सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ मी मंगलाष्टकं करते… ☆  सौ. उज्ज्वला केळकर

सकाळचे साडेदहा वाजले होते. इतक्या दाराची बेल वाजली आणि पाठोपाठ आवाज आला “मास्तरीन बाय हैत का घरात? म्या म्हटलं आज भेटता का नाय?” मी घाईघाईने दार उघडलं. दारात सिदू उभा होता. सिदू आमचा गावाकडचा वाटेकरी. आल्या आल्या म्हणाला “ते तांदूळ टाकायचे टायमाला म्हणतात ते गाणं लिवा” वहिनी साहेबांनी मी  किरकोळ कविता करते हे लक्षात ठेवून मला  मंगलाष्टक करायचा सांगावा धाडला हे समजल्यावर मला अगदी भरून आलं. त्यानंतर सिदूला जेवून जाण्याचा आग्रह केला. अण्णासाहेब पाटील म्हणजे आमच्या गावची बडी आसामी. आता त्यांच्या मुलाच्या लग्नात खूप माणसे येणार. बडी बडी माणसं मी केलेली मंगलाष्टक ऐकणार. मग मला आणखीन ऑफर्स येतील, कुणाच्या ओळखीचा उपयोग होईल, भावगीताची कँसेट रेकॉर्ड, सिनेमात गाणी लिहिण्याची संधी….. माझ्या मनाच्या पाखराने भरारी घेतली. पुढचं राहू द्या निदान चालू घडीला मंगलाष्टकाची कॅसेट करून देऊन चार पाचशे खिशात घालायला साँरी साँरी पदरात बांधायला हरकत नव्हती. या आनंदातच जेवण न करता शाळेत गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी आले तर दूरवरूनच अण्णासाहेबांची चकचकीत काळी अँबेसिडर दारात उभी. ” या मास्तरीन बाई या, माझ्या घरात त्यांनीच माझे स्वागत केलं. सिदबानं काल निरोप दिला न्हवं? हो सांगितला की. तुम्ही काय काळजी करू नका. अहो, तुमची पुष्पी मला माझ्या गौरी सारखीच! “नाही तुमच्यावर काय काम सोपवल्यावर आम्हाला काय घोर बी न्हाई. खरं पर म्हटलं एकदा सोताच तुमच्याकडे जाऊन सांगावं” मास्तरीन बाय, तेवढी गान्यात घ्यायची नाव लिवून घ्या” “मला माहित आहेत अण्णासाहेब तुमची नावं, ” “आमची नव्ह ती माहित हैत तुम्हास्नी. ही येगळी.. असं बघा, मास्तरीण बाय म्या म्होरल्या साली झेड. पी. च्या कृषी विभागाचा सभापती व्हायचं म्हणतूया. तेव्हा झेड. पी. चे अध्यक्ष मुरारराव जाधव, आमच्या भागाचे आमदार नाझरे-पाटील आणि खासदार सखाराम जगताप यांची नावं बी येऊ देत. ते लग्नाला येणार आहेत. अशी सगळ्यांची नाव कशी बसणार मंगलाष्टकात? सगळ्यांची नग, फकस्त त्या तिघांची येऊ देत. ते लग्नाला आलेली आणि आशीर्वाद देतात असं म्हणा. “आनि मास्तरीण बाय माझ्या आई-बा चा बी येऊ दे ” वहिनी साहेबांनी हुकूम सोडला. तुझी आई बा जीते हायती का? म्हनं त्यांची बी नाव लिवा. अण्णासाहेब खवळले. ” सर्गातून बघत्याती आनि आशीर्वाद देत्याती असं लिवा” वहिनी साहेबांनी त्यांच्यावर आवाज चढवला. माझी मुकिट्याने माझी डायरी काढली आणि त्यांनी सांगितलेली नावे लिहून घेतली. “अण्णासाहेब मंगलाष्टक लिहीते पण लग्नाच्या वेळी ती म्हणणार कोण? मी थोड्याशा मुत्सदी पणे प्रश्न टाकला. “माझ्या भैनीची ल्येक हाय कांची! कांचन लई ग्वाड गळा हाय तिचा! हादग्याची, पंचमीची, झोपाळ्याची, झिम्म्याची गानी झक्कास म्हंती. माझ्या डोळ्यापुढे 12-13 वर्षाची कांची काप-या काप-या आवाजात, हुंदके देत मंगलाष्टकं म्हणत असल्यास दृश्य उभ राहिलं. मी अण्णासाहेबांना म्हटलं, “अण्णासाहेब, आपल्या पुष्पाच्या लग्नात बडी बडी माणसे येणार” “व्हय की! आपले श्रीपतराव, नाझरे-पाटील, सकाराम जगताप, त्येंच्या संगट आनि बी कोण येतील साकर कारखान्याचे चेअरमन….. “तेच ते! तेव्हा एखाद्या परक-या प्रकारा पोरींनी मंगलाष्टकं म्हटलेली बरी नाही दिसायची. त्याची जिला चांगलं गाता येतं अशा कोणाकडून तरी तबला पेटीच्या साथीवर मंगलाष्टक म्हणून घ्यावेत आणि लग्नाच्या वेळी ती कॅसेट लावावी म्हणजे काही घोळ होणार नाही मी कॅसेट ची कल्पना त्यांच्याकडे उतरवली त्यांनाही ती पटली मुख्य म्हणजे वहिनी साहेबांना सुद्धा. मग मी सावधपणे म्हटले आता हे करायचं म्हटलं म्हणजे थोडा खर्च येणार म्हणजे मला काही नको गाणारी पेटी वाजवणारे कॅसेट खर्चाची चिंता सोडा मास्तरीन बाय तुम्ही त्या दिवशी ती कॅसेट घेऊन या आणि हा ते छापायचं काम ते तुम्हीच बघा मी मान डोलावली करून घ्यायला ते तयार झाले तर फार नाही सहाशे रुपये त्यांच्याकडून मागायचं मी ठरवलं खर्च वजा जाता पाचशे रुपये तरी मला उरले पाहिजे. मंगलाष्टकं चांगली आठ कडव्यांची करायची असे मी ठरवलं. एकदा तर मराठीच्या तासाला वर्गामध्ये मुलींनो खालील ओळीचा अन्वार्थ लिहा असे म्हणून प्रसन्न वदना प्राची येऊन, कुंकुम भाळी गेली रेखूनी…. या ओळी सांगितल्या. मुली एकदम ओरडल्या, बाई! बाई! ही कविता कुठे आहे आम्हाला? मग लक्षात आलं मंगलाष्टकातल्या ओळी चुकून बाहेर पडल्या होत्या.

असे तीन-चार दिवस गेले एके दिवशी पुष्पा आपल्या सगळ्या मैत्रिणी मैत्रिणीचा तांडा घेऊन माझ्याकडे आली आणि सगळ्या मैत्रिणींची नावे मंगलाष्टकात आली पाहिजे असे लडिवाळपणे सांगून गेली. दुसऱ्या दिवशी वसंता – पुष्पीचा भाऊ आला आणि आपल्या सगळ्या गॅंगची नावे मंगलाष्टकात आलीच पाहिजे असे धमकावून गेला. त्यानंतर पुढच्या चार दिवसात तर पुष्पाचे काका, काकू, मामा, मामी, आत्या, आजोबा, मावशी- मावसा, जवळचे- दूरचे बहीण-भाऊ माझ्याशी पायधूळ झाडून गेले. त्या साऱ्यांना त्यांची नावे मंगलाष्टकात यायला हवी होती. त्या साऱ्यांचा आतिथ्य करता करता माझा चहा साखर आणि पोह्याचा महिन्याचा स्टाॉक चार दिवसातच संपून गेला. मी आपली सगळ्यांची नावं हाताश पणे लिहून घेत होते. शेवटी मंगलाष्टकं तयार झाली. त्याची एक चुणूक….

आली मंगलवेळ आज नटली ही नोवरी सुंदरी 

प्रेमा कमा निर्मला तशी आणिक ती कस्तुरी 

शामा निमा शुभांगीनी नि यमुना ती नर्मदा गोदावरी 

उषा कुसुम सुशील जमल्या लेवूनी वसने भरजरी 

नाझरे पाटील पहा आले मल्हार राया घेवोनिया 

जगतापांचे सखारामही असतीच मंडपी आशीर्वाद ते द्यावया

अनिल सुनील कुणाल कमाल ऋषीही आजची दैवते

वसंत अशोक प्रभा गणा निनुरूपे मंडपी या नांदते…

तर अशाच प्रकारच्या मंगलाष्टकातल्या साऱ्या ओळी जमल्या. समोरची संगीता नक्की मंगलाष्टक म्हणेल. तिचे मास्तर पेटी वाजतील तिला साथीला तब्बलजी असतातच. संगीताच्या चालीवर शेवटी मंगलाष्टक रेकॉर्ड झाली. लग्नाच्या दिवशी सकाळी कॅसेट वसंताच्या ताब्यात दिली. ऐनवेळी गडबड नको म्हणून मंडपाच्या उजव्या हाताला असलेल्या खोलीत आम्ही ती लावून पाहिले.

आली मंगलवेळ आज नटलीही नोवरी सुंदरी….. हे सूर ऐकू आल्याबरोबर मंडपातलं पब्लिक लग्न उजव्या बाजूला खोलीत लागले काय असं वाटून उभे राहून मी मान उंचवून खोलीकडे पाहू लागलं. कुणी कुणी त्या दिशेने अक्षताही फेकल्या. नवरदेव मंडपाच्या टोकाला असलेल्या बोहल्या वरच्या मखमली खुर्चीत बसून होता. तोही गडबडीने त्या दिशेने बघत भराभरा पाटावर येऊन उभा राहिला. पब्लिकची गडबड बघून मी वसंताला खूण केली व वसंताने टेप बंद केला. त्याने कॅसेट काढून घेतली आणि टेप रेकॉर्डर मंडपात आणला. शुभमंगल सावधान… असे ओरडून कोण मंगलाष्टक म्हणणार आहे? भठजींनी विचारलं. त्याबरोबर प्रभ्याने टेप चालू केला. टेपच्या गळ्यातून शब्द उमटले *मै क्या करू मुझे बुड्ढा मिल गया*तशाही स्थितीत किन्या वगैरे वसंताच्या गॅंगचे मेंबर्स बोटाने किंवा पायाने ताल देऊ लागले. वसंताने टेप बंद केला. खोलीतून बाहेर येताना मंगलाष्टकाची कॅसेट प्रभ्याच्या खिशात राहिली व गडबडीत हातातली कॅसेट लावली गेली. ती काढून मंगलाष्टकाची कॅसेट रेकॉर्डरमध्ये घातली. त्या गडबडीत पाॉझचं बटन दाबलं गेलं. टेप केला पण कॅसेट पुढे सरकेचना. ऐन वक्ताला याच्या नरड्याला काय झालं कुणास ठाऊक! रोग पडला मेल्याला! असा टेप रेकॉर्डरचा उद्धार करीत कमळाबाईंनी आपल्या लेकीला फर्मावलं “म्हण ग कांचे तूच आता… मंगलाष्टकाचे छापील कागद वाटण्याचे काम वसंतांच्या गॅंगने चोख बजावलं होतं. कांचीन आपल्या कापऱ्या आवाजात मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. सर्वांना आपापली नावं ऐकून धन्य झालं. श्रीपतराव बोंद्रे, नाझरे पाटील, सखाराम जगताप यांच्यापैकी कोणी आलंच नव्हतं. पण ते आशीर्वाद देण्यासाठी हजर आहेत असं कांचीने म्हणून टाकलं.

मुहूर्ताची वेळ झाली भटजींनी आंतर पाट दूर केला. ” वाजवा रे वाजवा” म्हटल्यावर ताशे तडतडू लागले. बँड वाजला, पण “हाती घ्याल ते तडीस न्या”या न्यायाने कांचन आपली मंगलाष्टकं म्हणतच होती. इकडे वधू-वरांनी एकमेकांना हार घालून पेढे भरवले. कांचन मंगलाष्टकं म्हणतच आहे. पुरी आठ कडवी म्हणून झाल्यावरच ती थांबली.

आता वसंताच्या मित्रमंडळींना टेप रेकॉर्डर कडे बघायला फुरसत मिळाली. पॉझचं बटन दाबलेलं आहे हे पाहताच त्यांची हसता हसता पुरेवाट झाली. त्यांनी टेप रेकॉर्डर पुन्हा चालू केला आत मंगलाष्टकाची कॅसेट असल्याने पुन्हा सर्वांनी ऐकलं. ” आली मंगलवेळ आज नटली ही नोवरी….

 मंडपात आता पंगत बसली होती. इतक्यात प्रवेशद्वारापाशी गडबड झाली. ठेवण्यातलं रुंद हास्य करत अण्णासाहेब पुढे गेले. आमदार, खासदार, जिल्ह्याचे अध्यक्ष कामामुळे थोडे उशीरा आले होते. खाशा लोकांची पंगत वर होती. त्यांना हवं नको बघायला वहिनी साहेबाबरोबर मीही वरच होते. अण्णासाहेब म्हणाले “आपण तांदूळ टाकायचे टायमाला आला नव्हता मंगलाष्टकं लई बेश्ट झालीत. “वशा लाव रं तुझे टेप रेकॉर्डर… ” आणि मंडपातल्या लोकांनी पुन्हा तिसऱ्यांदा मंगलाष्टकं ऐकली. आता दुसऱ्या कडव्यातच श्रीपतराव मल्हारराव सखाराम आशीर्वाद घेऊन जातात ते बरं झालं ते बंद झाल्यावर अण्णासाहेबांनी ती लई बेस्ट मंगलाष्टके बंद करण्याचा हुकूम सोडला. वर खाशा पंक्तीत बसलेली श्रीपतराव, मल्हारराव ही बडी मंडळी मंगलाष्टका बद्दल काही बोलतात का? याची मला नकळत उत्सुकता लागून राहिलेली होती‌. मी दाराआडच होते. त्याचवेळी मला पुढील संवाद ऐकू आला “काय हो अण्णासाहेब मंगलाष्टका कुणी केल्या “? हा आवाज बहुतेक खासदार सखाराम बापूंचा असावा. “आहेत आमच्या वर्गातल्या मास्तरीणबाई! राजू, जारे इजुताईस्नी बोलावून आण.

” नको नको राहू दे.. आमच्यासाठी पण मंगलाष्टका करून देतील काय? “

” आता कुणाच लग्न काढलं? तुमच्या सगळ्या मुला मुलींची झाली ना लग्न? ” “आमच्यातली झाली हो, आमची धाकटे बंधू अनंतराव… त्यांच्या थोरल्या लेकाचं लगीन काढलंय. ” 

“अरे वा वा वा! ब्येस. ते मंगलाष्टकाचं माज्याकडं लागलं. मी सांगतो इज्युताईस्नी “

 “त्या पैशे किती मागतील?

 “पैशाचं काय? आपल्यासारख्यानं मंगलाष्टकं करायला सांगितली हाच त्यांचा सन्मान हाय. त्ये समदं म्या बघतो. ” अण्णा साहेबांनी अशी माझ्या वतीने त्यांना खात्री देऊन टाकली. त्यावर सखाराम बापू म्हणाले “मंगलाष्टकात तेवढं आपल्या बाबुरावांचं झालं तर आपल्या पक्षाध्यक्षांचं आणि आपल्या शी. एम. चं नाव तेवढं त्या घालायला सांगा. लग्नाच्या टायमाला शी. एम. त्या भागात दौऱ्यावर हाईत. हे ऐकल्यावर कितीतरी वेळ अण्णा साहेबांचा आ मिटला नाही. आणि त्या दुसऱ्या मंगलाष्टकाच्या कल्पनेने माझ्या डोक्याला लागलेल्या मुंग्या हटल्या नाहीत.

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments