श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ उधारी… भाग- १ ☆ श्री दीपक तांबोळी

 एका पेशंटच्या दाढेची ट्रिटमेंट झाल्यावर सुबोधने दुसऱ्या पेशंटला खुर्चीत बसायला सांगितलं.त्याच्या दाढांचं तो निरीक्षण करीत असतांनाच रिसेप्शनिस्ट काचेचा दरवाजा ढकलून आत आली.

” सर ते मनोहर पाटील नावाचे पेशंट आहेत ना,ते म्हणताहेत की आता त्यांच्याकडे फक्त एक हजार आहेत.बाकीचे दोन हजार पुढच्या आठवड्यात आणून देणार म्हणताहेत”

सुबोधला याच गोष्टीची चिड होती.कपड्यांवरुन तर पेशंट चांगला सधन दिसत होता.शिवाय तो नेहमी कारने येतो हेही त्यानं पाहिलं होतं.बरं त्यांना अगोदरच तीन हजार खर्च येणार असल्याची कल्पना दिली होती.तरी सुध्दा त्यांनी पैसे आणू नयेत याचा त्याला संताप आला.प्राॅब्लेम हा होता की तिथं जमलेल्या पेशंटच्या गर्दीसमोर असं त्यांना संतापून बोलणंही त्याच्याबद्दल पेशंटच्या मनात असणाऱ्या प्रतिमेला छेद देणारं होतं.त्याने नरमाईने घ्यायचं ठरवलं.

“ठिक आहे.त्यांचा मोबाईल नंबर लिहून घे आणि त्यांना सांग पुढच्या आठवड्यात नक्की आणून द्या”

रिसेप्शनिस्ट गेली.तो आपल्या कामाला लागला पण मनातली ती खदखद काही कमी होईना.

खरं पहाता तो शहरातला सगळ्यात यशस्वी दंतवैद्य होता.गरीबीची जाण असल्यामुळे त्याने आपली फी माफक ठेवली होती.कामात तर तो निष्णात होताच.वर मिठास बोलणं.त्यामुळे तो सर्वांना डाॅक्टरपेक्षा आपला मित्रच वाटायचा.अर्थातच त्याचा दवाखाना कायम पेशंटने तुडूंब भरलेला असायचा.सकाळी नऊ पासून ते रात्री दहापर्यंत त्याचं काम चालायचं.महिन्याला दहा लाखाच्या आसपास त्याची कमाई होती.लोकांनी त्याची उधारी बुडवली नसती तर हीच कमाई अकरा बारा लाखापर्यंत गेली असती.

दुपारी दोन वाजता त्याने काम थांबवलं.त्याला आणि स्टाफलाही भुक लागली होती.पंधरा मिनिटात त्याने जेवण संपवलं कारण बाहेर पेशंट ताटकळत बसले होते.बेसिनमध्ये हात धुत असतांनाच मोबाईल वाजला.हात कोरडे करुन त्याने तो घेतला.

“हॅलो सुबोध मी चंदन बोलतोय.फ्री आहेस ना? जरा बोलायचं होतं”पलीकडून आवाज आला

” आताच जेवून हात पुसतोय बघ.बोल काय म्हणतोस?”

” अरे जरा घराचं काम सुरु केलंय.दोनतीन लाखाची मदत केलीस तर बरं होईल”

” चंदन यार,मी तुझ्या पाया पडतो.तू दुसरं काहीही माग.माझ्या घरी सहकुटुंब रहायला ये.खाणंपिणं सगळं मी करीन.पण प्लीज यार मला पैसे मागू नकोस.तुला सांगतो ज्यांनीज्यांनी माझ्याकडून उधार पैसे नेलेत त्यांनी ते मला कधीच परत केले नाहीत.तीसचाळीस लाख माझे लोकांकडे अडकलेत.पैसे द्यायचं कुणी नावच काढत नाही “सुबोध उसळून म्हणाला

“अरे पण मी तुझा मित्र आहे.तुझे पैसे बुडवेन असं तुला वाटलंच कसं?”

” मित्र?अरे बाबा मित्र तर मित्र माझे भाऊ,बहिणी,मेव्हणे,काका,मामा ,सासरे सगळ्यांना पैसे देऊन बसलोय.एक रुपयाही  मला परत मिळालेला नाही. मिळालं ते फक्त टेंशन,मनस्ताप आणि शिव्या.पैसे मागितले तर म्हणतात ‘ तुम्हांला काय कमी आहे ,पैसा धो धो वाहतोय.पैसे देणारच आहोत ,बुडवणार थोडीच आहे! ‘. तुला जर वाटत असेल की आपली मैत्री कायम रहावी तर प्लीज मला पैसे मागू नकोस.हा पैसा सगळे संबंध खराब करतो बघ”

समोरुन फोन कट झाला. तो रागानेच कट केला असणार हे त्याच्या लक्षात आलं.त्याने परत आपलं काम सुरु केलं पण त्याच्या मनातून तो विषय जाईना.

उधारीचे पैसे परत का मिळत नाही हे विचारायला मागे तो एका ज्योतिष्याकडे गेला होता.ज्योतिषाने त्यांची कुंडली पहाताच त्याला सांगितलं

” दुसरं काही सांगण्याच्या आत एक गोष्ट सांगतो.तुम्ही कुणालाही उधार पैसे देऊ नका.उधारीचे पैसे तुम्हांला कधीही परत मिळणार नाहीत. तुमचे भाऊबहिण, साले,मेव्हणे,जवळचे नातेवाईक,मित्र सगळेच तुमचे पैसे बुडवतील.तसंच कुणालाही जामीन राहू नका त्यातही तुम्हीच फसाल.तुमच्या कुंडलीतले योगच तसे आहेत”

” याला काही उपाय?”त्याने विचारलं होतं.ज्योतिषाने नकारार्थी मान हलवली.

“उपायापेक्षा बचाव केव्हाही चांगला.कोणी कितीही कळकळीने पैसे मागितले तरी द्यायचे नाहीत.संबंध खराब झाले तरी चालतील कारण पैसे देऊनही संबंध खराबच होणार आहेत.किंवा मग पैसे द्यायचे आणि ते दिले आहेत हेच विसरुन जायचं म्हणजे टेंशनचं कामच नाही.तुमच्या नशिबात पैसा भरपूर आहे.तेव्हा पैसा बुडाल्यामुळे तुम्हांला फारसं जाणवणार नाही.”

ही गोष्ट खरी होती.त्याच्याकडे पैसा येतांना दिसत होता म्हणून तर लोक मागत होते आणि तो बुडवल्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही म्हणून निर्लज्जपणे बुडवत होते.तेव्हापासून त्याने पैसे उधार देणं बंद केलं होतं.पण दवाखान्यातली उधारी त्याला काही बंद करता आली नाही.

रविवार उजाडला.खरं तर रविवारीही त्याचा दवाखाना बंद नसायचा.असिस्टंट डाॅक्टर्स काम करत असायचे.सुबोधही एखाद दुसरी चक्कर टाकायचा.आज मात्र त्याला साठ किलोमीटरवरच्या एका खेड्यातल्या लग्नाला जायचं होतं म्हणून तो दवाखान्यात जाणार नव्हता.खेड्यातली लग्नं विशेष म्हणजे त्यातलं जमीनीवर बसून केलेलं जेवण त्याला फार आवडायचं.लहानपणीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या व्हायच्या.देशविदेशात अनेक महागड्या हाॅटेल्समध्ये तो जेवला होता पण या गावातल्या जेवणातली तृप्ती त्याला कधीही तिथं मिळाली नव्हती.

लग्न आणि लग्नातलं जेवण आटोपून तो आपल्या आलिशान कारमधून घरी परतायला निघाला.त्याच्या शहरापासून साधारण पंचवीस किमी.अंतरावर असतांना त्याला दुरुनच एक माणूस येणाऱ्या वाहनांना थांबवण्यासाठी हात देतांना दिसला.पण वाहनं न थांबता त्याला वळसा घालून जात होती.जसा सुबोध त्याच्याजवळ आला त्याला दिसलं की रस्त्यावर त्या माणसाशेजारीच एक बाईक आणि माणूसही पडला आहे.सुबोधला रहावलं नाही त्याने त्याच्याजवळ गाडी थांबवली.

“काय झालं?” खिडकीची काच खाली करुन त्याने विचारलं

” दादा ॲक्सीडंट झालाय.पोराला दवाखान्यात न्यावं लागीन “

वयाची सत्तरी उलटलेला तो म्हातारा सांगू लागला

“एक मिनीट थांबा” त्याने गाडी साईडला घेतली

“अहो कशाला या भानगडीत पडता.आठवड्यातून एक  रविवार मिळतो तर घरी चलून आराम करा ना” बायको त्राग्याने म्हणाली.

तिच्याकडे दुर्लक्ष करुन तो खाली उतरला आणि म्हाताऱ्याकडे गेला.

“कसं आणि केव्हा झालं हे?”

“दादा म्या आणि पोरगा गावाकडे जात होतो.ट्रकवाल्याने मागून धडक मारली आणि पळून गेला.म्या झाडीत फेकल्या गेलो म्हुन मले काही झालं नाई पण पोराच्या अंगावरुन ट्रक गेला” म्हातारा आता रडू लागला.सुबोधने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाकडे नजर टाकली.बापरे!प्रकरण गंभीर दिसत होतं.तो पटकन खाली वाकला.आणि त्याची नाडी तपासली.नाडी सुरु होती.पटकन ॲक्शन घेतली तर वाचूही शकला असता.त्याने उठून म्हाताऱ्याकडे पाहिलं.तो हात जोडून उभा होता.डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

“दादा अर्ध्या तासापासून गाड्यांना हात देऊ लागलो.कुणीबी थांबत नाही.पोराला दवाखान्यात घेऊन चला दादा तुमचे लई उपकार होतीन “

सुबोधने क्षणभर विचार केला.मग त्याने झटकन चेंदामेंदा झालेल्या खटारा बाईकला रस्त्याच्या बाजुला टाकलं.मग म्हाताऱ्याच्या मदतीने त्याने त्याच्या पोराला गाडीच्या मागच्या सीटवर टाकलं.त्याच्या शेजारीच म्हाताऱ्याला बसवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून त्याने गाडी सुसाट सोडली.गाडी चालवतच त्याने मोबाईल काढला.शहरात ॲक्सीडंट हाॅस्पिटल असलेल्या डाॅक्टर मित्राला त्याने फोन लावला.

“शेखर सुबोध बोलतोय.इमर्जन्सी केस आहे.दवाखान्याबाहेर स्ट्रेचर तयार ठेव.ओ.टी. तयार ठेव.मी ब्लडबँकेला रक्त तयार ठेवायला सांगतो.पंधरावीस बाटल्या रक्त लागणार आहे.मी वीस पंचवीस मिनिटात पेशंटला घेऊन पोहोचतोय”

” सुबोध अरे आज रविवार आहे आणि ॲक्सिडंटची केस असेल तर पोलिसांना…”

” मी करतो सगळं मॅनेज.तू फक्त तयार रहा.आणि तुझ्यासारखाच माझाही रविवार आहे.सो प्लीज बी फास्ट.माझ्या जवळच्या नातेवाईकाची केस आहे असं समज”

याच शेखरला सुबोधने हाॅस्पिटलच्या उभारणीसाठी पाच लाख उधार दिले होते.शेखरने त्याला फक्त दोन लाख परत केले होते.पण या उधारीवर बोलण्याची ही वेळ नाही याची जाणीव सुबोधला होती.

शेखर दिलेल्या शब्दाला जागला.त्याने खरोखरच सगळी तयारी करुन ठेवली होती.त्या म्हाताऱ्याला बाहेरच बसवून त्याच्या पोराला ऑपरेशन थिएटरमध्ये तो घेऊन गेला.रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्यामुळे ब्लड ग्रुप तपासून त्याने रक्ताच्या बाटल्या मागवल्या.सुदैवाने ब्लड बँंकेत ओ पाॅझिटिव्हचा भरपूर साठा होता. एक्सरेतून कमरेचं ,खांद्याचं,उजव्या पायाचं हाड तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं.तिन्ही ठिकाणी ऑपरेशनची गरज होती.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments