सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
जीवनरंग
☆ देणं… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆
“शरूवहिनी कालची पुरणपोळी सुरेख झाली होती.. हि डिश घ्या, आईने भाजी दिली आहे… ” डिश देऊन तो ऑफिसला पळाला देखील,..
ती जाळीच दार लावून आत वळाली तेवढ्यात सावी, “एक मिनीट वहिनी” म्हणत धावत पळत दारावर हजर झाली,.. “हि चावी ठेवा ना प्लिज. मला आज उशीर होईल आणि रवी जाताना चावी विसरून गेला आहे.. ” जाळीतूनच चावी तिने हातावर ठेवली आणि “हो” वळत लाजत वहिनीला म्हणाली, “कालच्या मोगऱ्याच्या गजऱ्याबद्दल खरंच थँक्स,… खुप प्रसन्न वाटलं त्यामुळे मला… ” एवढं बोलून ती निघून गेली.
हि परत जाळीचं दार लावत गॅसकडे धावली. चहाचं आधण उकळून गेलं होतं. तिने पटकन दूध घातलं आणि दोन कपात ओतुन आपल्या मैत्रिणीसमोर ट्रे पकडला. काल पासुन कामानिमित्त आलेली तिची मैत्रीण श्रिया हे सगळं न्याहाळत होती.
खरंतर ‘शरू किती चिडकी, एकटी राहणारी आणि घुमी होती, आणि आजची शरू… ‘ असा विचार श्रिया करतच होती तेवढ्यात परत हाक आली.. “अगं शरू, तेवढी चार जास्वंदीची फुलं देतेस का आणून बागेतून ? मीच गेले असते गं, पण मला मेलीला घंटा जाईल पायऱ्या चढ उतर करण्यात… “
शरूने पटकन चहाचा घोट घेतला आणि श्रियाला म्हणाली, “दोन मिनिटं हं श्रिया,.. ” तिने आजीला दार उघडून आत घेतलं. आजीच्या हातातली परडी घेतली आणि आजीला बसवून ती खाली पळाली,..
आजीने श्रियाची चौकशी केली आणि शरूचं कौतुक सुरू केलं… “शरू अपार्टमेंटमध्ये आली आणि आमचा सगळ्यांचा आधार झाली आहे गं,.. फार गुणी आहे,.. “
तेवढ्यात टपोरे लाल, पिवळे जास्वंद आणि दुसऱ्या परडीत पांढरा शुभ्र मोगरा घेऊन शरू आली. पानांसह असलेलं फुल तिने आजीच्या अंबाड्यात खोचलं आणि म्हणाली, “आजी लक्षात आहे ना.. “
आजी हसत म्हणाली, “हो हो हो, नाही काढत मुलाची आठवण, आणि नाही रडत दिवसभर. तुझं हे फुलं सांगत मला.. त्याचं काम सुगन्ध देणं तसंच आपलं आनंदाने जगणं… घटना घडल्या, आता आहे ते आयुष्य स्वीकारून आनंदी रहाणं…. मुख्य म्हणजे आपलं कर्तव्य करत राहणं…
बरं का श्रिया, माझा मुलगा अपघातात गेला तेंव्हा मी रडून रडून वेडी झाले होते.. शरू ने सावरलं.. म्हणाली, ‘रडत बसण्यापेक्षा आपल्याकडून समाजाला काय देता येतं का ते बघा… ‘ म्हंटल ‘मी म्हातारी आता कुठे घराबाहेर पडून समाजकार्य करणार,.. ‘ तर म्हणाली ‘मग घरात बसुन करा… ‘.
माझ्या वाती तिला आवडतात त्या करून घेते…. वॉचमनच्या बायकोला पाठवते. ती बंडल करून पॅकिंग करून विकते. चार पैसे तिला सुटतात…. इनडायरेक्ट समाजसेवा तिने मला शिकवली आणि मला वेड्याच्या इस्पितळात जाण्यापासुन वाचवलं,.. “
शरू म्हणाली, “आजी, देव खोळंबले आहेत तिकडे आणि आजोबा पण वाट बघतील,… “
“हो हो” म्हणत आजी गेली….
शरू हसत श्रियासमोर मोगऱ्याच्या वेण्या करत बसली. पटकन एक वेणी करून तिने श्रियासमोर धरली. श्रियाचे डोळे पाणावले. तिने पटकन शरूला जवळ घेतलं. “किती बदललीस गं…. “
शरू म्हणाली, “हो, आयुष्यातल्या अनुभवाने बदलले. नवरा कॅन्सरने गेला… त्याक्षणी शेवटच्या काळात ह्या अपार्टमेंटच्या लोकांनी जी मदत केली त्या मदतीचा धागा पकडून जगायला शिकले… खरंतर आधी शून्य झाले होते…. पण एक दिवस कुंडीतल्या मोगऱ्याच्या छोटयाशा फुलाने घर दरवळून टाकलं होतं,.. वाटलं क्षणभर मिळालेल्या आयुष्याची दरवळ करणारी हि चिमणी फुलं बघा आणि आपण बसलोय दुःख कुरवाळत,..
मग रडणं सोडलं,.. ज्यांनी कठीण काळात मदत केली त्यांचं देणं लागतो आपण ह्याची जाणीव मनात निर्माण केली आणि मदतीचा हात प्रत्येकासाठी पुढं केला… ऋणानुबंध वाढत गेले,.. आपण आधार होऊ शकतो हे कळलं.. ह्या फुलांनी ते शिकवलं… आजींना तर तू ऐकलं, नवरा गेल्यावर किती तरी दिवस मला रात्री सोबत करायला आल्या…. माझं एकटेपण त्यांनी वाटून घेतलं गं,..
मघाशी ती सावी गेली ती आता मोनोपॉज च्या खेळात त्रस्त असते…. तिला रोज असा गजरा दिला कि थोडी स्थिरावते…. सुगंध थेरपी तिच्यावर काम करते… माझ्या नवऱ्याच्या केमो थेरपीच्या वेळी तिच डबे पुरवत होती गं हॉस्पिटलमध्ये… तिचं देणं असं फिटतंय…
आणि तो पुरणपोळी विषयी कौतुक करणारा… त्याने तर नवऱ्याच्या शेवटच्या विधीचं सगळं बघितलं… अगदी डेथ सर्टिफिकेट आणून पेन्शन नावे करेपर्यंत…. कुठलंही नातं नसताना हि माणसं माझ्या जगण्यात जर मला काही देतात तर माझंही देणं लागतं ना… ह्या फुलांनी मला ते देणं शिकवलं… दरवळून टाकायचं दुसऱ्याचं आयुष्य…”
श्रियाने पदराने डोळे पुसले. शरूची पाठ थोपटली,.. “तुझ्या ह्या पद्धतीच्या जगण्याने मलाही फार काही दिलंस तू,.. मला वाटलं होतं तू अगदी एकाकी, खिन्न, उदास आयुष्य जगत असशील. पण नाही शरू, तू तर ह्या मोगऱ्यासारखी दरवळत आहेस… आणि तुझ्या विचारांनी आम्हालाही सुगंधी करत आहेस,.. खरंच ग देणं कळलं तर जगणं कळलं…. “
मोगऱ्याची दरवळ खोलीभर पसरली होती,.. डोळ्यातल्या अश्रूंचीही दोघींना फुलेच दिसत होती…
© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
मो +91 93252 63233
औरंगाबाद
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈