श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ तृप्ती… भाग-२ ☆ श्री दीपक तांबोळी

(नाहीतरी मराठी माणसाला आपल्या परंपरांचा, आपल्या भाषेचा, आपल्या खाद्य संस्कृतीचा अभिमानच नाही हे त्यांनी बऱ्याचदा अनुभवलं होतं. म्हणून तर हाॅटेल्सच्या मेनूकार्डमधून मराठी पदार्थ गायब झाले होते.) – इथून पुढे —-

जेवण झालं. त्यांच्या अंदाजानुसार भरपूर भाज्या उरलेल्या पाहून संपतरावांचा जीव कळवळला. या उरलेल्या पदार्थांमध्ये कमीतकमी ५-६ माणसं आरामात जेवली असती. हाॅट वाॅटर बाऊल्स आली. पण त्यात हात न धुता संपतराव उठून बेसीनजवळ गेले. तिथे त्यांनी चुळ भरुन तोंड धुतलं. सध्या दंतवैद्यांचे दवाखाने या हाॅट वाॅटर बाऊल्सच्या थेरांमुळेच तुफान चालताहेत असं त्याचं मत होतं. घरी गेल्यावर आपल्या नातवांना ते खळखळून तोंड धुवायला सांगणार होते. डायनिंग टेबलवर ते परत आले तेव्हा सगळी मंडळी तोंडात शोप कोंबून निघण्याच्या बेतात होती. टेबलवर बऱ्याच भाज्यांच्या डिशेस हातही न लावलेल्या स्थितीत पडलेल्या पाहून संपतरावांना रहावलं नाही. ते प्रथमेशला म्हणाले

“अरे प्रथमेश हे एवढं उरलेलं पॅक तरी करुन घे. कुणा गरीबाचं तरी पोट भरेल”

“कुणाला देणार काका हे?आमच्या सोसायटीत तर कुणी हे घेणार नाही”

“ठिक आहे. मला दे पॅक करुन. मी बघतो कुणाला द्यायचं ते”

“नाना कशाला घेताय ते “सुजीत नाराज होऊन म्हणाला “आपल्याकडे तरी कुणाला देणार?”

“सुजीत अरे नाना बरोबरच म्हणताहेत. वाया जाण्यापेक्षा कुणाच्या पोटात गेलं तर चांगलंच. नाही का?”प्रथमेशचे वडील म्हणाले तसा सुजीत चुप बसला पण त्याची नाराजी मात्र गेली नव्हती. उरलेल्या चार भाज्या दोन बिर्याणी, तीन दाल तडका, आठ बटर पराठे हे सर्व वेटरने पार्सलमध्ये पॅक करुन आणलं आणि संपतरावांच्या हातात दिलं. एवढ्या पदार्थात ४-५ माणसांचं जेवण नक्की झालं असतं.

निरोप घेऊन सगळे आपापल्या गाड्यांमध्ये बसले. ड्रायव्हिंग करणाऱ्या सुजीतला संपतरावांनी सहज विचारलं.

“किती बिल झालं रे जेवणांचं?”

“काही जास्त नाही. फक्त बारा हजार रुपये”

संपतरावांना धक्का बसला. एवढ्या पैशात एखादं कुटूंब महिनाभर गुजराण करतं. त्यांना एकदम आठवण आली की आपल्या सोसायटीच्या केअरटेकरला फक्त दहा हजार पगार आहे. घरात त्याची तीन मुलं आणि बायको मिळून पाच सदस्य आहेत. कसा भागवत असेल तो?मनातल्या मनात त्यांनी त्याला आणि त्याच्या बायकोला सॅल्युट ठोकला.

“आता हे पार्सल कुणाला देणार आहात नाना?” किर्तीने विचारलं

“आपला केअरटेकर-शांताराम आहे ना! त्याला देऊन टाकू”

“आता रात्रीचे दहा वाजलेत. त्यांची जेवणंसुध्दा झाली असतील. आणि तो असं उरलेलं घेईल का?तसा तो स्वाभिमानी आहे”

“बघू या विचारुन. नाही घेतलं तर समोर बांधकाम चालू आहे. तिथल्या मजुरांना देऊन येईन”

किर्तीने तोंड वाकडं केलं. तिच्या मते नाना हा उगीचचा फालतूपणा करत होते.

गाडी थांबली. गाडीतून उतरता उतरता संपतराव म्हणाले.

” तुम्ही जा सगळे वरती. मी आलोच शांतारामकडे जाऊन”

शांतारामने बेसमेंटमधल्या दोन छोट्या रुममध्ये संसार थाटला होता. रुमचं दार उघडं पाहून संपतरावांना हायसं वाटलं.

” नमस्कार नाना “त्यांना दारात पाहून शांताराम आश्चर्यचकीत झाला”काही प्राॅब्लेम आहे का नाना?”

“नाही नाही. तुमची जेवणं झालीत का?”

“पोरांची झाली. माझं आणि घरवालीचं राहिलंय. मी जरा गावाला गेलतो. आताच आलो. का हो नाना?”

“अरे आज हाॅटेलमध्ये पार्टीला गेलो होतो. तिथे ऑर्डर केलेलं बरंच जेवण उरलं होतं. भरमसाठ मागवून ठेवतात आणि वाया घालवतात. म्हंटलं वाया जाण्यापेक्षा कुणाला दिलं तर त्याचं पोट तरी भरेल. उष्टं नाहिये बरं का!अगदी हातही लावलेला नाहीये”

” तो काही प्राॅब्लेम नाहीये नाना. तुम्ही तसं काही देणार नाही याची खात्री आहे मला. पण घरवालीने मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी करुन ठेवलीये. ती वाया जाईल ना!”

मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचं नाव ऐकूनच संपतरावांचे डोळे चमकले. अचानक त्यांना सपाटून भुक लागल्याची जाणीव झाली. आपण हाॅटेलमध्ये थोडंसंच खाल्ल्याचं त्यांना आठवलं. ते एकदम उत्साहाने म्हणाले

“ती भाजी भाकरी मला दे. मी ती खातो. तुम्ही हे खा ” बोलताबोलता त्यांनी ते पार्सल त्याच्या हातात दिलं.

“पण नाना, तुमचं जेवण तर झालंय ना?”

” मला नाही आवडत ते हाॅटेलचं जेवण. मी काहीच जेवलो नाही तिथे. आणि महाग किती!एकेक भाजी तीनशे रुपयांची. साधा पराठा शंभर रुपयाचा”

शांतारामने डोळे विस्फारले. त्याच्या बायकोने ताटात तीन भाकरी आणि मेथीची भाजी आणली.

“नाना वर घेऊन जाताय ना?”

“नाही नाही. मी इथंच बसतो. या तुम्हीही. आपण बरोबरच जेवू “

संपतराव तिथंच फतकल मारुन बसले.

“अहो नाना, पाट तरी घ्या बसायला”

“राहू दे रे. सवय आहे मला असं खाली बसून जेवायची”

शांतारामच्या बायकोने सगळं वाढून घेतलं. भाजीभाकरीचा पहिला घास घेताच संपतरावांना जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला.

” नाना हिरव्या मिरचीचा ठेचा देऊ?”

“अरे दे ना!व्वा मजा येणार जेवायची “संपतराव खुश होऊन म्हणाले.

” नाना हे जेवण पण खुप छान आहे. तुम्हांला कसं आवडलं नाही?”शांतारामने बिर्याणीचा घास घेत विचारलं.

” अरे कधीतरी खाणाऱ्याला ते चांगलंच वाटणार. आम्ही दर आठवड्याला हाॅटेलमध्ये जातो. कसं आवडणार ते आम्हांला?”

जेवण झालं. संपतरावांनी तीन भाकरी सहज संपवल्या होत्या. पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर त्यांनी दिला. त्यांनी पाहिलं. शांताराम आणि त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावरही तृप्ती आणि समाधान विलसत होतं. संपतरावांच्या डोक्यात अचानक एक कल्पना चमकून गेली.

” शांताराम मला कधी खायची इच्छा झाली तर मला भाजीभाकरी करुन पाठवशील. मी पैसे देईन त्याचे “

“अहो नाना. तुम्ही केव्हाही सांगा. मी स्वतः आणून देईन. आणि तुम्ही आमच्या वडिलांसारखे. वडिलांकडून कुणी जेवणाचे पैसे घेतं का?”

संपतराव समाधानाने हसले. ते वर घरात आले तेव्हा सुजीत त्यांचीच वाट पहात होता.

“बराच उशीर केलात नाना. आणि काय झालं?आनंदात दिसताय “

“काही नाही. शांतारामशी गप्पा मारत बसलो होतो. आणि त्याला आणि त्याच्या बायकोला हाॅटेलचं जेवण खुप आवडलं बरं. थ्री स्टार हाॅटेलचं एवढं महागडं जेवण करायला मिळालं म्हणून दोघंही खुप खुश झाले. उरलेलं जेवण उद्या सकाळी मुलांना देणार आहेत “

” चला बरं झालं. मलाही आवडत नाही हो नाना असं अन्न वाया घालवायला. पण काय करता! आपलं स्टेटस् आडवं येतं. पण मी आता यापुढे लक्षात ठेवून. पार्ट्यांमध्ये अन्न उरणारच नाही इतकंच मागवायचा आग्रह धरीन. आणि उरलंच तर पॅक करुन गरिबांना वाटून देण्याची सगळ्यांना विनंती करेन “

त्याच्या या म्हणण्याने संपतरावांच्या चेहऱ्यावरची तृप्ती अधिकच गडद झाली.

— समाप्त — 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments