प्रा. सुनंदा पाटील

अभिनंदन ! अभिनंदन !!

जेष्ठ लेखिका, कवयित्री, गझलकार आणि वक्ता अशी ओळख  असलेल्या आपल्या समूहातील प्रा. सुश्री सुनंदा पाटील यांच्या, ज्येष्ठ नागरिकांवर आधारित कथा असलेल्या “पाचवा कोपरा” या कथासंग्रहासाठी , विदर्भातील प्रतिष्ठित मानल्या जाण्याऱ्या  साहित्य विहार संस्थेच्या वतीने “ सर्वोत्कृष्ट कथासंग्रह ” हा  राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.. आपल्या सर्वांच्या वतीने सुश्री सुनंदा पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि यापुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. 

आजच्या अंकात वाचूया ही पुरस्कार प्राप्त कथा –    “मोकळा श्वास”

“देवी आजवर मी तुला काहीच मागणं मागितलं नाही. तू जे आणि जसं दिलंस ते स्विकारलं मी. कधीच तक्रार केली नाही. पण आज एक मागणं मागते आहे. ते तू देशीलच. खरंतर तुला हे वेडगळपणाचं वाटेल, पण वाटू दे. हरकत नाही. यात माझा स्वार्थही वाटेल, तरीही हरकत नाही. पण माझी एवढी मागणी पूर्ण करच. “

एवढं बोलून आक्का देवीपुढे डोळे मिटून उभ्या राहिल्या. तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत राहिल्या. सोबत असलेल्या सुमनताईंना याचं खरंतर खूप आश्चर्य वाटलं. देवधर्म करणाऱ्या पण नवसा सायासांवर कधीही विश्वास न ठेवणाऱ्या आक्का आज काहीतरी मागत होत्या.

“आक्का काय मागितलं हो एवढं देवीकडे ? “

मंदिरातून बागेत येताच सुमनताईंनी आक्काला विचारलं. रोज इव्हिनिंग वॉकला त्या यायच्या दोघीही. मुलं, सुना सध्या लॉक डाऊन मुळे घरूनच काम करीत होती. सायंकाळी ६च्या सुमारास आक्कांना वॉकला जायची सध्या घरून परवानगी मिळाली होती. नातवंडांची ऑन लाईन शाळा. संध्याकाळी मुलंही घराबाहेर पडू लागली होती आताशा. मुलांच ऑफीस घरून जरी असलं तरी ७ पर्यंत असायचंच. आणि डॉट ७ ला किंवा त्याच्या आत म्हणजे सातच्या आत आक्कांना घरी परतावं लागायचं. कारण रात्रीचं जेवण आठ म्हणजे आठला तयार असावं लागायचं.

” आक्का काय विचारतेय मी? काय मागितलंत देवीकडे ? अर्थात आता तसं मागण्यासारखं काय आहे म्हणा ! हुशार कर्तबगार मुलगा, सून. पैशाची काहीच कमतरता नाही. तुम्हा दोघांची पेन्शन….

“हं “

“काहो ? “

” काही नाही. सगळीच सुखं पैशानं मिळाली असती तर आणखी काय हवं होतं ? “

आक्कांच्या बोलण्यातली व्यथा सुमनताईंना जाणवली. पण त्या गप्प राहिल्या. सांगावसं वाटलं की आक्का स्वतः सांगतील, हे त्यांना ठावूक होतं. दोघीही बागेतल्या एका बेंचवर टेकल्या.

नऊवार, आणि साडीतल्या निवृत्त स्त्रिया केंव्हाच मागे पडल्या होत्या. याही दोघी त्याला अपवाद नव्हत्या. छानपैकी सलवार सूट आणि दुपट्टा या वेषात त्या वॉकला येत असत. आधी सोसायटीच्या परिसरातच त्या फिरायच्या. पण दोन दिवसांपूर्वीच मंदिरं मोकळी झाली होती. म्हणून आज मंदिरातून त्या जवळच्याच बागेत आल्या होत्या.

त्या सुमनताईंशी बोलू लागल्या.

” सुमनताई, निवृत्ती नंतरचं जगणं म्हणजे प्रचंड तडजोड असते, नाही का ? “

” खरंय आक्का. “

” सुमनताई, आपणही तरूण होतो. तीस पस्तीस वर्ष नोकरी केली. त्यावेळी शिक्षणाचे दीर, नणंदा, त्यांची लग्न कार्य, सासू सासरे, आापली मुलं, घरचे कूळ कुळाचार, आला गेला सर्व सांभाळलंच ना आपण. “

” तर काय? केवढी तारेवरची कसरत होती. वरून सोवळं ओवळं ! आंघोळ करून नंतरच स्वैंपाक. साऱ्यांचे खाणे पिणे, डबे करून कसंबसं आपलं आटोपून बस गाठायची. तेही दुपारच्या जेवणासाठी कूकरची तयारी करूनच “

“होय ना ! मस्टर आत जायच्या आधी सही झाली की मिळवलं. ” 

” मग जरावेळ फ्रेश होणं, चहा आणि काम एके काम. “

“हो ना. काम लवकर आटोपून परत घर गाठायचं. मधला लंचब्रेक. शेअर करून खाल्लेल्या भाज्या. कसे गेले ते दिवस कळलंच नाही. “

” हो त्यातूनही ऑफिससाठी काहीतरी करायचंच ही इच्छा. शिवाय आपल्या कला जोपासल्या आपण. छंद, जपले. लेखन, वाचन, स्पर्धा सारंच केलं की.

 ” तरीही तोल जाऊ दिला नाही कुठे. भांड्याला भांडं लागलं असेलही, पण आवाज घरातच राहिले. लग्न कार्य, तीर्थयात्रा यासाठी सासू सासऱ्यांना पाठवलं. मी सुटी काढून घरी राहिले तेव्हा. कितीतरी वेळा. “

” तेच तर. पण आता बदललंय सारं. “

” आपलं घर, मुलं सासू सासरे सांभाळतात याचे उपकार मानणं नाहीच. तर ते त्यांचं कर्तव्यच आहे, ही भावना आलीय. “

”आपली मुलं म्हणून आपण करतोच. पण काळ बदललाय हे नक्की. सतत दुसऱ्यांशी तुलना केली जाते. अमुक आजी किती कामं करतात. कशा ठणठणीत आहेत वगैरे. दर सहा महिन्यात डॉक्टर व्हिजिट, चेक अप. जरा अप डाऊन झालं की सारखे खाण्यवर वागण्यावर निर्बंध. पण खरं सांगू, यात काळजीपेक्षा स्वार्थच अधिक दिसतो मुलांचा. चालत्या गाडीला वेळेवर तेल पाणी करतात ना, तसं वाटतं हे जपणं. अहो सकाळ पासून रात्रीपर्यंत हात रिकामा राहत नाही.

आजकाल तर काहीतरी नवीनच सुरू झालंय. दुपारी मुलं झोपली की, रात्री ती लवकर झोपत नाहीत. म्हणून आपण त्यांना जागवत ठेवायचं. शेवटची वामकुक्षी कधी घेतली हेही आठवत नाही आता.

आता काळा प्रमाणे चालत आहोत. तर मोबाईल, लॅपटॉप हातात जरी घेतला तरी सूनबाईचं डोकं ठणकतं. सतत हे काय म्हणून. आता त्यांना कसं पटवून देणार की, दोन पिढ्यांमधे फरक पडतोच म्हणून. नवीन पिढीच्या विश्वातलं आपाल्याला फारसं कळत नाही. मग समवयस्कांसोबत जरा गप्पा माराव्याशा वाटल्या, काही विचार शेअर केलेत तर काय बिघडलं ? आणि साऱ्यांचं सारं नीट करूनच आपण आपले छंद जोपासतो ना ? नोकरीत असताना या गोष्टींना वेळच नाही देता आला.

घरचं अर्थकारण, वेळ, मुलांच्या परीक्षा यात ना प्रवास केला, ना कधी चित्रपट बघता आले. ना भाषणं ऐकली ना संगीताचे कार्यक्रम. आता करू म्हटलं तर पुन्हा तेच. वेळ नाही.

खरंच कळत नाहीय, की वयाच्या साठ ते सत्तर मधे हे नाही करता आलं तर केव्हा करणार?

एकाच्या किवा फार तर दोघांच्या तुटपुंज्या कमाईत आठ दहा लोकांना सांभाळलं. आज चौघांच्या कमाईत एक बाळ सांभाळणं जड जातंय यांना “

“पण आज काय घडलं ? खूप अस्वस्थ वाटताय ! “

आक्का बोलत्या झाल्या.

काल रात्री आक्कांचा डोळा लागतो न लागतो, त्यांना बेड हलतोय असा भास झाला. पडल्या पडल्याच त्यांनी लाईट लावला. वसंतराव, त्यांचे मिस्टर, एका नामांकित कंपनीचे निवृत्त अधिकारी चक्क रडत होते. त्यांना बसतं करून आक्कांनी पाणी दिलं. विचारलं 

‘काय झालं ‘ ?

” मधू, आपण जाऊया दुसरीकडे. आपल्या गावी. ‘

” अहो हे काय मधेच ? “

‘हो. लगेच जाउया “.

” पण झालंय काय ? “

जरा सावरत वसंतराव बोलले.

” आज सूनबाई ओरडल्या माझ्यावर. “

” काय ? आणि कशासाठी ? “

” अगं तू सुमनताईंकडे गेली होतीस. गुरूवारच्या हळदी कुंकवाला. दुसऱ्या माळ्यावरचे विजयराव आले होते घरी. आणि आम्ही टी. व्ही. बघत बसलो. जुनं राजकपूरचं पिक्चर बघत. सहज तिला आवाज दिला, आणि चहा कर म्हटलं. तर खूप तोंडसुख घेतलं माझ्यावर. “

” म्हणजे ? “

” आधी रिकामटेकडे म्हणून भलावन झाली. टीव्ही चा मोठा आवाज, मुलं अभ्यास कशी करतील इथून घसरत गाडी आपल्या बचतीवर आली. आपण आयुष्यभर मजा केली. पैसा सांभाळून ठेवला नाही. घर नाही. एक ना दोन. दुसऱ्यांच्या समोर हा पाणउतारा नाही गं सहन झाला. “

‘ म्हणून तुम्ही माझ्याशी खोटं बोलतात. भूक नाही म्हणून. जेवला पण नाहीत. “

“हं. ‘

” हद्द झाली आता. आणि आपले चिरंजीव ? काही बोलला नाही तो ?”

” त्यानेही तिचीच री ओढली ! “

आक्कांना पण कळेना काय करावं ते? गावचं घर होतं. पगारातून चार पैसे मागे टाकून बांधलेलं. पण निवृत्ती नंतर या मुला जवळच रहायचंय. त्याला आपली मदत, आणि आपल्याला त्याची. या विचारात असताना, एका बेसावध क्षणी गावचं घर विकून तो पैसा मुलाला फ्लॅट घ्यायला दिला होता. “समोरचं ताट द्यावं पण, बसायचा पाट देऊ नये ‘ असं म्हणतात. पण तेच वसंतरावांनी केलं होतं.

आक्का रात्रभर अस्वस्थ होत्या. त्यांची मदत होत होती घरात, म्हणून सून फारसं बोलत नसे. अर्थात वय झाल्यावर त्यांच्याही बाबतीत हे घडणारच होतं. पण सध्या काळजी वाटत होती ती म्हाताऱ्या नवऱ्याची.

त्यांना किचनमधे प्रवेश नव्हता. साधा चहासुद्धा कुणी दिला तरच मिळायचा. फ्रीजला हात लावायचा नाही. घरातले डबे उघडून काही फराळ करायचा नाही. आणि बाहेर तर काहीच खायचं नाही.

सूनवासाची ही नवीन पद्धत आता रूढ होत चालली होती. बाईचं बरं असतं. म्हातारपण आलं तरी तिला किमान किचन मधे प्रवेश असतो. हळदी कुंकासारखे कार्यक्रम असतात. शिवाय एखाद्या घटनेचं खूप वाईट वाटलंच तर बाई रडून मोकळी होते. पुन्हा नवीन अश्रू जमा होण्यासाठी डोळ्यात नवी जागा तयार होते.

पण पुरुषांचं तसं नसतं. अश्रू आतल्याआत साठवून ते अधिक दुर्बल होतात. म्हातारपणी एकटी बाई जगू शकते, पण एकट्या पुरुषाला म्हातारपण काढणं खूप कठीण जातं.

आज आक्का म्हणूनच मंदिरात आल्या होत्या. देवीला त्यांनी मागणं मागितलं होतं.

” आई, प्रत्येक स्त्री अहेवपणी मृत्यू यावा म्हणून आयुष्यभर प्रार्थना करते. हा खरं तर तिचा स्वार्थच आहे. बायको शिवाय नवर्‍याची काळजी कुणीच घेऊ शकत नाही. मी असतानाच यांचे असे हाल होत आहेत, तर पुढे काय? त्यांच्या हाल अपेष्टांचं भविष्य मला स्पष्ट दिसतंय.

म्हणूनच माते माझ्यावर एवढी दया कर. “माझ्या आधीच यांना मृत्यू येऊ दे “. एवढंच माझं मागणं पूर्ण कर. ” सुमनताई हेच मागणं मागितलं मी देवीजवळ !”

“का ऽ ऽ य ? वेड्या झालात की काय आक्का ? अहो नोकरीत असताना केवढ्या तडफदार होतात ? आणि आजही आहात, हे विसरू नका ! बराच वेळ आपण इथे मंदिरात बसलोय. जरा फिरून येऊ. “

फिरता फिरता सुमनताई आणि आक्का बोलत होत्या त्यात एक प्लॅन आकार घेत होता. दोघीही फिरून घरी आल्या.

आककांनी बघितलं, दिवा न लावता वसंतराव हॉलमधे सोफ्यावर बसले होते. त्यांना कळत होतं की वसंतराव स्थीर नाहीत. आता फक्त बायको नाही तर त्यांची मैत्रीण व्हायची गरज होती. घरातली इतर मंडळी यायची होती, सायंकाळच्या जेवणासाठी त्यांनी कूकर लावला. भाजी कोशिंबिर केली. वरणाला फोडणी घातली. शिरस्त्या प्रमाणे आठला जेवण केलं आणि आपल्या रूममधे निघून गेले. काही वेळाने मुलगा, सून नातवंडं आल्याची चाहूल लागली. पण हे दोघंही शांतच होते. रात्री आक्का आणि सुमनताई यांचं बोलणं त्यांनी वसंतरावांना सांगितलं. त्यांनाही ते पटलं. पण प्रश्न पैशांचा होता. ” बघू ” म्हणून दोघेही झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी आक्का आणि सुमनताई बँकेत गेल्या. त्यांची एक मैत्रीण तिथे होती. गृह कर्जाची चौकशी केली. आक्का आणि वसंतरावच्या पेन्शन मधे वीस लाखांपर्यंत कर्ज बसत होतं. दोघींनाही समाधान वाटलं ! 

मुंबई, पुणे, ठाणे इथे एवढ्या पैशात काहीच होणार नव्हतं. सुमनताईंनी काही लोकांशी संपर्क साधला होता. आजकाल छोटया शहरातही फ्लॅट स्कीम होऊ लागली होती. तिथे यांच्या पैशात एका बेडरूमचा फ्लॅट मिळू शकणार होता. सुमनताई आणि आक्का वसंतराव यांनी निश्चय केला. दोन दिवसांनी “आम्ही जरा फिरून येतो “असं सांगून ते कोकणात आले. आणि तिथल्याच बँकेत संपर्क साधला. त्यांची पेन्शन, आय टी रिटर्न्स सर्व नियमित असल्याने काही प्रश्नच नव्हता. फक्त मेडिकल रिपोर्टस हवे होते. तेही नॉर्मल आले. त्यांना बावीस लाख कर्ज मिळू शकत होतं. फ्लॅटची किंमत चोवीस लाख होती. मात्र हिंमत करून त्यांनी फ्लॅट बुक केला.

सोन्याच्या चार बांगड्या, दोन पाटल्या यावर कर्ज घेऊन डाऊन पेमेंट केलं. सुमनताईंच्याच बहिणीकडे उतरल्याने त्यांचीही मदत होत होती. फ्लॅट रेडी पझेशनमधे होता. मात्र लोन साठी पंधरा दिवस लागले.

आणि तो दिवस उजाडला. आक्का आणि वसंतराव यांच्या हातात “स्वतःच्या घराची किल्ली होती. पेपर्स मात्र बँकेत होते. “

बॅगमध्ये जेमतेम दोघांचे कपडे होते. सामान काहीच नव्हतं. पण नुकतीच पेन्शन झाली होती आणि या महिन्यात EMI येणार नव्हता. जरा स्पेस होती म्हणून सर्वात आधी गॅस आणि काही जुजबी सामान त्यांनी घेतले. साधीशीच पूजा करून गृहप्रवेश केला.

काही सामान कागदपत्रे आणायला हवी होती. वसंतरावांची इच्छाच नव्हती मुंबईला जाण्याची. पण नाईलाजाने ते गेले शनिवार रविवार बघूनच. मुलगा आणि सुनबाईने ” प्रवास कसा झाला वगैरे जुजबी चौकशी केली. आक्कांनी लगेचच आपली बॅग भरायला घेतली. कागदपत्रे आणि काही फाईल्स, कपडे एवढेच ! आई बाबांकडे फारसे लक्ष द्यावे असं काही घडलंच नाही. नेहमीप्रमाणे रात्रीची जेवणे झाली. वसंतराव खोलीत निघून गेले. आक्कांनी लेका सुनेला हॉलमधे बोलावलं. म्हणाल्या,

” मुलांनो आज आम्ही दोघेही जेष्ठ नागरिक आहोत. वयस्क झालो आम्ही, पण जिवंत असल्यामुळे अजूनही भावभावना आहेत आम्हाला. आम्ही तुम्हाला जन्म दिला म्हणजे उपकार केले नाहीत हे कळलंय ! तुमच्या अभ्यासासाठी, आजारपणात आमच्या रात्री घालवल्या. ते आमचं कर्तव्यच होतं. तुमच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी आमच्या इच्छांना मुरड घातली, तेसुद्धा आमची जबाबदारी म्हणूनच. तुम्हाला पैशाची गरज होती म्हणून पी. एफ. दिला. गावचं राहतं घर विकून पैसा दिला. आम्ही स्वत:हून मुलांची जबाबदारी घेतली. मला कळतं की, एका घरात भांड्याला भांडी लागतातच. पण तो आवाज उंबरठ्याच्या बाहेर गेला की, घरातली लक्तरं वेशीवर टांगली जातात. बाबा तर यापुढे तुमच्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीतच म्हणून मीच बोलतेय. तुमच्या गरजा संपल्या आहेत. म्हणून आम्हीच आता इथून जात आहोत. कायमचे.

राहणार कुठे ? मुलाने विचारले !

रहायला घर लागतं ! सून बोलली.

ती चिंता तुम्ही करू नका. आम्ही कुठेही राहू. पण मोकळा श्वास घेऊ शकू ही खात्री आहे. आणि दोघांचं निभेल एवढी आम्हाला पेन्शन आहे. इथे राहून रोज मरण्यापेक्षा, बाहेर काही दिवस स्वातंत्र्याचे मिळाले तर जास्त छान आहेत. नाही का ? बाय द वे आता सांगतेच आम्हीही आमचा छोटासा फ्लॅट घेतलाय. स्वतःचा. गृहप्रवेश केलाय. काही महत्वाची कागदपत्रे, आणि कपडे घेऊन आम्ही निघतोय उद्या पहाटे. उद्या रविवार आणि तुम्ही उशिरा उठणार, म्हणून आत्ताच बोलले. सुनबाई तुझ्या मालकीचा सुतळीचा तोडाही मी नेत नाहीय. हवं तर तू चेक करू शकतेस सामान. आणि हो, आम्हाला सोडायला येण्याची गरज नाही. हे कॅब बुक करतील. झोपा आता.

कुठल्याही उत्तराची अपेक्षा न करता एका वेगळ्या निश्चयाने आक्का मोकळा श्वास घेत आपल्या खोलीत गेल्या. कितीतरी दिवसांनी वसंतरावांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं !!!

— समाप्त —

© प्रा.सुनंदा पाटील

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments