सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ ४९८ – अ… – भाग – १ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
श्री हेमन्त बावनकर
उत्तर भारतातील काही धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी, या विचाराने राजेश आणि त्याची पत्नी सरोज घराबाहेर पडले खरे, पण जबलपूर स्टेशनवर पाय ठेवला आणि राजेशला एप्रिल महिन्याची प्रचंड गर्मी आणि स्टेशनवरची गर्दी पाहून आपला निर्णय चुकला की काय, असं वाटू लागलं होतं. पण मग त्याने आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला, की इतक्या कमी पैशात इतक्या स्थळांचं दर्शन हे तसं शक्य नव्हतंच. शिवाय त्यांच्यासारखे इतरही अनेक पर्यटक त्या ट्रेनने प्रवास करणार होते. ९ डब्यांची ती विशेष ट्रेन होती. जी त्यांची स्थिती होईल, तीच आपली. राजेशने आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला.
गाडीची ठरलेली वेळ रात्रीची साडेअकराची होती, पण तीन वाजेपर्यंत गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मला लागणार, हेच कळलं नव्हतं. लोक आपापल्या पध्दतीने काऊंटरपाशी, प्रबंधकांपाशी जाऊन चौकशी करत होते. यात्रा प्रबंधक रेल्वे प्रशासनाला आणि चौकशीच्या काऊंटरवरील स्टाफ यात्रा प्रबंधकांना दोष देत होते. आणि स्वत:ची सुटका करून घेत होते. सगळ्यांचे कान अनाउंसमेंटकडे लागले होते. चारच्या सुमाराला स्पीकरवरून ट्रेन आणि प्लॅटफॉर्म नंबरची सूचना दिली गेली.
आता विशेष ट्रेनमधील विशेष प्रवाशांची गर्दी आपापलं सामान घेऊन, अनाउन्स केलेल्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाली. प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर थोड्याच वेळात अनपेक्षित अशी निर्मळ, स्वच्छ ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली. सर्व प्रवाशांना आपापले बर्थ क्रमांक माहीत होते.
बोगीत आपापल्या जागी आपापलं सामान ठेवता ठेवता सहप्रवासी एकमेकांबद्दल जाणून घेऊ लागले. काही प्रवाशांना आपले परिचित मित्र भेटले. काही प्रवासी शेजा-यांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू लागले. कुणी रिझर्व्ह स्वभावाचे प्रवासी आपापल्या बर्थवर सामान ठेवून गुपचुप खिडकीबाहेर पाहू लागले.
राजेशनेही आपले सामान वरती बर्थवर ठेवले. प्रत्येक बोगीत एक टूरगाईड, एक गार्ड आणि एक सफाई कामगार होता. ट्रेनच्या बोगीत २ स्पीकर लावलेले होते. थोड्याच वेळात एक विशेष सूचना प्रसारित केली गेली. टूर गाईड सर्व प्रवाशांची तिकिटे तपासतील. त्यानंतर, संपूर्ण यात्रेबद्दलच्या सूचना आणि माहिती दिली जाईल. तिकीट तपासणीच्या प्रक्रियेत अर्धा तास गेला. स्पीकरवर पुन्हा सूचना आली, ‘ट्रेन लवकरच सुटेल.’ गाडीची शिट्टी वाजली आणि ट्रेन निघाली. काही प्रवासी पुढे इटारसी आणि भोपाळला गाडीत चढणार होते.
साधारण इतर स्लीपर ट्रेनप्रमाणेच इथेही कूपेमध्ये आठ बर्थ होते. आरक्षण चार्ट पाहिल्यावर राजेशच्या लक्षात आलं की लोअर आणि मिडल बर्थ प्रवाशांसाठी व वरची बर्थ, त्यांचं सामान ठेवण्यासाठी ठेवलेली होती. चार्ट बघून त्याच्या हेही लक्षात आलं, की त्यांचे दोन सहप्रवासी इटारसी स्टेशनवर चढणार आहेत. त्यामुळे आपलं सामान व्यवस्थित ठेवून राजेश समोरच्या लोअर बर्थवरच बसला.
प्रवाशांचं बोलणं, गप्पा अजूनही चालू होत्या. थोड्याच वेळात चहा सर्व्ह केला गेला. मग चहावर चर्चा सुरू झाली. जसजसा चहाचा प्रभाव कमी होत गेला, लोक आपापल्या बर्थवर आडवे होऊ लागले. सरोज म्हणाली, ‘जोपर्यंत समोरच्या सीटवरची माणसे येत नाहीत, तोपर्यंत तुम्ही लोअर बर्थवरच पडा.’ अशा प्रकारे दोघेही आपापल्या कुपेत लोअर बर्थवर आडवे झाले. प्रत्येक बोगीत गार्ड होता. शिवाय, या ट्रेनमध्ये अन्य प्रवाशांना चढायची परवानगी नव्हती. त्यामुळे सामानाची काही काळजी नव्हती. आडवं झाल्यावर कधी डोळा लागला, त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
इटारसी स्टेशनवर गाडी थांबली. प्रवाशांच्या आणि हमालांच्या बोलण्यामुळे त्यांना जाग आली. बोगीत तिघे जण चढले. त्यांच्यामध्ये दोघे वृध्द नवरा-बायको होते. तिसरा चाळीशीच्या आसपासचा तरुण होता. त्याने सर्व सामान बर्थवर ठेवले. तो कदाचित् त्यांचा मुलगा असेल, असं राजेशला वाटले. सामान ठेवून झाल्यावर तो राजेशला म्हणाला, ‘‘अंकल-आंटी जरा बाबूजी आणि अम्मांकडे लक्ष ठेवा हं!”
दोघेही जवळजवळ एकदमच म्हणाले, ‘‘आपण अजिबात काळजी करू नका.” हात जोडून त्यांना नमस्कार करत तो तरूण खाली उतरला. व प्लॅटफॉर्मवरच्या बेंचवर जाऊन बसला. आणि राजेश-सरोजकडे पाहू लागला. ट्रेन चालू झाल्यावर त्याने अतिशय विनम्रतापूर्वक हात हलवत दोघांना बाय-बाय केलं. राजेशनेही हात हलवून अभिनंदनाचा स्वीकार केला.
राजेशचं लक्ष मग या पती-पत्नीकडे गेलं. वृध्द व्यक्ती साठीच्या आसपास असावी. त्याची पत्नी छप्पनच्या आसपासची असेल. उत्सुकतेने राजेशने विचारले, ‘‘आपल्याला पोचवायला आपला मुलगा आला होता का?”
‘‘नाही साहेब! ते आमचे जावई आहेत.” वृध्द गृहस्थ हसत हसत म्हणाले.
‘‘अरे वा! आपण मोठे भाग्यवान आहात!” राजेशच्या तोंडून सहजच बाहेर पडलं.
ते भावनावश झाले. दोन्ही हात जोडून देवाचे आभार मानत म्हणाले, ‘‘ही सगळी देवीमातेची कृपा.”
त्यांचं बोलणं पुढे चालू होणार, एवढ्यात स्पीकर वरून अनाउन्समेंट झाली, की भोजनाची वेळ झाली आहे. आता एवढ्यातच सर्वांना भोजन देण्यात येईल. राजेशने विचार केला, ‘आत्ताशी कुठे प्रवासाला सुरूवात झालीय. नंतर सावकाशपणे ओळख करून घेता येईल.’ पण वृध्द गृहस्थ जरा जास्तच उत्साही दिसले. ते म्हणाले, ‘‘मी रामजी आणि ही माझी पत्नी जया. आम्ही महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यातील दूरच्या गावामधून आलोय.”
राजेशने आपला परिचय दिला, ‘‘मी राजेश, आणि ही माझी पत्नी सरोज. आम्ही जबलपूरहून आलोय.”
एवढ्यात जेवण आले. लोक जेवू लागले. जेवता जेवता राजेशने एक दृष्टीक्षेप समोरच्या दंपतीकडे टाकला. रामजी सावळ्या रंगाचे, उंचे-पुरे, भारदार व्यक्तिमत्त्व असलेले दिसत होते. वयाच्या मानाने प्रकृती निकोप होती. त्यांनी काळ्या रंगाचा, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि गडद निळ्या रंगाची पँट घातली होती. उजव्या बाजूला मनगटात लाल-काळ्या धाग्यात एक ताईत बांधलेला होता. गळ्यात छोट्या रुद्राक्षांची माळ होती. त्याबरोबरच आणखीही रंगी-बेरंगी मोत्यांच्या माळा आणि एक स्फटिकांची माळही होती. पायातली चप्पल काळ्या रंगाची आणि जुनी, झिजलेली होती. त्यांच्या पत्नीने, जयाने फिकट पिवळ्या रंगाची साडी नेसली होती व डोक्यावरून पदर घेतलेला होता. ती गहू वर्णी आणि गोल-मटोल अशी महिला होती. आणि एकंदरीने त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटत होतं की ते आदिवासी बहूल क्षेत्रातून आले आहेत.
आता जेवणे झाली आहेत. लोक पुन्हा पहिल्यासारखे एकमेकांशी बोलू लागले होते. सरोज आणि जया यांचं अद्याप एकमेकींशी बोलणं झालं नव्हतं. त्या जरा एकेकट्या बसल्या सारख्याच बसल्या होत्या, पण त्यांचे कान मात्र इतरांचं बोलणं ऐकत होते. भोपाळ यायला अद्याप अडीच-तीन तास होते. राजेश सरोजला म्हणाला, ‘‘भोपाळहून ट्रेन सुटली की मगच झोपू या. नाही तर भोपाळ स्टेशनवर पुन्हा झोपमोड होईल.” सरोजने होकारार्थी मान हलवली.
रामजी ऐसपैस बर्थवर बसले. आता राजेशलाही बोलण्याची उत्सुकता वाटत होती. एक आठवडाभर एकमेकांच्या सोबतीने काढायचा होता. त्याने विचार केला, जरा गप्पा मारूयात. मग त्याने विचारले, ‘‘रामजी आपल्याला मुले किती?”
‘‘दोन मुले आणि एक मुलगी. देवीआईच्या कृपेने सगळ्यांची लग्ने झाली आहेत. सगळे आनंदात, सुखात आहेत.”
राजेश म्हणाला, ‘‘मला एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांचीही लग्नं झाली आहेत, आता निवृत्त झालोय. सगळ्या जबाबदा-यातून मुक्त झालोय.”
‘‘आपण मोठे नशीबवान आहात. पेन्शन आहे. त्यामुळे आरामात जगत असाल. आमचं नशीब कुठे एवढं बलवत्तर असायला. आम्ही पडलो व्यापारी.”
‘‘रामजी, व्यापारात पैशाला काय कमी? नोकरी पैशात आम्ही आयुष्यभर जेवढं कमावतो, तेवढे आपण काही काळातच मिळवू शकता. आपण खरोखरच नशीबवान आहात. आपल्याला इतका चांगला जावई मिळाला, आपली किती काळजी ते घेतात. हे काय कमी आहे?”
‘‘साहेब, आपण अगदी खरं बोलताय. जावयाच्या बाबतीत आम्ही खरंच नशीबवान आहोत. पण साहेब, हे सुख पदरात टाकण्यासाठी देवीआईने आमची अगदी कठोर परीक्षा घेतली होती.”
– क्रमशः भाग पहिला
मूळ हिंदी कथा – ४९८ -अ
मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628
☆☆☆☆☆
अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈