मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घर दोघांचं… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆
सौ. प्रभा हर्षे
जीवनरंग
☆ घर दोघांचं… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆
संंध्याकाळी फिरून आले तो सात वाजले होते..
आज उशीर झाला असं म्हणत म्हणत कॉफी ठेवली गॅसवर. आत्ता येइल सुमा, पर्स फेकेल आणि जोरात आवाज देइल ‘ मी आले ग ! ‘ फ्रेश होऊन कॉफीचा घोट घेईल आणि आनंदात ओरडेल.. “ बेस्ट ! मला शिकव न अशी कॉफी करायला !”
मी रोज तिच्याकडे अचंब्याने पहाते. गॅस जवळही न जाता ही कशी कॉफी करायला शिकणार आहे. मात्र सकाळचा नाश्ता ती अगदी सुंदर बनवते म्हणून हा गुन्हा माफ !
ही सुमा माझी भाची ! अगदी लाडकी भाची ! तीन वर्षांपूर्वी दादाने अगदी हौसेने लग्न करून दिले. पण सासरी गेलेली सुमा सहा महिन्यात परत आली ती अगदी रया गेलेली मुलगी होऊन ! तिची ही अवस्था पाहून दादाने तर हाय खाल्ली आणि हार्टचे दुखणे घेऊन बसला. मी सुमाला बदल म्हणून माझ्याकडे घेऊन आले. पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावले. पोरगी हुशार. कँपसमध्ये सिलेक्शन होऊन नोकरीला पण लागली. आता दादा वहिनी मागे लागले.. ‘ परत लग्नाचे बघुया का म्हणून !’ पण अं हं ! सुमा लग्नाचे नाव काढू देत नाही.
माझ्याकडच्या या साडेतीन वर्षांत सुमाने मला कधीही आपल्या सासरी काय बिनसलं आणि आपण का परत आलो याबद्दल एक शब्दही सांगितला नाही. कधी मी विचारले तर ती म्हणायची, “आत्तु, ती दोन वर्ष मी माझ्या आयुष्यातून काढून टाकली आहेत. ”
पण आज अघटितच घडले…. कॉफीचा मग खाली ठेऊन सुमा स्तब्ध बसून राहिली. डोळ्यात पाणी तरळतय असं मला उगाच वाटल.
तिच्या हाताला स्पर्श करत मी विचारले, “ का गं ! बरं नाही वाटत का ? काही होतंय का ? ऑफिसमध्ये काही झालं का ?”
सुमा काहीच बोलली नाही. पाच मिनिटे अशीच शांततेत गेली
आणि मग हलक्या आवाजात तिने सांगितले, “ आज तनय आला होता ऑफिसमध्ये. ”
“ तुला भेटायला ?” मी आश्चर्यचकित होऊन विचारले
“ नाही, अगदी तसंच नाही, पण मी तिथे भेटीन अशी कल्पना असावी त्याला. ”
“ बरं, पण म्हणाला काय ? ”
“ घरी येतो म्हणाला. तुझा पत्ता दिलाय. ”
“ अगं पण तुमचे काय बिनसलंय याची मला काहीच कल्पना तू कधी दिली नाहीस. मी असं करते, थोडा वेळ बाहेर जाते. ”
“ नको नको आत्तु ! तूच माझी या सगळ्यातून सुटका करशील. ”
मी कॉफीचे मग उचलता उचलताच बेल वाजली. दारात तनय उभा !
“ ये ना आत ! “ – तो सोफ्यावर टेकला, मात्र अवघडून बसला. मला कससंच झालं, कुठे तो हसरा उमदा मुलगा आणि कुठे हा नाराज, खांदे पाडलेला, अकाली पोक्त झालेला जावई !
“ ऑफिस मधून परस्पर आलास का !”.. कोणी तरी सुरवात करायला पाहिजे म्हणून मी विचारले. त्याची मान होकारार्थी हलली.
“ हा घे टॉवेल ! बेसीनवर फ्रेश हो ! मी कॉफी करते.. का चहा करू ?” मी विचारले.
“ कॉफीच करा आत्या !”
मी कॉफी करायला वळले आणि सुमा आत आली. तेवढ्यात तिने ड्रेस चेंज केला होता. मलाही बरं वाटलं. ‘चला, कॉफी जरा जास्त वेळ लावून करावी. ’…..
हॉलमध्ये चाललेले संभाषण थोडे थोडे कानावर येतच होते.
“ अरे, किती मी माझे मन मारायचे ? त्याला काही सुमार ? तुला चांगला पगार, सुख सुविधा मिळतात हे तुझ्या आईला आवडत नाही याचं खरंच आश्चर्य वाटतं मला… पण ठीक आहे. पण त्याचा राग माझ्यावर का काढायचा त्यांनी ? तू सांग, त्यांचे माहेर गरीब म्हणून माझ्या आई वडिलांनी मला काहीही द्यायचे नाही, माहेरी बोलवायचे नाही.. असं कुठे असतं का ? मी साधी कॉफीही घ्यायची नाही. का? तर घरात फक्त चहाच आणला जाईल म्हणून ! इतकी मन मारायची मला नाही रे सवय ! मग खायला काही बनवायचे वगैरे तर स्वप्नात पण शक्य नाही. मी खरंच तुमच्या घरी राहू शकत नाही. माझा जीव घुसमटतो. सकाळी सातला केलेली भाजी रात्री आठला जेवायला माझ्या नाही घशाखाली उतरत ! हे बघ.. मला त्यांचा अनादर नाही करायचा. पण मन मारत जगण्यापेक्षा मी माझा स्वतंत्र मार्ग निवडला. मला तुझी अवस्था कात्रीत सापडल्यासारखी करायची नाहीये.. खरंच सांगते. म्हणून मी तुझ्याकडे डायव्होर्स मागितला नाही. मला आशा आहे, कधीतरी ही परिस्थिती बदलेल, तुला माझी बाजू पटेल. मला तुझ्या बरोबर संसार करायचाय तनय ! हो …. पण मोलकरीण म्हणून तुमच्या घरात राहून नाही, तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून रहायचंय मला ! “
…… सुमा बांध फुटल्यासारखी बोलत होती. तनयही शांतपणे ऐकत होता. मीही ऐकत होते. किती ओझं मनावर ठेवलं होत पोरीने मुकाट्याने ! हीच तिच्या समंजसपणाची पावती होती.
मी कॉफी टिपॉयवर ठेवली.
“ जरा ऐक ना माझे ! “ आता बोलायची पाळी तनयची होती.
“ मी तुझे सगळे ऐकतोय. तुझ्या परीने तू बरोबर पण आहेस. पण ते माझे आईवडील आहेत. असं अचानक मी त्यांना सोडू नाही शकत. ही बघ… नवीन ब्लॉकची कागदपत्रे. मी मागच्या आठवड्यात आपल्यासाठी घर शोधलंय. एक तारखेला पझेशन मिळेल. जुन्या घराचे सर्व कर्ज फेडून मगच मी फक्त आपल्यासाठी हे घर घेतलंय… आणि तुला परत बोलवायला आलोय. आपण तुझ्या आईबाबांना हे सर्व सांगू. आणि आपल्या घरी जाऊ. आता मला अजून वाट बघायला लावू नकोस गं … तुझ्या इतकाच मीही विरहात कसेतरी दिवस काढतोय गं सुमा ! “
बोलता बोलता तनयने सुमाचे दोन्ही हात घट्ट पकडले….. शब्दापेक्षा स्पर्श नेहेमीच अधिक बोलका असतो ना …
सुमाचा आणि तनयचा खुललेला चेहरा पाहून मी पण अगदी खूष झाले. जिंकलं बरं पोरीने !!
सुश्री प्रभा हर्षे
९८६०००६५९५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈