श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दादाचे पहिले पुस्तक – भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर

 (आणि एक दिवस पोस्टमनने रजिस्टर पत्र आणून दिले. बाबांनी पत्र फोडले, त्यात ST ने पाठविलेल्या पार्सलची पावती होती.) – इथून पुढे —

मी हवेत होतो. दादाच्या कादंबरी साठी एवढा मोठा मोबदला मिळणार, हे माझ्या स्वप्नातही नव्हते. मी अंदाज केला, त्यानी या पार्सलात भेटवस्तू आणि पैसे पाठविले असणार.

दादाने पाहिले पार्सल ST ने वेंगुर्ल्याला पाठवले होते, म्हणजे दादाला पार्सल घेण्यासाठी वेगुर्ल्याला जावे लागणार होते. मी दादाकडे हट्ट करत होतो की मी पण वेगुर्ल्याला येणार कारण मला सर्वप्रथम पार्सल फोडायचे होते आणि आतील नोटा मोजायच्या होत्या. दादा म्हणाला 

“अरे दोघांनी जायचे म्हणजे जाताना दोन रुपये आणि येताना दोन रुपये म्हणजे चार रुपये लागतील आणि माझ्याजवळ काहीही पैसे नाहीत. मी चालत जाणारं त्यामुळे तू येऊ नकोस”.

मी रडू लागलो आणि तसाच झोपलो. पहाटे दादा वेंगुर्ल्याला जाण्यासाठी उठला तेव्हा मी जागाच होतो. दादा विहिरीवर आंघोळ करायला गेला तेंव्हा मी पण छोटी कळशी घेऊन विहिरीवर गेलो. शेवटी मी ऐकत नाही हे पाहून दादा गप्प बसला आणि म्हणाला “चालत जावे लागेल, पाय दुखतील हे लक्षात ठेव “.

मी चड्डी शर्ट घालून तयार झालो. आम्ही दोघानीं दूधभाकरी खाल्ली आणि बाहेर पडणार एवढ्यात बाबा आतून आले आणि त्यानी दोन रुपये दादाच्या हातावर ठेवले ” येताना संध्याकाळी ST ने या “ असे म्हणाले. दादाला आणि मला आश्यर्य वाटले, बाबांनी हे दोन रुपये कुठून आणले?

आम्ही दोघे चालत चालत म्हापणच्या घाटीपर्यत आलो तोपर्यत पूर्वेला उजाडत होते. घाटी चढताना मी दादाला म्हणालो 

“दादा आता पार्सल उघडून पैसे मिळाले की तुला आणि बाबांना चप्पल घ्यायचे, रोज दगडधोंड्यातून चालून चालून तुझे पाय फाटून गेले आहेत ‘.

“माझ्या पायांना काही होतं नाही रे,पहिल्यांदा घरावरची कौले फुटली आहेत, ती बदलायला हवीत नाहीतर आपले मातीच्या भिंतीवर पावसाचे पाणी पडून घर कोसळायला वेळ लागायचा नाही. शिवाय आईला मुंबईला किंवा पुण्याला नेऊन तिच्या डोळ्याचे ऑपरेशन करायला हवे, धूर डोळ्यात जाऊन जाऊन तिला काचबिंदू झाला आहे “.

बोलत बोलत आम्ही चालत होतो. नऊ वाजले तसे ऊन लागू लागलं पण थांबत थांबत आम्ही पुढे जात होतो. दाभोलीची घाटी चढतांना माझ्या पायात पेटके यायला लागले मग दादाने मला खांदयावर घेतले आणि तो घाटी चढू लागला. ऊन अगदी डोक्यावर आले तसे आम्ही दोघे वेगुर्ल्याच्या ST स्टॅण्डवर पोहोचलो.

स्टॅण्डवर आम्ही पार्सल ऑफिस शोधून काढले. त्या टेबलावरच्या क्लार्कला दादाने पोस्टाने आलेली पावती दाखवली. त्या क्लार्कने पावती हातात घेतली आणि आपले रजिस्टर चेक केले. तो दादाला म्हणाला 

“अहो, ह्या पार्सल येऊन दहा दिवस झाले, तुमी होतास खय,? आज नाय इल्लास तर उद्या मी परत पाठवतलंय असतंय’.

“पण आम्हाला ही पावती कालच मिळाली आणि आज आम्ही आलो ‘. दादा म्हणाला.

“पोस्टचो कारभार.. बरा पण तुमका उशिरा इल्याबद्दल दंड लागतलो, तसो ST चो नियमचं आसा. ‘

“, पण आमच्याकडे पैसे नाहीत हो ‘.

“, मग मी पार्सल देऊ शकत नाय, शेवटी माजी नोकरी आसा ‘.

“किती रुपये दंड होणार?

त्या क्लार्कने हिशेब केला आणि एक रुपया वीस पैसे म्हणून सांगितले.

 दादाने मोठया कष्टाने सकाळी बाबांनी येताना ST ने येण्यासाठी दोन रुपये दिले होते, ते त्या क्लार्ककडे दिले. क्लार्कने पावती केली आणि बाकी ऐशी पैसे परत दिले आणि पार्सल शोधून काढून ते ताब्यात दिले आणि दादाची सही घेतली.

आता माझ्या अंगात उत्साह आला. पायातील पेटके कुठल्याकुठे गेले, पार्सलमध्ये पैसे असणार होते किंवा चेक तरी असेल अशी आशा होती. मोठया लेखकांना प्रकाशक पाचशे रुपये किंवा सातशे रुपये पण देतात असे दादा म्हणाला होता आणि आपल्याला निम्मे तरी देतील असे पण म्हणाला होता.

मला पार्सल उघडण्याची उत्सुकता लागली होती, दादा म्हणत होता, घरी जाऊन उघडूया पण मला घाई झाली होती.

माझ्या हट्टामुळे दादाने तेथलीच सुरी घेतली आणि पार्सल उघडले. आत दादाची दहा पुस्तके होती आणि एक पाकीट होते. मी पुस्तक हातात घेतलं, मस्त कव्हर होते, कव्हरवर दादाचे नाव होते, मी पुस्तकाचा वास घेतला. नवीन पुस्तकाला जो वास असतो तो त्या पुस्तकांना होता. दादाने पाकीट फोडले, त्यात एक पत्र होते. दादाचा चेहरा पडला. तो घाम पुसू लागला. मी विचारले काय झाले? चेक पाठवला काय? रोख पैसे नाहीत?

दादा म्हणाला ” लेखकाचे मानधन म्हणून ही दहा पुस्तके पाठवली आहेत, बाकी काही नाही…. “

मी रडायला लागलो. मी म्हणालो “दादा, तू पहाटे उठून पाठीत दुखेपर्यत आणि हात मोडेपर्यत किती दिवस लिहीत होतास त्याचा हाच मोबदला?”

“होय बाबा, नवीन लेखकाची हीच किंमत असते. चला, बाबांनी दिलेल्या दोन रुपयातील एक रुपया वीस पैसे दंडाचे ST ने घेतले आता राहिले ऐशी पैसे खिशात. त्यात आपल्या दोघांचे तिकीट येणार नाही, तेंव्हा.. ”

“तेंव्हा काय?”

“ पांडुरंग सर्व्हिस.. बस माझ्या खांदयावर. ” दादा डोळे पुसत म्हणाला.

मी दादाच्या खांदयावर बसलो आणि पुन्हा पंधरा किलोमीटर चालायला सुरवात केली.

— समाप्त —

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments