्ववत काम करतात. आम्ही तर हाडामासांची माणसे. त्यांना विश्रांती नको. मग व्हायचा तो परिणाम होतोच. बघा ना कसं अंथरुणातूनही उठवत नाही आहे आज हिच्याकडून. “

“हो बरोबर आहे आई. विश्रांती तर पाहिजेच. सक्तीच्या विश्रांतीसाठी तर सलाईनची बाटली लावली आहे. काळजी करू नका तुम्ही. येतोय मॅडम” डॉक्टर देवकर निघून गेले.

अंगात असलेला ताप, त्यामुळे आलेली ग्लानी, प्रचंड थकवा आणि पाच-सहा तास पुरणारे सलाईनमुळे माझ्या

पापण्या केव्हा जडावल्या आणि मी निद्रेच्या आधीन झाले मला कळलेही नाही. आज दिवसभराच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स रेखाने रद्द केल्या होत्या. अगदीच इमर्जन्सी केस असली तर डॉक्टर वृशालीला बोलवण्यात येणार होते.

सायंकाळपर्यंत माझा ताप बराच कंट्रोल झाला होता. पण अंग मात्र ठणकत होतं. विकनेस खूप जाणवत होता. ” उठलीस बाळ, चल थोडीशी चूळ भर आणि खाऊन घे. मूग डाळीची मऊ खिचडी केली आहे तुझ्यासाठी, त्यावर थोडीशी शुद्ध तुपाची धार. चवीला पापड आणि खुर्चणीची चटणी केलीय. जेवून घे बेटा. त्याशिवाय तुला तकवा कसा राहील. आईने मला जेवायला भाग पाडले. पण अन्नाची चव लागत नव्हती. सगळंच कडू वाटत होतं. अन्न गिळले न जाता तोंडातच गोळी होत होती. “होतंय बेटा तापात असं आणि हा अशक्तपणा चांगला आठ-दहा दिवस घेईल पूर्णपणे बरं व्हायला. आईने हलकेच माझ्या कपाळावर थोपटले. “

सायंकाळची मंद वाऱ्याची झुळूक हिरवळीवरचा प्रशांत गारवा, रात राणीचा मंद सुगंध माझ्या खिडकीतून माझ्यापर्यंत पोचत होता. या आल्हाददायी वातावरणानं थोडं मोकळं वाटलं. माझी कळी खुलली. आणि काहीतरी काम करावं, माझं मन मला खुणावू लागलं.

रेखा परवा येऊन गेलेल्या हेमांगी जोशीचा टेस्ट रिपोर्ट आलाय तो जरा मला दाखवशील. निवांतपणा आहे तर थोडं बारकाईने त्याविषयी मला विचार करता येईल. “होय मॅडम, मी घेऊन येते ती रिपोर्ट फाईल”.

– क्रमशः भाग दुसरा

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments