श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ तृप्ती… भाग- १ ☆ श्री दीपक तांबोळी

संपतराव बाहेर फिरुन घरात शिरत नाही तोच त्यांचा नातू त्यांना म्हणाला

“आबा पप्पांचा फोन आला होता. तुम्हाला तयार व्हायला सांगितलंय. आपल्याला पप्पांच्या मित्राच्या वाढदिवसाला हाॅटेलमध्ये जायचंय”

वाढदिवसाच्या पार्टीला आणि तेही हाॅटेलमध्ये हे ऐकून संपतरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“मी नाही येत पार्टीला. तुम्ही जा “ते उद्वेगाने म्हणाले आणि आपल्या रुममध्ये निघून आले. नातू त्यांच्याकडे बघतच राहीला. आजकाल संपतरावांना हाॅटेलमध्ये जेवायला जाणं अजिबात आवडत नव्हतं. अनेक वेगवेगळे पदार्थ पण अनावश्यक मसाले वापरुन त्यांची मुळची चव घालवून टाकलेली असते असं त्यांचं म्हणणं. एका कंपनीत ते सेल्स एक्झिक्युटिव्ह होते. सगळं आयुष्य प्रवासात गेलेलं. अर्थातच बऱ्याचदा जेवणं बाहेर हाॅटेलातच व्हायचं. त्यामुळे त्यांना आता या हाॅटेलच्या जेवणाचा वैताग आला होता. घरचं साधंसुधं जेवण तेही बायकोच्या हातचं त्यांना अतिशय आवडायचं. पण दोन वर्षांपूर्वी बायकोचं निधन झालं. सुन नोकरी करणारी. संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला की हाॅटेलमध्ये जाणं नाहीतर झोमॅटो, स्विगीवरुन बाहेरुन जेवण मागवणं नेहमीचं होऊन गेलं होतं. आणि तेच संपतरावांना आवडत नव्हतं.

ते आपल्या रुममध्ये पुस्तक वाचत बसलेले असतांनाच सुजीत आत आला.

“नाना तयार व्हा ना. आपल्याला पार्टीला जायचंय”

” तुम्ही जाऊन या ना. मला आजकाल पार्ट्यांना जायचा कंटाळा येतो. असंही तिथे माझ्या ओळखीचं कुणी नसतं “

” असं कसं म्हणता?प्रथमेशचे वडील तुम्हांला चांगलंच ओळखतात. त्यांनीच मला “तुझ्या वडिलांना नक्की घेऊन ये “असं सांगितलंय. वाटल्यास त्यांना तुम्हाला फोन करायला सांगतो”

“नको नको. खरं सांगतो तुम्ही जा. मी खाऊन घेईन सकाळचं काही उरलं असेल तर”

” सकाळचं काहिही उरलेलं नाहिये. आणि नाना आता फक्त तुमच्यासाठी किर्तीला स्वयंपाक करायला लावू नका. तीही थकून भागून येते. अशा पार्टीच्या निमित्तानेच तिला आराम मिळतो”

संपतराव चुपच झाले. खरंतर सुजीतला एवढा गलेलठ्ठ पगार असतांना सुनेने नोकरी करणंच त्यांना आवडत नव्हतं. पण एकदा ते असं म्हंटले होते तेव्हा किर्ती उसळून म्हणाली होती ” मग नाना माझ्या वडिलांनी मला इतकं शिकवलं ते काय फक्त रांधा, वाढा, उष्टी काढायलाच का?ते काही नाही. मी नोकरी सोडणार नाही ” तिचंही म्हणणं योग्यच होतं. पण नवराबायको दोघंही नोकरीला असले की घराला घरपण रहात नाही असं संपतरावांना वाटायचं. म्हणून तर त्यांनी त्यांची बायको सावित्रीबाई उच्चशिक्षित असतांनाही तिला नोकरी करु दिली नव्हती. अर्थात त्यावेळच्या मुली घर संसाराला पहिलं प्राधान्य द्यायच्या. त्यामुळे सावित्रीबाईंनी संपतरावांचा निर्णय सहजगत्या स्विकारला होता. आणि तो स्विकारण्यातही त्यांना कोणताच कमीपणा वाटला नव्हता. त्यांच्या सुनेला मात्र करिअर महत्वाचं वाटत होतं. करिअर आणि घर सांभाळतांना बाईची जी प्रचंड ओढाताण होते तिचा सर्वप्रथम परिणाम स्वयंपाक करण्यावर होतो. त्यातूनच मग बाहेरुन जेवण मागवण्याचे किंवा वारंवार हाॅटेलमध्ये जाऊन जेवण्याचे प्रकार वाढले होते. संपतरावांना हे कळत होतं म्हणून तर त्या दिवसापासून संपतरावांनी तोंडाला कुलुप लावून घेतलं होतं.

 

सुजीतच्या आग्रहाखातर ते हाॅटेलमध्ये जायला निघाले खरे पण तिथे जेवणाच्या कल्पनेने त्यांची भुकच मरुन गेली होती. कुठलंस थ्री स्टार हाॅटेल होतं. जेवणाचे रेटही तगडेच असणार होते. प्रथमेशच्या वाढदिवसाची जय्यत तयारी हाॅटेलने केलेली दिसत होती. खरंतर तीन परीवारांची मिळून इनमीन१५-१६ माणसं होती. घरीसुद्धा हा कार्यक्रम करता आला असता. पण म्हणतात ना हौसेला मोल नसतं. त्यातून पैसा भरपूर असला की तो उधळायला निमित्तच लागतं. जो कार्यक्रम १-२ हजारात होऊ शकला असता त्यासाठी अनावश्यक १५-२० हजार खर्च केले जाणार होते. प्रथमेशचे आईवडीलही आले होते पण त्यांच्याही चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत नव्हता. बरोबरच होतं. वाढदिवसाचे सोज्वळ, पवित्र सोहळे पाहिलेली ही माणसं. असे भडक दिखाऊ कार्यक्रम त्यांना कसे रुचावेत?

टेबलवर भला मोठा केक आणला गेला. मागे कुठलंतरी वेस्टर्न म्युझिक सुरु झालं. कडक थ्री पीस सुट घातलेल्या प्रथमेशने केकवरच्या मेणबत्त्या विझवून केक कापला तसा सगळ्यांनी एकच जल्लोष केला. एकदोन जणांनी केकवरच आयसिंग उचलून प्रथमेशच्या तोंडाला फासलं. या किळसवाण्या प्रकाराची तर संपतरावांना अतिशय चीड होती. जो पदार्थ खाण्यासाठी आहे तो चेहऱ्यावर फासण्यात कसली आली मजा? केक एकमेकांना भरवून फोटो सेशन झालं. दुर उभं राहून संपतराव हे सगळे प्रकार पहात होते. त्यांना स्वतःच्या वाढदिवसाची आठवण आली. सावित्रीबाई त्यांना पाटावर बसवून ओवाळायच्या. त्यांना प्रेमाने पेढा भरवायच्या. मग ते सगळ्या मुलांना जवळ घ्यायचे. घरात गोडाधोडाचा स्वयंपाक असायचा. एका पेढ्याव्यतिरिक बाहेरचा कोणताही पदार्थ घरात न आणण्याकडे सावित्रीबाईंचा कटाक्ष असायचा. त्या आठवणीने संपतरावांना गहिवरल्यासारखं झालं.

केक कापण्याचा सोहळा आटोपल्यानंतर साताठ वेटर आले. त्यांनी आता जेवणाची तयारी सुरु केली. समोर पडलेलं भलंमोठं मेनू कार्ड संपतरावांनी चाळायला सुरुवात केली. “बापरे !काय भयंकर महाग पदार्थ आहेत. एकही भाजी तीनशेच्या खाली नाही. साधी चपाती सुध्दा तीस रुपयाची?खरंच इतक्या महागड्या जेवणाची शरीराला गरज असते?”ते मनातल्या मनात बडबडले.

वेटरने चायनीज चवीचं सुप आणून टेबलवर ठेवलं. सोबतीला मसाला पापड. मग वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर आले. तंदूरी मंचुरियन, पनीर चिली, हराभरा कबाब आणि बरंच काहीबाही. हे स्टार्टर खाण्यातच पोट भरणार होतं. मग जेवणार कसं हा प्रश्न विचारायचं संपतरावांच्या ओठावर आलं होतं. पण पार्टी दुसऱ्याची होती. अर्थात ही पार्टी सुजीतची जरी असती तरी हा प्रश्न विचारण्याचं धाडस संपतरावांना झालं नसतं. त्यांनी प्रत्येक स्टार्टरचा एक एक तुकडा घेऊन फक्त त्याची चव घेतली. त्यांनी आयुष्यात इतके पदार्थ खाल्ले होते की या पदार्थांची नवलाई त्यांच्यासाठी संपली होती. स्टार्टर संपले आता जेवणासाठी वेगवेगळ्या भाज्यांच्या ऑर्डर्स दिल्या जात होत्या. इतक्या भाज्यांची खरंच गरज होती का?दाबून स्टार्टर खाऊन झाल्यावर खरंच इतकी भुक शिल्लक आहे?काही वाया तर जाणार नाही?पैसा आहे म्हणून वाटेल ते ऑर्डर करत बसायचं का? हे प्रश्न त्यांच्या मनात आले. पण मघाप्रमाणेच ते आताही चुप बसले. असंही आजकालच्या तरुण पोरांना म्हाताऱ्यांचं‌ बोलणं पटतं कुठे?त्यांनी बसलेल्या सगळ्यांकडे नजर फिरवली. मसालेदार आणि भरपूर तेल, बटर घातलेले पंजाबी पदार्थ खाऊन जवळजवळ सर्वच लठ्ठ झाले होते. अपवाद होता तो प्रथमेशच्या आईवडिलांचा आणि त्यांचा स्वतःचा. साधं, सकस, भरपूर पोषक मुल्य असलेलं महाराष्ट्रीयन जेवण आजकाल मराठी माणसांना का आवडत नाही याचं संपतरावांना नेहमीच कोडं पडायचं. नाहीतरी मराठी माणसाला आपल्या परंपरांचा, आपल्या भाषेचा, आपल्या खाद्य संस्कृतीचा अभिमानच नाही हे त्यांनी बऱ्याचदा अनुभवलं होतं. म्हणून तर हाॅटेल्सच्या मेनूकार्डमधून मराठी पदार्थ गायब झाले होते.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments