मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कृतज्ञता… लेखिका – सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ कृतज्ञता… लेखिका – सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
टिना दिवसभर काम करून दमली होती. टेक्सासची अति गरम हवा, दिवसभरचा शीण आणि चालत घरी जाण्यास लागणारा वेळ या तिन्ही गोष्टी तिची दमणूक अजून वाढवत होत्या!
खरतर ती घराजवळच्या मेकडॉनल्डस मध्ये नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होती पण तिला तिथे नोकरी मिळाली नाही. पण त्याचाच भाऊ असलेल्या बर्गर किंग या बऱ्याच लांब असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गाडीतून ड्राईव्ह थ्रु मधे येणाऱ्या गिर्हाईकांकडून ॲार्डर घेऊन ती भरून देण्याची नोकरी मिळाली होती.
तिशीच्या घरातील टिना, तिचा नवरा व तीन मुले टेक्सासमधील एका लहान गावात रहात होते. नवऱ्याला डायबेटिस होता. लहान मुले, नवऱ्याचा आजार व प्रपंचाचा खर्च चहू बाजूंनी वाढतच होता. काही ना काही करून घरखर्चाला मदत करावी म्हणून मिळेल ती नोकरी तिने पत्करली होती. बर्गर किंग हे रेस्टॉरंट मात्र तिच्या घरापासून खूप लांब असल्याने रोजच्या चालत येण्याजाण्यात बराच वेळ जात होता. गाडी विकत घ्यावी अशी परिस्थिती नव्हती. हळूहळू पैसे जमा करून प्रथम गाडी विकत घेण्याची जरूर होती.
टिनाबरोबर वाढलेली गावातील इतर मुले उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळवून बसली होती. तिच्या घरची परिस्थिती अगदी बेताची असल्याने टिनाला कॉलेजला जाता आले नव्हते. आपण लोकांना बर्गर आणि कॅाफी विकत बसतो आणि आपल्या बरोबरची मुलं केवढी पुढे जात आहेत याची खंत होती पण इलाज नव्हता.
एक दिवस सकाळी ती नेहमीप्रमाणे बर्गर किंग मधे पोचली. कमरेला अॅप्रन लावून तिनं बर्गर, सॅंडविचेस, चहा, कॅाफीची तयारी सुरू केली. ड्राईव्ह थ्रू मधून दिसलेला गाड्यांची लांब रांग बघून तिचे हात वेगाने हलू लागले. क्रसांट या लांबट फ्रेंच ब्रेडवर अंड्यांचं ॲाम्लेट व चीज बसवून त्यावर दुसरा क्रसांट ठेऊन ती क्रसांटविच भराभर तयार करत होती. गिऱ्हाईकाच्या ॲार्डर हसऱ्या चेहऱ्याने पुरी करत होती.
ड्राईव्ह थ्रू मधील पुढची गाडी माईक जवळ आली.
Welcome to Burger King. May I help you? तिने विचारले.
तिकडून काही आवाज आला नाही. समोरच्या कॅमेऱ्यात तिला गाडीत बसलेली बाई दिसत होती.
ती परत म्हणाली, ”M’am, can I help you ?”
“ Ya.. Yess.. “ ती बाई बोलतच नव्हती. मागे गाड्यांची रांग खोळंबली होती..
“M’am, are you okay?” टिनाने काळजी वाटून विचारलं.. What’s your name?”
“Rebecca… I have diabetes… I.. I want to … order…” असं काहीतरी बोलून ती बाई परत बोलेनाशी झाली.
डायबिटीस आहे हे ऐकताच टिनाच्या डोक्यात प्रकाश पडला. तिनं भरकन एका उंच कपात आईसक्रिम भरले. रेस्टॉरंट मधून बाहेर पडून सुसाट धावत.. पळत.. गाड्यांच्या रांगेतून मार्ग काढत ती त्या बाईच्या गाडीजवळ पोचली. तिने भराभर दोन तीन चमचे आईस्क्रीम त्या बाईला भरवले. ते खाताच त्या बाईच्या नजरेत थोडा सावधपणा दिसू लागला..
“रिबेका, गाडी साईडला बरोब्बर माझ्या खिडकीसमोर पार्क कर व हे सर्व आईस्क्रीम संपव. ते संपल्यावर मी जा म्हणेपर्यंत कुठेही जायचं नाही. गाडीतच बसून राहायचं. OK? मी जाते आत पुढच्या ॲार्डर घ्यायला. ” टिना धावत आत गेली.
ॲार्डर्स घेताना आणि त्या भरताना तिचं त्या बाईकडे सतत लक्ष होतं. जरूर पडल्यास 9-1-1 ला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवायचा विचार करत ती काम करत होती. आता त्या बाईला आईस्क्रीम खाऊन मधे चाळीस मिनिटे गेली होती.
ती बाई गाडीतून उतरली व चालत आत गेली. ती टिनाला म्हणाली, “मी रिबेका बोनिंग. ” व तिने टिनाला मिठी मारली.
ती म्हणाली, “ टिना, तू आज वाचवलस मला ! मी हायवेवर गाडी चालवत कामाच्या मिटिंगसाठी निघाले होते. अचानक मला कसंतरी व्हायला लागलं. माझी ब्लड शुगर नक्की ड्रॉप झाली असणार कारण माझे हात पाय थरथरू लागले.. दरदरून घाम येऊ लागला.. हृदयाची गती खूपच वाढली होती. या सर्व लो ब्लडशुगरच्या खुणा आहेत हे मला माहित होते. तेवढ्यात हे बर्गर किंग दिसलं म्हणून मी इथे आले. एकसष्ट वर्षं वय आहे माझं.. पुढे काय झाले फारसे आठवत नाही. मागे एकदा असं झालं होतं.. मी काही ॲार्डर केलं का?”
“नाही.. तुला बोलता येत नव्हतं.. माझ्या नवऱ्याला पण डायबिटीस आहे. त्याची ब्लडशुगर ड्रॉप झाली की त्याला पण धड वाक्य पूर्ण करता येत नाहीत.. अशा वेळी पटकन शुगर द्यावी लागते त्यामुळे मला हा प्रकार चांगलाच माहित आहे. तेवढच मी केले.. विशेष काही नाही. ” टिना मनापासून म्हणाली.
आपल्याला असणाऱ्या माहितीचा एका व्यक्तीला डायबेटिक कोमामधे न जाऊ देण्यास उपयोग झाला म्हणून टिना आनंदात घरी आली.. घरी नवरा नैराश्यात बसला होता.. आपला काही उपयोग नाही कुणाला ही भावना हल्ली त्याला सतावत होती.
टिनानं त्याचे हात पकडले व ती म्हणाली, “ हनी, तुला वाटतं ना आपला काही उपयोग नाही? मग ऐक. तुझ्यामुळे आज एक व्यक्ती जगली आहे !” तिने सारी हकिकत त्याला सांगितली..
“आपण पैसे जमवून नक्की गाडी घेऊ. मी तुला कामावर पोचवून मग माझ्या कामाला जाईन म्हणजे तुला चालत जावं लागणार नाही.. तू काळजी करू नको ” म्हणत तिने एक अगदी जुनी गाडी फेसबुक मार्केटप्लेस वरून त्याला दाखवली.
“ममा, तू आम्हाला गाडीतून शाळेत पोचवशील?” मुलांनी विचारले. त्यांना नक्की पोचवेन म्हणत ती स्वयंपाकाला लागली.
दोन आठवड्यांनी एक दिवस सकाळी टिना कामाला जाण्यास निघाली. घराबाहेर पडताच अंगणात रिबेकाला बघून ती थक्क झाली. रिबेका एका नव्या चकचकीत गाडीत बसून आली होती.. त्या गाडीवर लाल रिबनचा बो लावला होता. अगदी गाड्याच्या शोरूममधून थेट टिनाकडे ती गाडी आली होती.
रिबेकाने गाडीच्या किल्ल्या टिनाच्या हातात दिल्या..
“टिना, ही आहे तुझी नवी गाडी ! तू मला ज्या दिवशी डायबेटिक कोमामध्ये जाण्यापासून वाचवलंस त्या दिवशी मी सोशल मिडियावर हा अनुभव शेअर केला.. माझ्याजवळ तुझ्यासाठी नवी गाडी घेण्याएवढे पैसे नव्हते म्हणून मी वाचकांना, तुझ्यासारख्या व्यक्तीला आपण गाडी देऊ शकतो का, विचारले आणि त्यांनी भरभरून देणग्या दिल्या ! त्या पैशातून तुला गाडी घेतली. तुझे आभार कसे मानायचे कळत नव्हते.. या गाडीच्या रूपाने मी माझी कृतज्ञता व्यक्त करत आहे ! या माझ्या पोस्टला ४८८, ००० लाइक्स आणि २०७, ००० शेअर आले होते !
टिना, तिचा नवरा आणि तीन मुले अवाक होऊन त्या चकचकीत नव्या गाडीकडे बघत होते ! एक स्वप्न साकार झालं होतं !
स्वतःचा काहीही फायदा नसताना केले गेलेले सत्कर्म कधीही वाया जात नाही. अगदी साध्या नोकरीमध्ये सुद्धा आपण एखाद्याचे भले करू शकतो कारण No job is too small !
आपले जीवन समृद्ध करणारे असे अनेक जीव जगात आहेत.. त्यांना धन्यवाद देण्याचा हा आठवडा आहे !
Happy Thanksgiving to all my readers!
लेखिका – सुश्री ज्योती रानडे
(दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमेरिकेत “कृतज्ञता दिवस ” (Thanks-giving Day) साजरा केला जातो. आपले आयुष्य समृद्ध करणाऱ्या व्यक्ती, घटना, अन्न, पाणी, निवारा अशा अनेक गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या आयुष्यात असे काही लोक येतात जे आपल्या ओळखीचे नसतात पण ते आपले आयुष्य बदलून टाकतात. कोविड काळात ईश्वराच्या वेशात आलेले डॉक्टर, नर्स, ॲम्ब्युलन्स-चालक वगैरेना कोण विसरेल? टिना हार्डी ही एक सामान्य मुलगी आहे. तिची आजची गोष्ट ही खरी घडलेली गोष्ट आहे.)
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈