श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ! श्री संभाजी बबन गायके 

दादांनी काकडा ज्योती पांडुरंगाच्या मुखासमोर धरून हळूहळू ओवाळले… डोळे मिटून विटेवरी उभे असलेले ते सावळे वात्सल्यब्रम्ह खरोखरीच डोळे उघडून आपल्याकडे बघते आहे, असा तिला भास झाला आणि ती हरखून गेली ! त्यात दादांचा त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातून उमटणारा आणि राऊळाच्या गर्भगृहात घुमणारा आवाज….

‘उठा पांडुरंगा.. आता दर्शन द्या सकळा…

झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ! ‘

आज पहाटे दादांची निद्रेची वेळा मात्र पांडुरंगाच्या वेळेच्या खूप आधी सरलेली अरुंधतीने ऐकली होती. काल रात्रीच अरुंधती दिवाळीसाठी म्हणून गावी आली होती. आई, वडील आणि धाकट्या बहिणीसोबत. अशोकला जास्त दिवस सुट्टी नव्हती म्हणून तो दोनच दिवसांनी परतणार होता. अरुंधतीची तिच्या कळत्या वयातली ही पहिलीच आजोळ भेट. घरात शिरताच कणग्यांत भरून ठेवलेल्या तांदळाच्या सुगंधाने ती वेडावून गेली होती. त्यात गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या गळ्यातील घंटेचा आवाज… घरामागचा ओढा…. खळाळता !.. अरुंधती आज्जीच्या पांघरुणात तिला बिलगून झोपली होती. अरुंधती म्हणजे दादांच्या एकुलत्या एका लेकाची, अशोकची लेक. तिसरीत शिकणारी.. दूरच्या शहरात. अशोक दूर गुजरातेत पोटामागे गेलेला होता पत्नीसोबत. अरुंधती त्याची धाकटी मुलगी.

दादा मोठ्या उत्सुकतेने कोजागिरीची वाट पाहत असत. त्यांच्या ओसरीवर मसाला दूध प्यायला गावातल्या सर्व माळकरी मंडळींना आवर्जून बोलवायचे आणि ‘ उद्या वेळेवर या रे काकड्याला ! ‘ असा प्रेमळ आग्रह करायचे. दिवसभर शेतात राबून रात्री अंथरुणावर पडताच झोपेच्या अधीन होणाऱ्या कष्टकरी माणसांना सकाळी लवकर उठणं कठीण… पण दादांनी त्यांना भजनाची गोडी लावली होती. त्यामुळे देऊळ भरलेले असायचे. त्यांनी स्वतः उभ्या आयुष्यात एक दिवसही काकडा चुकवला नव्हता…. वयाची पासष्टी उलटून गेली होती तरी. दादांचे कुटुंब अर्थात वनिताबाई तशा कमी शिकलेल्या, पण गावातल्या बायकांच्या आधारे घर, दार पहात. वृत्तीने शांत आणि मनाने माया करणाऱ्या. अत्यंत सुबत्ता असलेला काळ त्यांनी पाहिला आणि अनुभवला होता. पण आताच्या त्यामानाने हलाखीच्या परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले होते. अशोकला दुसरी मुलगीच झाल्याने वनिताबाई सुरुवातीला काहीशी खट्टू झाल्या होत्या मनातून. तसे दोन्ही दिरांच्या मुलांना मुलगे झाले होते. पण आपल्या मुलाचा वंश पुढे चालायचा असेल तर मुलगा हवाच अशा जुन्या पण साहजिक विचारांची ती साधी बाई.

दादांचे पाठचे दोन भाऊ पोटामागे शहरात निघून गेले होते… पर्याय नव्हता! पण मग भाताची उरली सुरली खाचरं राखायची कुणी? बरीच जित्राबं गावात कुणा कुणाला देऊन टाकली असली तरी दुधासाठी एक म्हैस आणि औतकाठीसाठी एक बैल जोडी मात्र दादांनी आग्रहाने ठेवून घेतली होती. भावांची मुलं जिकडे गेली तिकडचीच झाली. दादांच्या दोन्ही बहिणी दूर दिल्या होत्या तिकडे कर्नाटकच्या सीमेवरच्या गावांत.. त्यांची गावी ये जा अभावानेच होई. अशोकचं शहरात काही फार बरं चाललं होतं असं नाही. भाड्याच्या खोल्या आणि फिरस्तीची नोकरी. दोन्ही मुलींचं शिक्षण आणि तत्सम गोष्टींचा खर्च नाही म्हणलं तरी बराच असतो.

दादांनी उठून अंगणात चूल पेटवली. पाणी तापवायला ठेवलं. गुरांना वैरण घातली तशी म्हैस आणि दोन्ही बैल उठून बसले. त्यांच्या आवाजाने अरुंधती जागी झाली.

“आजोबा इतक्या लवकर कशाला हो उठलात? किती थंडी वाजते आहे! “ अरुंधती म्हणाली. तसे दादा हसले…” अगं काकड्याला जायचंय… देवाला उठवून न्हाऊ घालायला मग त्याच्या आधी नको आवरून व्हायला? येतेस माझ्यासोबत?” अरुंधती डोळे चोळत अंगणातल्या चुलीपाशी आली आणि हात शेकत बसली. जळणाऱ्या लाकडांचा वास तिला मोहवून गेला… चुलीच्या उजेडात तिचे आजोबा तिला आणखी छान दिसले… त्यांच्या डोळ्यांत लाल उजेड दिसला तिला. तोवर आज्जीबाई धडपडत उठल्या होत्याच. त्यांचे पाय सुजले होते पण काकड्याची तयारी तर त्याच करून द्यायच्या… वाती, उगाळलेले चंदन, फुलं, प्रसाद आणि विठोबा रखुमाईसाठी रोज नवा पोशाख. वनिता बाई मोठ्या हौसेने सारं करायच्या अरुंधतीचे आई बाबा, आणि धाकटी बहीण अजून अंथरुणात होते… ओसरीवर टाकलेल्या.

“आजोबा, मी येऊ तुमच्या सोबत?” अरुंधती म्हणाली.

“नको राजा. खूप थंडी आहे. देवळात जायचं म्हणजे आधी आंघोळ करावी लागेल. “

अरुंधती दादांच्या आधी न्हाणीत जाऊन बसली… दादांनी आज मग पाणी जास्त गरम होऊ दिले आणि आजोबा आणि नात त्या थंडीत एकमेकांच्या अंगावर पाणी घालीत न्हाऊ लागले… दादांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली होतीच… पाण्याचा आणि मंत्रांचा आवाज एकमेकांत मिसळून गेले !

अरुंधतीने दिव्याचे ताट आपल्या हाती घेतले… पहाटेच्या थंड वाऱ्याच्या झुळुकांनी ज्योत विझू नये म्हणून ज्योतीभोवती आपला इवलासा हात आडोसा म्हणून धरत ती खडबडीत रस्त्याने आजोबांसोबत निघाली. गावाच्या वाड्या, वस्त्यांवरून अशा अनेक ज्योती लुकलुकत देवळाकडे निघालेल्या तिने पाहिल्या… पहाटेच्या अंधारात त्या ज्योती घेऊन येणाऱ्या मुलींचे चेहरे त्या प्रकाशात उजळून निघालेले तिला दिसले. ” काका, नात आलीये जणू?” दादांना एका म्हातारीने विचारले. “होय, अशोकची छोकरी.” त्यावर ती म्हातारी गोड हसली 

देवळासमोर सडा रांगोळी काढून झाली होती. आज गावच्या पाटलांच्या हस्ते काकड आरती व्हायची होती त्यामुळे देऊळ जरा जास्त सजवलेलं होतं नेहमीपेक्षा आणि गर्दीही जास्त होती. एरव्ही दादा येतील त्या लोकांना घेऊन सारे काही पार पाडीत. पखवाज वाजवीत. संपूर्ण काकडा भजन त्यांना मुखोदगत. गवळणी म्हणताना सारे गोकुळ उभे राहायचे देवळात.

अरुंधती अनिमिष डोळ्यांनी सारं काही तिच्या डोळ्यांत साठवून ठेवत होती. ‘ पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली.. ’ हे शब्द तर तिला खूप भावले. दगडाची मूर्ती अशी जिवंत होऊन पुढे उभी राहते… भक्तांच्या हातून नहाते, प्रसाद घेते, तिला दृष्ट लागते आणि त्याची दृष्टही काढली जाते ! सारेच अद्भुत !

दादांनी भैरवी रागात गवळण गायली. आसपासच्या दऱ्या, डोंगर यांनी दादांचा आवाज ओळखला आणि त्यांनी प्रतिध्वनी उमटवले ! झोप आवरू न शकलेल्या लोकांनी अंथरुणातच काकडा अनुभवला… हे असंच सुरू होती गेली कित्येक वर्षे! अशोक आणि त्याची बायको मुलगी नंतर आवरून आले देवळात.

मग पाच आरत्या झाल्या.. देवळाबाहेर पाटलांच्या पोरांनी फटाक्यांची माळ लावली… प्रसाद झाला !

सर्वांच्या पूर्ण कपाळावर चंदन गंध शोभत होते… काकड्याला उपस्थित राहिल्याची ती हजेरीची खूण दिवसभर मिरवली जाणार होती. दादांचे कपाळ तर आणखीन छान दिसत होते.

दुसऱ्या दिवशी अरुंधतीला उठ असे सांगावे लागले नाही. तिला काकड्याची गोडी लागून गेली होती !

आता उद्या परतायचे म्हणून अशोकची तयारी सुरू होती. ” बाबा, मी इथंच राहू.. आजोबा आज्जीला सोबत म्हणून?” अरुंधतीने झोपायच्या तयारीत असलेल्या अशोकला विचारले.

“तुझी शाळा?” अशोक म्हणाला.

“मी जाईन की इथल्या शाळेत. गुजराथी शाळेचा कंटाळा आलाय मला. आपली मराठी किती गोड आहे. आणि इथला विठोबा किती सुंदर !” अरुंधती म्हणाली.

हे ऐकून दादा हरिपाठ म्हणायचे थांबले. त्या घरात ते दोघेच म्हातारा म्हातारी. शेजारच्या भावकीची सोबत असते पण.. ! घरात आपलं कुणी असावं!

दादांच्या एका चुलत भावाचा मुलगा गावातल्या शाळेवर मास्तर होता. शिवाय दादा जुनी सातवी पास झालेले होतेच. पोरगी राहिली इथेच तर शिकेलही चांगली असं त्यांना वाटून गेलं. अशोक बराच वेळ त्याच्या बायकोशी बोलत राहिला… शहरातला खर्च त्याच्या हिशेबात होताच. शिवाय दादा, आईंना सोबत होणार होती.

अरुंधती आज आजोबांच्या गोधडीमध्ये शिरली होती… आणि मी इथंच राहणार.. असं त्यांच्या कानात कुजबुजत होती. पण हे सोपं नाही हे दादा जाणून होते. ‘ बघू तुझा बाबा काय म्हणतोय ते ! ‘ असे म्हणून त्यांनी कुस बदलली.

अरुंधतीने दुसऱ्याही पहाटे काकड्याचे एक सुंदर आवर्तन अनुभवले. ‘ पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ‘ तिला पाठ होऊन गेले होते.

रात्री मुक्कामी असलेली एस. टी. निघायची वेळ झाली होती. ड्रायव्हर, कंडक्टर दादांच्या ओसरीवरच यायचे चहाला. अशोकचं आवरून व्हायचं होतं म्हणून ते निवांत चहा पीत बसले होते. अशोक, त्याची पत्नी, तिच्या कडेवर अरुंधतीची धाकटी बहीण.. निघायला तयार होते. अरुंधती आज काहीसे हळूहळू सर्व काही करत होती… तिने आपले कपडेही पिशवीत भरले नव्हते !

ती देवघरातून तशीच मोकळी बाहेर आली आणि ओसरीवर उभ्या असलेल्या दादांच्या मागे जाऊन त्यांना घट्ट बिलगून उभी राहिली…’ मी इथंच राहणार बाबा ! ‘ ती म्हणत राहिली… ! दादा अशोककडे पहात होते… एस. टी. ची वेळ उलटून चालली होती.

……. “अरूचा दाखला पाठवून दे पोस्टाने. गावातल्या शाळेत जाईल ती दिवाळीची सुट्टी संपल्यावर. तोवर तिचा मराठीचा अभ्यास करून घेईन मी. इथं काही खर्च लागत नाही शाळेला. सातवीपर्यंत तर नाहीच नाही !” दादा म्हणाले आणि अरुंधतीच्या मुखावर कोजागिरी उलटली… गोठ्यातून म्हैस हंबरली आणि बैलांच्या गळ्यातली घुंगरे वाजली.

जाणाऱ्यांना निरोप देऊन दादा आणि वनिताबाई परत निघाले… अरुंधती दोघांची बोटे धरून त्यांच्या मध्ये चालत होती !

…. “आजोबा, उद्या काकड्यात दृष्टीचा अभंग मी म्हणणार ! ” अरुंधती म्हणाली… तसा दादांचा चेहरा दृष्ट लागेल एवढा फुलून आला !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments