प्रा. विजय काकडे
जीवनरंग
☆ जातीची चौकट …. – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆
विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी मी पुण्याला जात होतो. यावेळी अनुला नक्की भेटायचंच असं ठरवूनच मी निघालो होतो कारण यावेळी अशोकने मला शेवटची वॉर्निंग दिली होती अन्यथा ती मला मिळण्याची शक्यता फार कमी आहे असे सांगितले होते. मी सुद्धा कोणत्याही परिस्थितीत अनुला गमावण्याच्या मनस्थितीत नव्हतो.
खरे पाहता मी आणि अनु एकमेकांना अजिबात ओळखत नव्हतो. आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष कधी पहिले सुद्धा नव्हते. परंतू आमच्या दोघांमधला दुवा म्हणजे अशोक आम्हाला लग्न बंधनाच्या धाग्याने एकत्र बांधू इच्छित होताआणि त्यामुळेच तर एकमेकांना भेटण्यासाठी आम्ही (म्हणजे मी तरी तिचे माहित नाही परंतू अशोकच्या सांगण्यावरून असे वाटत होते की बहुधा तीही माझ्या इतकीच उत्सुक असावी) उत्सुक होतो.
तिची माझी भेट होणार काय? आमचे लग्न जुळणार काय? या मध्ये एकच गोष्ट उभी होती आणि ती म्हणजे नियती! तिच्या हातात खरे तर ती दोरी होती. नाहीतरी तीच सगळे ठरवीत असते.
आपण काय फक्त मोठामोठी स्वप्ने रंगवीत असतो. पुढे काय घडणार आहे ते आपल्याला कुठे माहित असते?नियतीच तर सारेकाही ठरवत असते ना…
“अनु दिसायला खूप सुंदर आहे, देखणी आहे, आपल्या इतकीच शिकलेली सुद्धा आहे आणि एका महाविद्यालयामध्ये लेक्चरर आहे. शिवाय आपल्या जातीतली आहे. तेव्हा तू लवकर येऊन तिला पाहून घे. अन्यथा चांगले स्थळ हातचे जाईल, “असे अशोकने मला वारंवार फोनवरून सांगितले होते. मी हो म्हणायचो परंतू प्रत्येकवेळी काहीतरी अडचण यायची आणि मला जाणे शक्य व्हायचे नाही.
ज्या ज्या वेळी आमची म्हणजे अशोकची आणि माझी प्रत्यक्ष भेट व्हायची त्या प्रत्येकवेळी तो अनुच्याच विषयावर माझ्याशी भरपूर चर्चा करायचा. मी बरेचदा दुर्लक्ष करायचो कारण मला एवढ्यात लग्न करायचे नव्हते. कारण माझी घरची परिस्थिती त्यावेळी नाजूक होती. गावाकडे अजून बरीच कामे मला करायची होती. त्यानंतरच मग लग्नाचा विचार मला करता येणार होता.
तसे पहिले तर अनु आणि अशोक वेगवेगळ्या कॉलेजमध्ये नोकरीला होते पण ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते त्यामुळे एकमेकांना ते दोघे चांगले परिचित होते.
अशोक मला नेहमी अनुविषयी पुष्कळ गोष्टी सांगायचा. अनुची आणि तुझी जोडी छान जमेल असं म्हणायचा. त्याच्या अशा सततच्या सांगण्यामुळे माझ्या नजरेसमोर त्याने तिची एक वेगळीच मूर्ती उभी केली होती. ज्यामुळे अनुविषयी माझे आकर्षण दिवसांगाणिक वाढत चालले होते.
मी नेहमी अशोकला म्हणायचो, ” अरे, मी खेड्यातला, ती शहरातली, आमच्या दोघांचे सूत जमेल काय?नाहीतर बघ बाबा? काहीतरी गडबड व्हायची! त्यापेक्षा त्या नादाला न लागलेले बरे… “असे मी विचारल्यावर तो सांगायचा, ” अरे, असं काहीही होणार नाही, मित्रा. तू बिल्कुल चिंता करू नकोस. तुझ्याबद्दल मी सगळं काही अनुला सांगून ठेवलयं…. ती तुझ्याशी लग्न करायला नक्की तयार होईल. आणि हो, तुझ्यात काय कमी आहे रे? मी तिला तुझं घर, तुझं गाव, तुझी शेती, अगदी सगळं- सगळं तुझ्याबद्दल तिला सांगून झालंय आणि तिनेही ते सगळं मान्य करून तुझा स्वीकार करायचा ठरवलयं. आता फक्त तिने तुला पाहणे एवढेच बाकी आहे. तिला तुझ्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे. मगच सगळं फायनल होईल. तेव्हा आता तू लवकर पुण्याला ये आणि तिची भेट घे, आता उशीर करू नकोस. तुम्हा दोघांची भेट घालून दिली की माझे काम संपले! ” त्याच्या अशा सांगण्याने माझ्याही मनात लग्नाचे विचार घोळायला लागले. अनुच्या सौंदर्य स्वप्नात मग मीही गुंग व्हायला लागलो.
आत्ता चला एकदा अनुला भेटून प्रकरण निकाली काढूया असे ठरवून एकेदिवशी मी तिला भेटायचंच असं ठरवून खास पुण्याला रजा काढून गेलो. तिथे गेल्यावर तिचे कॉलेजही बरोबर शोधून काढलं. पण गंमतच झाली की माझे दुर्दैव म्हणा किंवा सुदैव म्हणा त्या दिवशी ती नेमकी रजेवर होती… ! त्यामुळे माझी निराशा झाली… ! तिचे दोघेतिघे सहकारी तेवढे तिथे भेटले. त्यांच्याशी ओळख झाली. मग थोडया गप्पा झाल्या. त्यातल्या एकाजवळ हळूच अनूचा विषय काढला तर त्याने तिच्याबद्दल भरपूर माहिती मला दिली. तिच्याबद्दल सगळे छानच सांगितले, त्यावरून तर तिला भेटण्याची ओढ मला आणखीनच लागली.
ती तिथे कॉलेजवर भेटली नसल्याने काहीही करून त्याच दिवशी तिच्या घरी जाऊन तिला तात्काळ भेटून काय तो सोक्षमोक्ष लावण्याचा माझा विचार पक्का झाला परंतु त्यांची पूर्ण फॅमिलीच गावाला गेल्याचे अशोककडून मला समजले. संकटे अशी एकटीदूकटी येत नसतात म्हणजे काय असतं हे मला त्यादिवशी समजलं. एखादी गोष्ट नसेल होणार तर तुम्ही लाख प्रयत्न करा नकार घंटाच वाजणार! हे मला अनुभवास येत होते. परंतू मी हार मानणाऱ्यापैकी थोडाच होतो. बचेंगे तो और भी लडेंगे हे लहानपानापासून चांगले अंगात मुरले होते. नाहीतरी माणूस आशेवरच जगत असतो ना? ती एक भाबडी आशा प्रयत्न करायला भाग पाडत होती.
त्यानंतर असेच दोन-तीन महिने निघून गेले आणि मग तो शुभ दिवस उगवला! त्या दिवशी मी विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दोन दिवसांसाठी पुण्याला जात होतो. यावेळी मी पुण्यात एक दिवस मुक्कामीच जाणार असल्याने अनुला भेटण्याचे नक्की केले होते. अशोकलाही फोन करून मी येत असल्याचे कळवले होते. उत्सुकता शिगेला पोहोचली होती… दिवसभर मी खुशीत होतो. संमेलनात माझे मन काही केल्या लागत नव्हते. तिथे मी केवळ शरीरानेच उपस्थित होतो. मन मात्र अनुशी हितगुज करण्यात गुंतले होते. तिच्या समोर गेल्यावर ती कशी रिऍक्ट करेल? मग तिच्याशी बोलायला कुठून व कशी सुरुवात करायची? लग्नाचा विषय कसा काढायचा? असे सगळे विचार माझ्या मनात एकसारखे धुमाकूळ घालत होते.
मधूनच कधीतरी जेव्हा मी भानावर येत होतो तेव्हा संमेलनाच्या पहिल्या दिवसाचे शेवटचे सत्र कधी संपेल याचीच वाट पाहत होतो.
अखेरीस सायंकाळचे पाच वाजले. संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्राचा समारोप झाला आणि मी मुक्कामाच्या ठिकाणाच्या दिशेने निघालो.
त्या दिवशीचा मुक्काम मी माझ्या काकांकडे विश्रांतवाडीला करणार होतो. त्यांना मी तिथे येत असल्याची कसलीही पूर्वकल्पना दिली नव्हती. परंतू तिथेच मुक्कामाला जायचे हे आधीपासून ठरवले होते. अगदी अचानकच जाणार होतो कारण घर आपलंच होतं. शिवाय माझे काका काकू अनेक दिवस मला तिकडे येण्यासाठी आग्रह करत होते परंतु मलाच या ना त्या कारणाने त्यांच्याकडे जाणे जमत नव्हते. प्रत्येकवेळी, आता पुढच्या वेळी मी नक्की येईन असे आश्वासन मात्र त्यांना मी देत होतो. त्या अर्थाने तिकडे जाण्याची हीच योग्य वेळ होती.
– क्रमशः भाग पहिला
© प्रा. विजय काकडे
बारामती.
मो. 9657262229
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈