प्रा. विजय काकडे
जीवनरंग
☆ जातीची चौकट …. – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆
(प्रत्येकवेळी, आता पुढच्या वेळी मी नक्की येईन असे आश्वासन मात्र त्यांना मी देत होतो. त्याअर्थाने तिकडे जाण्याची हिच योग्य वेळ होती.) – इथून पुढे —-
आज मात्र तिकडे जाण्याचा योग चांगलाच जुळून आला होता. त्यांच्याकडेच मुक्कामाला जाण्याचे मी पक्के ठरवले होते त्याला कारणही तसेच होते. एक म्हणजे मला मुक्कामाचे ठिकाण हवे होते आणि दुसरे म्हणजे अनुचे घर त्याच एरियात होते. अशोकने जो अनुचा पत्ता दिला होता तो त्याच भागातला होता. ज्या भागात माझे काका राहत होते.
मी घरी गेलो तेव्हा काका कामावर गेले होते. काकू घरीच होत्या त्यांनी माझे स्वागत केले. चहा झाला. मग त्यांनी येण्याचे कारण मला विचारले तेव्हा मी अनुचा पत्ता त्यांना दाखविला. तो वाचल्यावर ते ठिकाण इथूनच अगदीच जवळ असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांना सोबत येण्याचा आग्रह केल्यावर त्यांनी तो टाळला नाही. त्या माझ्यासोबत येण्यासाठी तयार झाल्या. आम्ही ताबडतोब तिकडे जाण्यासाठी निघालो. आता अनुची आणि माझी भेट अगदी काही मिनिटांवर येऊन ठेपली होती होती. मी तिला भेटण्यासाठी खूप आतुर झालो होतो. माझ्या हालचालीवरून काकूंनी ते बरोबर ओळखले. ” का रे? मुलगी तुझ्या ओळखीची आहे? “
” नाही. ”
” प्रेम वगैरे असेल तर तसे सांग. “
” तसं काही नाही काकू, माझ्या मित्राने सुचवलंय, आणि त्याने खूप आग्रह केलाय म्हणून आलोय. बहुतेक मुलगी सुद्धा चांगली आणि माझ्या इतकीच शिकलेली आहे आणि नोकरीला सुद्धा आहे. ”
” आपल्या जातीतली आहे? ”
” हो, म्हणजे काय? ” म्हणून तर पहायला आलोय ना. ”
माझ्या हातातला पत्ता आणि अशोकने सांगितलेल्या खाणा-खुणा यावरून तिच्या वडिलांचे नाव विचारत -विचारत आम्ही अखेर अनुच्या घरी पोहोचलो. माझ्या काळजाची धडधड त्यावेळी दृतगतीने धावत होती.
आम्हाला समोर पाहताच तिच्या वडिलांनी आमचे हासून स्वागत केले. ते गृहस्थ बहुतेक माझ्या काकूंना ओळखत असावे असे प्रथमदर्शनी वाटले. माझे डोळे मात्र अनुला शोधात होते. तिला पाहण्यासाठी ते आतूर झाले होते. आता काही क्षणांचीच प्रतीक्षा केवळ उरली होती.
काकूंनी लागलीच माझी ओळख करून दिली. मग थोड्या इकडच्या तिकडच्या म्हणजे एकमेकांच्या ओळखीच्या, त्या एरियातल्या गप्पा झाल्या. थोडे स्थिरस्थावर झालेय असे लक्षात येताच काकूंनी विषयाला हात घालत त्या गृहस्थांना म्हणाल्या, ” मुली घरात दिसत नाहीत?”
” हो, तशा बाहेर म्हणजे गेल्यात म्हणजे ?मोठ्या मुलीचं लग्न झालेय ना मागच्या वर्षी आणि छोटी मुलगी बाहेर गेलीय मैत्रिणीकडे. येईलच ती एवढ्यात. ” अनुच्या वडिलांनी एका दमात सगळे सांगितले. अनु बाहेर गेलीय म्हटल्यावर माझी थोडी थोडी निराशा होणे स्वाभाविक होते. अरे यार इतकं पण नशीब खोटं असू नये म्हणून मला स्वतःचीच कीव येत होती. परंतू ती लवकरच येणार आहे म्हटल्यावर मला थोडे हायसे वाटले.
अनुचे वडील चांगले सुशिक्षित गृहस्थ दिसत होते. बोलायला एकदम फर्डा वाटत होते.
वातावरण अनुकूल झाल्याचे लक्षात येताच काकूंनी लगेच मूळ मुद्दा पुढे केला, ” हो, आम्ही तिला पाहण्यासाठीच आलोय. तिचं काही कुठे ठरलं वगैरे तर नाही ना?…. ”
“छे, छे अजूनतरी नाही. पण शोध मोहीम म्हणाल तर ती सुरु केली आहे. ” त्यांचे ते उत्तर ऐकून माझे कान जणू तृप्त झाले होते. सगळेकाही अनुकूल घडत होते. मला छान वाटत होते. अनु लवकर ये बाई असे माझे मन आतून म्हणत होते.
” ताई, आपल्याला माहित नसेल तर एक गोष्ट आधीच क्लिअर करतो ते म्हणजे आमच्या मोठ्या मुलीने इंटरकास्ट मॅरेज केले आहे. तुम्हालाही ते मंजूर आहे काय? व तुमचाही तसाच विचार आहे काय?म्हणजे तसे जमेल काय? तसे असेल तर ठिक. आपण बोलणी सुरु करू शकतो. ”
जमेल काय?अशा त्या गृहस्थांच्या गुगलीने मी संभ्रमात पडलो होतो. त्याची उकल मला होत नव्हती.
परंतू ती गुगली न कळल्यामुळे काकू लगेच, ” हो ” म्हणाल्या.
“अहो हल्ली चालते सगळीकडेच आणि तुम्हाला चालते म्हटल्यावर आम्हाला काही हरकत नाही. त्या तुमच्या मोठया मुलीच्या इंटरकास्ट मॅरेजशी आम्हाला काही देणेघेणे नाही. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. “
” नाही नाही ताई, जे सत्य आहे ते तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे. ” ते गृहस्थ अतिशय नम्रपणे म्हणाले.
मी मान डोलवत ” हो ” असे म्हणत त्यांच्या हो त हो मिसळला. कारण मला लग्न अनुशी करायची होते.
” तुम्हाला आंतरजातीय विवाह चालेल का? ” असा थेट सवाल त्यांनी आम्हाला केला. तेव्हा मग मी पटकन म्हणालो, ” ते कसं शक्य आहे?आणि आम्हाला इंटरकास्ट मॅरेज करायची गरजच काय? ”
” अहो, आमच्या मुलाचे काही लव्हमॅरेज नाही. तुमच्या मुलीची आणि त्याची अजून ओळख सुद्धा नाही. आम्ही तुमच्या मुलीला रितसर मागणी घालायला आलो आहोत.
” काकू पटकन पुढे म्हणाल्या.
” म्हणजे ताई, तुम्ही आम्हाला ओळखलेले दिसत नाही? ” अनुचे वडील पटकन म्हणाले. “
” अहो, ओळखते ना आपण किती वर्षे झाले एकाच एरियात राहतोय. माझे मिस्टर ओळखतही असतील तुम्हाला. ”
” अहो तेच सांगतोय तुम्हाला, तुमच्या मिस्टरांना ओळखतो मी, म्हणूनच तर म्हणतोय की आपली कॅटेगरी एक आहे पण आपली जात एक नाही… ”
” काय सांगता?”
” हो ना, माझ्या ते आधीच लक्षात आले परंतू तुमच्या लक्षात येत नसल्याने मला हे सगळं सांगावं लागलं. ताई, आपली जात वेग वेगळी आहे. परंतू तुम्हाला चालत असेल तर आम्हाला काही फरक पडत नाही. तुमचा मुलगा छान आहे. आमची काही हरकत नाही. ” त्यांचे ते शब्द ऐकताच माझा चेहरा एकदम खरखर उतरला…
अशोकच्या सांगण्यावरून मला अनु खूप आवडली होती. कदाचित आमचे आपोआप प्रेम संबंध जुळले असते तर मी जातीचा विचार न करता बिनधास्तपणे अनुशी आंतरजातीय विवाह केला असता. तिथे जातीचा प्रश्न आलाच नसता. परंतू एका अनोळखी मुलीशी ऍरेंज मॅरेज आणि तेही इंटरकास्ट? ते कदापि शक्य नव्हते. खरे सांगायचं तर काही केल्या जातीची चौकट मोडायला माझेही मन त्यावेळी तयार होत नव्हते….
अजून कशातच काही नाही. अनुची भेट अजून व्हायची आहे तेव्हा ती येण्याअगोदर इथून आपण निघालेले बरे. असे ठरवून आम्ही उठलो आणि त्या तिच्या घराच्या चौकटीतून जातीची चौकट अबाधित ठेवून आम्ही तिच्या वडिलांना हात जोडून बाहेर पडलो…!
— समाप्त —
© प्रा. विजय काकडे
बारामती.
मो. 9657262229
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈