श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ तो चिडतो… आणि आता तो चिडत नाही… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

“हॅलो, मंगेश का” तासाभरात काकूंचा आलेला तिसरा फोन.

“हो, काकू. बोला”

“अरे, एक सांगायचं राहिलं म्हणून परत फोन केला. तीन-चार रविवार ‘संडे डिश’ आल्या नाहीत. ”

“मी तर पाठवल्यात”

“मला नाही मिळाल्या. बहुतेक व्हाटसपचा प्रॉब्लेम झालाय. आता काय करू”

“घरातल्या दुसऱ्या कोणाचा नंबर सांगा. त्यावर पाठवतो. ”

“नको रे बाबा”

“का”

“लेकाला कळलं तर चिडेल आणि तुला फोन केलेला त्याला आवडणार नाही. ”

“मी अवीशी बोलतो”

“नाही. नको, फोनच्या प्रॉब्लेमविषयी रोज सांगतेय पण माझ्यासाठी कोणाला वेळच नाहीये. सगळे बिझी फक्त मीच रिकामटेकडी आहे आणि त्यात तू जर अवीला काही बोललास तर आमच्या घरात महाभारत होईल. ”

“तसं काही होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. ”

“अवीला सांगण्यापेक्षा तूच फोन दुरुस्त करून दे ना. प्लीज. विनंती समज”

“असं परक्यासारखं का बोलतायं. ”

“म्हातारपण वाईट रे!! माझ्यामुळं सगळ्यांना त्रास होतो. वयामुळे विसरायला होतं. थोडावेळा पूर्वी बोललेलं लक्षात राहत नाही. पुन्हा पुन्हा तेच बोललं जातं”

“आत्ता घरात कोणी आहे का”मी विषय बदलला.

“सगळे बाहेर गेलेत म्हणूनच फोन केला. अवी परत यायच्या आत म्हटलं बोलून घ्यावं. आजकाल फार चिडचीड करतो. मला तर सारखं धारेवर धरलेलं असतं. हे कर, ते कर, असं करू नको, तसं करू नको. हेच चाललेलं असतं. तो घरात असला की फार टेंशन येतं. भीती वाटते. कसं वागावं हेच कळत नाही. ”काकू भावुक झाल्या. मलाही काय बोलावं हे सुचेना म्हणून विषय बदलण्यासाठी म्हणालो “एक उपाय आहे. ”

“अरे वा!! कोणता?”काकूंनी उत्साहानं विचारलं.

“व्हॉटसप डिलिट करून नवीन डाउनलोड करायचं. ”

“असं करता येतं. ”काकू 

“हो, एकदम सोपयं”

“मग तूच दे ना करून”

“त्यासाठी तुमचा फोन लागेल”

“अरे देवा!! मग रे”

“अवीला सांगतो”

“नको, तो चिडेल”

“मग सूनबाई”

“तिच्याविषयी न बोललेलं बरं”

“मग एखादी मैत्रीण, शेजारी, नातेवाईक वगैरे”

“ढीगभर आहेत पण अवीला कळलं तर तो चिडेल. ”

“मग काय करायचं तुम्हीच सांगा. ”

“सॉरी हं!!तुला खूप त्रास देतेय पण काय करू. हा फोन चांगला टाईमपास होता पण आता तो सुद्धा रागावला”

“अवीसारखा!!”माझ्या बोलण्यावर काकू दिलखुलास हसल्या.

“बरं ठेवते. दाराची बेल वाजतेय म्हणजे अवी आला. फोनवर बोलताना पाहिलं तर परत पन्नास प्रश्न विचारेल. ” काकूंनी घाईघाईत फोन कट केला.

 शालिनीकाकू, माझ्या मित्राची आई, वय सत्तरीच्या आसपास. तब्येतीमुळे घराबाहेर पडणं अवघड झालेलं. वेळ घालवण्यासाठी मोबाईल, टीव्ही हाच मोठा आधार. त्यात मोबाईल नीट काम करत नसल्यानं काकू अस्वस्थ.

स्पष्ट बोलल्या नसल्या तरी काकूंच्या वेदनेचा ठणका जाणवला. खूप बेचैन झालो. डोक्यात विचारांचा भुंगा सुरु झाला. कितीतरी वेळ फोनकडचं पाहत नुसताचं बसून होतो.

“काय झालं. असा का बसलायेस. ”बायकोच्या आवजानं भानावर आलो. काकूंविषयी सांगितल्यावर तीसुद्धा अस्वस्थ झाली. “हे नवीनच ऐकायला मिळालं.

“वयस्कर आईला धाकात ठेवायला काहीच कसं वाटत नाही. ”

“त्यांच्याही काही अडचणी असतील आणि फक्त एका बाजूनं विचार करू नकोस. ”

“तुला नक्की काय म्हणायचंयं”

“काकूंचं ऐकून लगेच मित्राला दोष देऊन मोकळा झालास. ”

“वस्तुस्थिती तीच आहे ना. काकू कशाला खोटं सांगतील. ”

“आणि अवीभाऊजी सुद्धा मुद्दाम असं वागत असतील हे वाटत नाही”

“तुला काय माहीत”

“नसेल माहिती पण भाऊजीची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना. ”

“क्षणभर तू म्हणतेस ते मान्य केलं. काकूंच्या वागण्याचा त्रास होत असेल तरी त्यांच्या वयाचा विचार करता घरातल्यांनी समजून घ्यायला काय हरकत आहे. थोडी अडजेस्टमेंट करावी. ”

“शंभर टक्के मान्य पण एक सांग आजकाल आपण सगळेच एकाच वेळी अनेक फ्रंटवर लढतो. वेगवेगळ्या अडचणींना तोंड देताना वारंवार तडजोडी कराव्या लागतात. इच्छा नसताना मन मारावं लागल्यामुळे चिडचिड होते. ऑफिसमध्ये बोलता येत नाही. मग वड्याचं तेल वांग्यावर निघतं” 

“म्हणजे”

“घरातली लहान मुलं आणि म्हातारी माणसं म्हणजे सॉफ्ट टार्गेट.. म्हणून त्यांच्यावर राग निघतो. त्यातल्या त्यात म्हाताऱ्यांवर जरा जास्तच…”

“खरंय तुझं. यात अवीची सुद्धा काही बाजू असेल याचा विचारच हा केला नव्हता. बरं झालं तुझ्याशी बोललो. कधीही एका बाजूनं विचार करू नये. हा चांगला धडा मिळाला. ”

‘तेच तर सांगायचं होतं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा देखील विचार करावा. ”

“मग आता??”

“अवीभाऊजीना फोन कर”

“त्याच्याशी डायरेक्ट बोललो तर काकूंना त्रास होईल. ” 

“त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐक. तुझ्या पद्धतीनं समजावून सांग आणि तसंही भाऊजी काकूंवर चिडतातच फार तर अजून जास्त चिडचिड करतील. ”एवढं बोलून बायको किचनमध्ये गेली आणि मी अवीचा नंबर डायल केला रिंग वाजत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments