☆ “कासावीस…” लेखिका : सुश्री माधुरी काबरे ☆ प्रस्तुती : श्री जगदीश काबरे ☆
गुडघे धरून भागीरथीबाई उठल्या. ‘थांबा चहा टाकते, ‘ असं म्हणून मंद गतीने कपाटामागच्या बाजूस गेल्या. त्या ठिकाणी स्वयंपाकासाठी आडोसा केला होता. त्या कपाटावर वेड्यावाकड्या इंग्रजीत मुलांनी ‘किचन’ असे खरडले होते. भागीरथीबाईंनी स्टोव्ह पेटवला आणि त्या आवाजाने मथूअत्या सुखावली. दुपारी एक पासून येथे आल्याचा फायदा झाला होता. गेले दोन अडीच तास मथूआत्या बडबडत होती. सुरकुतलेल्या चेहऱ्याने आणि तोंडाच्या बोळक्याने चमत्कारिक दिसणारी माथूआत्या गावातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी भागीरथीबाईंच्या कानावर भसाभसा ओतत होती. भागीरथीबाई चहाला उठल्या तेव्हा ती ‘नको’ असे मुळीच म्हणाली नाही. गरम पाण्यात टाकलेल्या चहाच्या पत्तीचा उत्तेजक सुगंध नाकात भरून घेत ती लुकलुकत्या डोळ्याने भावाचा केविलवाणा संसार न्याहाळत होती.
गावातच मोठा वाडा असूनही केशवराव आपल्या चार मुलांना घेऊन या एका दरिद्री खोलीत राहत होते. ती खोली अत्यंत अव्यवस्थित होती. कधीकाळी तेथे फरशी असावी. आता मात्र मधून मधून कित्येक फरशा उखडल्या होत्या. त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यासारख्या भागात वाळू, दगड, कचरा तसाच लोळत होता. एका पसरलेल्या तोंडासारख्या दिसणाऱ्या लांब बोळकांडीत देव होते. भोवतीने कितीतरी तसबीरी होत्या. त्या सगळ्यांवर कधी काळी घातलेल्या आणि आता वाळून कोळ झालेल्या झेंडूच्या माळा लटकल्या होत्या. खोलीची एका बाजूची भिंत अडवून एक मोठा छप्पर पलंग होता… केशवरावांनी भांडून मिळवलेला. त्यावरच्या मच्छरदाणीसाठी असलेल्या नक्षीदार दांड्यावर कळकट कपडे लोंबत होते. पलंगावर चार-पाच गाद्या होत्या. त्यावर उडी मारूनच चढावे लागले असते. पलंगाखाली कसले कसले डबे, बाटल्या, गाठोडी, ट्रंका यांची गर्दी माजली होती. पलंगाच्या लगतच एक भले मोठे उंच कपाट त्या खोलीशी विसंगतपणे उभे होते. त्याने जो आडोसा केला होता, तेच स्वयंपाक घर होते. राहिलेल्या कोपऱ्यात एक माणूस कसाबसा उभा राहील अशी मोरी होती. तिच्या बुटक्या कठड्यावर एक काळपट रंगाचे पिंप स्तब्धपणे पेंगत होते. जवळच दोन बादल्या बेववरशासारख्या लोळत होत्या. त्या खोलीला असलेल्या एकुलत्या एक चारखणी सेल्फचा प्रत्येक खण पुस्तकांच्या गर्दीने ओसंडत होता. आपापल्या खणावर मुलांनी आपली पूर्ण नावे लिहिली होती.
‘भागीर्थी पहिल्यापासूनच आजागळच नाहीतरी’, मथूआत्या मनाशी म्हणाली आणि समोर आलेले दहा मिटक्या मारीत लपालपा पिऊ लागली. भागीरथीबाई चमत्कारीक आवाज करीत चहा पीत मक्ख चेहऱ्याने बसून होत्या. त्यांच्या घामट चेहऱ्यावर एक प्रकारचा मख्ख भाव नेहमी चिकटून असायचा. तशा काही त्या खरोखर मख्ख होत्या असे नाही, पण दिसायच्या मात्र. आणि राहणीही अगदीच काहीतरी होती.
दोघींचा चहा पिऊन झाला. तुडतुडीत मथूअत्या चटकन उठली. त्या पिपातील शिळ्या पिवळट पाण्याने कपबशी धुऊन तिने कपाटाशी पालथी घातली आणि आपल्या झुळझुळीत पातळाचा पदर खांद्यावर ओढून घेत म्हणाली, “भागीर्थीवैनी, जाते आता. स्वयंपाकाला लागायला हवं. येत जा कधीमधी. ”
“वन्स, तिथे येऊन उगीच अपमान करून घ्यायला काय मला हौस आलीय? तुम्हीच आज आलात तशा या केव्हाही. हेही घर तुमचंच आहे. ”
“माझं आहे म्हणून तर आले! जाऊ आता? पाच वाजायला आले असतील. वीस-पंचवीस माणसं जेवणारेत रात्री. ” मथूआत्या सूचकपणे अंदाज घेत म्हणाली. पण भागीरथीबाईंनी लक्षात येऊनही त्यावर रुक्ष हुंकार भरला.
मथूअत्या तरीही चिकाटीने म्हणाली, “कशाला म्हणून नाही विचारलंस बरी?”
“कशाला?”
“अगं, पम्मीचं लग्न ठरलंय ना! ती माणसे यायची आहेत आज. पोरीनं मात्र नशीब काढलंन हो… ”
मथूआत्याचे पुढले शब्द भागीरथीबाईंना कळले नाहीत. त्यांच्या मख्ख देहावर अचानक सरसरून वीज चमकली. मन कुठेतरी व्याकुळ व्याकुळ झालं. मथूआत्याजवळ काहीतरी मनातलं बोलून टाकावसं वाटलं. पण त्यांनी स्वतःला आवरलं. लगबगीने निघालेल्या मथूआत्याने पम्मीच्या स्थळाचे वर्णन अर्धा तास केलं नि ती तुरुतुरु निघून गेली.
ती गेल्याच भागीरथीबाईंना बरंच वाटलं खरं. पण तिथं स्वच्छ धुतलेलं चांगल्यापैकी लुगडं, काटक्यासारख्या हातात खडखडणारे दोन-दोन बिलवर, गळ्यातील चमकदार कंठी आणि कानातल्या कुड्या त्यांच्या डोळ्यासमोर हालत नव्हत्या. वाड्यातल्या घराचं तिने केलेलं रसभरीत वर्णन भागीरथीबाईंना डोळ्यासमोर दिसत होतं. आणि जाताना डोक्यात दगड घातल्यासारखे सांगितलेली पम्मीच्या लग्नाची बातमी भागीरथीबाईंच्या चक्काचूर करत होती. पम्मीचं लग्न! त्यांच्या धाकट्या जावेच्या मुलीचं लग्न! त्यांच्या मनात मत्सर उगवला आणि पाहता पाहता फोफावू लागला. दातावर दात वाजले आणि त्या लग्नात अडथळा आला तर बरं होईल, असं त्या मनापासून घोकू लागल्या. अशुभ घटनांच्या घड्याच्या घड्या रचून उस्कटू लागल्या. मनाची तगमग थोडी शमू लागली.
“आई काय झालं तुला? गप्पशी बसलीस?” विणाच्या उद्गारानं त्या खडबडून भानावर आल्या. वीणा नोकरीवरून परत येऊन पातळ बदलत होती. तिचं थोराड शरीर भागीरथीबाईंना खूपू लागलं. एक दोन मुलांच्या आईसारखी वीणा दिसत होती. पहिलं पातळ एका ट्रंकेत ठेवून दांडीवरचं हिरवट वीटकं पातळ नेसली. तिच्या पोटावरील विद्रुप वळ्यांकडे पाहत भागीरथीबाई सुन्नपणे बसून होत्या. वीणाच मग त्या कपाटामागे जाऊन स्टोव्ह पेटवू लागली. तिला रोज आल्यावर चहा लागायचा. भागीरथीबाई रोज मनापासून करूनही द्यायच्या. पण आज त्यांना हलावंसच वाटत नव्हतं. त्यांना विणेचा राग येत होता. त्यांच्या डोळ्यासमोर नाजूक सडसडीत पद्मजा येत होती. मुंडावळ्या बांधून ती गोड हसत होती… आणि हिरवट वीटकं पातळ नेसून वीणा चमत्कारिकपणे वाकून उभी होती.
“वीणे, पम्मीचं लग्न ठरलं बरं का. दुपारी मथूवन्स आल्या होत्या. ” उपरोधपूर्ण स्वरात भागीरथीबाई म्हणाल्या.
“हो का? वा!” वीणाचा स्वर एकदम वेगळा आला आणि भागीरथीबाईंचं मन तिच्याविषयी एकदम हळवं झालं. आपल्या प्रौढ मुलीला पदराखाली घेऊन थोपटावं असं त्यांना वाटलं. पण त्या तिथेच काळजीत बसून राहिल्या. आत वीणाही गप्प होती. करून घेतलेला चहा तिला घ्यावासा वाटत नव्हता. आपल्या घाऱ्या डोळ्याने कुठेतरी पहात ती आतच बसून राहिली होती. एकदम बधीर झाल्याप्रमाणे तिचं डोकं जड झालं होतं आणि अडगळीत टाकलेल्या वस्तूप्रमाणे सारे विचार दूर टाकून पम्मीच्या लग्नात ती गुरफटली होती.
संध्याकाळ केव्हाच घरात शिरली. बाहेरच्या बाजूला घामट आणि मख्ख भागीरथीबाई आणि कपाटाच्या आतल्या बाजूला थुलथुलीत वीणा! कितीतरी वेळ गेला आणि कलकल करीत मुलांनी त्या शांततेची शकलं करून टाकली. भागीरथीबाई व वीणा एकमेकींची नजर टाळत स्वयंपाक घरात खुडबडू लागल्या. मध्येच कोणीतरी बटन दाबलं आणि धुळीने माखलेल्या बल्ब मधून चोरटा अंधुक प्रकाश लोंबकळू लागला. वीणाने देवांच्या बोळकांडीत एक भित्रट ज्योतीचे निरंजन लावले नि उदबत्तीच्या भडक गंधाने क्षणभर तिथे फेऱ्या मारल्या.
“वीणाक्का, शुभम करोती सांग की’, मुलं म्हणाली. पण त्यांना तीरसटपणे उत्तर देऊन विचित्र चालीने वीणा बाहेरच्या पायरीवर येऊन बसली. समोरच्या घरातून ऐकू येणारा रेडिओ ऐकत नेहमीच तिथे बसायची. पण आज मात्र ते सूर तिच्या कानापर्यंत येऊ शकत नव्हते. एरवी ऑफिसमधल्या लोकांच्या नकला करून विचित्र आवाज करून वीणाक्का खूप मजा करायची. पण आज मात्र आपले घारे डोळे जास्तच गहिरे करून ती आतल्याआत स्फुंदत बसली होती. पम्मी! तिची आवडती बहीण… वाड्यात दोघींची जोडी असायची. गेली सात-आठ वर्षे मात्र त्या दोघी एकमेकांशी बोलल्याही नव्हत्या. गेली आठ वर्षे पम्मी त्या प्रशस्त वाड्यात बागडत होती आणि विणा या दरिद्री खोलीत आयुष्याबरोबर फरफटत होती. बापाच्या हट्टीपणात आणि चिडकेपणात, आईच्या अव्यवस्थितपणात विणा कधीच प्रौढ झाली होती. अकाली सुकून गेली होती. वाड्यात असती तर ती कदाचित आज… पम्मीचा तिला प्रथमच भयंकर संताप आला आणि लगेच तिचा आपल्याला का संताप यावा याबद्दल स्वतःचाही संताप आला. तेव्हा हळूच मनात एक वेदना ओघळली आणि अचानक वेगाने आलेले अश्रू तिला थांबवता येईनात.
कोणालातरी जोर जोराने शिव्या देतच केशवराव घरात आले, तेव्हा मुलं गाढ झोपली होती. भागीरथीबाई त्यांची वाट पाहत पाटावर बसून होत्या आणि वीणा डोळ्यापुढे पुस्तक धरून वेळ काढत होती. कपडे बदलून केशवराव जेवायला येऊन बसले तेव्हा ते तंद्रीतच बडबडत होते, “हरामखोर लेकाचे, समजतात कोण स्वतःला? अरे, तुमच्या हाताखाली नोकरीला असलो म्हणून काय झालं? मनात आलं तर आत्ता लाथ मारीन… ”
त्यांच्या पानात भात वाढत भागीरथीबाई म्हणाल्या, “दुपारी मथूआत्या आल्या होत्या. ”
“घेतलंस कशाला तिला घरात? आमचा अपमान करायला येते साली. तुला एक कळत नाही काडीइतकं… ”
“पम्मीचं लग्न ठरलंय!” त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत भागीरथीबाईंनी त्यांच्याकडे रागारागाने पाहत म्हटले.
“ऑ?” केशवराव एकदम दचकले. त्यांनी वीणाकडे पाहिले. तिचे डोळे भरले होते. केशवराव तोंड दाबल्यासारखे गप्प बसले. त्यांनी कोणालाही शिव्या घातल्या नाहीत की ते तणतणले नाहीत. वचावचा जेवून ते इकडेतिकडे फेऱ्या घालू लागले. भागीरथीबाई न जेवताच भरल्या ताटासमोर तशात बसून राहिल्या आणि गेला तासभर उघडलेले एकच पान वाचण्याचा वीणा पुन्हा प्रयत्न करू लागली.
अंधुक प्रकाशातील त्या केविलवाण्या खोलीत असलेल्या त्या तीन माणसांच्या मनात काहीतरी घुमत होते. त्याचा आवाज एकच होता. त्याचा अर्थ एकच होता. कुठूनतरी गळत आलेली एक व्यथा त्या तिघांच्या आतबाहेर वाहत होती आणि त्यात बुडून ते कासावीस होत होते !
☆
लेखिका: सुश्री माधुरी काबरे
प्रस्तुती : श्री जगदीश काबरे (मधुर जग फाउंडेशन)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈