डॉ. जयंत गुजराती

❤️ जीवनरंग ❤️

☆ अस्तित्व… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

तो जेव्हा माझ्या क्लिनीकमधून बाहेर पडला तेव्हा मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतिकडे एकटक बघत राहिलो. चाळीस वर्षांपूर्वी तो जसा होता तसा आजही तसाच होता. केवळ मधे दिवस, महिने वर्षं गेलीत म्हणून वय वाढलं म्हणावं इतकंच. तो यत्किंचितही बदलला नव्हता. तोच ताठ कणा, तीच दमदार चाल, तेच शरीरसौष्ठव. केवळ अधूनमधून मला भेटायची हुक्की येते, तर तेव्हा तो उगवतो. भेटल्यावर वीसेक मिनिटं ऐसपैस गप्पा मारून निघून जातो. याचं त्याला कोण समाधान. म्हणतो, “डाक्टरसाब, आप से बात करने में जो मजा आता है वो और कहीं नहीं। ” त्याची वैचारिक भूक भागवण्याची जबाबदारी जणू माझीच. तो येतो तेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये दंगल ठरलेलीच. इतर पेशंट बाहेर ताटकळत असलेले, याचं भान दोघांनाही उरत नाही. बाहेर मात्र, आत फार मोठ्या गंभीर गोष्टीवर चर्चा चालू असल्याची हवा. तो बाहेर पडतो तेव्हा तो हसतमुख. मग सगळेच चाट पडतात. मीही तसा दिलखुलास. इतकी कडाक्याची चर्चा होऊनही काहीच घडलं नाही असं दिसल्यावर आश्चर्यच आश्चर्य क्लिनिकभर. स्वतःच्या कारचा दरवाजा उघडून तो आत बसला तोपर्यंत माझी नजर त्याच्यावर खिळलेली. तो गेल्यावर, मी म्हणायचो, “नेक्स्ट, ” आजही तसंच म्हटलं.

चाळीसेक वर्षांपूर्वी मध्यमवयीन आजारी आईला घेऊन तो आला होता तेव्हापासूनचा आमचा दोस्ताना. आई सतत आजारी असायची. तेव्हा एकतर तो आईला घेऊन क्लिनीकला यायचा वा मी त्याच्या आलिशान घरी व्हिजिटला. आईचा आजार हा दुर्धर असून ती फार काळ जगणार नाही हे कितीदा तरी सांगून झालं होतं. आम्ही आमच्यापरीने प्रयत्न करतोय पण सर्व देवावरच हवाला, हेही कितीदा तरी सांगून झालं होतं, पण त्याचं उत्तर ठरलेलं व ठाम, “मी देवाला मानत नाही! तिचं आयुष्य असेल तितकं ती जगेल. निरोप घ्यावासा वाटला तर ती घेईल! ” इतकं साधं सरळ उत्तर ऐकून मी चाट पडलो होतो. देवाला मानत नाही असं त्याने म्हटल्यावर धक्काच बसला होता. म्हणजे तू नास्तिक आहेस! ! असं मी म्हटल्यावर, “असं तू म्हणतोस, मी स्वतःला नास्तिकही म्हणणार नाही. ” नंतर मी काहीसा वाद घातला पण एकूण तो मला भावला. आजारी आईच्या निमित्ताने तो सारखा भेटायचा. त्याच्या आईने व देवाने माझं भाकित खोटं ठरवण्याचा चंगच बांधला होता. ती चक्क तीस वर्षं जगली आजारासकट. मात्र आमचे संबंध सुदृढ करत गेली.

इंडस्ट्रीयल झोनमधे त्याने स्वतःचं एक छोटं युनिट टाकलं होतं स्वतःच्या हिंमतीवर. एक युनिक प्रॉडक्ट तो काढायचा. देशभर त्याची मागणी असायची, कारण ते प्रॉडक्ट त्याने पहिल्यांदा भारतात आणलं होतं. त्याची मशिनरीही विदेशातून आणली होती. चाळीस वर्षांपूर्वी तशी मशिनरी आणायची हिम्मत इतरांकडे नव्हती. याने जम बसवलाच पण बक्कळ पैसाही कमवला. मालाचा दर्जा सांभाळत नावही कमावले. सतत नवनवीन टेक्नोलॉजीच्या पाठीशी धावणारा. त्यानिमित्ताने देशविदेशाचे दौरे ठरलेलेच. निम्मं जग पालथं घातलं म्हणा ना. प्रत्येक दौऱ्यानंतर तेथल्या घडामोडी क्लिनीकमधे येऊन सांगणारच. जगात कुठे काय चाललंय याचं वेगळंच आकलन त्यामुळे व्हायचं. तो कधीही यशामागे धावला नाही. यश मात्र त्याच्यामागे धावत राहिलं.

कितीही यश मिळाले तरी ते कधीही त्याच्या डोक्यात गेलं नाही. तो आपल्या मुलुखावेगळ्या विचारांवर कायम राहिला. मूळचा तो पंजाबी. ना कधी तो मंदिरात गेला ना गुरूद्वारात. बायको, मुलांना मात्र स्वातंत्र्य दिलेलं. आपलं मत कधीही त्यांच्यावर थोपलं नाही. मुलं मोठी होऊन कॅनडात गेली. त्यांची मर्जी म्हणून याने तेही स्वीकारलं. इंडस्ट्रीच्या संस्थांमधे, त्यांचे कार्यक्रम, मिटींगांमधे हा कधीही गेला नाही. बकवास है सब! ! म्हणायचा. एकटं राहणं, पुस्तकं वाचणं, जगजीतसिंह, गुलजार जीव की प्राण. रात्री दहा वाजले की मोबाईल स्विच ऑफ. नवरा बायको दोघांच्या हाती ग्लास! एका वेगळ्या ब्रँडची व्हिस्की त्यांच्या हाती वर्षानुवर्षे. महिन्यातून एकदा मोजक्याच मित्रमंडळींना पाजायचा स्वखर्चे. मग त्या बैठकीत ही वाद ठरलेलेच. एकदा गणपतीचे सुरेख पेंटिंग त्याच्या घरी हॉलमधे लावले गेले तेव्हा मोजक्याच मित्रमंडळींमधे खळबळ उडाली होती. ते सुरेख पेटिंग आहे.. त्यापलिकडे काही नाही ही त्याची मखलाशी. त्याचं कलासक्त असणं तर खरंच बेमिसाल. एखादी कलाकृती आवडली की त्यासाठी वारेमाप उधळपट्टी करणार हे ठरलेलेच.

देवावरचा विश्वासच काय, त्याचे अस्तित्व नाकारणे यावरून मी त्याला कितीतरी वेळा छेडलंय. मी पक्का आस्तिक तर तो इहवादी. तो म्हणायचा, “ तू तुझ्या मतांवर ठाम रहा, मी माझ्या! ” त्याचं म्हणणं खोडणं माझ्या जीवावर यायचं. एकदोनदा मात्र मी बोलून गेलो होतो की “टाईम विल टीच यू अ लेसन! ” यावर तो मोकळेपणाने हसला होता.

आजही तो माझ्याशी बराच वेळ बोलत बसला होता. सत्तरीच्या जवळपास आम्ही दोघं आलेलो. आयुष्य मनमुक्त जगलेलो. कसलीही खंत वा किल्मिष नसलेले. हा नास्तिक असला तरी त्याची बायको दुप्पट आस्तिक होती हे मला ठाऊक असलेलं. त्याच्या बायकोच्या पुण्याईवरच याने आयुष्य निभावून नेलंय हे माझं ठाम मत. मात्र तसं मी सांगितल्यावर तो खळखळून हसायचा. आज त्याने रिपोर्ट दाखवायला मोबाईल उघडला तर मोबाईलच्या स्क्रीनवर शंख, चक्र, गदा, पद्मधारी विष्णू! हे चित्र तसं होतं सुरेखच! ! पण ते नेहेमी त्याच्या बायकोच्या मोबाईल स्क्रीनवर असते. आज याच्या मोबाईलमधे कसे? मी विचारात पडलो. नेहेमी तावातावाने वाद घालणारे आम्ही, पण आज तसं विचारायची माझी हिंमत झाली नाही. न विचारलेलंच बरं मनाशी ठरवलं. पाठमोरा होत तो निघून गेला तेव्हा त्याचा ताठ कणा आज ही मला खुणावत होता. तो तसाच रहावा असं आतून आतून वाटत राहिलं.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments