श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ उधारी… भाग- २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
(एक्सरेतून कमरेचं, खांद्याचं, उजव्या पायाचं हाड तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिन्ही ठिकाणी ऑपरेशनची गरज होती..) इथून पुढे –
शेखर दिलेल्या शब्दाला जागला. त्याने खरोखरच सगळी तयारी करुन ठेवली होती. त्या म्हाताऱ्याला बाहेरच बसवून त्याच्या पोराला ऑपरेशन थिएटरमध्ये तो घेऊन गेला. रक्तदाब झपाट्याने कमी होत असल्यामुळे ब्लड ग्रुप तपासून त्याने रक्ताच्या बाटल्या मागवल्या. सुदैवाने ब्लड बँंकेत ओ पाॅझिटिव्हचा भरपूर साठा होता. एक्सरेतून कमरेचं, खांद्याचं, उजव्या पायाचं हाड तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिन्ही ठिकाणी ऑपरेशनची गरज होती.
तातडीने हालचाल केल्यामुळे पेशंट धोक्याबाहेर असल्याचं थोड्यावेळाने सुबोधला शेखरने सांगितलं तेव्हा सुबोधला एकदम हायसं वाटलं. त्याने बाहेर येऊन म्हाताऱ्याला सांगितलं तेव्हा म्हातारा त्याच्या पाया पडू लागला. सुबोधने लगेच त्याचे हात धरले.
” देवाचे आभार माना काका, त्यानेच तुमच्या मुलाला वाचवलं. बरं घरी कळवलं की नाही?”
” दादा पोराकडेच मोबाईल व्हता तोबी तुटी गेला. कसं कळवू?”
“अरे बापरे!मग आता?”
म्हाताऱ्याने खिशातून एक छोटी मळकट डायरी काढली. त्याच्यातून छोटू या नावाचा नंबर त्याने सुबोधला दाखवला.
” याले फोन करा”
“हे कोण?”
“धाकला पोरगा हाये”
“ओके” सुबोधने स्वतःच्या मोबाईलवरुन तो फोन डायल केला. अपघाताची तीव्रता त्याने सौम्य भाषेत सांगितली. ‘काळजी करु नका’ असं तीनतीनवेळा सांगितलं.
” दादा किती दिवस लागतीन आणि किती पैसे लागतीन हो?”
म्हाताऱ्याने विचारलं. त्याच्या प्रश्नातल्या काळजीने सुबोधचं काळीज हललं. म्हाताऱ्याची काळजी खरंच समजण्यासारखी होती. आजकाल डाॅक्टरकडे पेशंटला ॲडमिट करणं म्हणजे कसायाच्या हातात बकरी सोपवण्यासारखं होतं. आपण डाॅक्टर असल्यामुळे शेखरने अजून पैशाची मागणी केलेली नाही नाहीतर रक्ताची बाटली लावण्यापुर्वीच शेखरने पन्नाससाठ हजार जमा करायला लावले असते हे काय तो जाणत नव्हता?
“काका डाॅक्टरांनी अजून तरी काही सांगितलं नाहिये पण महिनाभर तरी तुमच्या मुलाला इथं रहावं लागेल हे नक्की. पैशाचं मी विचारुन सांगतो. डाॅक्टरसाहेब माझे मित्र आहेत. तुमच्या घरची मंडळी येईस्तोवर तुम्हांला कुणी पैसे मागणार नाहीत. पण घरच्यांना पन्नाससाठ हजार तरी आणायला सांगा”
म्हाताऱ्याचा चेहरा काळवंडला. त्याने सुबोधला परत फोन लावायला सांगितला. मग तो बाहेर जाऊन आपल्या मुलाशी बोलत बसला. सुबोधचं एकदम आपल्या बायकोकडे लक्ष गेलं. ती रागाने त्याच्याचकडे पहात होती.
” अजून संपलंच नाही का?अहो संध्याकाळ झालीये. पोरं आपली वाट पहाताहेत. झालं ना?. पार पाडलं ना तुम्ही तुमचं कर्तव्य? आता तरी चला” ती वैतागून म्हणाली. तिचंही म्हणणं योग्यच होतं. ती स्वतः फिजीओथेरपिस्ट होती. सुबोध इतकी तिची प्रॅक्टिस नसली तरी तिलाही फुरसत रविवारीच मिळायची.
” साॅरी साॅरी. बस एकच मिनिट हं शमा. शेखरला मी सांगून येतो”
तो आत गेला. शेखरकडून अपडेट्स घेऊन आणि गरज भासल्यास बोलवायचं सांगून तो बाहेर आला. म्हाताऱ्याला आपलं कार्ड देऊन म्हणाला” काका मला आता अर्जंटली घरी जायचंय. हे माझं कार्ड असू द्या. काही गरज लागली तर मला फोन करा. तुमची मंडळी येतीलच थोड्या वेळात”
म्हाताऱ्याने हात जोडले. सुबोध बायकोला घेऊन निघाला.
“गाडी बघितली का?मागचं सीट आणि दारं रक्ताने भरलीत. तुम्हालाच काहो इतकी उठाठेव असते?जणू माणुसकी फक्त तुमच्यातच उरलीये”
ती नाराजीच्या सुरात म्हणाली. तो फक्त हसला. तिच्याशी वाद घालायची त्याची इच्छा नव्हती
” आणि काहो या शेखरलाच तुम्ही पाच लाख दिले होते ना?दिले का त्याने ते परत?”
” दोन लाख दिलेत. तीन बाकी आहेत. देईल लवकरच बाकीचे ”
” आता तुमचं येणं होईलच. मागून घ्या सगळे. काय बाई लोक असतात. सात आठ वर्षांपूर्वी घेतलेले पैसे अजून परत करत नाही माणूस”
‘तुझ्या भावानेही तर सात लाख नेलेत. एक रुपया तरी परत केला का?’असं विचारायचं त्याच्या अगदी ओठावर आलं होतं पण तो चुप बसला. शेवटी भाऊ आणि मित्रात फरक असतोच ना?
या घटनेनंतर सुबोध परत आपल्या दवाखान्यात व्यस्त होऊन गेला. दहाबारा दिवसांनी त्याला शेखरचा फोन आला
” सुबोध तू आणलेला तो ॲक्सीडंट झालेला पेशंट, शामराव पाटील, अरे त्याचं ऑपरेशन करायचंय पण त्याचे नातेवाईक पैसे संपले असं म्हणताहेत. काय करु?”
” त्यांनी काहीच पैसे दिले नाहीत का?”
“एक लाख दिलेत पण एक लाखात काय होतंय?तीन ऑपरेशन्स होती त्याची त्यातलं कमरेच्या हाडाचं केलं मी. हाताचं आणि पायाचं बाकी आहे. मेडिकल इंश्युरंसदेखील नाहीये त्यांचा”
एक क्षण सुबोधला वाटलं, झटकून टाकावी जबाबदारी. माणुसकीखातर आपण त्या माणसाला दवाखान्यात पोहचवलं. पैशाचं मॅटर शेखरने पहावं, आपला काय संबंध?’नसेल देत पैसे तर हाकलून दे दवाखान्याबाहेर’ असं त्याला सांगावं. पण तो असं करु शकणार नव्हता. नव्हे त्याचा तो स्वभावच नव्हता म्हणूनच तर लोकं त्याला आजपर्यंत फसवत आले होते.
” साधारण किती पैसे लागतील शेखर पुर्ण ट्रिटमेंट, रुमचं भाडं, मेडिसीन्स वगैरेला?”
“अडिच लाखाच्या आसपास”
“ठिक आहे तू कर ऑपरेशन. बाकीच्या दिड लाखाचं काय करायचं ते बघतो मी ” तो मनाविरुद्ध बोलून गेला. मग त्याने रिसेप्शनिस्टला बोलावून सांगितलं
” ज्या ज्या पेशंटकडे पैसे बाकी असतील त्यांना फोन कर आणि बाकी लवकरात लवकर पे करायला सांग”
रात्री तो दवाखाना बंद करुन घरी गेला. ज्या ज्या लोकांना त्यानं पैसे उधार दिले होते त्यांची लिस्ट केली. मग बायकोच्या नातेवाईकांना सोडून सगळ्यांना फोन लावायला सुरुवात केली. मृत्युच्या दाढेत असलेल्या एका मित्राच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचं सांगून ताबडतोब पैसे देण्याची विनंती केली. पण कुणालाच त्याच्या मित्राच्या जीवाशी देणंघेणं नव्हतं. सगळेच पैसे न देण्याचे बहाणे सांगत होते. त्याच्याच पैशासाठी त्याला भीक मागावी लागत होती आणि घेणारे त्याला खेळवत होते. थकून त्याने फोन ठेवला. ज्या लोकांना दुसऱ्याच्या प्राणांचीही पर्वा नाही त्यांच्या अनावश्यक गरजांसाठी आपण उसने पैसे द्यावेत याचा त्याला भयंकर संताप आला. स्वतःला शिव्या देतच तो झोपायला गेला.
दुसऱ्या दिवशी परत शेखरचा फोन आला. त्याला काय उत्तर द्यावं या विचारात असतांनाच त्याला एक कल्पना सुचली. फोन उचलून तो म्हणाला
“शेखर असं कर ना, तुझ्याकडे माझे तीन लाख बाकी आहेत. त्यातले दिड लाख तू वापरुन घे. दिड लाख तू मला पुढच्या वर्षी दिले तरी चालतील”
पलीकडे एकदम शांतता पसरली. मग क्षणभराने शेखर म्हणाला
” ते पैसे नंतर दिले असते मी सुबोध. तुला तर माहितच आहे माझ्या आसपास बरेच ॲक्सीडंट हाॅस्पिटल्स आहेत त्यामुळे माझी कमाई काही तुझ्याइतकी नाही आणि ओळखपाळख नसलेल्या लोकांसाठी तू तरी का स्वतःचे पैसे वाया घालवतोय?करतील ते त्यांचं कसंही. तुला वाटतं का ते तुला पैसे परत करतील म्हणून?”
” मग तू मला फोनच का केला?हाकलून द्यायचं असतं त्यांना. झक मारुन आणले असते त्यांनी पैसे”
सुबोध चिडून म्हंटला तशी शेखरची बोलती बंद झाली. मग सुबोधच नरमाईच्या सुरात म्हणाला
” हे बघ शेखर सात आठ वर्ष झालीत तुला पैसे देऊन. मी कधी तुला बोललो?कधी तुला पैसे मागितले?आताही मी तुला तीन लाख मागत नाहीये. शामरावसाठी जे वरचे दिड लाख अजून लागताहेत तेच फक्त मी तुला मागतोय”
शेखरने लवकर उत्तर दिलं नाही. मग म्हणाला
“ठिक आहे करतो मी ॲडजस्ट. पण मला दोन वर्षतरी पैसे मागू नकोस”
“ओके. डन. आणि तुला सांगू का शेखर, मला हा परोपकाराचा आणि मदतीचा किडा चावलाय म्हणून मी उठसुठ कुणालाही मदत करत असतो. काय करु स्वभावच आहे माझा. कुणाचं दुःख पहावल्या जात नाही माझ्याकडून. नाही तर तुला एका फटक्यात पाच लाख कशाला काढून दिले असते मी?”
ही मात्रा बरोबर लागू होणार होती. शेखर शब्दही काढू शकला नाही.
एक महिन्यानंतर सुबोधला शेखरचा फोन आला. शामराव पाटीलला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होता. शामराव आणि त्याच्या कुटूंबाची सुबोधची भेट घेण्याची इच्छा होती. ‘त्यांना तुझ्या घरी पाठवू की क्लिनिकमध्ये’असं विचारत होता. सुबोधने त्याला तो स्वतः शेखरच्या हाॅस्पिटलमध्ये येत असल्याचं सांगितलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच सुबोध शेखरच्या हाॅस्पिटलमध्ये पोहचला. शामरावच्या हाताला आणि पायाला अजूनही प्लास्टर होतं. त्याच्याभोवती बसलेलं त्याचं कुटुंब सुबोधला पहाताच उठून उभे राहिले. शामरावच्या वडिलांनी हात जोडले तर धाकटा भाऊ पाया पडायला लागला. सुबोधने त्याला उठवलं तर तो रडायला लागला.
— क्रमशः भाग दुसरा
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈