श्री विश्वास देशपांडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ प्रसन्न वदने… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

“सुनीता, चहा आणतेस का जरा ? आणि येताना पाणी पण घेऊन ये, ” रमेशरावांनी बाहेरच्या पोर्चमधून आवाज दिला. दुपारी थोडा वेळ झोपायचं आणि उठल्यावर बाहेर पोर्चमध्ये येऊन बसायचं. बाहेर खुर्च्या टाकलेल्याच असायच्या. रमेशराव आपलं एखादं आवडतं पुस्तक किंवा वर्तमानपत्र घेऊन बाहेर बसायचे. हा त्यांचा रोजचा आवडता उद्योग होता.

त्यांच्या घराच्या बाहेर छोटासा पोर्च होता. आजूबाजूला छोटीशी बाग होती. बागेतील फुलझाडे सुनीताबाईंनी मोठ्या आवडीने लावली होती. बाहेरची मोकळी हवा त्यांना फार आवडायची. सुनीताबाईंनी चहा आणि सोबतच रमेशरावांना आवडणारी बिस्किटे पण आणली.

सुनीताबाई आणि रमेशरावांची मुलं पुण्याला होती. ते अधूनमधून पुण्यात जात असत. जाताना किंवा येताना ते वाटेतील सुपा गावात थांबून तेथील बेकरीत चांगल्या तुपापासून बनवलेली खास कणकेची बिस्किटे घेत. ही बिस्किटे रमेशरावांची फार आवडती.

चहा बिस्किटांचा आस्वाद घेता घेता रमेशराव म्हणाले, “मग काय प्लॅन आता ? नवरात्र जवळ आलंय. लगेच दसरा आणि दिवाळी. ” 

“अहो, खूप कामं आहेत. एवढं मोठं घर आपण घेतलं. त्यावेळी छान वाटलं. पण आता नाही आवरणं होत हो माझ्या एकटीनं. इतके दिवस केलं सगळं, ” सुनीताबाई म्हणाल्या.

“अगं, खरंय तुझं. पण तू एकटी कशाला करतेस सगळी कामं ? आपल्या त्या धुणीभांडे करणाऱ्या रमाबाई आहेत ना, त्यांना किंवा त्यांच्या मुलीला घे की मदतीला, ” रमेशराव.

“बघू या. मी विचारीन त्यांना. पण आता रमाबाईंकडून जास्त काम होत नाही. त्यांची मुलगी पण या वर्षी बारावीला गेलीय. ती तिचा अभ्यास सांभाळून त्यांना कामात मदत करते. मुलगा कोणाकडे तरी कामाला नुकताच लागलाय. पण त्याला फार काही पैसे मिळत नाहीत. नवऱ्याचेही फारसे उत्पन्न नाही. एवढ्या महागाईत चार जणांचा संसार कशीतरी करते बिचारी, ” सुनीताबाई म्हणाल्या.

“हो ना, सुनीता. अगं कमाल आहे या लोकांची. एवढ्याशा मिळकतीत कुरकुर न करता आनंदानं राहतात. आणि काही लोकांना बघ, कितीही पैसा मिळाला तरी त्यांची हाव संपत नाही, ” रमेशराव म्हणाले.

बोलता बोलता सुनीताबाईंचं मन भूतकाळात गेलं. त्या लग्न होऊन सासरी आल्या होत्या, तेव्हा अगदी छोटंसं घर होतं त्यांचं. सरळ एका रेषेत असलेल्या तीन खोल्या. घर छोटं असली तरी त्यात चैतन्य नांदत होतं. काही लोक तर त्याला आगगाडीचा डबा म्हणायचे. पण त्या घरातही त्या खुश होत्या. त्या छोट्याशाच घरात सात माणसे एकत्र राहत होती. सासू सासरे, दोन लहान दीर, एक नणंद.

परिस्थिती जेमतेमच होती. सासरे निवृत्त झाले होते. त्यांची पेन्शन तुटपुंजी होती. रमेशराव तर त्यावेळी एक साधे कारकून म्हणून काम करीत. पण सुनीताबाई कष्टाळू होत्या. त्यांनी शिक्षिकेची नोकरी करून घराची परिस्थिती सावरली. यथावकाश त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. शाळेतील मुलांना घडवताना या फुलांकडे देखील त्यांनी लक्ष दिले. मुलं पण हुशार आणि हरहुन्नरी होती.

काही वर्षांनी नणंदेचे लग्न होऊन ती सासरी गेली. दोन्ही लहान दिरांचे शिक्षण पूर्ण होऊन ते नोकरीसाठी दुसऱ्या गावी निघून गेले होते. आता सासू सासरेही आता कधी या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे असायचे. घरात आता चौघेच होते. थोडी आर्थिक सुबत्ता आली होती. रमेशरावांनी आता बँकेकडून कर्ज घेऊन एक छानसे बंगलीवजा घर घेतले होते.

दिवस भराभर जात होते. या नवीन घरात सुनीताबाईंनी सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या करून घेतल्या होत्या. आता चार पाहुणे आले तरी सगळ्यांची छान व्यवस्था होत होती. पण लवकरच मुले शिकून मोठी झाली. यथावकाश लग्नं होऊन आपापल्या संसारात ती रमली. रमेशराव आणि सुनीताबाई दोघंही आपापल्या जबाबदारीतून निवृत्त झाली होती. आता पुन्हा एवढ्या मोठ्या घरात रमेशराव आणि सुनीताबाई असेच दोघे उरले.

रमेशराव मोठ्या अधिकारपदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी पासष्टी ओलांडली होती आणि सुनीताबाईंची एकषष्ठी. मुलांनी दोघांचीही पासष्टी आणि एकषष्टी नुकतीच थाटामाटात साजरी केली होती. वयाच्या मानाने दोघांचेही आरोग्य उत्तम होते. रमेशराव सकाळी योगासने, प्राणायाम करीत. संध्याकाळी नियमितपणे फिरायला जात असत. त्यांचे मित्रमंडळ मोठे होते. महिन्यातून एकदा तरी सगळे मित्र मिळून कुठेतरी सहलीसाठी जात असत. सुनीताबाई देखील जवळच असलेल्या एका ठिकाणी योगवर्गासाठी जात असत.

 

“सुनीता, अगं कुठे हरवलीस ? चहा गार होतोय, ” रमेशरावांच्या शब्दांनी त्या भानावर आल्या. त्या कपबशा घेऊन घरात गेल्या आणि रमेशरावांनी पुन्हा आपल्या आवडत्या पुस्तकात लक्ष घातलं.

घरात गेल्यावर सुनीताबाईंना आपलं साड्यांचं कपाट दिसलं. दरवर्षी त्या आपल्या वापरलेल्या साड्या कुणाकुणाला काही निमित्ताने देत असत. तरी त्यांच्याकडील नवीन साड्यांमध्ये या ना त्या निमित्ताने भरच पडत असायची. गौरीच्या वेळी गौरीसाठी म्हणून साड्या घेतल्या जायच्या किंवा कोणीतरी गौरींसाठी भेट म्हणून द्यायचे. शिवाय वेळोवेळी कुठल्या तरी निमित्तानं साडी खरेदी व्हायचीच.

आता नवरात्रीचा सण चार दिवसांवर आला होता. नवरात्रीच्या नऊ दिवसात वेगवेगळ्या रंगांच्या साड्या हव्यातच नेसायला. तशी त्यांच्याकडे साड्यांची कमी नव्हती. पण प्रत्येक वेळी त्यांना नवीन साडी हवी असायची. आता सणासुदीनिमित्ताने दुकानांमध्ये सेलचे बोर्ड लागले होते. सुनीताबाईना नवीन साडी खरेदीची उत्सुकता होतीच. उद्या काही झालं तरी आपण साडी खरेदीसाठी जायचंच असं त्यांनी ठरवलं.

रमेशरावांना मात्र कपडेलत्ते, सोने आदी गोष्टीत फारसा रस नव्हता. पण त्यांनी सुनीताबाईंना कधी अडवलं मात्र नाही. आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेतील पंधरा ते वीस टक्के रक्कम ते सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी खर्च करत.

सकाळी कामासाठी म्हणून रमाबाई आल्या. त्यांच्या अंगावर एक जुनी जीर्ण झालेली साडी होती. बहुधा त्यांना मोजक्याच दोन तीन साड्या असाव्यात. त्याच त्या आलटून पालटून वापरत. सुनीताबाईंनी मनाशी काहीतरी ठरवले. रमेशरावांना तर साडीखरेदीसाठी बरोबर जाणे फारसे आवडत नसे. त्यामुळे त्यांनी यावेळी रमाबाईंना बरोबर घेऊन जायचं ठरवलं.

“रमाबाई, आज दुपारी मी साडी खरेदीसाठी दुकानात जाईन म्हणते. यांना बहुतेक माझ्यासोबत यायला काही जमणार नाही. आपण दोघी जाऊ. याल का ?” सुनीताबाईंनी विचारले.

“तशी मला कामं हायती पण येईन म्यां तुमच्याबरोबर, ” रमाबाई म्हणाल्या.

बरोबर चार वाजता रमाबाई आल्या. ऑटो करून दोघीही एका साड्यांच्या भव्य दालनात गेल्या. साड्यांचा नवीन स्टॉक आला होता. दुकानात साड्या खरेदीसाठी गर्दी होती. कामाला असलेली मुले, माणसे साड्या दाखवत होती. साड्यांचा ढीग सुनीताबाई आणि रमाबाईंसमोर होता. त्यातून आपल्या पसंतीच्या साड्या त्या पाहत होत्या.

सुनीताबाई रमाबाईंना म्हणाल्या, “रमाबाई, यावेळी तुमच्या पसंतीच्या साड्या घ्याव्या म्हणते. त्यामुळे तुमच्या पसंतीच्या दोन तीन साड्या काढा. रोज वापरता येतील अशाच हव्यात. “

सुनीताबाई आपल्या पसंतीच्या साड्या घेणार याचा आनंद रमाबाईंना झाला. त्यांनी मोठ्या आनंदानं तीन साड्या निवडल्या. साड्यांचा रंग, पोत, किनार आदी गोष्टी सुनीताबाईंना शोभून दिसतील अशा विचाराने त्यांनी त्या निवडल्या. दुकानदाराला बिल देऊन सुनीताबाई ऑटोने पुन्हा घरी आल्या. वाटेत रमाबाईंना सोडलं. यावेळी त्यांच्या मनात काही वेगळेच विचार होते.

घरी आल्यावर त्यांनी पाहिले तर घराला कुलूप होते. रमेशराव कुठेतरी बाहेर गेले असावेत. त्यांनी आपल्या जवळच्या चावीने दार उघडलं. थोड्याच वेळात बेल वाजली. रमेशराव आले होते. त्यांच्या हातात सुनीताबाईंची जुनी सायकल होती. सुनीताबाईंनी विचारलं, “अहो, ही सायकल कुठे घेऊन गेला होतात ?” 

“सुनीता, अगं ही सायकल आता तू वापरत नाहीस ना ? तशीही कधीची पडूनच आहे. मग आपल्या रमाबाईंची मुलगी वापरेल असे वाटले. तिला कॉलेजला जायला तरी उपयोगी पडेल म्हणून रिपेअर करून आणली. तुझी काही हरकत नाही ना ?” 

“अहो, माझी कसली आलीय हरकत ? त्या सायकलीचा वापर तरी होईल. आपल्या वस्तूंचा लोभ तरी किती धरायचा! आणि ती वस्तू जर कोणाच्या तरी उपयोगी पडणार असेल तर त्यापरीस आनंद तो कोणता ?” सुनीताबाई म्हणाल्या.

“उद्या नवरात्र बसतंय. रमाबाईंबरोबर त्यांच्या मुलीला, पूजालाही सकाळी बोलावून घे. म्हणजे तिला ही सायकल देता येईल. ” रमेशराव म्हणाले.

सुनीताबाईंनी लगेच रमाबाईंना फोन करून सकाळी पूजाला घेऊन या म्हणून सांगितलं.

नवरात्रीचा आज पहिला दिवस होता. रमेशरावांनी यथासांग पूजा करून घटस्थापना केली. तेवढ्यात रमाबाई आणि त्यांची मुलगी अशा दोघीही आल्या. रमेशरावांनी त्यांच्या मुलीजवळ सायकलची चावी दिली. “पूजा बेटा, आजपासून ही सायकल तुझी. कॉलेजला जायला यायला उपयोगी पडेल. चांगला अभ्यास कर. खूप मोठी हो. ” 

पूजा घरच्या परिस्थितीमुळे आजपर्यंत सायकलही घेऊ शकली नव्हती. कॉलेजला पायी जावे लागे. आज अचानक ही भेट पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

सुनीताबाई म्हणाल्या, “रमाबाई, थोडं थांबा. ” त्या घरातून साड्यांची पिशवी घेऊन आल्या. रमाबाईंच्या हातात ती पिशवी देत म्हणाल्या, “रमाबाई, तुमच्या साड्या जुन्या झाल्या आहेत. आता या नवीन साड्या वापरा. “

रमाबाईंचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. त्या म्हणाल्या, “ताई, आपण या साड्या तुमच्यासाठी घेतल्या होत्या. त्या मला कशापायी देताय ? मला हायती साड्या रोजच्या वापरासाठी. ” 

“नाही रमाबाई, काल मी तुम्हाला सांगितलं नाही. पण तुमच्या पसंतीच्या या साड्या तुमच्यासाठीच घेतल्या. आजपासून नवरात्र सुरु होत आहे. तुम्ही या साड्या वापरा. नाही म्हणू नका. ” सुनीताबाई म्हणाल्या.

रमेशराव थक्क होऊन सुनीताबाईंकडे पाहत होते. आजपर्यंत सुनीताबाईंनी असे कधी केले नव्हते. दर वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने त्यांची नवीन साड्यांची खरेदी असायचीच. ते सुनीताबाईंना म्हणाले, “अगं, रमाबाईंना साड्या दिल्यास, छानच केलंस. पण तुझ्यासाठी काही आणल्यात की नाही ?” 

सुनीताबाई म्हणाल्या, “मला भरपूर साड्या आहेत. त्यामुळे यावर्षी नवीन नको असे ठरवलं. साड्यांची खरी गरज रमाबाईंना आहे. त्यांना साडी नेसवून यावर्षी नवरात्र साजरं करावं असं मला वाटलं. ” 

“अति उत्तम विचार! रमेशराव म्हणाले. त्यासाठी तुझं अभिनंदन! “

रमाबाई आणि पूजा भारावलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. काय बोलावं हे त्यांना कळेना. रमेशराव आणि सुनीताबाईंचं हे अनोखं रूप त्यांना नवीन होतं. अशीही माणसं या जगात आहेत ही परमेश्वराची केवढी कृपा! त्या विचार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सुनीताबाईंच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण काहीतरी चांगलं केल्याचं समाधान झळकत होतं.

बाहेर कुठेतरी देवीची आरती सुरु होती. आरतीचे सूर निनादत होते. “प्रसन्न वदने प्रसन्न होसी…. “

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments