श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ फक्त लढ म्हणा… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
“सर आज करवा चौथ है. शामको घर जल्दी जाना है. ” सतिंदरने माझी परवानगी मागितली. मी त्याला होकार दिला. तो आनंदाने गेला. मला पटकन आठवलं, गेल्या वर्षीचा करवा चौथच माझ्या जीवनाला कलाटणी देणारा दिवस होता. माझ्या डोळ्यांसमोर गेल्या संपूर्ण वर्षभराचा कालपट अलगद उलगडत गेला.
संध्याकाळचे सहा वाजले असतील. अकाऊंट्स हेड, गुप्ता सरांनी मला बोलावलं होतं. मला बसायला सांगितलं आणि हळूच म्हणाले. “सॉरी सुधाकर, तुम्हाला कंपनीचा राजीनामा द्यावा लागेल. नोटीस पिरीयडमध्ये तुमच्या जागी नेमलेल्या व्यक्तिला व्यवस्थित प्रशिक्षित करावं लागेल. ” हे ऐकून मला धक्काच बसला. मी आवंढा गिळत म्हणालो, “सर माझी काही चूक झालीय का?”
“सुधाकर, तसं काहीच नाही. यू आर अ जिनियस. आमचं बॅड-लक. आम्ही तुमच्यासारख्या सहकाऱ्याला मिस करतोय. यापेक्षा मी अधिक काही सांगू शकत नाही. आज करवा चौथ आहे. माझी पत्नी वाट पाहत असेल. मला घरी लवकर जायला हवं” असं म्हणून गुप्ताजी पटकन निघून गेले.
मी विमनस्क मन:स्थितीत घरात पाऊल ठेवलं. मला पाहताच सुलभाच्या प्रसन्न चेहऱ्यावरचे भाव पटापट बदलत गेले. तिने काळजीभरल्या सुरात विचारलं, “सुधाकर, काय झालं? आज खूप थकल्यासारखे वाटताय. ऑफिसात काही प्रॉब्लेम झाला का? ट्रॅफिक जाम होतं का?” सुलभा चेहरा आणि आवाजावरून समोरच्या माणसाचा मूड अचूक ओळखते.
“सुलु माझा जॉब गेलाय. उद्या राजीनामा द्यायला सांगितलं आहे. नोटीस पिरीयडमध्ये कामावर जावं लागणार आहे. ” मी धपकन सोफ्यावर कलंडलो. तिनं पाण्याचा ग्लास पुढे केला. घटाघटा पाणी प्यायलो.
ती लगेच म्हणाली, “जाऊ द्या हो. हा जॉब गेला तर दुसरा जॉब मिळेल. आता मी नोकरी करतेय ना? आतापर्यंत केलेल्या बचतीतून फ्लॅटचे हप्ते भरू या. काळजी कशाला करताय?”
सुलभाकडून मी इतक्या शांत प्रतिक्रियेची अपेक्षा केली नव्हती. मला खूप मोठा दिलासा मिळाला. थोड्याच वेळात चहाचा कप हातात देत ती म्हणाली, “अहो, राजे कसलंही टेन्शन घेऊ नका. एक दोन महिन्यात तुम्हाला नक्की नोकरी मिळेल. ”
मी म्हटलं, “सुलु, अग नोकरी लवकर नाही मिळाली तर मी काय करायचं? दिवस कसे काढायचे?”
सुलु खोटं खोटं हसत म्हणाली, “अहो, नोकरी पहिल्यांदा गेलीय का? ही तुमची चौथी नोकरी होती. आता पाचवी मिळेल त्यात काय?”
“अगं, मी आता पन्नाशीला आलोय” मी अगतिकपणे म्हणालो.
माझ्या हातावर थोपटत म्हणाली, “बच्चमजी, पन्नाशीचे झालात म्हणून काय झालं? पंचवीस वर्षाचं अनुभव-धन तुमच्या पाठीशी आहे. घडणाऱ्या प्रत्येक कृतीमागे भगवंताची काहीतरी वेगळी योजना असते. ही नोकरी सुटण्यामागेदेखील काहीतरी चांगलं दडलं असेल.
अचानक नोकरी गेली की कमकुवत मनाचा माणूस ढेपाळतो. ध्येयवेडा माणूस मात्र फिनिक्स पक्ष्यासारखा राखेतून नव्याने जन्म घेऊन उंच भरारी घेतो. मध्यंतरी पिंपरीच्या आयटीएन्सची कंपनीतली नोकरी गेली होती. ते गप्प बसून राहिले होते का? त्यांनी मिळेल ती नोकरी धरली. काहीजण कॅब सर्व्हिस, काहीजण भाज्यांचे मार्केटिंग वगैरे व्यवसाय करायला लागले.
अनैतिक धंदे सोडले तर कुठलाही व्यवसाय करता येतो. इथे कोपऱ्यावर पाणीपुरीचा गाडा लावणारा भय्या माहीताय ना? अहो तो देखील दिवसाकाठी हजार, दोन हजार कमवतो म्हणे. सगळ्यांनीच नोकरी केली तर आपल्या जीभेचे चोचले तरी कोण पुरवणार? कुणाला तरी ते काम करावं लागेलच ना? अर्थात मी तुम्हाला पाणीपुरीचा गाडा लावायला सांगते असं समजू नका. ”
“मग मी काय करावं, अशी तुझी अपेक्षा आहे, ते तरी सांग. सुलु मी घरी बसू शकणार नाही. तुम्ही मायलेकी दोघी कामावर गेल्यावर मला घर खायला उठेल. ” मी काकुळतीने म्हणालो.
“सुधाकर, जीवन ही एक यात्रा आहे. गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या मार्गाने जायचं ते स्वत:च ठरवायचं असतं. मार्गाचा शोध घ्यावा लागतो. दुसरा कुणीच त्याचा नकाशा देत नसतो. काय करायचं हे ठरलं की कसं करायचं हे आपोआप सुचतं. तुम्ही इतके हुशार. अकौंट्समध्ये चॅम्पियन आहात. त्याच क्षेत्रात काहीही करता येईल. एक तर तुम्ही. . . . . . . . ”
ती अखंडपणे बोलत होती. मला आत्मविश्वासाचे डोस पाजत होती. त्यावेळी मला माझ्या आईची आठवण आली.
माझी आई सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असायची. बीकॉम च्या शेवटच्या वर्षात मला टायफॉईड झाला होता. बरेच दिवस पिरीयड्सना जाता आले नव्हते. अभ्यास कसा होईल म्हणून मी चिंताक्रांत झालो होतो. आई मला समजावत म्हणाली, “सुधाकर, तुला काही फरक पडणार नाही रे. मला खात्री आहे. मिळालेल्या वेळेत तू सगळा पोर्शन भरून काढशील. आणि तूच टॉपर होशील. ” अर्थात तिचं म्हणणं खरं ठरविण्यासाठी मलाही जिवाचा आटापिटा करावा लागला होता. तो भाग वेगळा.
करवा चौथचं व्रत उत्तर भारतातल्या स्त्रिया आपल्या पतीच्या योगक्षेमासाठी आणि पति-पत्नी यांच्यातील दृढ नात्याचे, प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून साजरे करतात. आज करवा चौथ असल्याचं सुलभाच्या ध्यानीमनीही नसावं. कसलेही व्रत न करता ती माझ्यावरचे प्रेम आणि दृढ विश्वास अगदी मनापासून प्रकट करत होती.
सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर माझी लेक अनु माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाली, “बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आता मी जॉब करतेय ना? होईल हो सगळं व्यवस्थित. ” नकळत माझ्या डोळ्यांत पाणी तरारलं. सुलभा आणि अनुजाच्या वागणुकीने मला पत्नी आणि कन्या या नात्यांचा खरा अर्थ त्या दिवशी गवसला.
कंपनीने माझ्या जागी एका डायरेक्टरच्या भाच्याला नियुक्त केलं होतं. मी मनात कसलाही आकस न ठेवता, हातचं काहीही राखून न ठेवता त्या तरुणाला अकाऊंट्सची संपूर्ण माहिती दिली. नोटीस पिरीयड संपताच घरी बसलो. अनुजा सकाळी सुलभाला तिच्या शाळेत ड्रॉप करून पुढे ऑफिसला निघून जायची. मी लॅपटॉपवर नोकरीच्या साईट्सवर रिझूमे अपलोड करत बसायचो. पण त्यानंतर काय? एकटं एकटं वाटायचं.
माझ्या पूर्वीच्या कंपनीतले अकाऊंट्स हेड मला रोज एखादी दुसरी जॉबची अॅड पाठवायचे. कधी नव्हे ते, बऱ्याच नातेवाईकांचे फोन यायला लागले. माझी नोकरी गेली आहे, हे त्यांना बहुधा माझ्या तोंडून ऐकायचं असावं. एव्हाना सगळ्या मित्रमंडळीत माझी नोकरी गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈