श्री सुनील शिरवाडकर
जीवनरंग
☆ बाबा – भाग-१ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
मागे चार सिट बसले यांची बाबानं खात्री केली.. रिक्षात पुढच्या सीटवर तो बसला.. उजव्या बाजूला एकाला बसवलं.. डाव्या हाताने किकचा दांडा जोरात उचलला.. रिक्षाचं मशीन सुरू झालं.. थोडं सरकुन त्यानं जागा केली..
.. चल बस.. हा हात टाक मागुन.. म्हणत त्यानं डाव्या बाजूला अजुन एक सीट बसवलं.. आणि पहिला गीअर टाकुन एकदम धुराट निघाला.
बाबाच्या शालीमार ते नाशिकरोड स्टेशन अश्या रोज चार पाच चकरा व्हायच्या.. सकाळी सात वाजताच तो शालीमारला यायचा..
.. चले रोड ए का.. रोड ए का.. म्हणत सीट भरायचा. त्याच्या भाषेत शीटा. मी त्याला कॉलेजला असताना पासून ओळखतो. तो आमच्याच गल्लीत रहायचा. माझ्या पेक्षा चार पाच वर्षांनी मोठा.. पण त्याला ‘ए बाबा’ असंच म्हणायचो. आणि बाबाच्या मागे त्याचा उल्लेख बाबा रोड असं करायचो.. म्हणजे सगळेच जण तसं म्हणायचे. तो रोडच्या शीटा भरतो म्हणून हे नाव…. ‘ बाबा रोड. ’
रिक्षा बाबाची नव्हती.. मालक कुणी वेगळाच होता.. आणि हा मालक नेहमी बदलत जायचा.. कधी याची रिक्षा.. कधी त्याची. मालकाशी पटलं नाही की बाबा ती रिक्षा सोडुन द्यायचा.. आश्चर्य म्हणजे त्याला लगेचच दुसरी रिक्षा मिळायचीही.
स्वतःची रिक्षा घेण्याएवढी बाबाची परीस्थिती नव्हती. पण आहे त्यात बाबा सुखी होता. जेवढं मिळायचं त्यात तो भागवायचा. त्याला बायको होती.. एक पोरगाही होता.. म्हातारे वडील होते. त्याच्या संसाराला लागेल तेवढं त्याला मिळायचं.. बाकी छानछौकी.. नशा पाणी करायला त्याच्या कडे पैसा नव्हताच…
त्याची चैन म्हणजे कधीतरी बाहेर गाडीवर अंडा भुर्जी पाव खाणं.. एवढंच.
बाबाच्या खिशात नेहमी चॉकलेट असायचे.. रिक्षात एखादं लहान मुलं बसलं की तो त्याला चॉकलेट द्यायचा.. एकदा त्यानं मलाही चॉकलेट दिलं.. मी काही लहान नव्हतो.. बाबाला म्हटलं..
‘अरे मला कशाला?’
‘घे रे.. तोंड गोड कर..’
तर असा हा बाबा रोड.. एकदा नेहमीप्रमाणे त्याचं रिक्षा मालकाशी भांडण झालं.. ते काम सुटलं.. पण महीना दोन महिने झाले.. दुसरी रीक्षा मिळेनाच.. जसे जसे दिवस जाऊ लागले.. तसा बाबा अस्वस्थ होऊ लागला.. पैसा तर लागतोच ना! आणि बाबाचं असं कितीसं सेव्हिंग असणार?दोन चार महिने पास केले.. मग पुढे?
मला हे समजलं.. आणि त्याच्या घरी जायचं ठरवलं. तसं मी जाऊन काहीच होणार नव्हतं, मी काही त्याला पैसे काढून देणार नव्हतो. पण तरी गेलो.
शालीमारवर ‘शिटा’ भरणारा बाबा आणि घरातला बाबा.. दोन्ही वेगळी रुपे होती. शालीमारवरचं वातावरणच वेगळं.. सगळे रिक्षावाले.. आजुबाजुला फेरीवाले.. त्यांची टपोरी भाषा.. बाबा जेव्हा त्यांच्यात असायचा तेव्हा त्यांच्यासारखाच असायचा.
बाबाच्या घरचं वातावरण एकदम वेगळं.. सोवळं ओवळं.. कर्मकांड.. सगळंच होतं. भद्रकाली मंदिराजवळ असणारं बाबाचं घर म्हणजे वाडाच होता.. वडिलोपार्जित. बाहेर छोटंसं अंगण.. आणि एक औदुंबराचं झाड. बाबाचे वडील दत्तभक्त.. आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो.
त्याच्या घरचं देवघर पण खुप मोठ्ठं होतं.
अण्णा रिटायर्ड होते.. एका दवाखान्यात औषधांच्या पुड्या बांधायचं काम करायचे ते.. आयुष्यभर त्यांनी तेच काम केलं. आता ते सत्तरीत होते.. त्यांनी पेन्शन बिन्शन नव्हती. त्यांना वाटायचं बाबानं शिकुन नोकरी करावी.. पण बाबाचं डोकं नव्हतं..
असाच कधीतरी वयाच्या विशीत मित्राच्या ओळखीने रीक्षा चालवायला लागला.. आणि मग तोच त्याचा व्यवसाय झाला.. पण दुसर्याची रिक्षा चालवण्यातच त्याचं आयुष्य चाललं होतं.. अजुन स्वत:ची रिक्षा त्यानं घेतली नव्हती.
मी बाबाच्या घरी गेलो तेव्हा अण्णांची आरती चालू होती.. माझ्या लक्षात आले.. आज गुरुवार.. दर गुरूवारी अण्णा संध्याकाळी दत्ताची आरती करायचे.. आणि आरती झाल्यावर हाक मारुन पेढ्याचा तुकडा सर्वांना द्यायचे.. सर्वांना म्हणजे जे काय दोन चार जण असतील त्यांना.. एका वाटीत मोजुन चार पेढे असत नैवेद्याचे. दत्ताचा चांगला मोठा फोटो होता त्यांच्या देवघरात. गुरुवारी त्याला चांगला मोठा हार घातलेला असायचा. अण्णा आपल्या हातांनी तो हार बनवायचे. बुधवारी संध्याकाळी फुल बाजारातुन ते फुलं आणत. कधी झेंडु, कधी शेवंती, उन्हाळ्यात मोगरा.. तुळशीचा वाटा.. रात्री जेवण व्हायच्या आधी ते हार करायला बसत. अख्खा पेपर पसरुन त्यावर फुलं ओतत.. बाजुला तुळशीचा वाटा. दोर्यात सुई ओवुन एक एक फुल ओवत. मध्ये वेगळ्या रंगाची फुले.. कधी तुळशीची डगळी.. हार झाल्यावर मग गोंडा.. तोही कधी तुळस गुंफलेला.. तो हार सकाळी पुजेच्या वेळीच घातला जायचा.. मोगर्याचा हार असला की दिवसभर घरात मंद दरवळ जाणवायचा. आत्ताही मी गेलो तर तोच परिचीत दरवळ जाणवला. आत गेलो.. ‘घालीन लोटांगण ‘ सुरु होतं.. थोड्या वेळात तेही झालं.. देवापुढे कापुरार्ती ठेवून अण्णा हात जोडून देवापुढे उभे राहिले.
“महाराज बघा.. तीन महिने झाले पोरगा काम शोधतोय.. काहीतरी करा.. त्याच्याकडे लक्ष असु द्या”.
ही त्यांची एक नेहमीची सवय.. देवाशी.. खासकरून दत्ताशी गप्पा मारायच्या.. तो समोर उभा आहे.. आपलं ऐकतो आहे हीच भावना असायची त्यांची..
अण्णांनी प्रसादाची वाटी उचलली.. पेढ्याचा अर्धा तुकडा करून माझ्या हातावर टेकवला..
“कुठे गेला बाबा?” मी विचारलं.
“असाच कुठेतरी गेलाय.. तिकडे कोणाची तरी रिक्षा आहे म्हणे. “
“खरंतर बाबानी आता स्वतः ची रिक्षा घ्यायला हवी.. “
मी असाच सहजच बोलून गेलो.. पण अण्णा त्याचीच वाट पहात होते जणु.. ते बोलतच सुटले. त्यांचंही हेच म्हणणं होतं.. आता बाबा चाळीशीत आला.. पोरगंही दोन वर्षांनी कॉलेजमध्ये जायला लागेल.. तो खर्च वाढेल. आत्ताच स्वतःची रिक्षा घेतली तरच होईल.
मलाही ते पटत होतं. दोन दिवसांनी मी बाबाला भेटलो.. त्याला समजावलं.. अण्णांनी त्यांचे साठवलेले थोडे पैसे दिले.. बाकी लोन केलं.. आणि एक दिवस बाबा स्वतःच्या रिक्षाचा मालक बनला.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाबानी रिक्षा घरी आणली. रिक्षा घ्यायची ठरलं.. आणि मग अण्णांनी मला सांगितलं..
“बाबासोबत रहा.. ते लोन वगैरे करायचं.. कुठल्या बॅंकेचं करायचं.. सुरुवातीला किती पैसे भरायचे ते सगळं तु बघ. मी फक्त पैसे देतो.. बाकी गोष्टीत लक्ष घाल. मला तर त्यातलं काही समजत नाही.. बाबावर पण अशी लोनबीन घेण्याची वेळ कधीच आली नाही. “
लोनचे सगळे सोपस्कार पार पडून आज रिक्षा बाबाच्या वाड्या बाहेर उभी होती. पेढ्याचा बॉक्स.. हार.. फुलं सगळं आणलं होतं. हेमा वहीनींनी.. म्हणजे बाबाच्या बायकोनं रिक्षाचं औक्षण केलं.. पेढे वाटले.
– क्रमशः भाग पहिला
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈