सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ व्यवहारापलीकडचं नातं… भाग – १ – लेखिका – सुश्री मिताली वर्दे ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆
भर पावसाळ्यात जून महिन्यात सारिकाची बदली मुलुंड येथे ब्रँचमॅनेजर म्हणून झाली. पावसाची रिपरिप, ट्रेनमधील गर्दी याने सारिका त्रासून गेली. कशीबशी वेळेत बँकेत पोचली. ब्रँचला गेल्यावर ग्राहकांची ओळख, कर्मचाऱ्यांची ओळख, कामाचे हॅण्डओव्हर यात जेवणाची वेळ कधी झाली हे तिला समजलेच नाही. तिने डब्बा आणलाच होता. आधीचे ब्रँचमॅनेजर, श्री गोरे ह्यांच्याबरोबर ती डब्बा खायला बसली. ग्राहकांची गर्दी ओसरली. आता दरवाजात फक्त ‘ती’ एकटी उभी होती. लक्ष जावं किंवा लक्षात राहावी अशी ती नव्हतीच. लांबूनच ती सारिकाला न्याहाळत होती. शेवटी शटर बंद करायची वेळ अली तेव्हा ती निघून गेली. ती कोण? हे सुद्धा सारिकाने विचारलं नाही, इतकी ती नगण्य होती. चार दिवसांनी गोरे सर गोरेगाव ब्रँचला, जिथे त्यांची बदली झाली होती, तेथे निघून गेले. ‘काही अडलं तर नक्की फोन करा’ असं सांगून गेले. जाताना एवढेच म्हणाले ‘त्यादिवशी ती दरवाजात उभी राहून तुमच्याकडे बघत होती, त्या बाईला उभी करू नका. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कुठचे तरी जुने पैसे मागत असते व त्रास देते’. मी सुटलो. सारिकाने फक्त ‘हो’ म्हंटल.
दुसऱ्या दिवशी पासून सारिकालाच ब्रॅन्चचे व्यवहार बघायचे होते. पावसामुळे जून, जुलै महिना कंटाळवाणा गेला. ग्राहक आणि बँकेचा धंदा दोन्ही कमीच होत. मात्र झोनची मिटिंग होऊन ब्रॅन्चच टार्गेट दिल गेलं. सारिकाने मार्केटिंग साठी वेगळी टीम बनवली आणि कामाला सज्ज झाली. आठ दिवस लख्ख ऊन पडलं. सारिका एका कर्मचाऱ्याला घेऊन काही मोठ्या ग्राहकांना भेटून आली. अशारितीने कामाला सुरवात झाली. ह्या ब्रॅन्चमध्ये स्त्री कर्मचारी जास्त होत्या. त्यामुळे साड्या, दागिने, ड्रेस, मुलबाळ हे विषय सतत चालू असायचे.
सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणपतीसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज दिले. ते समोर ठेऊन काम कोणाला वाटून द्यायची ह्याचा सारिका विचार करत असताना कोणीतरी धाडकन दार उघडून आत आलं आणि धप्पकन समोरच्या खुर्चीवर बसलं. सारिकाने मानवर करून बघितलं तर ती ‘तीच’ होती. पाहिल्या दिवशी दाराकडे उभं राहून सारिकाला न्याहाळणारी. सारिकाने तिला नीट निरखून बघितलं. ती शरीराने कृश, काळीसावळी, गालावर देवीचे खडबडीत व्रण, चेहेर्यावर उदासीनतेची छटा असा तिचा चेहेरामोहरा होता. तिने पांढऱ्या केसांची बारीकशी वेणी घातली होती. वेणीला काळी रिबीन बांधली होती. अंगावर कॉटनची विटकी पण स्वच्छ क्रीम रंगाची साडी, काळ्या रंगाचा ढगळ ब्लाउज व पायात रबरी चप्पल असा एकंदरीत तिचा अवतार होता. तिला अशी अचानक केबिन मध्ये घुसलेली पाहून सारिका म्हणजे मी दचकलेच. बाहेरून सगळे कर्मचारी माझ्याकडे पाहत होते आणि आपापसात कुजबुजत होते. मी अनिच्छेनेच तिला विचारले काय काम आहे? ती म्हणाली ‘माझे हरवलेले पैसे पाहिजेत’. मला काहीच समजेना. पैसे कधी हरवले? किती पैसे हरवले? पैसे कोणी हरवले? असे प्रश्न मी तिला पटापट विचारले. ती म्हणाली दहा वर्षांपूर्वी मी भरलेले पैसे बँकेने हरवले. मी तिला सांगितले पुरावा घेऊन ये आणि माझ्या कामाला लागले. ती तशीच बसून राहिली. मी तिला परत विचारले, आता काय राहील? पुरावा मिळाला की बँकेत ये. तिच्याकडे काहीही पुरावा नव्हता. बँकेचे पासबुक देखील नव्हते. मी तिला सांगितले बँकेचे पासबुक घेऊन ये मगच आपण बोलू आणि आता तू निघू शकतेस, मला खूप काम आहे. ती निराश होऊन निघून गेली. मी तिचे नाव माझ्या डायरीत लिहून घेतले. पासबुकच नसेल तर मी देखील काय करणार होते.
घरोघरी गणपती उत्सव दणक्यात पार पडले. सर्व कर्मचारी सुट्या संपवून कामावर रुजू झाले. कामाने जोर धरला. पंधरा दिवसात मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली ती बाई धाडकन दार उघडून आत आली आणि धप्पकन माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. हातातली विटक्या कापडाची पिशवी तिने माझ्या समोर उपडी केली. त्यात बऱ्याचशा पैसे भरलेल्या पावत्या होत्या व एक फाटके आणि भिजून पुसट झालेले पासबुक होते. माझ्या महत्वाच्या कामाच्या मध्येच या बाईने हा पसारा घातला होता. ती बाई मला म्हणाली घरात होत ते सगळं मी शोधून आणलं आहे. आता माझे पैसे द्या. मी चिडलेच, मी तिला म्हणाले, तू हे सगळं इकडेच ठेऊन जा. मला वेळ मिळाला की मी बघीन, ती बाई हुशार होती मला म्हणाली, ‘मला याची पोचपावती द्या’. मी तिला सांगितलं, ‘ह्या चिठ्या उचल, एका कागदावर सगळं व्यवस्थित लिही. त्याची एक प्रत काढून मला दे, मग मी त्या प्रतीवर तुला बँकेच्या शिक्यासह पोचपावती देते. शेवटी ती तो पसारा तसाच टाकून निघून गेली. ह्या वेळी आठवणीने मी तिचा मोबाईल नंबर घेतला. तिच्याकडे असलेला जुना मोबाईल मी पिशवीतले जिन्नस माझ्या टेबलावर ओतताना टेबलावर पडलेला बघितला होता.
मी त्या पावत्या एका लोनच्या रिकाम्या डॉकेट मध्ये भरल्या आणि त्यावर त्या बाईचे नाव लिहून ते डॉकेट मी माझ्या खणात ठेऊन दिले. आठ दिवस मी त्या डॉकेट कडे ढुंकून देखील बघितले नाही. पण का कोण जाणे मला त्या बाईची रोज एकदा तरी आठवण येत असे. एका शनिवारी ग्राहकांची वर्दळ बंद झाल्यावर मी ते डॉकेट खणातून वर काढून टेबलावर ठेवले. कर्मचाऱ्यांना घरी जायला अजून एक तास होता. एका कर्मचाऱ्याला माझ्या केबिन मध्ये बोलावले. मी प्रथम त्या सगळ्या पावत्या डॉकेट मधून टेबलावर ओतल्या. मी आणि त्या कर्मचाऱ्याने त्या तारखे प्रमाणे लावून घेतल्या. ह्या पावत्या दहा वर्षा पूर्वीच्या होत्या. आमच्या ब्रान्चला एवढा जुना डेटा नव्हता. कर्मचाऱ्याने सरळ हात वर केले. ‘मॅडम एवढा जुना डेटा अकौंट्स डिपार्टमेंटला ट्रान्स्फर झाला आहे. आता हे काही मिळणार नाही. त्या दिवशी इथेच ते काम थांबलं.
सोमवारी बँकेत आल्यावर मी अकौंट्स डिपार्टमेंटला फोन लावला. त्यांना सगळी केस सांगितली. मी तारखे प्रमाणे पावती वरील रक्कम एका कर्मचाऱ्याकडून टाईप करून घेतली. दुसऱ्या दिवशी तो कागद मी अकौंट्स डिपार्टमेंटला पाठवून दिला व काहीही झालं तरी ह्या पैशाच्या एन्ट्री शोधायला सांगितल्या. त्या बाईला फोन करून तुझं काम चालू आहे असा निरोप दिला. आता मी निवांत झाले. माझी जबाबदारी मी पार पाडली होती.
माझ्या लक्षात आलं पूर्वीच्या ब्रँच मॅनेजरने एवढे सुद्धा कष्ट घेतले नव्हते आणि त्या बाईला सगळ्यांनी वेडी ठरवलं होत. आठ दिवसाने मला अकाउंट्स डिपार्टमेंटहून एक मेल आलं. त्यात म्हंटल होत. या बाईचा खात नंबर ५००१ आहे आणि या बाईने सगळे पैसे ५०१० या खात्यात भरले आहेत. सगळ्या पावत्यांवर खाते नंबर ५०१० असा घातला असून नाव सीमा कुलकर्णी असं घातलं आहे. ते खाते तर शहा नावाच्या माणसाचं आहे. या शहाने हे पैसे दहा वर्षांपूर्वीच काढून घेतले आहेत आणि खात बंद केलं आहे. मी शहांचा पत्ता पाठवत आहे तुम्ही ब्रान्चला हे प्रकरण सोडवा. अशारितीने अकौंट्स डिपार्टमेंटने हात झटकले.
मला एकदम वैताग आला. या प्रकरणात हात घातला व डोक्याला भलताच ताप झाला. एक मन म्हणाल, ‘तिचीच चूक आहे. खाते क्रमांक चुकीचा का घातला?’ दुसरं मन म्हणाल ‘कर्मचाऱ्याने आणि चेकिंग करणाऱ्या ऑफिसरने देखील का बघितलं नाही?’, त्रास मात्र माझ्या डोक्याला झाला होता.
मी प्रथम कुलकर्णी बाईला बोलावून घेतलं. आज सुद्धा ती त्याच साडीत, तशीच गबाळी आली होती. आज प्रथमच मी तिच्या डोळ्यात माझ्या बद्दलचा विश्वास बघितला. मी तिला अकौंट्स डिपार्टमेंटच लेटर प्रिंट काढून वाचायला दिल.. मी तिला विचारले, ‘तू पासबुक का भरून घेतलं नाहीस?, वेळेत पासबुक भरलं असत तर तेव्हाच समजलं असत. ते वाचून ती रडायला लागली. पैसे भरलेली रक्कम थोडीथोडकी नाही तर सव्वा लाख रुपये एवढी होती.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : सुश्री मिताली वर्दे
प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈