श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दादाचे पहिले पुस्तक – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

पहाटे पहाटे मला जाग आली. मी गोधडीमधून मान बाहेर काढली, दादा कांदिलाच्या प्रकाशात पाट मांडीवर घेऊन लिहीत होता. दादाची ही वेळ आवडीची, सर्वजण झोपेत असताना तो पहाटे चार वाजता उठतो, कंदिलाची काच पुसतो आणि पाट मांडीवर घेऊन लिहायला बसतो. मग तो उठून तोंड धुईल आणि गोठ्यात जाऊन गाईचे दूध काढेल. मग आंघोळ, पूजा करून घरचं दूध पिऊन बाहेर पडेल. रोज अंदाजे दहा पंधरा किमी चालून कुणाकडे एकादशीणि, कुणाकडे ब्राम्हण जेवण नाहीतर नुसतीच पूजा करून भर दुपारी डोकयावर उपरणे घेऊन परत येईल. मग दुपारी जेवण करून थोडी वामकुक्षी करून परत लिहायला बसेल. तोपर्यत बाबा पण गावात भिक्षुकी करून आलेले असत. त्यांचे पण जेवण होई.

मी उठून दूध घेत होतो तोपर्यत दादा पंचा आणि बंडी घालून तयारीत होता. बाबा खाली बसुन चहा पित होते, त्यानी दादाला विचारले 

“आज कोठे आहे कामगिरी?

“तेंडोलीत जायचे आहे, खानोलकरांची पूजा आहे आणि रवळनाथ मंदिरात अभिषेक.

“बरं, खानोलकरांचा मोठा सुभाष आला आहे की काय, पूर्वी मी जायचो तेंव्हा त्याला देवाचे फार होते, म्हणून विचारले.

“नाही, एकनाथने बोलावले आहे, बरं मी जातो.

मी दादा आणि बाबा यांचेकडे पहात होतो. एव्हड्यात आई घरातून बाहेर आली, पदराला हात पुसत दादाला म्हणाली 

“म्हापणची घाटी चढतांना सांभाळून हो.. कसली घाटी ती… मला तर श्वास लागतो चढतांना.. काटेकुटे किती.. बरे पायात चप्पल नाही.. यांना म्हणते, वासूला चप्पल घेउन द्या ‘.

“माझ्या पायात तरी कुठे आहे चप्पल? चप्पलला पैसे लागतात किती? आपल्या कोकणात कितीशा लोकांच्या पायात चप्पल आहे? एक आपामास्तर आणि सोन्या वाणी सोडुन कोण चप्पल घालतो काय पायात? पायात चप्पल घालायची चैन केली तर पोटात काय ढकलायचे?”

हे आणि असे नेहेमीचे आईबाबांचे संवाद ऐकू यायचे, आज पण तसेच. मग बाबा पंचा, बंडी आणि खांदयावर उपरणे घेऊन बाहेर पडले, त्यांच्याही पायात चप्पल नसे. आईने आटवल आणि लोणच्याची फोड दिली, ती खाऊन मी शाळेत गेलो.

मी संध्याकाळी शाळेतून आलो तेंव्हा दादा लिहीत बसला होता. दुपारी पोस्टमनने पत्रे आणून दिली होती. दादाने ती फोडून वाचली होती. मी सहज ती पाहिली, दोन अंक होते, एक रत्नागिरीचा आणि एक पुण्याचा. दोन्ही अंकात दादाच्या कथा छापून आल्या होत्या “वासुदेव अनंत जोशी ‘.

मी कौतुकाने दादाकडे पाहिले, दादा लिहिण्यात मग्न होता. मी दादाला विचारले 

“दादा, तुझे नाव छापून येते, मग पैसे किती मिळतात याचे?”

दादाने मान वरुन माझ्याकडे पाहिले आणि तो हसला.

“मोठया लेखकांना पैसे मिळत असतील.. माझे नाव कुठे झाले आहे? आणि खेड्यातल्या लेखकांला कोण विचारतो? “

“मग दादा तू पहाटे उठून मान मोडेपर्यत आणि हात दुखेपर्यत का लिहितोस?

“मला दुसरे काही येत नाही, आज ना उद्या आपले पण नाव होईल आणि दोन पैसे मिळतील, या आशेने लिहितो. ”

मी घरात गेलो आणि मेहेनतीचे पैसे न देणाऱ्या या अंकवाल्यांच्या अंकात कधी लिहायचे नाही हे मनोमन ठरवून टाकले.

रात्री बाबा आणि दादा बोलत असताना मी ऐकले की दादा सध्या कादंबरी लिहितो आहे. कादंबरी म्हणजे काय, हे मला कोठे माहित होते?

मी दादाला विचारले, “, दादा कादंबरी म्हणजे काय?

“कादंबरी म्हणजे मोठी गोष्ट, ही गोष्ट किंवा कथा मी सात आठ पानांची लिहितो, तीच कथा दीडशे दोनशे पानांची लिहायची.

“मग तू कादंबरी का लिहिणार आहेस?

“कारण आपल्याकडे ते मुंबईचे लेखक येतात ना नानासाहेब, त्यांनी पत्र लिहिले आहे की तू कादंबरी लिही, त्यांचे पुण्याचे प्रकाशक ओळखीचे आहेत. नानासाहेब त्या प्रकाशकांना सांगून माझे पुस्तक प्रकाशित करणार आहेत. म्हणूंन मी आता कादंबरी लिहिणार आहे. ”

“मग या कादंबरीचे किती पैसे मिळतील आपल्याला?”

“पैसे किती मिळतात हे मला पण माहित नाही. पण मी ऐकतो ना. सी. फडके म्हणून पुण्याचे लेखक आहेत, त्यांच्या कादंबऱ्या खुप खपतात, म्हणून त्याना पाचशे रुपये मानधन मिळते म्हणे.. तसेच शिरोड्याचे खांडेकर, मुंबईचे पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांना खुप मागणी आहे, म्हणून त्याना पाचशे सातशे मिळत असतील.

“मग दादा तुला पाचशे रुपये मिळतील?”

“मी कथा लिहितो, तसे शहरात पण माझे वाचक झाले आहेत. कादंबरी प्रथमच लिहितो आहे, बघू किती देतात ते, फडक्याच्या निम्मे दिले तरी खुप झाले.” 

मी मनातल्या मनात खूष झालो. दादाला कादंबरीचे अडीचशे मिळाले तर? काय काय करायचे, हे मनात ठरविले. पहिल्यांदा बाबांना आणि दादाला चप्पल घयायचे.. आईला दोन लुगडी आणि काय.. काय..

मी पाहिले दादा जोराने लिहू लागला. रात्री तीन वाजता उठू लागला. मी संध्याकाळी घरी आलो तेंव्हा पण दादा लिहीत असायचा. लिहिलेले बाबांना वाचून दाखवायचा. बाबा त्याला सूचना करायचे.. मग ते रद्द करून पुन्हा लिहायचा.

मुंबईच्या नानासाहेबांचे कार्ड येत असे. लिखाण कितपत आले याची ते चौकशी करत होते. शेवटी दादाची कादंबरी लिहून झाली. दादाने पुन्हा एकदा चांगल्या अक्षरात ती लिहून काढली आणि पोस्टाने प्रकाशकाला पाठवून दिली. पंधरा दिवसांनी प्रकाशकांचे कादंबरी मिळाल्याचे कार्ड आले. आता आम्ही सर्व प्रकाशक काय निर्णय घेतात, पुस्तक छापतात की परत पाठवतात याची वाट पहात होतो.

एक महिन्याने पुण्याहून प्रकाशकाचे पत्र आले, “पुस्तक छापायला घेतले आहे”.

आमच्या घरात आनंदीआनंद झाला. आईने केळ्याची शिकरण आणि चपाती केली आणि आम्ही सर्वजण खुप जेवलो. मी मनातल्या मनात प्रकाशकाने पैसे पाठविले तर काय काय करायचे याची यादी बनवत होतो.

आणि एक दिवस पोस्टमनने रजिस्टर पत्र आणून दिले. बाबांनी पत्र फोडले, त्यात ST ने पाठविलेल्या पार्सलची पावती होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments