श्री दीपक तांबोळी
जीवनरंग
☆ मोबदला… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆
शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली
” अहो जरा अण्णांना बघता का?खुप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत “
“हो. फ्रेश झालो की लगेच बघतो “
बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं
” काय झालं अण्णा?काय होतंय?”स्वतःलाच धीर देत त्याने विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला
“काय म्हणालात कळलं नाही. परत एकदा सांगा”
“म…. ला….. दे…… वा…… क….. डे…… जा…. य… चं…. य” परत हात वर करुन ते अस्पष्ट आवाजात म्हणाले शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं. तरी स्वतःला सावरत तो म्हणाला
“मी कोण तुम्हांला देवाकडे नेणारा. त्याला न्यायचं तेव्हा नेईल. आणि अजून तुम्हांला नातवंडांची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?”
अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले.
“बरं बरं तुम्ही पडा. काही दुखतंय का तुमचं?”
त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलावलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरुन, पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला. का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं. त्या विचाराने त्याला गहिवरुन आलं. पण असं रडून चालणार नव्हतं. स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं
“डाॅक्टरला बोलावू?”
त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला.
“बरं बरं. मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला”
अण्णांनी होकारार्थी मान हलवली. शिरीष बाहेर आला
“काय झालं?काय होतंय त्यांना?”नेहानं काळजीनं विचारलं
” काही होत नाहिये. त्यांना आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत रहाणार आहेत. कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच ” उदास होत शिरीष म्हणाला.
शिरीष योग्यच म्हणतोय हे
नेहाच्या लक्षात आलं. गेली सात वर्ष अण्णा पॅरॅलिसीस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे. पण ते तेवढंच. खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते. पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं. सुरवातीचं एक वर्ष बरं गेलं. एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही भाऊ निर्मल, गुणवंत आणि त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची. अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्चशिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिनं मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता. घरात कटकटी वाढल्या आणि भांडणं होऊ लागली तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरिषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही जावांच्या शिरजोरपणाला आणि या रोजच्या कटकटींना कंटाळली होती. शिरीषची इच्छा नसतांनाही त्याला वेगळं व्हावं लागलं. अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करुन टाकलं. नेहा आणि शिरीष असतांना त्यांची खुप काळजी घेतली जायची. वेळच्या वेळी जेवण, औषधं असायची. त्यामुळे अण्णा ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुध्दा कुणी त्यांना लवकर आणून देत नव्हतं. त्या औषधांचा खर्च कुणी करायचा यावरुन दोघा भावांची आणि जावांची भांडणं व्हायची. शेवटी अण्णांकडूनच पैसे घेतले जायचे. आपण आपल्याच घरात निराधार झालोय या जाणीवेने अण्णा मानसिकरीत्या खचत गेले. त्याचा परीणाम व्हायचा तोच झाला. त्यांचा रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढून त्यांना पॅरॅलिसीसचा अटॅक आला. आता तर निर्मल, गुणवंतची चांगलीच पंचाईत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्या तरी घेऊन किती घेणार? केअरटेकर ठेवला तरी त्याचे पैसे द्यायची एकाही भावांची तयारी नव्हती. घरात परत एकदा भांडणं होऊ लागली. अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी “अण्णांची ही ब्याद आता शिरीषनेच सांभाळावी. अशीही त्याची बायको रिकामटेकडीच असते “या विचारावर संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं. शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्विकारली. एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची अंघोळ वगैरे सगळं आटोपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं, त्यांना औषधं देणं, त्याच्या हातापायाला मालीश करणं वगैरे आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती. त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा. अतिशय कामात असतांना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा. रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पुर्ण शहरातून फिरवून आणायचा. तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा एक जीवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली. मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमीकमी होत गेली. त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते.
झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला
” आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत ” मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला
” अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला”
अण्णांनी मान डोलावली.
रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं. पण ते शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नियमित सुरु होता.
सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती. शिरीषने अण्णांकडे बघितलं. ते फ्रेश वाटत होते.
“कसं वाटतंय?”त्याने विचारलं. त्यांनी हाताने ठिक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं.
“अण्णा मी येतो अंघोळ करुन. मग तुमचा चहा झाला की तुम्हाला अंघोळ घालेन”
अण्णांनी मान डोलावली. शिरीष रुमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली. शिरीषने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिला हायसं वाटलं.
शिरीष अंघोळ करुन बाथरुमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली
“अहो अण्णा परत झोपले वाटतं. मघाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही”
शिरीषला शंका आली. एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाही. त्यांच्या रुममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही. त्याने घाबरुन नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला
“डाॅक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा…. ” पुढे त्याला काही बोलता येईना.
– क्रमशः भाग पहिला
© श्री दीपक तांबोळी
जळगांव
मो – 9503011250
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈