श्री सुनील शिरवाडकर
जीवनरंग
☆ बाबा – भाग-२ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
(लोनचे सगळे सोपस्कार पार पडुन आज रिक्षा बाबाच्या वाड्या बाहेर उभी होती.पेढ्याचा बॉक्स..हार..फुलं सगळं आणलं होतं.हेमा वहीनींनी.. म्हणजे बाबाच्या बायकोनं रिक्षाचं औक्षण केलं.. पेढे वाटले.) – इथून पुढे —-
“अण्णा.. मला काय वाटतं..रिक्षाला मागे नाव द्यायचं ना..तर ते तुमचं देऊ.”
बाबानी सांगितलं..पण अण्णांनी विरोध केला.खरंतर मलाही बाबाचं म्हणणं पटलं होतं..कारण आज ही जी दाराशी रिक्षा उभी होती..ती अण्णांनी एकरकमी मोठी रक्कम दिल्यामुळेच ना!
मी बाबाला म्हटलं..
“दे..रे.. अण्णांचंच नाव रिक्षाला.. मस्त मागे रंगवुन घे..
‘अण्णांची कृपा’ असं.”
पण अण्णांनी त्याला विरोधच केला.
“तुम्हाला काही तरी नाव द्यायचं ना..मग लिहा..
दत्तगुरुंची कृपा”
ते आम्हालाही पटलं.दोन दिवसातच तसं स्टिकर रिक्षांवर लागलं.दत्तगुरुंच्या कृपेमुळे बाबाचं आयुष्य बदलून गेलं.
आता बाबा सकाळी लवकरच रिक्षा घेऊन जायला लागला.सगळ्यात पहीले त्याने एक गोष्ट केली..ती म्हणजे शालीमार नाशिकरोड पट्ट्यावर रिक्षा चालवणे सोडुन दिलं.त्याच्या घराजवळच सागरमल मोदी शाळा होती.त्या शाळेतल्या मुलांना शाळेत नेऊन पोचवणं आणि शाळा सुटल्यावर घरी आणुन सोडणं हे काम सुरु केलं.
आता सकाळी लवकर त्याचा दिवस सुरु व्हायचा.आंघोळ करुन जरा वेळ देवापुढे बसायचा.तसं तर त्याला अलीकडे वाटायला लागलं होतं.. अजुन थोडंसं लवकर उठावं आणि पुजा करावी.पण रोजची पुजा अण्णाच करायचे.. पुर्वीपासुन..त्यांचा पुजा करण्यात छान वेळ जायचा.. आणि मुख्य म्हणजे त्यांना त्याची आवड होती.मग बाबा काय करायचा? देवापुढे दिवा लावायचा.. उदबत्ती लावायचा..एक माळ ओढायचा ते झालं की दत्तबावन्नी वाचायचा.
शुचिर्भूत होऊन..कपाळावर गंधाचा टिळा लावून बाबा बाहेर पडायचा.सकाळी शाळेत मुलांना नेऊन सोडलं की मग तिवंधा चौकातील स्टॅण्ड वर रिक्षा लावुन बसायचा..दोन चार भाडे झाले की पुन्हा मुलांना आणायला शाळेत जायचा.
दुपारी घरी यायचं..जेवण करून तासभर आराम करायचा .आणि पुन्हा रिक्षा घेऊन स्टॅण्ड वर जाऊन उभा रहायचा.संध्याकाळपर्यंत भाडे करायचा.सहा वाजले की रिक्षा घेऊन घरी यायचा.एक चांगलं जाड ताडपत्रीचं कव्हर त्यानं आणलं होतं.ते कव्हर रिक्षावर टाकायचा..साखळीने रिक्षा बांधायचा.. आणि मग फ्रेश होऊन चौकातल्या ओट्यावर जाऊन बसायचा.. तिथं सगळी त्याची मित्रमंडळी जमत.
तीन चार वर्षांत बाबानी रिक्षाचे बरचसं लोन फेडलं.आता जरा पैसाही बरा मिळायला लागला.मग अधुनमधून शौक पाणी सुरु झाले.पुर्वी फक्त अंडी खायचा..आता चिकन मटणाची सवय लागली.पण हे सगळं घराबाहेर.घरात अजुन तरी अण्णांचा धाक होता.घरी काही असं करायची हिंमत होत नव्हती.
पण एक दिवस त्याने तेही केलं.योगायोगाने मीही तेव्हा कशासाठी म्हणून बाबाकडे गेलो होतो.बाहेरच्या खोलीत कुणी दिसलं नाही.. म्हणून स्वयंपाकघरात डोकावलं तर तिथं बाबांचा मुलगा अंडी फोडताना दिसला.. मला धक्काच बसला.
“अरे बाबा.. हे काय? तुझ्या घरात चक्क अंडी?”
“शू….हळु बोल”.
“अरे पण हे काय?, आणि अण्णा कुठे गेले?त्यांना हे माहीत आहे का?”
“तु गप्प बस बरं.. अण्णा यायच्या आत मला हे आटोपायचं आहे..ही टरफलं बाहेर नेऊन टाकली की झालं “
पण तेवढ्यात अण्णा आले.त्यांनी बघितलं..त्यांना सगळं समजलं.मला वाटलं आता अण्णा चिडणार..घरात खुप राडा होणार.
पण अण्णांनी ते प्रकरण खुप शांततेत घेतलं.आता आपलं काही चालणार नाहीये.. आपण काही सांगायला गेलो..तर काही तरी कारण सांगून आपल्याला गप्प बसवतील.यापेक्षा जे आहे ते ठिक आहे म्हणायचं आणि शांत बसायचं.
त्यांचं देवघर स्वयंपाकघराच्या जवळच होतं.वर्षोनुवर्षे दत्ताची भक्ती केलेलं त्यांचं मन जरा उदासच झालं.आपल्या या घरात हे असं काही बघायला मिळेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं.पण आता विरोध करायचा नाही.. पोराला.. नातवाला करु दे त्यांच्या मनासारखं.
अण्णा बाहेर अंगणात आले.झाडाला बांधलेल्या दोरीवर त्यांचा पंचा होता..तो त्यांनीं ओढला..आंत गेले..तो पंचा दत्ताच्या तसबीरीवर टाकला.
“चला..दृष्टीआड सृष्टी..दत्त महाराज.. क्षमा करा.. नाही पटत हे..पण शांत बसायचं ठरवलंय मी..”
मग बाबाच्या घरात हे वरचेवर होऊ लागलं..आणि अण्णांची जगण्याची उमेदही कमी होऊ लागली.तसं बाबा काही खुप जगावेगळं करत नव्हता..पण अण्णांचं जग वेगळं होतं.. त्यांना हा सगळा अनर्थ वाटत होता.आपल्याला हे सगळं बघायला मिळेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं.रोजची पूजा करत होते..गुरुवारची आरतीही करत होते.. पेढ्याचा प्रसाद पण वाटत होते..पण ते कशातच नव्हते.कधी घरात असं काही शिजवलं जायचं तेव्हा अण्णा दत्ताच्या तसबीरीवर पंचा टाकुन फोटो झाकायचे.
एकदा काय झालं ..बाबानी धाडस केलं..चक्क घरात चिकन आणलं..त्याची बायको धास्तावली..
“अहो हे काय? अण्णांनी बघितलं तर काय म्हणतील?”
पण बाबापुढे तिचं काही चाललं नाही.बायकोच्या मदतीने त्यानी ती चिकन बनवली.डिशमध्ये घेऊन तो बाहेरच्या खोलीत आला.
समोर दत्ताची तसबीर होती..पंचा न टाकलेली.अण्णा कुठे तरी बाहेर गेल्यामुळे आज पंचा टाकलेला नव्हता..बाबा सहजच गमतीने म्हणाला..
“या दत्त महाराज..गरम गरम चिकन मसाला बनवलाय….बघा तर खरं एकदा टेस्ट “
आणि त्याच वेळी अण्णा बाहेरुन आत आले..त्यांनी हे ऐकलं.. आणि त्यांना राहवलं नाही..
“काय बोलतोयस तु? तुझं तुला तरी समजतंय का? आणि हे काय आता नवीनच?घर बाटवलंय या पोरानी”.
बाबा चपापला.. कुठुन हे असं बोलून बसलो असं त्याला झालं.
“अण्णा..अहो सहज आपली गंमत.. आणि काही नाही हो.. हल्ली सगळेच जण हे खातात”
“तुझी फारशी श्रध्दा नाही माहीतेय मला..पण बापाच्या भावना .. घराच्या परंपरा काही आहे की नाही?”
“अण्णा..अहो..”
अण्णा तिथे थांबलेच नाही.. आतल्या खोलीत निघून गेले.. त्या रात्री त्यांनी जेवणही केलं नाही.
पुढचा गुरुवार आला..
अण्णांच्या हातचा फुलांचा हार आज फोटोवर चढला नाही..
वर्षोनुवर्षे होणारी संध्याकाळची दत्ताची आरती पण त्या गुरुवारी झाली नाही..
आणि नेहमीप्रमाणे
“बाबा.. प्रसाद घे..”अशी हाकही आली नाही.
— समाप्त —
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈