डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ मुंगी उडाली आकाशी… – भाग – ३ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
(रेखा परवा येऊन गेलेल्या हेमांगी जोशीचा टेस्ट रिपोर्ट आलाय तो जरा मला दाखवशील. निवांतपणा आहे तर थोडं बारकाईने त्याविषयी मला विचार करता येईल. “होय मॅडम, मी घेऊन येते ती रिपोर्ट फाईल”. ) – – इथून पुढे —-
लग्नाला चांगली पाच वर्षे होऊनही मातृत्व सुखाने वंचित हेमांगी माझ्याकडे आली होती मोठी आशा घेऊन. “डॉक्टर ताई मदत करा हो माझी. तुम्ही सांगाल ते सगळे औषधोपचार, तपासण्या करून घेण्यास मी तयार आहे. त्यासाठी कोण कोणती दिव्ये मी केली मलाच माहित. उपवास, व्रतवैकल्य, घरगुती उपचार, पवित्र नद्यांचं स्नान. सगळं सगळं केलं. घरात सासूबाईचा तगादा वाढलाय. नातेवाईक, शेजारी, मित्र मैत्रीणी, शुभचिंतक, हितचिंतक, प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देताना माझी दमछाक होते हो. आणि डॉक्टर बाळाच्या मऊ कोमल स्पर्शासाठी मी सुद्धा आसुसले हो. ” “हेमांगी, अगं इतकी सेंटीमेंटल होऊ नकोस. आपण करू उपचार. सगळे प्रयत्न करू. ईश्वर नक्कीच आपली मदत करेल. “
मी हेमांगीची फाईल चाळली हेमांगीचं गर्भाशयचं अविकसित होतं जन्मतःच त्यात दोष होता. ईश्वराने तिला स्त्रीत्व तर दिलं होतं, पण मातृ सुखाचा तिचा तो मार्ग मात्र अविकसित राहिला होता. अशा स्थितीत तिला मातृत्व लाभणं कठीण होतं. हेमांगीला माता होण्यासाठी दोनच मार्ग आता शिल्लक होते. एक तर तिने मूल दत्तक घेणे. दुसरा भाडोत्री आईच्या (सरोगेट मदर) गर्भाशयात मूल वाढविणे. हेमाचे यजमान अविनाश जोशी तसे समजदार गृहस्थ होते. पण कुटुंबातून किती सहकार्य मिळेल याविषयी मी साशंक होते.
माझ्या हातातील फाईल काढून घेत आई म्हणाली, “एक दिवस तर आराम कर माझी बाई. ” मी मंद स्मित करीत फाईल ठेवली. आईला बरं वाटावं म्हणून बेडवर आडवी झाले. आणि हळूहळू भूतकाळाची आवर्तने माझ्या मन: पटावरून सरकू लागली. आई-वडिलांच्या संसार वेलीवरचं मी पहिलं वहिलं फूल. माझा जन्मच सगळ्यांना आनंद देणार होता. सगळ्यांच्या मुखावर हास्य होते. कारण बऱ्याच दिवसातनं रांगती पावलं घरभर दुडूदुडू धावत होती. माझ्यानंतर घरात दोन भावांचा जन्म झाला. सुखाच्या राशीवर आम्ही सगळे खेळत होतो, बागडत होतो.
माझा शाळा प्रवेश, शिक्षणातील गती, इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड, माझा वाचनाचा छंद- घरात नेहमीच कौतुकाचा, प्रोत्साहनाचा विषय ठरला. मुलगी म्हणून कुठलीही आडकाठी दुय्यम दर्जा मला कधी मिळाला नाही. वयाची बारा वर्ष मी पार केली आणि आईची काळजी वाढू लागली. मुलगी तारुण्यात पदार्पण करेल, तिला सांभाळायला पाहिजे, या चिंतेने ती पोखरली जाऊ लागली. पण वयाची पंधरा वर्षे पार होऊनही माझ्यात स्त्रित्वाची कोणतीच लक्षणे न दिसल्याने आई-बाबांनी मला डॉक्टरांकडे नेले. माझी सगळी शारीरिक तपासणी, सोनोग्राफी करण्यात आली. आणि विधात्याने माझ्यावर केलेला अन्याय लक्षात आला. मुलगी म्हणून मला जन्म तर मिळाला पण स्त्रित्व बहाल करणारा तो अवयवच (गर्भाशय) माझ्या शरीरात नव्हता. माझ्या कुटुंबावर तर हा आघात होताच. पण माझ्या तनामनावर आघात करणारा हा क्रूर नियतीचा खेळ होता. पण माझे वडील मोठे खंबीर आणि धीरोदत्त विचारसरणीचे, ताठ कण्याचे एक सद्गृहस्थ होते. त्यांनी आईला व मुख्यतः मला सावरले.
” काही काळजी करू नकोस बेटा. तुझा अभ्यास उत्तम चालू ठेव. त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कर. खूप शिक. मोठी हो आणि स्वतःच्या पायावर उभी रहा. ताठ मानेने ताठ कण्याने जगायला समर्थ करण्याइतका तुझा बाप नक्कीच तुला मदत करणारा आहे. “अहो पण मुलीची जात, परक्याचं धन आणि हा समाज- कसं सगळ्यांना तोंड देणार ?. मुलीचं लग्न कसं होणार?कोण करील तिच्याशी लग्न? आणि मुलींचे लग्न नाही केलं तर समाज काय म्हणेल?” माझी आई बोलत होती. थोडीशी पॅनिक झाली होती
“कोणता समाज, कोणते लोक, कोणाला घाबरताय तुम्ही. तुमचं दुःख, तुमचे कष्ट, कमी करायला काही हा समाज येत नाही. मग तुम्हाला बोलणारा, तुम्हाला बोट दाखवणारा कोणता समाज म्हणता तुम्ही. त्यांना अधिकार तरी आहे का तुम्हाला बोलण्याचा. “
बाबांचा खंबीरपणा, आईची मदत, भावांचं सहकार्य मी यशाच्या पायऱ्या भरभर चढत होते. बारावीचा माझा परीक्षेचा निकाल लागला. आणि मी बाबाजवळ मनमोकळेपणाने बोलले. “बाबा मला उत्तम डॉक्टर व्हायचंय. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून अनेक माता-भगिनींची सेवा करायचीय. विधात्याने माझ्यावर अन्याय केला स्त्रि जन्मा येऊनही स्त्रीचं पूर्णत्व मातृत्व सुखापासून मी वंचित राहिले. माझं दुःख सहन करण्याची विधात्यानचं मला शक्ती दिलीय. आता माझ्यासारख्या अनेक भगिनींची सेवा करून माझा हा जन्मच ही सफल करीन. मी अभागी नाही हो बाबा. “
“कोण म्हणते बेटा तू अभागी आहेस म्हणून. आणि तुझा विचार केवढा उदात्त. समाजानं आपल्याला काय दिलं, यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” मांडणारी माझी मुलगी खरंच महान आहे. बेटा तुझ्यापुढे आज तुझा हा बाप, जन्मदाता नतमस्तक होतोय. जा बेटा, पुढे पुढे जा. माझा मदतीचा हात सदैव तुझ्या पाठीशी राहील. “
आईबाबांच्या आशीर्वादाने व खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिल्याने आज मी डाॅ. शर्वरी गोखले एक. नामांकित स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ होते
माझ्या नेत्र पाकळ्या केव्हाच जडावल्या व मी झोपेच्या आधीन झाले. सकाळी उठल्यावर थोडे फ्रेश वाटले. रेखा आज हेमांगीला आणि तिच्या पतीराजांना बोलावून घे. मी सविस्तरपणे हेमांगी व अविनाशला समजावून सांगितले. आणि मूल दत्तक घेणे किंवा सरोगेट मदर द्वारा प्राप्त करण्याचे मार्गही सुचवले. अविनाश उच्चशिक्षित व समंजस होता मूल दत्तक घेण्याचाच त्याने विचार केला आणि कुटुंबाला समजावून सांगण्याची जबाबदारी ही स्वीकारली.
“ताई ताई तुम्ही खरोखरच धन्य आहात. मदतीचा हात देणाऱ्या दाता आहात आणि रोज नवीन कुटुंबाला जन्म देणाऱ्या अनेक माता भगिनींच्या ओटीत मातृत्वाचा दान देणाऱ्या तुम्ही धन्वंतरी आहात. “
“मी कसली धन्वंतरी. करता करविता तो ईश्वर आहे. तो सगळ्यांची मदत करणारा सगळ्यांचा भाग्यविधाता आहे. तुम्ही सगळेच मला धन्वंतरी, मातृरुपिणी मानतात. पण स्त्री जन्मा येऊनही स्त्रीचं पूर्णत्व मातृत्व मला कधीच मिळालं नाही. अपूर्णत्व असलेली मी एक स्त्री. “
“नाही डॉक्टरताई, तुमचं दुःख तसं मोठं आहे पण स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या दुःखावर मायेनं फुंकर घालणाऱ्या तुम्ही एक असामान्यचं आहात. या मानवीय दुःखावर मदतीचा हात देऊन तुम्ही त्यावर मात करतात, हे मानव जातीवर तुमचे उपकारच आहेत ताई. येते मी आणि बाळ दत्तक घेतल्यावर मिठाईचा बॉक्स घेऊन लवकरच येईल मी. “
माझी ओ. पी. डी. संपली होती. मी घरात आले. फ्रेश झाले. आईची सायंकाळची दिवाबत्ती नुकतीच झालेली होती. तिचे हरिपाठ स्तोत्र गुणगुणणे सुरू होते.
“मुंगी उडाली आकाशी,
तिने गिळले सुर्याशी. “
देवघरातील त्या दिव्याच्या मंद प्रकाशात आज मलाही अनोखे सौख्य लाभले होते. मनःशांती मिळाली होती. सौख्य आनंदाने भरलेला माझा तो तेज:पुंज चेहरा पाहिल्यावर आईलाही समाधान वाटले होते. तिचा आशीर्वादाचा हात माझ्या मस्तकावर होता.
– समाप्त –
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]